नवीन लेखन...

एक वॉर्ड एक गणपती

१७ ऑगस्ट २००८ साली माझा हा लेख लोकसत्ता मध्ये आला होता. हायकोर्टाच्या ताज्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा मी हा लेख मराठीसृष्टीवर टाकत आहे.

गणेशोत्सवा चे स्वरूप हे उत्सव साज-या करणा-या कार्यकर्त्यांच्या गुणांवर अवलंबून असते .लोकमान्य टिळकांनी राजकारणाबरोबर समाजाला एकत्र आणण्यासाठी जे प्रयत्न केले ,त्यातूनच शिवजयंती ,गणेशोत्सव या सारखे उत्सव करण्याची परंपरा महाराष्ट्रात उदयास आली.राजकारण आणि धर्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे मानणा-या टिळकांनी सत्वगुणांनी युक्त अशा कार्यकर्त्यांना शिवजयंती आणि गणेशोत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरे करण्याची प्रेरणा दिली.समाजाने एकत्र यावे , देवांचे आणि देशाचे गुणगान गावे आणि माणसा-माणसांमध्ये प्रेम,ज्ञान आणि समर्पणाचा संदेश जावा हे गणेशोत्सव सार्वजनिक करण्यामागील कारण होते.हि भावना जपणारी मंडळे निश्चितच कौतुकास पात्र आहेत.परंतु स्वार्थासाठी उत्सव साजरे करण्यासाठी खटपट करणा-या मंडळीत रजोगुण आणि तमोगुण प्राबल्याने असतात हे उत्सवाचे आजचे स्वरूप पाहिल्यानंतर लक्षात येते.

आजकाल गल्लीबोळात गणेशोत्सव होतात.या गणेशोत्सवाची संख्या इतकी अमाप वाढली आहे की , कधी कधी १०० फुटाच्या अंतरावरही गणेशोत्सवाचे मंडप उभे राहिलेले दिसतात.एखाद्या प्रभागात जेवढे सामाजिक किंवा राजकीय गट तेवढे गणपती , असा प्रकार सुरु आहे. मंडप उभारायचा , त्यासाठी अरुंद रस्ते आडवायचे , दिवसभर कर्कश्य आवाजात ध्वनिवर्धक लावायचे , संध्याकाळी भसाड्या आवाजात होणारी भजने , रात्री रंगलेले पत्याचे डाव आणि जुगाराची रिंगणे हे उघड्या डोळ्यांनी पाहिल्यावर हताश झाल्यासारखे वाटते.अनेक मंडळे धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करीत नाहीत,पावती पुस्तके छापतात,प्रभागातील नागरिक आणि व्यापा-यांकडून वर्गणी गोळा करतात आणि वर्गणी देण्यास नकार देणा-या लोकांना धमकी देतात.रात्री दारू पिणे आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत बीभत्स हावभाव करीत नाचणे हे प्रकार सर्रास सुरु आहेत.हिंदू म्हणून घेण्यास लाज वाटेल ,अशा प्रकारचे उत्सव पाहिल्यावर “तमोगुणी ” कार्यकर्त्यांचे पेव फुटल्याचे जाणवते.

ठाण्यात हिरानंदानी इस्टेट सारख्या उच्चभ्रू वस्तीत होणारे ” Ganapati festival “हा एक विचित्रच प्रकार सुरु झाला आहे.सोसायटीत साजरा होणारा गणेशोत्सव म्हणून कुणीही वर्गणी साठी नाही म्हणत नाही.उत्सव साजरे करणा-या लोकांमध्ये परप्रांतीय अग्रेसर असतात.हि मंडळी गणेशोत्सव साजरा करताना मराठी रूढी , मराठी परंपरा आणि धार्मिक प्रथा पायदळी तुडवतात.दिवसभर ध्वनिवर्धक लावून इंग्रजीतून सूचना देतात. स्थानिक कलाकारांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इंग्रजीतून असते .गणपतीची पूजा सोडली तर सर्व व्यवहार इंग्रजीतून होतो.स्थानिक कलाकार म्हणून लहान मुलांना अश्लील हिंदी आणि इंग्रजी गाण्याच्या तालावर नाचवतात.त्यांचे आई -बाबा, नव्हे -नव्हे “मम्मी -पप्पा “जोरात हाऊनाईस ,व्हेरीगुड असे चित्कार टाकत टाळ्या वाजवतात आणि अर्धनग्न पोशाखातील लहान मुलांना उत्तेजन देतात .हे सर्व पाहिल्यावर लोकमान्य टिळकांचा आत्मा काय म्हणत असेल ? या साठीच का त्यांनी गणेशोत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरे करण्याची प्रेरणा दिली ?

