प्रकाशन दिनांक :- 02/05/2004 ‘
निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी ‘दृष्टीपत्र’ (व्हिजन डॉक्युमेंट) प्रकाशित केले. या दृष्टीपत्राच्या माध्यमातून देशाच्या विकासाचे आकर्षक चित्र या पक्षांनी चितारले असले तरी या चित्रात रंग भरण्याची क्षमता आपल्याकडे आहे की नाही, हा चिंतनाचा प्रश्न ठरतो. राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणुकीच्या काळात बऱ्याच घोषणा करीत असतात. या घोषणा किती फसव्या असतात याची मतदारांसोबतच या पक्षांनाही जाणीव असते. वस्तुस्थितीशी या घोषणांचा या घोषणांचा काहीच संबंध नसतो. दृष्टीपत्रांची ही स्थिती वेगळी नाही. विकासाची अपेक्षित गती, रूपयाची किंमत, दरडोई उत्पन्न, विकासदराचा निर्देशांक या सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडे असलेल्या गोष्टींवर भर देणाऱ्या आकडेवारीचा भुलभुलैय्या असलेल्या दृष्टीपत्रातला भारत प्रत्यक्षात मात्र कुठे दिसत नाही आणि कधी दिसू शकेल, याची शक्यताही वाटत नाही. एक साधा तार्कीक नियम आहे. तिसऱ्या किंवा चवथ्या पायरीवर जायचे असेल तर पहिली-दुसरी पायरी आधी ओलांडावी लागते. एकदम चवथ्या पायरीवर जातो म्हटले तर चवथ्या पायरीवर पोहचण्यापेक्षा तोंडावर पडण्याचीच शक्यता अधिक असते. आमचे समृद्ध बलशाली भारत उभारण्याचे स्वप्न हे असेच एकदम चौथी पायरी गाठण्यासारखे आहे. सध्या लोकसभेची 14 वी निवडणूक होत आहे. 13 निवडणुकी आणि 50-55 वर्षांच्या वाटचालीनंतरही राजकीय पक्षांच्या प्रचाराचे मुद्दे कोणते असावेत आणि कोणते आहेत, याचा तटस्थपणे विचार केला तर आपल्या सहज लक्षात येईल की, चौथी पायरी गाठण्याचे स्वप्न पाहणारे आम्ही अद्याप धड पहिली पायरीदेखील ओलांडू शकलेलो नाही. आजही जात-पात, मंदिर-मशीद, मंडल-कमंडलच्या भोवतीच आमचे राजकारण फिरत आहे.
21 व्या शतकात भारताला एक विकसित राष्ट्र म्
हणून उभे करायचे असल्यास केवळ स्वप्न पाहून चालणार नाही, त्या स्वप्नाला प्रयत्नांची आणि योग्यदिशेने जाणाऱ्या प्रयत्नांची जोड मिळायला हवी. ज्या कथित विकासाबद्दल आज भरभक्कम बोलले जात
आहे, प्रत्यक्षात तो विकास 5
टक्के लोकांपर्यंतही पोहचलेला नाही. आजही ठाामीण भारतातले जीवन जगणाऱ्या प्राथमिक सुविधांसाठी तरसत आहे. अशा परिस्थितीत येणारे प्रत्येक सरकार त्याच मळलेल्या पायवाटेवरून मार्गक्रमण करीत राहिले तर त्या चार दारूड्यांसारखीच आपली अवस्था होईल.
