प्रकाशन दिनांक :- 07/11/2004
एका शहरात अनेक वर्षापासून व्यवसाय करणाऱ्या माणसाने आपल्या एकुलत्या एका मुलाला डॉक्टर बनविले. खाजगी मेडिकल कॉलेजचे डोनेशन, फी वगैरे सर्व 40-50 लाख खर्च झाला. बापाच्या इच्छेनुसार मुलगा डॉक्टर झाला. मुलाने दवाखाना लावला. शहरातील एक श्रीमंत व्यक्ती त्या डॉक्टरांकडून उपचार घेण्याकरिता आली. डॉक्टरांनी त्या श्रीमंत व्यक्तीला तपासले. आजाराचे स्वरुप फारसे गंभीर नव्हते. अनेक वर्षे टिकून राहावा असाही त्यांचा आजार नव्हता. त्या तरुण डॉक्टर मुलाने योग्य निदान केले, योग्य औषधी दिली. थोड्याच दिवसात ती श्रीमंत व्यक्ती ठणठणीत बरी झाली. मुलाने मोठ्या कौतुकाने आपल्या वडिलांना आपल्याकडे उपचार घेत असलेल्या त्या श्रीमंत रुग्णाला आठ दिवसात कसे ठणठणीत केले ते सांगितले. मुलाचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतल्यानंतर वडील शांतपणे एवढेच म्हणाले, ‘असला मुर्खपणा यापुढे करु नको. तुझे मेडिकलचे महागडे शिक्षण झाले आहे, दवाखान्याचा एवढा मोठा व्याप सांभाळायचा, पैसा कमवायचा असेल तर या धंद्याचे काही संकेत तुला समजून घ्यावे लागतील. तुझे खरे शिक्षण तर आता सुरु होतेय. लोकांचे आणि त्यातही श्रीमंतांचे आजार असे झटपट बरे होऊ लागले तर आपले आरोग्य कसे सुदृढ राहील?’
आपले आर्थिक आरोग्य सुदृढ राखायचे असेल तर समाज निरोगी ठेवून चालणार नाही, केवळ वैद्यकीयच नव्हे तर इतर अनेक व्यवसायांचा हाच पायाभूत सिद्धांत झाला आहे. वास्तविक वैद्यकीय, शिक्षकी अशा क्षेत्रांकडे सेवाभावी वृत्तीचा पेशा म्हणून बघितल्या जाते. पैसा कमाविण्याला या व्यवसायात दुय्यम स्थान दिले जाते. परंतु ज्या काळात हे व्यवसाय सेवाभावी वृत्तीचे होते, ज्या काळात पैशापेक्षा सेवा महत्वाची मानली जायची तो काळ केव्हाच इतिहासजमा झालेला आहे. बाजारु व्यावसायिक वृत्तीने या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात
शिरकाव केला आहे. सरकारी मेडिकल कॉलेजऐवजी खाजगी मेडिकल कॉलेजेस राजकारण्यांनी सुरु केल्यामुळे सर्व
गणितच बिघडले आहे. व्यवसायाचा
किंवा पेशाचा धंदा झाला की नीतिमत्तेची सगळी गणिते कोलमडून पडतात. पैसा कमाविणे हेच एक ध्येय ठरते आणि हे ध्येय गाठण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब मग निषिद्ध ठरत नाही. वैद्यकीय आणि शिक्षण व्यवसायाला खूप मोठा इतिहास आहे. सेवाभावी वृत्तीच्या लोकांनी या व्यवसायाला समाजात खूप आदराचे स्थान प्राप्त करुन दिले आहे. डॉक्टरांना देवाचे आणि शिक्षकांना मातापित्यांच्या सोबत आदराचे स्थान त्यामुळेच मिळाले आहे. परंतु व्यावसायीकरण आणि जागतिकीकरणाच्या या युगात आता कोणत्याही क्षेत्राला आपले पावित्र्य सांभाळणे कठीण जात आहे. व्यावसायिक