प्रकाशन दिनांक :- 14/11/2004
मानव समूहाचा उल्लेख करताना ‘मनुष्य प्राणी’ हा शब्दप्रयोग केला जात असला तरी इतर प्राण्यांपेक्षा मनुष्य कितीतरी प्रगत, विकसित असल्याने ‘प्राणी’ या व्याख्येत त्याचा समावेश निश्चितच होऊ शकत नाही. मानवाचा हा विकास केवळ बौध्दिक प्रातांतच झाला असे नाही तर ज्याला निखळ मानवी म्हणता येईल अशा मूल्यांच्या, भावनांच्या संदर्भातही तो इतर प्राण्यांच्या तुलनेत खूप पुढारलेला आहे. भूक, भय, निद्रा आणि मैथुन या प्राण्यांच्या प्राथमिक स्तरावरील गरजा आहेत. मानवाने सहजीवनाची अधिक विकसित पातळी गाठताना या प्राथमिक गरजांना अनुलक्षून उच्चस्तरीय मूल्ये रुजविली. दया, परोपकार, प्रेम, क्षमा, सर्वांचे भले व्हावे, ही भावना विकसित मानवाला इतर प्राण्यांच्या तुलनेत कितीतरी पुढे घेऊन गेली. त्यामुळेच मानव सृष्टी निर्मात्याची सर्वश्रेष्ठ कलाकृती म्हणून मिरवू लागला; परंतु 21 व्या शतकात मोठ्या दिमाखाने पाऊल ठेवणारा मानव समाज आज खरोखर आपणच उभारलेल्या मूल्यांशी प्रामाणिक आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ पाहतोय. मानवी मूल्य म्हणून ज्या गुणांचा गौरवाने उल्लेख केला जातो ते गुणच आज मानव समूहातून हद्दपार होताना दिसत आहेत. ही परिस्थिती जेवढी गंभीर तेवढीच चिंतनीय आहे.
सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्ती अनादिकाळापासून मानवी समाजात अस्तित्वात होत्या, परंतु त्यांचे तुलनात्मक प्रमाण आजच्या इतके व्यस्त कधीच नव्हते. सज्जन, प्रामाणिक, पापभिरु, देवभोळ्या माणसांचे प्राबल्य अधिक असायचे. समाजात त्यांना मान-सम्मान असायचा आणि अशा लोकांच्या प्राबल्यामुळेच मानवी समाज खऱ्या अर्थाने मानव म्हणून घेण्याच्या योग्यतेचा होता. आज मात्र परिस्थिती अगदी विपरीत आहे. आज समाजावर प्रभुत्व आहे ते छाकट्या, बेगडी लोकांचे. सज्जनतेचा मुखवटा घालून स्वार्थ साधणाऱ्यांच्या टोळ
यांनी आज संपूर्ण मानवी सभ्यता धोक्यात आणली आहे. दयेच्या, परोपकाराच्या एवढेच काय तर देव भक्तीच्या व्याख्यासुध्दा आता बदलू लागल्या आहेत. देवाचे नामस्मरण करीत
इमाने-इतबारे आपले काम करणाऱ्या, कर्मालाच
भक्ती मानणाऱ्या देवभोळ्या सज्जन लोकांचे हाल कुत्रा खात नाही, असे अनेकदा पाहण्यात आलेय. तर दुसरीकडे धार्मिकतेचा-भक्तीचा व्यापार करणाऱ्यांची श्रीमंती मात्र गुणाकाराच्या पटीने वाढत आहे. मोठमोठ्या महाराज, कथाकार-प्रवचनकारांचे ऐश्वर्यसंपन्न धार्मिक सोहळे आयोजित करणाऱ्यांच्या नावावरुन साधी नजर टाकली तर ईश्वराच्या भक्तीचाही ठेकेदारी पध्दतीने कसा लिलाव चालला आहे ते लक्षात येते. देवानेही भक्तीचे ‘टेंडर’ मागवायला सुरुवात केली आहे की काय, अशी शंका आता येऊ लागली आहे. कष्टाच्या कमाईतून अर्धी भाकर खाणे जिथे सामान्य लोकांना शक्य होत नाही तिथे दिखाऊ धार्मिकतेवर लाखोंची उधळण करणाऱ्यांची नीती आणि नियती किती प्रामाणिक असेल, याची कल्पना करवत नाही; परंतु हीच मंडळी आज समाजात प्रतिष्ठित, मोठी माणसं म्हणून मिरवीत असतात. सत्ता, संपत्ती आणि अधिकाराची सर्वच सूत्रे यांच्या हाती असतात आणि सज्जन प्रामाणिक माणूस मात्र आपल्या आयुष्याची ठिगळे जोडीत खुरडत-खुरडत जगत असलेला बहुतांश दिसतो. त्यांच्या सज्जनतेची, प्रामाणिकतेची तर ही शिक्षा नव्हे, असे आपल्याला वाटून जाते. मानवी मूल्य जोपासण्याच्या नादात त्यांना आयुष्याचे मोल चुकवावे लागते आणि हीच मानवी मूल्ये आपल्या दिवाणखान्यातील ‘शोकेस’ मध्ये ठेवणारे लोकं मात्र समाजात उजळमाथ्याने प्रतिष्ठित म्हणून वावरताना पाहण्यात येते. विठ्ठलाचे नामस्मरण करीत शेतात राबणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या पायात काटे बोचतात आणि सप्ताह -सत्संगाच्या माध्यमातून भक्तीचे दिखाऊ प्रदर्शन मांडणाऱ्यांच्या पायदळी मात्र मऊ गालीचे असत
ात. सज्जनतेला गरिबीचा शाप आणि छाकटेपणाला मात्र श्रीमंतीचे वरदान, हाच कदाचित कलियुगाचा न्याय असेल आणि जर हाच न्याय असेल तर त्यापेक्षा मोठा अन्याय दुसरा असू शकत नाही.
सगळीकडे सध्या नाटकबाजीला उ*त आला आहे. नकली चेहऱ्यांचा सर्वत्र सुळसुळाट झाला आहे. धार्मिकता, भक्ती, समाजसेवा, राजकारण अगदी वैचारिक प्रबोधनातही नाटकी बडेजाव शिरला आहे. या नटमंडळींचे खरे अंतरंग वेगळेच असते आणि वरचा मुलामा मात्र अतिशय आकर्षक असतो. आपल्यापेक्षा मोठा भक्त, आपल्यापेक्षा थोर समाजसेवक, आपल्यापेक्षा द्रष्टा राजकारणी दुसरा कुणीच नाही, असेच सगळ्यांना वाटत असते आणि या दिखाऊ लोकांच्या भाऊगर्दीत अस्सल मात्र कुठेतरी हरवून गेलेले पाहण्यात येते. या संदर्भात एक पौराणिक उदाहरण अप्रस्तुत ठरु नये. नारद मुनींना आपल्या ईश्वर भक्तीचा फार अहंकार होता. ‘नारायण-नारायण’ असा सतत जप करणारा आपल्यासारखा दुसरा भक्त असूच शकत नाही, याची नारदमुनींना खात्री होती. तरीसुध्दा एकवेळ प्रत्यक्ष भगवंतालाच विचारलेले बरे, या उद्देशाने त्यांनी एक दिवस भगवान विष्णूंना सहज विचारले,’तिन्ही लोकांत आपला सर्वश्रेष्ठ भक्त कोण?’ नारदांनी सहज विचारले आणि भगवंतांनीदेखील तितक्याच सहजपणे उत्तर देत, पृथ्वीवरील एक गरीब शेतकरी आपला सर्वश्रेष्ठ भक्त असल्याचे सांगितले. भगवंताच्या उत्तराने नारद अवाक झाले. त्यांचा पुरता जळफळाट झाला. तो शेतकरी आपल्यापेक्षा श्रेष्ठ भक्त कसा, हे पाहण्यासाठी नारद पृथ्वीवर आले. त्यांनी पाहिले की तो शेतकरी सकाळी उठल्यावर एकदा, दुपारी शेतात भाकरतुकडा खाण्यापूर्वी एकदा आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा असे दिवसातून केवळ तीन वेळा भगवंताचे नाव घेतो, एरवी तो सतत आपल्या कामात व्यस्त असतो. आपण रात्रंदिवस भगवंताचे नामस्मरण करतो तरी दिवसातून केवळ तीन वेळा भगवंताचे स्मरण करणारा आपल्
