नवीन लेखन...

पुन्हां एकदा : १० मे १८५७

  • पुन्हां एकदा १० मे आला, आणि पुन्हां एकदा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाची जयंती आली. ही १६१ वी anniversary. या प्रसंगी आपण त्या युद्धाला व त्यात आहुती देणार्‍या आपल्या पूर्वजांना विसरूंया नको.
  • आजही बरेच विद्वान या घटनेला Mutiny, Rebellion, Revolt (बंड) असें संबोधतात. न. र. फाटकांसारख्या सुप्रसिद्ध विद्वानानेंही या घटनेला ‘शिपायांचें बंड’ अशा प्रकारेंच संबोधलें आहे. साम्यवादी (कम्युनिस्ट) इतिहासकार, ‘हें जमीनदारांच्या कुकृत्यांमुळें सुरूं झालेलें युद्ध होतें’ असें मानतात. असे सर्व विद्वज्जन , आपापल्या सिद्धांताच्या पुष्ट्यर्थ पुरावा म्हणून, तत्कालीन कागदपत्रांचा संदर्भही देतात.
  • १८५७ चें युद्ध हें भारताचें पहिलें स्वातंत्र्यसमर ( War of independence) आहे, हा विचार सर्वात आधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी २० व्या शतकाच्या पहिल्या दशकात मांडला. हल्ली कांहीं मंडळी म्हणताहेत की, ‘सावरकरांनी इंग्रजांविरुद्ध संघर्ष करणार्‍या तत्कालीन ( २० व्या शतकातल्या ) लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी हा स्वातंत्र्ययुद्धाचा सिद्धांत मांडलेला होता, पण वस्तुस्थिती तशी नव्हती’ .

मात्र, आज अनेक विचारवंत सावरकरांच्या  सिद्धांताची ( त्यांचा नामोल्लेख करून वा न करून) पुष्टी करताहेत, हें विसरून चालणार नाहीं.

  • १८५७ चें युद्ध हें बंड (revolt) होतें की सशस्त्र क्रांती (revolution) या गोष्टीचा उहापोह करतांना केवळ कागदपत्रांचाच आधार घेणें पुरेसें नाहीं. उदाहरणार्थ, या युद्धात पंजाबातील शीख जमात इंग्रजांच्या बाजूनें लढली. म्हणून, कोणी अशी आर्ग्युमेंट देऊं शकतो की, ”ज्याअर्थी सगळेच हिंदुस्थानी लोक (म्हणजे भारतीय) इंग्रजांच्या विरुद्ध लढले नाहींत, त्याअर्थीं या युद्धाला, ‘कांहीं पलटणी इत्यादींनी केलेलें  बंड ’ म्हणणेंच सयुक्तिक आहे”  . परंतु, शिखांनी इंग्रजांच्या बाजूनें लढण्याची तत्कालिक कारणें वेगळी होती. त्यांच्या योग्यायोग्यतेचा विचार तूर्तास बाजूला ठेवूं या, पण ती कारणें जरूर जाणून  घ्यायला हवीत, त्यांचा अन्वयार्थ समजून घ्यायला हवा.

थोडाथोडका काळ नव्हे, तर दीडएक वर्षें चाललेलें व भारताच्या बर्‍याच भागात पसरलेलें हें युद्ध, ज्यात अनेक तत्कालीन बडी प्रस्थें सामील           झालेली होतीं, तें म्हणजे ‘बंड’ कसें ? , याचें समाधानकारक उत्तर कोणाकडूनही मिळणें कठीण आहे.