वृत्तीच्या नावाखाली जी जीवनमूल्ये नव्याने प्रस्थापित होवू पाहात आहेत त्या जीवनमूल्यांना संस्कृती आणि सभ्यतेचा कुठलाही पाया नाही. समाजाती शोषण करुन आर्थिक प्राप्ती करणे एवढे एकच तत्व या आधुनिक जीवनमूल्यात समाविष्ट आहे. आर्थिक संपन्नता प्राप्त करणे हा प्रत्येकाचा अधिकार असला तरी ही संपन्नता कोणत्या मार्गाने आणि व्यवसाय करुन यावी याचा विधिनिषेध बाळगला गेलाच पाहिजे. तसे झाले नाही तर आर्थिक विषमतेची समस्या वेगळे वळण घेवू शकते. कोणतीही व्यवस्था शोषणावर आधारित असली तर त्या व्यवस्थेचे भवितव्य कधीच उज्वल असू शकत नाही. त्यामुळेच पैसा मिळविताना आपण कुणाचे अधिकार, कुणाचे हक्क अथवा कुणाला न्याय तर नाकारत नाही ना, याची काळजी घेतली जाणे आवश्यक ठरते. तसे झाले नाही तर नाकारलेल्यांचा असंतोष एखादेवेळी विस्फोटक रुपात प्रगट होवू शकतो. हे भान निव्वळ पैसा कमाविणे या एकमात्र ध्येयाने पछाडलेल्या नवश्रीमंतांनी राखायलाच हवे. आजकाल बहुतेक डॉक्टर मंडळी अतिशय व्यावसायिक झालेली दिसतात. रुग्ण त्यांच्या
साठी केवळ एक गिऱ्हाईक असतो. त्याच्यावर उपचार करताना डोक्यात पैशांची आकडेमोड सातत्याने चाललेली असते. रुग्णाचा आजार त्यांच्या आर्थिक आरोग्यासाठी जणू वरदान ठरत असतो. या आत्यंतिक टोकाच्या व्यावसायिक वृत्तीमुळे पवित्र अशा वैद्यकीय पेशातील मानवीमुल्ये आज हरविल्यात जमा आहे.
पूर्वी रुग्णांना देव वाटणारा डॉक्टर आज कसाई वाटू लागला आहे. अर्थात सर्वच क्षेत्रात आढळतात त्याप्रमाणे या क्षेत्रातही काही सन्माननिय अपवाद असतील, नव्हे आहेतच; आणि ते निष्ठेने आपले सत्व, तत्व राखण्याचा प्रयत्नही करीत आहेत; मात्र एकंदरितच गदारोळात ते आक्रसून जात आहेत. परंतु अपवादांचा अपवाद वगळता बहुतेक मंडळींनी व्यवसायाच्या नावाखाली शोषणाची एक नवी सुदृढ व्यवस्था उभी केली आहे. अलिकडे तर हे शोषण अगदी साखळीपद्धतीने केले जाते. वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित असलेल्या इतर घटकांनाही या साखळीत सामावून घेतल्या गेले आहे. साखळी पद्धतीने होणारे हे शोषण अक्षरश: घृणास्पद आहे. रुग्ण आणि त्याच्यासोबत त्याच्या नातेवाईकांची असहाय फरफट, पैशाची जुळवाजुळव करताना त्यांचे होणारे हाल आणि इतके करुनही शेवटी योग्य उपचार होतीलच याची नसलेली खात्री; कोण डॉक्टरांना देव मानण्याची हिंमत करेल? खेड्यापाड्यातील गरीब रुग्णांकडे वाहनाची सोय नसेल तर जमेल त्या मार्गाने, अगदी म्हशीच्या पाठीवर बसून जाणारे डॉक्टर आम्ही पाहिले आहेत. गरीब रुग्णांवर मोफत उपचार करताना आपण काही उपकार करीत असल्याचे लेशमात्रही भाव चेहऱ्यावर नसणारे डॉक्टरदेखील आमच्या पाहण्यात आहेत. अशा डॉक्टरांनीच या व्यवसायाला समाजात देवत्व प्राप्त करुन दिले. त्यांना पैशाची गरज नव्हती, असे नाही परंतु निव्वळ पैसा कमाविणे हे त्यांचे जीवन ध्येय नव्हते आणि कदाचित म्हणूनच ती मंडळी जीवनात सर्वच दृष्टीने यशस्वी ठरली. आता मात्र जगण्या