चार दारूडे एका रात्री भरपूर झोकून सरोवराच्या काठी आले. तिथे त्यांना एक नाव दिसली. छान चांदणी रात्र होती. चौघांच्याही मनात जलविहाराची इच्छा उफाळून आली. चौघेही त्या नावेत बसले, नाव जोरजोरात वल्हवू लागले. अशा शांत चांदण्या रात्री जलविहाराची मजा काही औरच असते, असे म्हणत चौघेही जलविहाराच्या आनंदात मग्न झाले. रात्रभर त्यांचे नाव वल्हवणे सुरूच होते. पहाट झाली, सूर्य उगवला. सूर्याचा प्रकाश सर्वत्र पसरला. आता थांबायला हवे, असा चौघांनी विचार केला. रात्रभर नाव वल्हवल्यामुळे ते थकलेसुद्धा होते. धुंदीही उतरली होती. सहजच त्यांच्या डोक्यात विचार आला रात्रभर आपण नाव वल्हवत होतो, आपण किती दूरचा पल्ला गाठला ते तरी पाहावे. एव्हाना सूर्यप्रकाश सर्वत्र पसरलाच होता. त्या प्रकाशात त्यांनी पाहिले तर त्यांना रात्री ज्या ठिकाणी आपण नावेत बसलो त्याच ठिकाणी सकाळी असल्याचे दिसून आले. झाला प्रकार त्यांच्या लक्षात आला. नावेत बसून रात्रभर त्यांनी नाव वल्हवली तर होती, परंतु नाव एका दोरखंडाने किनाऱ्यावरील झाडाला बांधली होती, तो दोरखंड सोडायची शुद्धच त्यांना नव्हती. दोरखंड न सोडताच त्याच जागेवर ते रात्रभर नाव वल्हवत राहिले. आमचे विकासाचे प्रयत्न तर असे वांझोटे ठरत नाहीत ना? कित्येक पंचवार्षिक योजनांच्या अंमलबजावणीन
तरसुद्धा आमच्या मुलभूत समस्या होत्या त्याच कायम राहिलेल्या दिसतात. कसे होईल विकसित भारताचे स्वप्न साकार? कोणतीही गोष्ट करायची असेल तर सुरूवात शुन्यापासून करावी लागते. आधी पाया भक्कम आणि मजबूत करावा लागतो. नंतरच त्यावर टोलेजंग इमारत उभी करता येते, परंतु आजपर्यंतच्या सरकारांनी नेमके याच गोष्टींकडे दुलर्क्ष केले. आमच्याकडे वाहनांची संख्या भरपूर आहे, परंतु रस्त्यांची अवस्था मात्र स्पेअरपार्टस्चा धंदा जोरात चालावा अशी आहे. धरणं आहेत, ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्यात आहेत, परंतु त्या धरणात, टाक्यात पाणी साठविण्याची कोणतीही प्रभावी योजना नाही. संगणक आहे, इंटरनेट आहे, परंतु त्यांचा व्यावसायिक वापर करण्यासाठी संधीच उपलब्ध नाही. शाळा भरपूर आहेत, मास्तरं भरपूर आहेत परंतु खऱ्या अर्थाने सुशिक्षित लोकांची संख्या बोटावर मोजण्याइतपतही नाही. अन्नधान्यांचे प्रचंड उत्पादन आहे, परंतु उत्पादक शेतकऱ्याची दैनावस्था कायमच आहे.
आपले एकूण नियोजनच चुकले आहे. केवळ कारखाने काढून औद्योगिक विकास साधता येत नाही. सुतगिरण्या काढल्या म्हणजे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरात अत्तराचे दिवे लागणार नाहीत किंवा साखर कारखाने काढून ऊस उत्पादकाचे तोंड गोड करता येत नाही. तसे असते तर हा देश केव्हाच सुजलाम् सुफलाम् झाला असता. प्रयत्नांची योग्य दिशा ठरविणे आणि नंतर त्यावर दृढ निश्चयाने मार्गक्रमण करणे म्हणजे नेमके काय, याचे आदर्श उदाहरण आपल्या शेजारीच आहे. चीनने आज आंतरराष्ट्रीय स्तरावर आज आपला जो दबदबा निर्माण केला आहे तो एका रात्रीतून जादूची कांडी फिरल्यामुळे निर्माण झालेला नाही. कित्येक दशकांच्या सुनियोजित प्रयत्नातून आजचा चीन उभा झाला आहे. अगदी बारीकसारीक गोष्टीत चीनी राज्यकर्ते किती दक्ष असतात त्याचे उदाहरण नुकतेच अनुभवण्यास आले. 2008 साली होणाऱ्या ऑलिम्