आमच्या लहानपणी आम्ही याच ठाण्यात गणेशोत्सवाच्या काळात गजानन वाटवे , सुधीरफडके ,दशरथ पुजारी वगैरे मंडळींची भावगीते ऐकली ,राष्ट्रीय कीर्तनकार आफळे यांची राष्ट्रपुरुषांवरील कीर्तने ऐकली ,रामभाऊ मराठे , प्रसाद सावकार,प्रभाकर कारेकर यांच्या नाट्यगीते आणि शास्त्रीय संगीताच्या मैफली ऐकल्या , देशप्रेमाची आणि विद्वान लोकांची भाषणे ऐकली . गणेशोत्सव म्हणजे मनोरंजन आणि ज्ञान यांची मेजवानी असायची आणि त्यात आतताईपणा किंवा बिभत्सपणा नव्हता . असे गणेश उत्सव साजरे करणारी मंडळे हि सत्वगुणी कार्यकर्ते निर्माण करणारे कारखाने होते. याच कार्यकर्त्या तून उत्तुंग नेतृत्व देणारे नेते उदयास आले , परंतु तो आता इतिहास झाला आहे.

यासाठी तातडीचा उपाय म्हणून मंडळांच्या संख्येवर निर्बंध येणे आवश्यक आहे .म्हणूनच एक गाव एक गणपती या धर्तीवर सर्व प्रथम “एक प्रभाग एक गणपती “हि संकल्पना शहरी भागात रुजवणे गरजेचे आहे.शक्यतो उत्सव रस्त्यावर मंडप टाकून न करता मोकळ्या जागेवरच करावेत. मनोरंजनाचे कार्यक्रम लहान मुलांचे आणि तरुणांचे प्रबोधन करणारे असावेत .ध्वनिवर्धक लावताना डीजे चा वापर टाळावा, या गोष्टी आपण सहज करू शकतो .

माणूस म्हणून सर्व माणसे सारखीच असली तरी प्रत्तेक माणूस आपापल्या परीने वेगळा असतो.जे जे आकारात येते ते त्रिगुणांनी भरलेले असते असा सिद्धांत भारतामध्ये कपिलाचार्यांनी मांडला होता.माणूसही त्रिगुणात्मक असतो.प्रकाश ,ज्ञान शांती, समाधान , निस्वार्थी प्रेम इत्यादी सत्वगुणांबरोबर येतात.

वासना ,धडपड , उद्योगीपणा , लढावूवृत्ती इत्यादी रजोगुणांबरोबर येतात. आळस , निद्रा , सुस्ती , जडत्व , मोह इत्यादी तमोगुणांबरोबर येतात.प्रत्तेक माणसामध्ये हे तिन्ही गुण असतातच पण त्यापैकी एक इतर दोहोंपेक्षा वरचढ असतो.या वरचढ गुणांमुळे प्रत्तेक माणूस रजोगुणी , तमोगुणी किंवा सत्वगुणी मनाला जातो.

राजकारण आणि समाजावर कोणत्या लोकांचे वर्चस्व आहे ,त्यावर त्या देशाचे भवितव्य ठरत असते.हिरोशिमा किंवा नागासकीवर पडलेले अणुबॉम्ब तमोगुणी पुढा-यांच्या वर्चस्वाचा परिणाम होता.माझे नुकसान झाले तरी बेहत्तर पण मी दुस-याचा नायनाट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,हि वृत्ती म्हणजेच तमोगुण . याच वृत्ती मूळे युद्धे होतात,रक्तपात होतो,मनुष्यहानी होते संपत्ती चा नाश होतो आणि समाजाचे जीवन असह्य होऊन जाते.तमोगुणी माणसांच्या अट्टाहासामूळे किंवा त्यांच्या इर्षे पुढे समाज हतबल झाल्याची अनेक उदाहरणे इतिहासात आणि वर्तमानातही दिसून येतात.

समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये या तिन्ही गुणांचे वर्णन केले आहे.समर्थ म्हणतात ‘तमोगुणी माणसात पैसा मिळवावा आणि चैनीत आयुष्य घालवावे असा दृष्टीकोन असतो . तो उघडपणे भोगी वृत्तीचा असतो.तमो गुणी व्यक्तींमध्ये एकाकीपणा , आततायीपणा आणि अघोरीपणा असतो .अमर्याद स्वार्थ आणि आसक्ती हा तमोगुणांचा स्थायीभाव आहे.ज्यास परमावधीचा राग येतो , रागाच्या भरात आपला प्राण द्यावा अथवा दुस-याचा प्राण घ्यावा असे वाटते . स्त्रिया आणि मुले यांवर अत्याचार करणे,किडे ,मुंग्या ,श्वापदे , जनावरे यांना ठार मारणे , सत्ता अथवा संपत्ती मिळण्यासाठी प्रतिस्पर्धी ठार मारणे , पापाचे भय नसणे , भ्रष्टाचार करणे या गोष्टी तमोगुणी माणसात सहजपणे आढळतात .दुस-याच्या दुखः पाहून जो संतोष पावतो ,निर्दयी पणे वागण्याची ज्याला हौस आहे,, लोकांत भांडण लावून द्यावे आणि आपण मजा पाहत राहावे हि द्रुष्टबुद्धी ज्यांच्या अंतर्यामी असते तो तमोगुणी असतो ‘.