्या सगळ्या संकल्पनाच बदलल्या आहेत. भौतिक सुख सर्वोतोपरी प्रमुख ठरल्याने पैसा देव झाला आहे. या देवाची आराधना करण्यासाठी ‘नरबळी’ चढवायलाही आज कुणी मागेपुढे पाहात नाही. शहरातून सहज फेरफटका मारला तर चौकाचौकात असलेला दवाखान्यात डॉक्टरांच्या वेदीवर असहायपणे आपली मान ठेवण्यास तयार असलेल्या रुग्णांची भरमसाठ गर्दी दिसून येईल. एक हात खिशातील पैशावर तर दुसरा डोक्याला लावून बसलेले हे लोक आता
पुढे काय वाढून ठेवले आहे याची अगतिकपणे वाट पाहात
असतात. पूर्वी डॉक्टरांना केवळ पाहिल्यानंतर अर्धा आजार दूर पळाल्याची भावना रुग्णाच्या मनात निर्माण व्हायची, आता डॉक्टरांचे बील कसे फेडायचे या संभाव्य काळजीने दवाखान्यात गेल्यावर नसलेला आजार बळावण्याची शक्यता असते. रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन देणारी चकचकीत हॉस्पीटल्स मुळात रुग्णांच्या माध्यमातून समाजाचे शोषण करणाऱ्या पॉश छळछावण्या ठरल्या आहेत. मोठमोठ्या हॉस्पीटल्समधील भफबाज दिखावूपणाला बळी पडून सामान्य रुग्ण बिलाची रक्कम योग्यच असल्याचा समज करुन घेतो. काही दवाखान्यात तर बिलाची रक्कम हजारापासुनच सुरु होते. अशा दवाखान्यात अपचार करुन घेणे, हजाराने किंवा लाखाने डॉक्टरांचे बील देणे नवश्रीमंतासाठी आज एक स्टेटस् सिम्बॉल बनले आहे. अमुक एका हॉस्पीटलमध्ये आपण ट्रिटमेंट घेतली असे सांगणे त्यांच्यासाठी फुशारकीचे ठरले आहे. रुग्णांचा आर्थिक छळ करणाऱ्या या छळछावण्यात फसवणूक जितकी चकचकीत, पॉश असते तितकीच माणूसकी दिनवाणी असते. वास्तविक रुग्णांचे आजारपण हे डॉक्टरांच्या आर्थिक मिळकतीचे माध्यम असले तरी हे आजारपण कायमस्वरुपी नष्ट करणे हे देखील डॉक्टरांचेच कर्तव्य ठरते. अशा परिस्थितीत रुग्णाला योग्य मार्गदर्शन, मानसिक आधार देणे डॉक्टरांकडून अपेक्षित आहे. परंतु अगदी सुरुवातीला सांगितल
याप्रमाणे धंद्याच्या गणितात हे बसत नाही. आजकाल तर धर्मार्थ म्हणून चालविल्या जाणाऱ्या काही दवाखान्यातही पैसा कमाविणे हाच एक धर्म उरला आहे. अर्थात सगळीकडेच अशी परिस्थिती नाही. डॉक्टरी व्यवसायातील सामाजिक संवेदना जिवंत ठेवणारी बरीच मंडळी अद्यापही या क्षेत्रात कार्यरत आहे. नागपुरजवळच्या दाभा येथील ‘आंतरभारती आश्रम’चे भाऊ झिटे सेवाभावी वृत्तीने दवाखाना चालविताना रुग्णांना केवळ मोफत किंवा माफक दरात औषधे देत नाहीत तर आजार पुन्हा होवू नये म्हणून त्यांना आहारविषयक योग्य माहिती, दैनंदिन व्यवहारात पाळावयाची पथ्ये आणि सर्वाधिक महत्वाचे म्हणजे मानसिक धीर देतात.
आजारी रुग्णांवर उपचार करणे म्हणजे केवळ औषधी, गोळ्या आणि इंजेक्शनचा मारा करुन आजार काबूत आणणे नव्हे तर त्या आजाराची कारणे समूळ नष्ट करण्यासोबतच पुन्हा तसल्या आजाराने आक्रमण करु नये म्हणून योग्य मार्गदर्शन करणे ठरते. उपचाराची ही व्याख्या अलिकडच्या किती ”बनिया वृत्तीच्या” डॉक्टरांना मान्य आहे? त्यांच्या लेखी केवळ औषध, गोळ्या, इंजेक्शन यांचा अव्याहत आणि बरेचदा अवास्तव मात्र ”अर्थपूर्ण” मारा म्हणजेच उपचार ठरतो. औषधी कोणत्या कंपनीची द्यावी हे सुद्धा त्या कंपनीकडून मिळणाऱ्या पर्सेंटेजवर अवलंबून असते. वेगवेगळ्या अनावश्यक तपासण्यामागील ”अर्थशास्त्र” सामान्य रुग्णाच्या आकलन शक्तीबाहेर असते. तो बिचारा डॉक्टरला देव मानण्याची चूक करुन बसला असतो. या देवभोळ्या रुग्णांच्या भरवशावरच आज ठिकठिकाणी पंचतारांकित हॉस्पीटलस् उभी झाली आहेत. पूर्वी पंचतारांकित हा शब्द केवळ हॉटेल व्यवसायाशी निगडीत होता. आता मात्र दवाखानेसुद्धा पंचतारांकित, सप्ततारांकित होवू लागले आहेत. पंचतारांकित हॉटेल लावल्यापेक्षा हॉस्पीटल काढलेले बरे असे ह्या ”बनिया” वृत्तीच्या मंडळींना वाटते. कारण हॉटेलमध्
े ठााहकाचे कोण नखरे! बाथरुम ठीक नाही; टॉवेल स्वच्छ नाही, चादर स्वच्छ नाही, सव्र्हिस बरोबर नाही, परिचारक आला नाही, ए.सी. बरोबर चालत नाही; फोन हवा, जेवणात हे हवे अन् ते नको. वरुन सरकारी इन्स्पेक्टर्स, कायदे, कानुन आणि सेवा कर वगैरे कटकटी सांभाळा; व्यावसायिक स्पर्धा करा. त्यापेक्षा हॉस्पीटल बरे; वर उल्लेखित कुठलीही गोष्ट कशीही असू द्या, ठााहक (सॉरी) पेशंट निमुटपणे सहन करतो. हाक ना बोंब. आज अनेक शहरात डेंग्यु, मलेरिया व्हायरल फीव्हर, कावीळ इत्यादी रोगांनी आम्ही प्रगतीकडे जात आहोत की अधोगतीकडे असे वाटण्याची वेळ आली आहे. मात्र ह्या आजाराच्या मुळाशी नगरपालिका, महानगर पालिकाच्या तुंबलेल्या नाल्या; उकीरडे; धूळ तसेच नागरिकांची बेदरकार, बेजबाबदार वृत्तीच कारणीभूत आहे म्हणून सामाजिक जबाबदारी समजून डॉक्टरांच्या किती संघटनांनी नपा, मनपावर मोर्चे काढले, निवेदने दिली? जनजागृती केली? बहुतेक नाही. किंबहुना हे असेच रहावे असे ह्यातील बहुतेक मंडळींना वाटत असावे. असे म्हणण्याची वेळ आली आहे. व्यवसाय आणि सेवाभाव ह्यातील सिमारेषा पुसट नव्हे जवळपास नष्टच झाल्या आहेत. त्याचीच ही परिणती.
— प्रकाश पोहरे
Leave a Reply