  • या युद्धात नानासाहेब (दुसरे) , त्यांचे बंधू रावसाहेब, झाशीची वीर राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांच्याव्यतिरिक्त इतरही बर्‍याच मंडळींचें नेतृत्व लाभलें होतें, जसें की बख्त खान, राव तुलाराम, कंवर सिंह, चौधरी कदम सिंह इत्यादी. नेपाळ-नरेश व नेपाळी पलटणीही प्रत्याप्रत्यक्षपणें इंग्रजांविरुद्धच होत्या ; आणि नानासाहेब तर युद्ध हरल्यानंतर नेपाळातच गेले होते. तिथें ते लुप्त झाले. ते कुठें गेले, त्यांच्यासंगें असलेला खजिना कुठे गेला, हें कोणासही माहीत नाहीं. उघड आहे की त्यांना नेपाळ नरेशानें गुप्तपणें लपवलें होतें, अन्यथा नानासाहेबांनाही रावसाहेब आणि तात्या टोपे यांच्याप्रमाणें नक्कीच फासावर लटकावें लागलें असतें.
  • इथें मुद्दा असा की, जर त्या लढ्यात केवळ शिपाईच नव्हते, तर, भारतातील अनेक प्रॉमिनंट राजे, मोठे जमीनदार , आणि, (रिलक्टंटली, नाइलाजास्तव, कां होईना, पण ) मुघल बादशाह बहादुरशाह जफर, अशी मंडळी सामील होती , त्या लढ्याला केवळ ‘शिपायांचें बंड’ असें संबोधून कसें चालेल?
  • हें युद्ध दक्षिण भारतात लढलें(च) गेलें नाहीं, असें कांहीं इतिहासकार मंडळी मानत व मानतात. परंतु, खरी गोष्ट तशी नाहीं, हें आतां पुराव्यानिशी सिद्ध झालेलें आहे, आणि त्यावर संशोधन करून पुस्तकेंही लिहिली गेलेली आहेत. बरं, तें कांहींही असो, दक्षिणेतील पलटणींनी उत्तरेत जाऊन इंग्रजांविरुद्ध लढणार्‍या आपल्या बांधवांशी युद्ध करण्यांस नकारही दिलेला होता, हें मान्य करायला हवं.
  • दुसरी , आणि महत्वाची गोष्ट म्हणजे, कागदपत्रांव्यतिरिक्त अशा बर्‍याच गोष्टी असतात, ज्या ज्यूडिशियसली , नीरक्षीरविवेकबुद्धीनें, विचारात घेणें आवश्यक ठरतें. तिथें घटनांचा व पूर्वपीठिकांचा अन्वयार्थ काढणें आवश्यक असतें, आणि तें सोपें कार्य नव्हे. मौखिक चर्चांबद्दल तर साधारणतया (खरें तर जवळजवळ नेहमीच) कांहींच कागदपत्रें मिळणें  शक्य नसतें, व त्यामुळे, अन्य बाबींवरून अशा गोष्टींचा कयास बांधावा लागतो.
  • तो अन्वयार्थ जोडून आपला सिद्धांत मांडणार्‍या , आणि आपल्याला त्या युद्धाबद्दल एक नवीन दृष्टी देणार्‍या, स्वातंत्र्यवीर सावरकारांच्या बुद्धीची झेप आणि आवाका यांची स्तुती करावी तेवढी थोडीच!
  • रिव्होल्ट की रिव्होल्यूशन ( बंड की क्रांती ) हें ठरवतांना अनेक मंडळी एक बाबच मुख्यत्वें विचारात घेतात, आणि ती ही की, ‘तें युद्ध कोण जिंकलें , कोण हरलें ’. पण तो विचार नक्कीच पुरेसा नाहीं, खरें तर, तेवढाच विचार करणें हें योग्य नाहींच.

या बाबीचें विश्लेषण करतांना आपण कांहीं युद्धें ध्यानांत घेऊं या.

