नवीन लेखन...

स्वामीनाथनचे नक्राश्रू!





राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहात बोलताना राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष डॉ. स्वामीनाथन यांनी ‘शेतकऱ्यांना वाचवा, शेती वाचवा’ , हा नारा घेऊन ठाामस्तरावर काम करण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी पॅकेजने आत्महत्या थांबत नसतील तर कृषी धोरणाचा फेरविचार करावा लागेल, असे वत्त*व्य त्यांनी केले होते. एकूण काय तर सध्या शेती आणि शेतकऱ्यांची अवस्था अगदीच बिकट असल्याचा साक्षात्कार या स्वामीनाथन महोदयांना झालेला दिसतो. शेतकऱ्यांच्या उन्नतीचे आता चिंतन करणाऱ्या स्वामीनाथन महोदयांनी थोडे भूतकाळात डोकावून पाहिले तर ते स्वत:च बऱ्याच अंशी या परिस्थितीला कारणीभूत असल्याचे त्यांच्या लक्षात येईल. कदाचित याची जाणीव त्यांना असावी आणि म्हणूनच अपराधी भावनेतून ते आता शेतकऱ्यांच्या उन्नतीवर प्रवचन झोडत फिरत असावेत. भारतीय शेतकरी आजच्या इतका कंगाल कधीच नव्हता. भारतीय शेती आजच्या इतकी बरड कधीच नव्हती. सहज चालता चालता बी फेकले तरी निव्वळ पावसाच्या पाण्यावर त्या जमिनीतून रोपं तरारून यायची. आज मात्र परिस्थिती ही आहे की पीक घ्यायचे म्हटले की पाण्यापेक्षा अधिक गरज खते आणि कीडनाशकांची भासते. शेतकऱ्यांच्या आर्थिक परावलंबितेला सुरूवात कृत्रिम खते आणि कीडनाशकांच्या वापरापासूनच झाली आणि शेतकऱ्यांना या कृत्रिम खतांच्या, कीडनाशकांच्या वापरासाठी प्रोत्साहित करण्याचे पाप जर कोणाच्या माथी असेल तर ते हरितक्रांतीचे जनक म्हणविणाऱ्या डॉ. स्वामीनाथन यांच्या! घरचेच बियाणे, घरचेच खत, घरचेच मजूर असलेली आणि म्हणूनच उत्पादन खर्च शून्य असलेली शेती बहूराष्ट्रीय कंपन्यांच्या दावणीला बांधण्याचे पाप हरितक्रांतीने केले. अन्नधान्याची कृत्रिम टंचाई देशात निर्माण केल्या गेली. वाढत्या लोकसंख्येचा बागुलबोवा उभा करण्यात आला. शेतकऱ्या
ना ‘अधिक उत्पादन, अधिक उत्पन्न’चे भ्रामक स्वप्न दाखविण्यात आले. भोळा शेतकरी या गोबेल्स नीतीला बळी पडला. कृत्रिम बियाणे, रासायनिक खते, जहरी कीडनाशके जमिनीत ओतल्या जावू लागली. उत्पादन जरूर वाढले, परंतु उत्पन्नात कधी

