‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ कडून प्रकाशित केला जाणारा हा इंग्रजी भाषेतील शब्दकोश आहे. १८५७ साली इंग्लंडमध्ये ‘फायलॉजिकल सोसायटी’च्या काही अर्ध्वयूंना तेव्हा उपलब्ध असलेले सारेच शब्दकोश अपुरे आहेत, असे वाटू लागले आणि त्यातून ‘ऑक्सफर्ड’ या सुप्रतिष्ठित शब्दकोशाचा जन्म झाला.
१८८४ मध्ये ‘A New English Dictionary on Historical Principles’ या नावाने पहिल्यांदा हा शब्दकोश प्रकाशित झाला. १८९५ मध्ये सर्वप्रथम अनौपचारिकरीत्या ‘The Oxford English Dictionary’ हे नाव वापरण्यात आले. १९३३ पासून मात्र या नावानेच हा शब्दकोश प्रकाशित होत आहे.
या शब्दकोशाच्या आजपावोतो असंख्य आवृत्या निघाल्या आहेत. प्रारंभी केवळ इंग्रजी शब्दांचे इंग्रजीतच अर्थ देणारा हा शब्दकोश जग बदलत गेले तसे निरनिराळ्या भाषांतूनही अर्थ समजावून देऊ लागला, त्यात विविध भाषांमधील शब्दही अंतर्भूत होऊ लागले आणि आता तर रोजचा एक शब्द निवडण्यापासून वर्षभरातील एका शब्दाचीही निवड होऊ लावली आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या शब्दकोश विभागाचा ‘शब्द’ ब्रिटिश इंग्रजीकरिता अंतिम मानला जातो. याला कारणही तसेच आहे. ‘फिलॉलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन’ या भाषाशास्त्राच्या संस्थेतील सभासदांनी १८५७ मध्ये तत्पूर्वीचे शब्दकोश अपूर्ण आणि सदोष असल्याने शब्दांचे पुनःपरीक्षण करून नवा शब्दकोश तयार करण्याचे ठरवले. प्रत्यक्ष कृती फार मंदगतीने होत गेली. अखेर १८७९ मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसशी करार होऊन न्यू इंग्लिश डिक्शनरीच्या कामास सुरुवात झाली. हा प्रकल्प किती काळ चालेल, किती निधी त्यात गुंतवावा लागेल, वगैरे कसलीच कल्पना कोणालाही आली नाही. पण जेम्स मरे, हेन्री ब्रॅडले, डब्ल्यू. ए. क्रेग, सी.टी. ऑनियन्स, यांसारख्या निष्णात शब्दकोश रचनाकारांनी पुढील सुमारे चाळीस वर्षे जीव ओतून अथक परिश्रम केले आणि इंग्रजी शब्दकोश इतिहासात मैलाचा दगड ठरलेली ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी प्रसिध्द झाली. यासाठी शब्द संकलन कसे केले, अर्थ कसे लावले गेले, मुद्रण कसे झाले, याबद्दलची माहिती रोचक आहे. जिज्ञासूंनी सायमन विन्चास्टर यांच्या ‘The Meaning of Everything : The Story of Oxford English Dictionary हा ग्रंथ अवश्य पाहावा.
१९२८ साली प्रकाशित ‘बारा’ खंडांच्या शब्दकोशामध्ये १९३३ साली पुरवणी खंडाची जोड मिळाली. शब्दकोश अद्ययावत करण्याच्या दृष्टीने, त्यामध्ये विसाव्या शतकातील शब्दांची भर घालण्याकरिता चार खंडातील पुरवणी १९७२ ते १९८६ पर्यंत प्रकाशित केली गेली. याच दरम्यान १९८४ साली न्यू ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी प्रकल्प सुरू झाला. याच सुमारास कम्प्युटर तंत्रज्ञानाचा विकास झाला. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने या माध्यमाचे साधर्म्य ओळखून शब्दकोशाच्या मुद्रित आवृत्तीबरोबरच इलेक्ट्रॉनिक आवृत्ती प्रकाशित करण्यास सुरुवात केली. इलेक्ट्रॉनिक आवृत्तीमध्ये साठवणीला भरपूर वाव असल्याने नवे शब्द सहज समाविष्ट करण्यात येऊ लागले. हा शब्दकोश सी. डी. रूपात मिळू लागला. अनेक नवे शब्द भाषेत येत असताना त्यांचा शब्दकोशात अंतर्भाव करण्याबाबत काही निकष कटाक्षाने पाळले जातात. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस जगातील भाषाविषयक सर्वात मोठा आणि व्यापक कार्यक्रम राबवते.