  • पहिलें आहे ‘फ्रेंच रिव्होल्यूशन’, आणि दुसरें आहे ‘अमेरिकन वॉर ऑफ् इंडिपेंडेन्स्’. घ्यानात घ्या, हे दोन्हीही लढे, जनतेनें तत्कालीन राजसत्तांच्या विरोधात केलेले ‘उठाव’च होते. पण, फ्रान्समधील युद्धात जनता जिंकली, आणि म्हणून तें ‘रिव्होल्यूशन’ ठरलें. त्याचप्रमाणें उत्तर अमेरिकेतील, इंग्लिश राजसत्तेच्या अधिपत्याखाली असलेल्या कॉलनींनी इंग्लंडविरुद्ध केलेल्या युद्धात, कॉलनीज् जिंकल्या , आणि म्हणून त्या युद्धाला ‘वॉर‘ऑफ् इंडिपेंडेन्स्’ असें संबोधलें गेलें.
  • जर फ्रेंच जनता व / किंवा अमेरिकन कॉलनीज् हरल्या असत्या, तर त्यांच्या संघर्षाला ‘रिव्होल्ट’ (बंड) असेंच संबोधलें गेलें असतें, ही बाब आपण घ्यानात घेणें आवश्यक आहे.
  • लॅटिन अमेरिकेतही युरोपीय राष्ट्रांच्या कॉलनीज् होत्या. तेथील जनतेनेंही युरोपीय सत्तांविरुद्ध लढे दिले आणि स्वातंत्र्य प्राप्त करून घेतलें. त्यामुळे, त्या संघर्षांनाही ‘क्रांती’ किंवा ‘स्वातंत्र्ययुद्ध’ असें संबोधलें जातें.
  • अशीआणखीही उदाहरणें आहेत . ती आहेत, रशिया १९१७ , चीन १९४९ , आणि १०७० च्या दशकातील व्हिएटनाम.

या तिन्ही ठिकाणीं तत्कालीन सत्ता ( रशियात झार, चीनमध्ये सन् यत सेन यांचें सरकार, व व्हिएटनाममध्ये अमेरिका (USA) आणि अमेरिकेनें दक्षिण व्हिएटनाममध्ये स्थापन केलेलें ‘dummy’ सरकार ) यांच्याविरुद्ध झालेलीं युद्धें , यांत प्रत्येक ठिकाणीं जनता (अनुक्रमें, लेनिनादि बोल्शेव्हिक, माओ त्से तुंग, आणि हो चि मिन्ह ) जिंकले, म्हणून त्यांचा संघर्ष हा क्रांती / स्वातंत्र्ययुद्ध ठरलें.

  • [ त्यामुळे, एक निष्कर्ष जरूर काढता येतो, आणि तो हा की, १८५७ च्या युद्धात जर ‘कंपनी सरकार’ (इंग्रज सत्ता) हरलें असतें, व हिंदुस्थानी संघर्षक जिंकले असते, तर मग या युद्धाला निश्चितच ‘स्वातंत्र्ययुद्ध’ म्हटलें गेलें असतें, व त्याबद्दल कुठलेंही दुमत झालेंच नसतें  ] .
  • पण हा बर्‍याच अंशीं वरवरचा विचार झाला. कोण जिंकलें कोण हरलें , केवळ यावरूनच, तो संघर्ष, रिव्होल्ट किंवा रिव्होल्यूशन  यांपैकी काय होता, हें ठरविणें कितपत योग्य आहे ?
  • खरें तर, युद्धामागचा हेतू पाहून मगच काय तें ठरवणेंच उचित आहे.
  • युद्ध जिंकणे , फक्त हाच जर योग्यायोग्यतेचा, ( आणि , त्या युद्धाला काय ‘नांव’ द्यायचें, यासाठीचा ) निकष असता, तर अनेक युद्धांबाबत आपण, ( व इतिहासकारही ), कांहीं वेगळें बोललो असतो.
  • यासाठी आपण कांहीं उदाहरणें पाहूं या.
  • (पुढील उदाहरणें जरी ‘जनता विरुद्ध राजसत्ता’ अशा प्रकारची नसली, तरी, ती, ‘जिंकण्या-हरण्यावरून निष्कर्ष बांधण्याबद्दल ’च्या आपल्या मुद्द्याशी संबंधित आहेत. आणि, अर्थातच, त्यांतील निकष आणि विश्लेषण ‘जनता विरुद्ध राजसत्ता’ या लढ्यांनाहीआपण लागू करूं शकतो, ही बाब महत्वाची).
  • १७६१ मध्ये मराठ्यांना पानिपतावर अब्दालीनें पूर्णपणें मात दिली म्हणून आपण (खास करून महाराष्ट्रीय लोक) ‘अब्दाली बरोबर होता, आणि मराठे चूक ’ , असें म्हणायला तयार होणार होणार आहोत कां ?
  • शिवपुत्र संभाजीला औरंगझेबाचा सरदार मुकर्रब खान यानें , तो (संभाजी) बेसावध असतांना पकडलें आणि औरंगझेबानें त्याला ( संभाजीला ) हालहाल करून ठार मारलें. याचा अर्थ, ‘औरंगझेबाची बाजू योग्य होती व संभाजीची अयोग्य ’ , असें आपण मानणार आहोत कां? अर्थातच नाहीं. कारण तसें जर असतें, तर त्यानंतरची १८ वर्षें , औरंगझेबाच्या मृत्यूपर्यंत, मराठे मुघलांशी अथक लढत राहिले नसते.
  • त्याआधीच्या काळातली उदाहरणें घेतली, तर अटिला द हुन (हूण) , महमूद गझनवी, महंमद घोरी, तैमूरलंग, चंगेझखान, हलाकू खान, नादिरशाह इत्यादी ‘नृशंस आक्रमणकांचीच बाजू योग्य होती , न्याय्य होती ’ , असें आपण म्हणायचें कां ?
  • दुसर्‍या महायुद्धात, जपानला नमविण्यासाठी अमेरिकेनें ( USA नें ) हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर अणुबाँब टाकले ; व त्यामुळे जपाननें शरणागती पत्करली, आणि अमेरिका जिंकली. पण त्या जिंकण्यामुळे, अणुबाँब टाकण्याचें अमेरिकेचे कृत्य समर्थनीय ठरतें कां  ? तर, नाहीं . आतां तर अनेक अमेरिकन विचारवंतही त्या कृत्याला अयोग्यच म्हणतात.
  • आपण अफझलखानाचें उदाहरण जरा खोलात जाऊन पाहूं या.