वाढ झालीच नाही, उलट ते

दिवसेंदिवस कमीच होत गेले. शिवाय शेती हळूहळू परावलंबी झाली ते संकट वेगळेच! जमिनीची सकसता नष्ट झाली, जनुकीय बियाण्यांनी पर्यावरणाला मोठा धोका निर्माण केला. पारंपारिक बिनखर्चाची बियाणे तर केव्हाच नामशेष झाली. आज शेतकऱ्याला शेतीतून उत्पन्न घ्यायचे म्हटले की आधी कर्ज काढावे लागते. सगळंच विकत घ्यावे लागते. उत्पादनखर्च भरमसाठ वाढलाय, उत्पन्नाची मात्र शाश्वती नाही. शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली पिचू लागला. कर्ज आणि त्यावरील व्याज त्याच्या मानगुटीवर कायमचे बसले. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याची शक्यता धूसर दिसू लागली. शेतकऱ्यांना नैराश्येने ठाासले आणि त्यातूनच एखादा साथीचा रोग पसरावा तशी शेतकऱ्यांमध्ये आत्महत्येची लाट आली. कोणतेही पॅकेज ही लाट थांबवू शकणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या समस्यांच्या मुळाशी सरकार जाणार नाही तोपर्यंत हे सगळेच उपचार वरवरचे ठरणार आहेत आणि मुळाशी जाण्याची सरकारची तयारी नाही, हिंमतही नाही. भारताचे कृषी धोरण दिल्लीत नाही तर वॉशिंग्टनमध्ये निश्चित होते. आमच्या शेतकऱ्यांनी काय, किती आणि कसे पिकवावे, याचा निर्णय बहूराष्ट्रीय कंपन्या घेतात. भारतीय शेतीवर त्यांना अप्रत्यक्ष ताबा हवा आहे. हे आक्रमण शेती क्षेत्रापूरते मर्यादित नाही. शेतीपासून सुरूवात झाली आहे. या आक्रमणाचे क्षेत्र खूप व्यापक आहे. पुढील काळात भारतातल्या लोकांनी काय खावे, हेदेखिल बहूराष्ट्रीय कंपन्याच ठरविणार आहेत. कोणत्या आजाराला त्यांनी बळी पडावे, हेदेखील या कंपन्या ठरविणार आहेत. त्या कंपन्या उत्पादित करत असल
ल्या औषधी ज्या रोगांवर उपचार म्हणून वापरल्या जातात तेच रोग पुढे भारतात धूमाकूळ घालणार आहेत. जनावरेही त्यातून सुटणार नाहीत. बर्ड फ्लूने त्याची चुणूक दाखविलीच आहे. आमच्या आहार-विहाराच्या सवयी आमच्याही नकळत बदलत आहेत. पिझ्झा, बर्गर केव्हा आले आणि स्थिरावले ते आम्हालाही कळले नाही. अस्प्रो, अॅनॅसिन, क्रोसिनमध्ये आता या कंपन्यांना स्वारस्य उरलेले नाही. त्यात फारशी कमाई नाही. आता केवळ डोकेदुखीवर म्हणावा तसा धंदा होत नाही. काही मोठे आजार त्यांना ‘लाँच’ करावे लागतील. त्यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरू आहे. मधूमेह, हृदयरोग, एडस्, कॅन्सर, रत्त*दाब, हेपिटायटिस सारख्या रोगांचा, आजारांचा धूमाकूळ नजिकच्या काळातच वाढणार आहे. अमेरिकेच्या मोटारी, अमेरिकेची शस्त्रे आता कुणी घेत नाही. हा धंदा आता फायद्याचा राहिलेला नाही. आता धंदा बदलावा लागणार आहे आणि सोबतच काही पर्मनंट गिऱ्हाईकेही शोधावी लागणार आहेत. पहिले लक्ष्य अर्थातच भारत आहे. इतका सज्जन, सोशिक आणि मोठा गिऱ्हाईक दुसरा कोणता असेल? सगळी यंत्रणा कामाला लागली आहे. भारतातील लोकांचा बुद्धीभेद करण्यासाठी अमेरिकेतून फौज आणण्याची गरज नाही. इथलेच घरभेदी पुरेसे आहेत. शिवाय तोंडवळा भारतीय असल्याने त्यांच्यावर इथले लोकं चटकन विश्वास ठेवतात. एखाद्या अमेरिकन तज्ञाने हरितक्रांतीची कल्पना रूजविण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित इथल्या लोकांनी ती कल्पना स्वीकारली नसती. परंतु शेतीतज्ञ डॉ. स्वामीनाथन यांनी हरितक्रांतीची कल्पना सरकारसहीत सगळ्यांच्याच गळी उतरविली. आज शेती आणि शेतकऱ्यांचा जो काही बट्ट्याबोळ झाला आहे, त्यासाठी हरितक्रांतीच्या माध्यमातून रूजविण्यात आलेल्या विचारांनाच जबाबदार धरले पाहिजे. या विचारांनीच भारतीय शेती परावलंबी केली, या विचारांनीच भारतीय शेतकऱ्यांना देशोधडीला लावले. आपल्याकडे
ोकांना भंपक विद्वत्तेचे प्रचंड आकर्षण आहे. कुठलाही तज्ज्ञ आला की त्याच्या त्या विद्वतप्रचूर तर्कांना आपण आपली तर्कनिष्ठा गहाण ठेवून उचलून धरतो. डॉ. स्वामीनाथन, शरद जोशी सारख्या लोकांनी याचाच फायदा घेतला. यांनीच आग लावली आणि आता हेच पाण्याचा बंब कुठे आहे, म्हणून ओरड करत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहात डॉ. स्वामीनाथन शेतकऱ्यांच्या दशावताराचे विश्लेषण करत होते तेव्हा तिथे उपस्थित एकाही बुद्धीजिवी माणसाने या दशावतारासाठी आपण पेरलेली आधूनिक शेतीची कल्पना जबाबदार नाही का, असा प्रश्न त्यांना केला नाही. उलट कुलगुरू डॉ. पठाण यांनी स्वामीनाथन यांची तुलना राष्ट्रसंतांशी केली.

खेड्यांच्या उद्धारासाठी अहोरात्र झटणाऱ्या राष्ट्रसंतांची खेडी भकास करणाऱ्या स्वामीनाथन

यांच्यासोबत तुलना करून डॉ. पठाण यांनी राष्ट्रसंतांचा अपमान केला, असेच म्हणावे लागेल. भारतातील बुद्धीवाद्यांना, मीडियाला, प्रेसला हाताशी धरून आपल्या स्वार्थाला पुरक विचार इथे रूजविण्याची नीती बहूराष्ट्रीय कंपन्यांनी खूप आधीपासून अवलंबिली आहे. आजही तेच सुरू आहे. दुर्दैवाची बाब हीच आहे की या लोकांच्या असल्या भंपक प्रचाराला आपली भोळी जनता सहज बळी पडते.

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..