नवीन लेखन...

सुपारीबाज नेते!

अलीकडील काळात भारतातले अनेक उद्योग झपाट्याने बंद पडत असले, उद्योजक बेकार होत असले तरी एक धंदा मात्र अगदी जोरात सुरू आहे आणि त्या धंद्याला मरणही नाही, कुठला धंदा म्हणून काय विचारताय? अहो, तो धंदा म्हणजे राजकारण! पावसाळ्यातील छत्र्यांसारखे आपल्याकडे नेते उगवत असतात. जनतेचे, जनतेचे म्हणण्यापेक्षा स्वत:चे जे काही बरे-वाईट करायचे ते करून पुन्हा लुप्त होतात. परत कधी अनुकूल परिस्थिती लाभली तर पुन्हा जोमाने उभे राहतात. अशा या मोसमी नेत्यांनीच राजकारणाचे आणि राजकारणासोबतच जनतेचेही मातेरे केले आहे. शेतकऱ्यांच्या नशिबी तर कायमच असे संधिसाधू नेते आले आहेत. काहींनी शेतकऱ्यांच्या जिवावर आपले उखळ पांढरे करून घेतले आणि आता दुसऱ्या धंद्याला लागले, तर काही अजूनही शेतकऱ्यांच्याच मानगुटीवर बसलेले आहेत. अशा नेत्यांचा मेरुमणी म्हणून शेतकऱ्यांचे कथित मसिहा शरद जोशी खासच शोभून दिसतात. या कमालीच्या स्वार्थलोलुप माणसाला प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना गंडवणे कसे जमते, हे त्याचे त्यालाच ठाऊक! अमेरिकेत जागतिक बँकेत नोकरी करणारा हा माणूस भारतात आला तोच मुळी या बँकेचा एजंट म्हणून! अर्थात ही भूमिका त्यांनी खुल्या दिलाने पार पाडली असती तर कोणाचा आक्षेप असण्याचे कारणच नव्हते. अनेक विदेशी कंपन्यांचे एजंट आपल्या कंपनीच्या प्रचारासाठी भारतात येतच असतात, परंतु शरद जोशींनी आपल्या मूळ उद्देशाला शेतकऱ्यांच्या हिताचे आच्छादन घातले आणि नंतर सुरू झाला तो एका दीर्घकालीन बोगस आंदोलनाचा फार्स! या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे मसिहा ही प्रतिमा उभी करण्यात सुरुवातीच्या काळात शरद जोशींना चांगलेच यश आले. शेतकरी संघटनेचा जोमाने प्रसार झाला. शेतकऱ्यांनाही आपल्याला एक विद्वान नेता लाभला असे वाटू लागले. अशा प्रकारे शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर हळू हळू जोशीबुवांनी आपले अंतरंग उघड करण्यास सुरुवात केली, अर्थात शेतकरी हिताचा बुरखा कायम ठेवूनच! अमेरिकेला, जागतिक बँकेला भारताची बाजारपेठ खुणावत होती, आजही खुणावत आहे. या बाजारपेठेवर आपला एकाधिकार प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेला आधी इथली ठाामीण अर्थव्यवस्था मोडीत काढणे भाग होते. शेतकरी या ठाामीण अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू होता. या शेतकऱ्यालाच कफल्लक करून देशोधडीला लावण्याचे दीर्घकालीन षड्यंत्र आखल्या गेले. शरद जोशींसारखी माणसे त्यासाठीच पेरण्यात आली. खाल्ल्या मिठाला जागत शरद जोशींनीही शेतकऱ्यांवरील आपल्या प्रभावाचा वापर करीत शेतकऱ्यांची दिशाभूल करायला सुरुवात केली. डंकेल प्रस्तावाचे गुणगान ते गाऊ लागले. जागतिकीकरणाची वकिली त्यांनी सुरू केली. आधुनिक शेतीचा महामंत्र शेतकऱ्यांना ते देऊ लागले. भारतीय शेतकऱ्याने जागतिक स्पर्धेत उतरलेच पाहिजे आणि त्यासाठी अत्याधुनिक तंत्राने शेती करणे भाग आहे, असा मौलिक सल्ला शरद जोशींनी शेतकऱ्यांना दिला. तुमचा शेतमाल निर्यात होईल, जागतिक बाजारपेठेत पोहोचेल, आर्थिक समृद्धीची गंगा तुमच्या शिवारात खेळू लागेल, असे मोहक आणि तितकेच फसवे चित्र त्यांनी शेतकऱ्यांसमोर उभे करायला सुरुवात केली. त्याचवेळी शेतकऱ्यांवरील आपला प्रभाव कायम राखण्यासाठी अधूनमधून लहान-मोठी आंदोलने ते करीतच होते. त्यांच्या आंदोलनाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे एकही आंदोलन यशस्वी ठरू शकले नाही. त्यामागचे मुख्य कारण हेच होते की, स्वत: शरद जोशींनाच आंदोलन यशस्वी करण्यात रस नव्हता. त्यामुळे अनेक आंदोलने ऐन निर्णायक टप्प्यावर गुंडाळण्यात आली. ही आंदोलने अशी अर्धवट अवस्थेत का गुंडाळल्या जात आहेत, याचा विचार तेव्हा फारसा कुणी केला नाही. शरद जोशी या नावाची मोहिनी लोकांना, विशेषत: शेतकऱ्यांना, असा विचार करायची संधीच देत नव्हती. कालांतराने शरद जोशींच्या आंदोलनांचा, त्यांच्या नेतृत्वाचा फोलपणा लक्षात येऊ लागल्यानंतर प्रल्हाद पाटील कराळ, माधवराव मोरे, नरेंद्र अहिरे, विजय जावंधियांसारख्या एके काळच्या त्यांच्या कट्टर समर्थकांनी शेतकरी संघटनेपासून फारकत घ्यायला सुरुवात केली. शरद जोशींना शेतकऱ्यांच्या हितात स्वारस्य नाही, हे हळूहळू उघड होऊ लागले. त्यांना इथल्या शेतकऱ्यांना एका गुंगीत ठेवून बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या फासात अडकवायचे होते. रासायनिक आणि अती खर्चीक शेतीच्या नादी लागून इथला शेतकरी कफल्लक झाल्यावरच त्यांचे ‘मिशन’ पूर्ण होणार होते. त्यांच्या दुर्दैवाने आणि शेतकऱ्यांच्या सुदैवाने हे ‘मिशन’ पूर्ण होण्याअगोदरच माझ्यासह श्रीकांत तराळ, पाशा पटेल, शंकर धोंडगे, किशोर माथनकर, संध्याताई इंगोले, रेखाताई ठाकरे, रावसाहेब काम्बे, मनोज तायडे, लक्ष्मण ओंगे, राजू शेट्टी, आशाताई तराळ, अरविंद नळकांडे, संजय कोल्हे अशा अनेक शेतकरी संघटनेच्या खंद्या लढवय्यांना या घातक ‘मिशन’ची कल्पना आल्याने नंतर संघटनेला रामराम ठोकला आणि संघटना खिळखिळी झाली. जेव्हा संधी मिळेल तेव्हा हाताशी असलेल्या आपल्या मूठभर सोबत्यांच्या साहाय्याने आपले ‘मिशन’ पुढे दामटण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. प्रत्येक वेळी एक नवे आंदोलन उभारायचे आणि ते शेवटाला जाण्यापूर्वीच गुंडाळून दुसऱ्या आंदोलनाकडे वळायचे, ही ‘मोडस ऑपरेंडी’ कायमच होती. अगदी अलीकडे शरद जोशींना रामराम ठोकून आपल्या कार्यकर्त्यांसह मोरेश्वर टेंभुर्णे पाटीलही रा.काँ.वासी झाले. शरद जोशींना खरोखरच शेतकऱ्यांचे हित साधायचे होते, तर त्यांनी शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा म्हणून संसदेत आवाज का उठविला नाही? ज्या आधुनिक शेतीचा ते पुरस्कार करतात त्याच आधुनिक शेतीने शेतकऱ्यांना कर्जाच्या जाळ्यात आणि पुढे आत्महत्येच्या पाशात ढकलले, ही वस्तुस्थिती मान्य करायला शरद जोशी तयार आहेत का? तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा आवाज ते संसदेत मोठा करणार आहेत का? किंवा त्याकरिता कोर्टात एखादी जनहित याचिका ते टाकणार का? ”शिवार” करिता जमा केलेले भाग भांडवल तरी ते व्याजासह परत करणार आहेत का? ज्या बी.