नवीन लेखन...

श्रमाची प्रतिष्ठा!………………





‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’, किती साध्या, सरळ, सोप्या भाषेत किती मोठे तत्त्वज्ञान आपल्या संतांनी सांगून ठेवले आहे; परंतु आपल्याला साधी भाषा कळतच नसावी. एकतर आपल्या संतांचे साहित्य इंठाजीत नाही. ते ‘वेल पॉलिश्ड’ नाही. जड शब्दांचा सुळसुळाट त्यात नाही. हे तत्त्वज्ञान सांगणारे सुटाबुटातले झकपक नव्हते, त्यामुळे त्यांची किंमत नाही. इतकं हलकं अन्न आम्हाला अलीकडे पचेनासे झाले आहे. त्याचे परिणाम आज आपल्याला भोगावे लागत आहेत. ‘केल्याने होत आहे रे…’ आम्ही विसरलो, ‘आधी केले मग सांगितले’ याचेही आम्हाला विस्मरण झाले. आता आम्हाला सगळंच कसं आयतं पाहिजे. काही करायची आमची तयारी नसतेच, कुणीतरी करावं आणि आम्ही केवळ त्या कष्टाचा उपभोग घ्यावा, अशीच आमची इच्छा असते.
हा आजार आता सार्वत्रिक होत आहे आणि खूप बळावतदेखील चालला आहे. समाजाच्या सर्वच स्तरात ही बसून खाण्याची वृत्ती बोकाळत आहे. कष्ट करायला कुणीच तयार नाही. घामाचे मोल जाणून घेण्याची कुणाची इच्छा नाही. घाम येऊच दिला जात नाही. शारीरिक कष्ट ही अतिशय निम्नस्तराची बाब समजली जाते. ही सवय पूर्वी नव्हती. पूर्वी भाकर कष्टाचीच असायची. श्रमाला प्रतिष्ठा होती. आयतं बसून खाणाऱ्याला दूषणं दिली जायची. आता तसे राहिले नाही.
दोन एकर शेत असलेला शेतकरीही, मजूर मिळत नाही म्हणून डोक्याला हात लावून बसतो. दोन एकरात काम असे कितीसे असणार, तो एकटाच त्याच्या कुटुंबासह शेतातले सगळे काम सहज करू शकतो; परंतु त्याची तयारी नसते. मजूर मिळाले तरच त्याच्या शेतातील कामे पूर्ण होतील. मजूर मिळणार तरी कुठून? कामाची लाज सगळ्यांनाच वाटते. आम्ही काय घमेले, टोपले उचलण्यासाठी जन्माला आलो, हा अहंगंड सगळ्यांचाच मनात असतो. दुसरीकडचे जाऊ द्या, लोक आपल्याच घरातील आपलेच काम दुसऱ्यांकडून करून घेत असतात. मोलकरीण मिळाली