तमोगुणांपेक्षा थोडासा श्रेष्ठ हा रजोगुण असून , श्री समर्थ रामदास सांगतात की , रजोगुणांमुळे माणसाला पुन्हा पुन्हा जन्म घेऊन यावे लागते.रजोगुण हा तमोगुणां एवढा भयंकर नसला तरी रजोगुणांमुळे वासना प्रपंचात गुंतून राहते.आई -वडील ,बायको , मुले- मुली ,जावई , सुना , नातवंडे इतक्याच लोकांची जो काळजी करतो तो रजोगुणी असतो.उत्तम खावे , उत्तम वस्त्रे पांघरावी आणि दुस-याकडे जे जे उत्तम आहे त्याची अभिलाषा धरावी हे रजोगुणी माणसाचे विचार असतात.समर्थ म्हणतात ,मी तरुण,मी सुंदर, मी बलाढ्य ,मीच चतुर असे जो समजतो तो रजोगुणी असतो.

सत्वगुणी माणूस हा सर्व श्रेष्ठ असतो.सत्व गुण हा अत्यंत दुर्लभ आहे.ईश्वरावर प्रेम ,विवेकी वृत्ती ,परमार्थाची आवड , समाजाची निरपेक्ष सेवा हि सत्वगुणांची महत्वाची लक्षणे आहेत.नाना प्रकारची दाने करणे , मंदिरांना मदत करणे , अन्नदान करणे,धर्मशाळा उभ्या करणे , लहान मोठ्या बागांची निर्मिती करणे , लोकांबद्दल सहानुभूती असणे तो सत्व गुण असे रामदास स्वामी दासबोधात सांगतात.

सत्वगुणी माणसे उत्सवप्रिय असतात .एरव्ही नियमाने ईश्वराची उपासना करणा-या भक्ताला उत्सवामध्ये भगवंताचे विशेष प्रेम दाटून येते.अनेक लोकांची सेवा करण्याची संधी मिळते.अशा सत्वगुणी लोकांची स्तुती श्री समर्थांनी दासबोधात केली आहे.
परंतु आजचे उत्सवाचे स्वरूप पाहिल्यानंतर आम्ही संतांची शिकवण विसरलो , लोकमान्य टिळकांच्या विचारांना पायदळी तुडवले असे जाणवते.

एकतर बेसुमार गर्दीमुळे शहराला विनाशकाली सूज आलेली असताना जे पुढारी अनधिकृत झोपडपट्ट्या वसवतात , फेरीवाल्यांना रस्त्यावर आणून बसवतात आणि त्यांच्या कडून हप्ते खातात,आधीच निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांची पावसामुळे दैना होते अशा रस्त्यावरून लोकांना प्रवास करायला भाग पाडून लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहतात , त्यांनी पुन्हा असले त्रासदायक ठरतील असे उत्सव साजरे करून जनतेला वेठीला धरावे , हाच या लोकांमध्ये तमोगुण आणि रजोगुण मोठ्या प्रमाणात वाढला आहे याचा पुरावा आहे.

हे थांबवणे गरजेचे आहे.उत्सव साजरे झाले पाहिजेत पण त्यांचे आजचे स्वरूप बदलणे गरजेचे आहे.ज्या ठिकाणी शांतता ,सुचिता, शिस्त , वागण्याची मर्यादा , आपलेपणा असतो त्याच ठिकाणी धर्माचे अधिष्ठान असते हे विसरून चालणार नाही.

याच साठी एका वार्डात एकाच गणपती असावा हि आमची मागणी आहे.सर्व पक्षीय नगरसेवकांनी या साठी एकत्र येण्याची गरज आहे.जो वार्ड यासाठी जाहीर पुढाकार घेईल त्या वार्डातील गणेशोत्सव मंडळाचा जाहीर सत्कार झाला पाहिजे .आता फक्त राजकीय पाठिबा मिळण्याचा अवकाश पुन्हा माझे ठाणे मोकळा श्वास घेवू लागेल

चला सर्व जण एकत्र येवून या उत्सवाचे स्वरूप बदलूया –

— चिंतामणी कारखानीस

चिंतामणी कारखानीस
About चिंतामणी कारखानीस 75 Articles
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..