टी. बियाण्यांची त्यांनी भलावण केली त्या बी.टी. बियाण्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक झाली, हे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांनी मान्य केले आहे. शरद जोशीही हे मान्य करायला तयार  आहेत का? आणि तयार असतील तर ही बियाणी भारतात ‘प्लाॅन्ट’ करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध ते आवाज उठवणार आहेत का? किमानपक्षी विदेशी शेतमाल, विशेषत: कापूस भारतात येऊ नये म्हणून त्यावर आयात कर किमान 60-70 टक्के वाढवावा ह्याकरिता जोशीसाहेब काही आवाज उठवणार आहेत काय? असे काहीही होणार नाही. आता शेतकऱ्यांचे कर्जमुक्ती आंदोलन उभारण्याचे नवे नाटक शरद जोशी करू पाहत आहेत. मुळात शेतकऱ्यांना कर्जाच्या दलदलीत ढकलणारे आधुनिक शेतीचे बोगस तत्त्वज्ञान शेतकऱ्यांच्या गळी उतरविण्याचे पाप शरद जोशींनीच केले. डंकेल प्रस्तावाची वकिली करून त्यांनीच भारतीय शेती उद्योग बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हवाली करण्याचे कारस्थान केले. ज्या मुक्त अर्थव्यवस्थेची शरद जोशी भारतात भलावण करत आहेत, ती मुक्त अर्थव्यवस्था जगाच्या पाठीवर कुठेही नाही. अगदी अमेरिकेतही शेतकऱ्यांना आणि शेती उत्पादनाला सरकारचे संरक्षण आहे. कोणत्याच देशाने आपले दरवाजे विदेशी शेतमालासाठी सताड उघडलेले नाहीत. भारतानेच तसे करावे हा आठाह शरद जोशींसारखी मंडळी का धरताहेत? शेतकऱ्यांची वैचारिक दिशाभूल करण्यातून शरद जोशींना नेमके काय साधायचे आहे? आपल्या नेतेगिरीचे दुकान व जागतिक बँकेची नोकरी व्यवस्थित चालण्यासाठी विद्वत्तापूर्ण परंतु फसवे तर्क देऊन शेतकऱ्यांना भडकवायचे, आंदोलन उभे करायचे, ही जोशींची चिरपरिचित शैली आहे. गेली 25 वर्षे या शैलीनेच ते शेतकऱ्यांना फसवत आले आहेत. त्यांच्या शेतीचे अर्थशास्त्र जागतिक बँकेच्या इशाऱ्यावर काम करते, हे अर्थशास्त्र ते इथे पेरू पाहत आहेत. त्यांचा हा छुपा अजेंडा आतातरी शेतकऱ्यांनी ओळखावा! जागतिक स्पर्धा, खुला व्यापार, निर्यातक्षम उत्पादन वगैरे मोहक आणि फसव्या शब्दांच्या नादी न लागता शेतकऱ्यांनी आपले, आपल्या कुटुंबाचे भरणपोषण व्यवस्थित होईल या पद्धतीने बिनखर्चाची, कर्जाच्या अधीन न जाणारी परंपरागत नैसर्गिक शेतीची कास धरावी. अशा शेतीत केवळ त्यांचेच नव्हे तर राष्ट्राचेही भले आहे. मात्र विदेशी कंपन्यांच्या इशाऱ्यावर चालणारी शरद जोशींसारखी मंडळी असा सल्ला शेतकऱ्यांना कधीच देणार नाही. कारण त्यांना इथला शेतकरी, पर्यायाने इथली अर्थव्यवस्था, स्वयंपूर्ण झालेली नको आहे तर हा देश अमेरिकेकडे आणि इथली अर्थव्यवस्था जागतिक बँकेकडे गहाण ठेवण्याची सुपारीच या लोकांनी घेतली आहे. अशा सुपारीबाज नेत्यांपासून शेतकऱ्यांनी वेळीच सावध व्हावे!

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..