नवे शब्द शोधण्याकरता ऑक्सफर्ड इंग्लिश कॉर्प्स (शब्दांची गंगाजळी) आणि ऑक्सफर्ड रीडिंग प्रोग्राम ही मुख्य संसाधने आहेत. अनेक मान्यवान योगादानकर्ते आपण जे वाचले त्यातील नवे शब्द व त्यांचे अर्थ यांचा पद्धतशीर पाठपुरावा करतात. रीडिंग प्रोग्राममध्ये या प्रत्येक प्रकारच्या लिखाणाचा (गाण्यांच्या ओळीपासून शास्त्रीय शोधनिबंधांपर्यंत) संग्रह केला जातो. गंगाजळीत हे दस्तऐवज आणि त्यांचे स्त्रोत यांची नोंदणी होते. असे नवे शब्द मिळाले की तो शब्द किती ठिकाणी, कोणत्या संदर्भात, कोणत्या अर्थाने, या अर्थाला काही विविध छत आहेत काय, किती काळ वापरला जात आहे, याचा आढावा तज्ज्ञांच्या संघाद्वारे घेतला जातो. अपशब्द वर्ज्य नसतात. पण ते वापरू नयेत, असा इशारा दिलेला असतो.
याखेरीज शब्दकोश कोणाकरता आहे, पृष्ठ संख्यांची मर्यादा, व्याख्या देतानाची शब्द मर्यादा, अशा तांत्रिक, वित्तीय मुद्द्यांचा देखील विचार केला जातो. एखादे वेळी एखाद्या शब्दाला जर अनेक वर्षांचा इतिहास नसतो, पण तो समर्पक असला तरी त्याचा अंतर्भाव करण्याचा विचार केला जातो. कम्प्युटरवरील गेममधले एखादे पात्र मेले आणि पुन्हा जिवंत झाले, तर त्याचे वर्णन respwan या क्रियापदाने केले जाते, आणि कायमचे मेले तर permdeath असे वर्णन केले जाते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नव्या शब्दांचा विचार करताना इंग्रजी भाषेतील शब्दांचा विचार होत नाही, अन्य भाषेतील शब्द विचारार्थ घेतले जातात. बंड, धरणे (असे संपाचे प्रकार) याच रूपात इंग्रजी भाषेत प्रवेशले. कधीकधी स्पेलिंगच्या फरकाने वेगळे अर्थ सुचवले जातात. Pundit म्हणजे तज्ज्ञ आणि pandit म्हणजे पदवी.
नव्या शब्दांचे अर्थ देणे, हे देखील आव्हानात्मक काम आहे. यासाठी व्यापक सामान्यज्ञान असणारी तज्ज्ञ मंडळी, संदर्भग्रंथ, माहितीचे अन्य स्त्रोत, विषय तज्ज्ञ, इतर समानार्थी शब्द यांचा आधार घेतला जातो. उद्या अण्णू गोट्या होणे हा वाक्प्रचार मराठी शब्दकोशात समाविष्ट करायचा झाला तर त्या तज्ज्ञाला अंतू बर्वा माहिती हवा. शब्दकोशशास्त्र जसे शब्दकोशांचे स्वरूप बदलेल तसे विकासात होत गेले आणि शब्दकोश जसे बदलत गेले तसे शब्दकोशशास्त्र बदलत गेले. आज शब्द म्हणजे निव्वळ अक्षरांचे समूह राहिलेले नाहीत. कधीतरी आकडे वापरून संकल्पना सादर केली जाते, जसे २६/११ कधी आकडा आणि अक्षर एकत्र नांदतात, २द सारखे शब्द यात मोडतात. कधी A1 असा त्यांचा क्रम असतो. आता तर संकल्पना इमॉटीकॉनद्वारे दर्शवली जाते. अशा सर्वांचा क्रम काय असावा, हेही इंग्रजी शब्दकोशात रूढ होत आहे.
अविनाश पंडित.
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply