नवीन लेखन...

होत्याचे नव्हते!




काळाच्या प्रवाहासोबतच मनुष्याची जीवनशैली बदलत चालली आहे आणि त्या बदलामागचे प्रमुख कारण ठरत आहे वैज्ञानिक प्रगती! वैज्ञानिक प्रगतीच्या खऱ्या वेगाला चालना मिळाली ती जेम्स वॅटने वाफेच्या इंजिनाचा शोध लावल्यानंतर . जागतिक औद्योगिकीकरणाचा तो आरंभबिंदू होता. त्यानंतर झपाट्याने अनेक शोध लागत गेले, त्याचा प्रभाव समाजजीवनावर पडत गेला. पुढे विसाव्या शतकात या वैज्ञानिक प्रगतीने कमालीचा वेग गाठला आणि उत्तरोत्तर तो वाढतच गेला. या वाढत्या वेगाबरोबरच अनेक संकल्पना, संज्ञा झपाट्याने बदलत गेल्या. कालपर्यंत जे अंतिम सत्य मानल्या जात होते ते आज अल्प सत्य समजले जाऊ लागले. कालचे अप्रूप आज एक साधारण सामान्य बाब ठरली. शंभर-दीडशे वर्षापूर्वी एखाद्याने हवेत उडण्याची कल्पनाही केली असती किंवा दूरच्या ठिकाणी घडणारी घटना त्याचवेळी घरच्या घरी पाहायला मिळेल असे सांगितले असते तर त्याला नक्कीच वेड्यात काढल्या गेले असते. त्या काळी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा आवाका या कल्पनाही मान्य करायला तयार नव्हता, परंतु आज या गोष्टी अगदी सामान्य ठरल्या आहेत. प्रगती अजून सुरूच आहे. आज अंतराळयात्रा किंवा चंद्रावरची फेरी सामान्य लोकांसाठी अप्रूप असली तरी होऊ शकत की भविष्यात याच गोष्टी नित्याच्या जीवनाचा एक भाग बनतील. सहज बाजारातून चक्कर मारून येतो, या थाटात लोकं जरा मंगळावर जाऊन येतो किंवा आज शुक्रावरचे वातावरण थोडे नरम होते म्हणून मी लवकरच पृथ्वीवर परतलो, असे म्हणू लागतील. विज्ञानाच्या प्रगतीचा वेग लक्षात घेता या गोष्टी फार दूरवरच्या आहेत असे वाटत नाही. अगदी आजच चंद्रावर मानववस्ती वसविण्याचा विचार बोलून दाखविला जात आहे. या वैज्ञानिक प्रगतीमुळे सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनावर कसा प्रभाव पडत गेला, याचे अवलोकन करायचे झाल्यास तो एक मनोरंजक माहिती
टच ठरेल. पूर्वीच्या काळी साधा निरोप एका ठिकाणाहून दुसरीकडे द्यायचा झाल्यास

कोण आटापिटा करावा लागत असे.