ापेक्षा श्रेष्ठ कसा, असा प्रश्न नारदाला पडला. आपली तक्रार घेऊन ते परत विष्णूकडे आले. भगवंतांनी तक्रार ऐकली आणि योग्य वेळी आपण उत्तर देऊ, असे सांगून नारदाची बोळवण केली. दरम्यान, काही काळ लोटल्यानंतर एके दिवशी सकाळीच भगवान विष्णूने नारदाला पाचारण केले, त्यांच्या हातावर तेलाने काठोकाठ भरलेली वाटी ठेवली आणि सांगितले की, संध्याकाळपर्यंत ही वाटी सांभाळायची आणि त्यादरम्यान एक थेंबही वाटीतून सांडायला नको. भगवंताची आज्ञा म्हणजे नारदासाठी जीव की प्राण होती. संध्याकाळी अगदी तशीच भरलेली वाटी घेऊन नारद भगवंतासमोर उपस्थित झाले.
भगवंताने सोपविलेली जबाबदारी आपण यथायोग्य पार पाडल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर
झळकत होते. अगदी तशीच भरलेली वाटी पाहून भगवंत म्हणाले की, काम तर अगदी व्यवस्थित पार पडले, आता फक्त एवढेच सांग की या दरम्यान तू माझे नामस्मरण किती वेळा केले? भगवंताच्या प्रश्नावर नारद उत्तरले,’माझे सगळे लक्ष त्या वाटीतून तेल न सांडण्यावर केंद्रित झाले होते, त्यामुळे तुमच्या नामस्मरणाचा मला विसरच पडला,’ त्यावर भगवान म्हणाले की, आता तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. तो शेतकरी किमान तीन वेळा तरी माझे नाव घेतो, तू तर एकादाही घेतले नाही. कथा पौराणिक असली तरी त्यातला आशय सार्वकालिक आहे. आज ही भक्तीचे देव्हारे माजविणाऱ्यांचा अहंकार नारदाइतकाच तीप आहे. केवळ भक्तीच नव्हे तर सर्वच क्षेत्रात अशा दिखाऊ, छाकट्या लोकांचीच चलती आहे. त्या शेतकऱ्यांसारखा खरा भक्त, प्रामाणिक, पापभिरु माणूस मात्र उपेक्षेचे जीवन जगत आहे. ईश्वरी न्यायातही कुठेतरी चूक होत आहे असे वाटते. सज्जनता, प्रामाणिकपणा अपराध ठरावा अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. या पापभिरु, सज्जन लोकांची प्रामाणिकता पायात गाडून दुर्जनांच्या श्रीमंतीचे इमले उभे राहत आहेत. ही परिस्थिती आहे
शीच कायम राहिल्यास निकट भविष्यातच आपली ओळख आधी ‘मानवप्राणी’ आणि नंतर नुसते प्राणी म्हणून प्रस्थापित होईल, यात शंका नाही. प्राण्यांकडून मानवाकडे झालेली वाटचाल आता कदाचित उलट दिशेने सुरु झाली असावी. जर सज्जनता, प्रामाणिकपणा अपराध ठरु लागत असेल आणि म्हणून सज्जनांनी व प्रामाणिक माणसांनीही छाकटेपणाचा मार्ग धरला तर समाजाचे काय होईल? हा विचार करण्याची वेळ आली आहे.
— प्रकाश पोहरे
Leave a Reply