नाही तर घरातल्या बा

ची अवस्था किती केविलवाणी होते? बरं, केवळ मोलकरणीवरही भागत नाही, धुणेवाली बाईदेखील हवी असते. पूर्वी एकटी मोलकरीणच सगळी कामं करायची. आता त्यातही ‘स्पेशालायझेशन’ झाले आहे. भांडेवाली वेगळी, धुणेवाली वेगळी, झाडझूड करणारी वेगळी, कदाचित उद्या वाट्या घासणारी वेगळी, ताटं घासणारी वेगळी अशीही वर्गवारी होऊ शकते.
पुरुषही त्याला अपवाद नाहीत. कार्यालयात जातील तर आपली खुर्ची स्वत: साफ करणार नाहीत. चपराश्याला आवाज देतील. त्यातही वर्गवारी आहेच. खुर्ची साफ करणारा चपराशी पाणी आणून देणार नाही आणि पाणीवाला झाडूला हात लावणार नाही. कोपऱ्यावर जाऊन भाजी आणायची असेल तरी गाडीला किक मारली जाते. थोडंही पायी चालायची तयारी नसते. पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी दोन मिनिटे लागतात; परंतु तेवढे कष्ट करायचीही कोणाची तयारी नसते. लिफ्टची वाट पाहत पंधरा मिनिटे थांबतील, जातील मात्र लिफ्टनेच.
सांगायचे तात्पर्य कष्ट करण्याची सवयच हळूहळू लुप्त होत आहे. वरवर पाहता ही बाब फारशी गंभीर वाटत नाही. आहेत चपराशी तर आम्ही का आमची खुर्ची स्वत: स्वच्छ करावी, मिळतात मोलकरणी तर आम्ही का तसल्या कामात वेळ दवडावा, वाहनाची सुविधा आहे तर कशाला उगाच तंगड्या मोडत जायचे, हे तर्क तसे योग्यच वाटतात. परंतु थोडा खोलात जाऊन विचार केला तर असल्या तर्कांमुळे आपण आपले किती नुकसान करून घेत आहोत, हे लक्षात येईल.
सहज मिळत असतील तर सुविधांचा लाभ घेण्यात गैर काय, असे कुणालाही वाटेल; परंतु कालांतराने याच सुविधा आपल्याला कायमस्वरूपी अपंग करतात. एखाद्या दिवशी मोलकरीण आली नाही तर घराचा उकिरडा होऊन जातो. गाडीतले पेट्रोल संपले की चार पावलावरचे दुकानही चार मैलांवर असल्यासारखे वाटते. कष्ट करण्याची शरीराची सवयच नाहीशी झालेली असते. याचा परिणाम दूरगामी होऊ शकतो. दोन पिढ्यांपूर्वी हाताच्या बोटांवर हिशोब
करणारे लोक होते. पावकी, निमकी, दिडकीचे पाढे लोकांना पाठ असायचे. हिशोब करण्यासाठी कागद हातात घ्यायचीही गरज नव्हती. आता काय परिस्थिती आहे? कॅलक्युलेटर घेतल्याशिवाय साधी बेरीजही आजकालच्या मुलांना करता येत नाही. याला मानवी क्षमतेचा ऱ्हासच म्हणावा लागेल. पायऱ्या चढण्याची सवयच राहिली नाही तर उद्या कदाचित आपले पाय पायऱ्या चढण्याची क्षमताच गमावून बसतील.
पाश्चिमात्य देशात डायनिंग टेबलवरच जेवण घेतले जाते. त्या लोकांना मांडी घालून बसताच येत नाही. आपणही त्यांचेच अनुकरण करत आहोत. पुढच्या पिढीत कदाचित मांडी घालून बसणे हा प्रकारच बाद झालेला असेल.
कमावलेले शरीर आता केवळ ‘बॉडी बिल्डिंग’ स्पर्धांमध्येच दिसते. पूर्वी प्रत्येकाचे शरीर कमावलेले असायचे, कारण सगळेच शेतावर नाहीतर इतर कुठे कष्ट करायचे. आजकाल तर परिस्थिती अशी आहे की कष्ट करणाऱ्या मजुरांची हाडे मोजून घ्यावी लागतात. कळकट, तेलकट, मळकट, फुंकर मारला तरी उडून जाईल असा माणूस दिसला की नक्की समजावे तो मजूर आहे. सरकारी कृपेने शेतातून आता कसदार विष पिकवले जाते. या विषावर पोसले जाणारे सुदृढ राहतील तरी कसे? बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या’ अॅण्टिबायोटिक्स’वर जगणाऱ्यांची ही पिढी, कष्ट करणार तरी कसे?
हा झाला शारीरिक परिणाम. शरीराला कष्टाची सवय नसल्याचा मानसिक क्षमतेवरही परिणाम होत आहे. काम करण्यापेक्षा काम टाळण्याकडेच लोकांचा अधिक कल असतो. परवा एक ओळखीचे गृहस्थ भेटले. त्यांचा वीटभट्टीचा उद्योग आहे. छत्तीसगडला निघालो म्हणत होते. त्यांना मजूर हवे होते. इकडे मिळत नाही का असे विचारले असता. इकडच्या मजुरांचे नखरे झेलण्यापेक्षा तिकडचे मजूर परवडतात, असे ते म्हणाले. त्यात खोटं काही नाही. आपल्याकडच्या मजुरांना कामापेक्षा आपल्या हक्कांची अधिक काळजी असते. त्यांची कामं सरकारी स्टाईलने 11 ते 5 आणि त्यातही मध्ये द
न तासांचा ‘ब्रेक’ असे चालते. खासगी उद्योगात ही चैन मालकाला

परवडणारी नसते. शिवाय अंगावर पैसे घेऊन नंतर मालकाला आपल्यामागे फिरविण्याची

खोड या लोकांना असते. त्यापेक्षा बाहेरून मजूर आणलेले परवडतात. कामासाठीच ते येतात. त्यांचे पोट त्या कामावरच अवलंबून असते. त्यामुळे बाकीचे नखरे नसतात.
तात्पर्य, कष्ट करण्याची मानसिक तयारी नाही. काहीतरी करण्याची जी एक मूलभूत ऊर्मी असते तीच हळूहळू कमी होत आहे. आजकाल आपण पाहतोच की केवळ बोलणाऱ्यांची, सल्ले देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. प्रत्यक्षात काही करायला फारसे कुणी समोर येत नाही. सगळे नेते बोलघेवडे आहेत. शेतकऱ्यांसाठी हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, असं करू, तसं करू, प्रत्यक्षात कुणीच काही करत नाही. ‘श्रमप्रतिष्ठा’ ही संकल्पना महात्मा गांधींसोबतच संपली, असे वाटते. ही संकल्पना केवळ शारीरिक कष्टाशी निगडित नाही. स्वत:च्या प्रयत्नाने विपरीत परिस्थितीवर मात करण्याची जिद्द या संकल्पनेत समाविष्ट आहे. ही संकल्पना बाद झाली तर समाज अपंग आणि पुढे चालून गुलाम व्हायला वेळ लागणार नाही.

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..