निरोप पोहोचविण्यासाठी खास ‘निरोपे’ असत. श्रीमंत लोक असे निरोपे पदरी बाळगत. सामान्य लोकांना मात्र स्वत:च पायी जाऊन किंवा एखाद्या जनावराचा प्रवासासाठी वापर करून निरोप पोहोचवावा लागे. त्यामुळे माणसाचे व्यवहार, सोयरीक संबंध पंचक्रोशीच्या बाहेर फारसे होत नसत. अनेक शतके ही परिस्थिती कायम होती. अलीकडील काळात म्हणजे इंठाजांची सत्ता भारतात प्रस्थापित झाल्यानंतर टपालखाते अस्तित्वात आले. एका ठिकाणचा निरोप दुसऱ्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी पायपीट करण्याची गरज उरली नाही. निरोपही तुलनेने जलद पोहचू लागले. पुढे पत्राची जागा फॅक्सने घेतली. एका क्षणात इकडचे पत्र तिकडे जसेच्या तसे पोहचू लागले. दरम्यान टपालखात्याला पर्याय ठरलेल्या कुरिअर सव्र्हिसचाही उदय झाला. पुढे त्यांचेही महत्त्व कमी होत गेले. आता ‘इ-मेल’चा वापर वाढू लागला आहे. मोबाईल फोनद्वारे एसएमएस सुविधा उपलब्ध झाली. संफ साधनातील या अत्याधुनिक सुविधांमुळे टपालखाते जवळपास मोडीतच निघाले आहे. पोस्टमनच्या वाटेकडे डोळे लावून बसण्याचा प्रकार इतिहासजमा झाला आहे. त्यामुळे पत्रासोबत जुळलेला भावबंध सामाजिक जीवनातून लोप पावला. खरेतर टपाल खात्यानेही संफ साधनाच्या या अत्याधुनिक आविष्कारांसोबत जुळवून घेतले असते तर आज हे खाते मोडीत निघाले नसते. टपाल खात्यातील लोकांच्या नोकऱ्याही शाबूत राहिल्या असत्या. सांगायचे तात्पर्य, बदलत्या आणि वेगवान प्रवाहाशी जुळवून घेणे प्रत्येकाला भाग आहे. पोस्टमन जसा एकेकाळी समाजाचा एक महत्त्वाचा घटक होता, तशीच किंमत गावातल्या शिंप्यालाही होती. नव्याकोऱ्या कापडाच्या विविध रंगसंगतीने नटलेले शिंप्याचे दुकान सगळ्याच आबालवृद्धांचे आवडीचे ठिकाण होते. कापड घेणे, ते
िंपीदादाकडे नेऊन देणे, त्याची ती माप घेण्याची कसरत, परवा नक्की घेऊन जा असे म्हणत मात्र प्रत्यक्षात हजार चकरा मारल्यानंतर पधरा दिवसांनी किंवा महिन्याने उपकार केल्याच्या थाटात त्याने शिवलेला पोषाख देणे आणि तो मिळाल्यावर शिंपीदादावरचा राग विसरून आनंदाने घराकडे पळणे, या सगळ्याच गोष्टी, या गोष्टीतून मिळणारा आनंद आज पारखा झाला आहे. आधुनिक टेलर्सने शिंपीदादाचे उच्चाटन केले आणि आता या टेलर्सनादेखील रेडीमेड गार्मेंटस्ने जवळपास हद्दपार केले आहे. या शिंपीदादासारखाच रस्त्याच्या कोपऱ्यावर एखाद्या झाडाखाली आपले अवजार घेऊन छोटेसे दुकान थाटणारा चर्मकारदेखील इतिहासजमा झाला आहे. करकर वाजणाऱ्या नव्याकोऱ्या चामड्याच्या चप्पला आता दिसत नाहीत. आता जमाना आलाय तो बाटा, आदिदास, लिबर्टीसारख्या शू कंपन्यांचा! 500 पासून ते 50 हजार रुपयांपर्यंतचे बूट या कंपन्या चोखंदळ ठााहकांना पुरवत आहेत. कोपऱ्यावर मिळणाऱ्या पाच-पन्नास रुपयांच्या चप्पलांना आणि त्या मेहनतीने तयार करणाऱ्या चर्मकारांना आज समाजजीवनात स्थान उरलेले नाही. एकेकाळी भरभराटीस आलेला विटांचा उद्योग आज कसाबसा तग धरून आहे. मातीच्या विटांची जागा आता काँक्रीटच्या ‘हॉलो ब्रिक्स’ ने घेतली आहे. चित्रपटांचीही गत तशीच झाली आहे. पडद्यावर हालती-बोलती चित्रे दिसू लागली तेव्हा त्याचे काय अप्रूप होते. पडद्यावर इतिहास जिवंत करणाऱ्या या कृष्ण-धवल चित्रपटांना कमालीची लोकप्रियता लाभली होती. पुढे कृष्ण – धवल चित्रपट रंगीत झाले आणि कृष्ण-धवल चित्रपटांची सद्दी संपली. पडद्यावरील चित्रांची लांबी-रुंदीही बदलत गेली. 16 एमएम, 32 एमएम, 72 एमएम असा चित्रपट पडद्याचा प्रवास पुढे सरकत गेला. जसेजसे नवे तंत्रज्ञान येत गेले तसेतसे चित्रपटांचे स्वरूपही बदलत गेले. पुढे डॉल्बी सिस्टीम आली, थ्रीडीचा प्रयोग झाला आणि आता मल्टीप्
ेक्सचा जमाना आला आहे. चित्रपटासोबतच चित्रपटगृहांच्या लोकप्रियतेलाही ओहोटी लागत आहे. मुंबईतील मिनर्व्हासारखे चित्रपटगृह आपली एक प्रतिष्ठा राखून होते. मिनर्व्हात सहकुटुंब चित्रपट बघायला जाणे हा एक सोहळाच असायचा. खेड्यातील माणसे काही कामाने तालुक्याला किंवा शहराला आली की, हमखास मॅटनी शो पाहूनच परतायची. आता कसलेच नावीन्य उरले नाही. टीव्हीच्या छोट्या पडद्याने चित्रपटगृहातील मोठ्या पडद्याला घराघरात पोहोचविले. ठाामोफोन रेकॉर्डस्चेही तेच हाल झाले. रेकॉर्ड प्लेअर आणि एचएमव्हीच्या ठाामोफोन रेकॉर्डस् घरी असणे