िक स्पर्धेचे यजमानपद चीनला मिळाले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने जगभरातील खेळाडू, प्रशिक्षक, पदाधिकारी हजारोंच्या संख्येने चीनमध्ये येतील. ही संधी साधून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिमा उंचावण्यासाठी त्या योगे आपली आर्थिक उलाढाल वाढविण्यासाठी चीनने सर्वंकष प्रयत्न आतापासूनच सुरू केले आहेत. पाहुणे म्हणून येणाऱ्या या खेळाडू, प्रशिक्षक, पदाधिकाऱ्यांना चीनची संपूर्ण ओळख व्हावी, चीनने साधलेल्या प्रगतीची त्यांना माहिती व्हावी, आपल्या देशाचा गौरवशाली इतिहास या पाहुण्यांपर्यंत पोहचावा यासाठी चीनने
या परदेशी लोकांचा ज्यांच्याशी सरळ संबंध येऊ शकतो अशा टॅक्सी
ड्रायव्हरपासून ते थेट विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच 2008 पर्यंत इंठाजी भाषा अवगत करणे सक्तीचे केले आहे. चीनी राज्यकर्ते कोणत्याही गोष्टीचा किती सूक्ष्म विचार करतात, हे स्पष्ट होण्यासाठी वरील उदाहरण पुरेसे आहे. जपानमध्येसुद्धा इंठाजी आणि जपानी भाषा समजणाऱ्या दुभाषांसाठी जाहिराती झळकत आहेत. सांगायचे तात्पर्य, प्रयत्नांची दिशा योग्य असेल आणि प्रयत्न अगदी पहिल्या पायरीपासून होत असतील तर आणि तरच ते प्रयत्न फलदायी ठरू शकतात. चीन किंवा इतर राष्ट्रांच्या तुलनेत भारताची विदेशातील प्रतिमा आजही साप, गारूडी आणि साधुसंतांचा देश या चक्रातच अडकून पडली आहे. भारतातील सार्वजनिक अस्वच्छतादेखील आपल्या बदलौकिकात भर घालणारीच असते. भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा उंचवायची असेल तर सरकारने अगदी सार्वजनिक स्वच्छतेसारख्या प्राथमिक पायरीपासून सुरूवात करायला पाहिजे. खरेतर सरकारने सर्वात अगोदर सगळ्या पानपट्ट्या सक्तीने बंद कराव्यात. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे किंवा घाण करणे दंडनीय अपराध समजला जावा. उघड्यावरील मलविसर्जनामुळे केवळ रोगराईच पसरत नसून देशाची
ीर्तीसुद्धा वेगळ्या अर्थाने पसरत आहे. त्यासाठी सरकारने आधी सार्वजनिक स्वच्छ स्वच्छतागृहे आधी उभारावीत आणि त्यानंतर उघड्यावर मलविसर्जन करण्याला कायद्याने बंदी घालावी. सुरूवात या अतिशय दुलर्क्षित परंतु तितक्याच महत्त्वाच्या कामापासून करायला पाहिजे. जगातील इतर देश आज कुठे आहेत आणि आपण कुठे आहोत, याचा विचार करून पुढील काही वर्षात जगाच्याबरोबर येण्यासाठी एक कार्यक्रम निश्चित करावा आणि तो दृढपणे अंमलात आणावा.
सगळ्या चांगल्या कामाची सुरूवात स्वच्छतेपासून होत असते. त्यामुळे या कामाची सुरूवातसुद्धा सार्वजनिक तसेच वैयक्तिक स्वच्छतेचे दंडक घालूनच करायला पाहिजे. सरकारची जितकी जबाबदारी आहे तितकीच जबाबदारी सामान्य नागरिकांचीसुद्धा आहे. नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने सार्वजनिक स्वच्छतेचे भान राखायला पाहिजे. राष्ट्राच्या विकासाचा या गोष्टीशी कदाचित संबंध नसेलही परंतु अशाच लहानसहान गोष्टीतून विकासाला आवश्यक असलेली मानसिकता घडत असते. राष्ट्राच्या विकासात आपलेही योगदान आहे, ही भावना प्रत्येक नागरिकांच्या मनात निर्माण झाली तर कोणतीही योजना केवळ सरकारी राहणार नाही. आज एखादा सरकारी उपक्रम असेल तर सामान्य माणूस त्यापासून चार हात दूर राहणेच पसंत करतो. मग तो उपक्रम ठाामस्वच्छतेचा असो अथवा प्रदूषण नियंत्रणाचा असो. सरकारी उपक्रम म्हणजे तो बोगसच असला पाहिजे ही जी धारणा नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे, त्याला बहुतकरून सरकारच जबाबदार आहे. एकंदरीत सामान्य नागरिक आणि सरकार या दोन्ही घटकांच्या संयुक्त प्रयत्नातूनच हा देश मोठा होऊ शकतो. तेव्हा देशाचा विकास साधायचाच असेल तर पहिल्या पायरीपासून, अगदी शून्यापासून सुरूवात करावी लागेल.
— प्रकाश पोहरे
Leave a Reply