एकेकाळी प्रतिष्ठेचे समजले जात असे. पुढे कॅसेटस् आल्या. ठाामोफोन

रेकॉर्डमध्ये एका बाजूला दोन किंवा फार तर तीन गाणी असायची. ठाामोफोन रेकॉर्डच्या तुलनेत अतिशय स्वस्त असलेल्या, टेपरेकॉर्डरमध्ये वाजविल्या जाणाऱ्या कॅसेटस्मध्ये मात्र एकाच बाजुला 8 ते 10 गाणी असायची. कालांतराने या कॅसेटचेही महत्त्व कमी झाले. सीडी आल्यात. टेपरेकॉर्डरची जागा सीडीप्लेअरने घेतली. मात्र त्यांचीही राजवट अल्पकालीनच ठरली. त्यानंतर डीव्हीडी प्लेअर आले आणि लवकरच एमपी- थ्रीने दिवाणखान्यातील स्थान पटकावले. आतातर होम थिएटरचा जमाना आला आहे. एका बाजूला दोन ते तीन गाणी असणाऱ्या ठाामोफोन रेकॉर्डपासून अक्षरश: शेकडो गाणी सामावून घेणाऱ्या एमपीथ्री प्लेअरपर्यंतच्या या प्रवासाला प्रत्येक घर साक्षी आहे. सांगायचे तात्पर्य, वैज्ञानिक किंवा तांत्रिक प्रगतीचा वेग होत्याचे आहे म्हणेपर्यंत नव्हते करून जात आहे. आज ज्याचे अप्रूप वाटते ते उद्या कालबाह्य ठरू पाहात आहे. बदलाचा हा वेग लक्षात घेऊनच आपण आपल्या संज्ञा, संकल्पना निश्चित करायला हव्यात. उद्योगावरही या बदलाचा परिणाम होतो आहे. मोबाईलचे आगमन होण्यापूर्वी काही काळ पेजरचे राज्य होते. त्यावेळी अनेक कंपन्यांनी पे
र उत्पादनात पैसा गुंतवला, परंतु थोड्याच काळात मोबाईलने पेजरला हद्दपार केले, त्याचा फटका या गुंतवणूकदारांना बसला. विज्ञान- तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीने अनेक सामाजिक संदर्भ बदलत आहेत. एकेकाळी समाजजीवनाचा भाग असलेली अनेक क्षेत्रे आज कालबाह्य ठरली आहेत, परंतु हे सगळे होणारच आणि हे गृहित धरून, ही वस्तुस्थिती स्वीकारून प्रत्येकालाच बदलत्या प्रवाहाशी जुळवून घ्यावे लागेल. रूढीप्रियतेच्या आहारी जाऊन जे या बदलांना स्वीकारणार नाहीत, त्यांचे काळाच्या प्रवाहातील अस्तित्वच धोक्यात येऊ शकते.

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..