अफझल आणि शिवबा यांची तंबूत एकांतात भेट झाली, आणि तिथें जो कांहीं व्यक्तिगत स्वरूपाचा संघर्ष झाला, त्यात अफझल खान मेला. (‘कुणी कुणावर आधी वार केला’, हा प्रश्न इथें गौण आहे).  ‘शिवबा यशस्वी झाले , केवळ म्हणूनच, त्यांचें वर्तन योग्य होतें ’, असें आपण म्हणायचें कां ? कारण, जर केवळ तोच जर निकष असता, तर कस्तुरी रंगा व अफझल यांच्यामधील भेटीबद्दल काय म्हणायचें ? दोन्ही बाजूंच्या सैन्यांमधील युद्धात कस्तुरी रंगा हा राजा हरेना. त्यामुळे, सलोखा करण्यासाठी म्हणून अफझलनें त्याला भेटीला बोलावलें, आणि तिथें दगाफटका  करून त्याला मारलें. म्हणजेच, अफझल विजयी झाला.

ध्यानात घ्या, केवळ ‘विजय’ हाच जर निकष मानला, तर, कस्तुरी रंगाच्या संदर्भात अफझलचें वर्तन योग्यच होतें, असें म्हणणें आपल्याला क्रमप्राप्तच आहे. पण तसें होत नाहीं. तें कां ? तर, तिथें आपल्याला त्या घटनेमागील हेतू  पहावा लागतो. अफझलला विधिनिषेध नव्हता, त्याला by hook or crook जिंकायचेंच होतें, आणि तें , आपल्या बादशहासाठी (आदिलशहासाठी) करायचें होतें. तसेंच, त्यानंतर आदिलशहाच्या दरबारात आपला मानमरातब, दबदबा वाढेल, हेंही गणित त्यामागे होतें. पण शिवबांचा हेतू  noble  , उदात्त   होता. त्यांना हिंदवी स्वराज्य निर्माण करायचें होतें , त्यांना जनतेवरील अन्याय व जनतेची लूट थांबवायची होती , रयतेचे राज्य स्थापायचें होतें. त्या सार्‍या गोष्टींचा  विचार करून, आपण, ‘ शिवबांनी केलेलें कृत्य योग्य होतें, पण त्याच प्रकारचें अफझलनें केलेलें कृत्य अयोग्य होतें ’, अशा निष्कर्षापर्यंत पोंचतो.

  • आपण पुन्हां एकदा, १७६१ जानेवारीच्या पानिपत-लढाईकडे वळूं या.

भाऊसाहेब मराठवाड्यातील परतूडहून निघाले, तेव्हांपासून-ते-उत्तरेत-पोंचल्यानंतरही , ते (भाऊसाहेब) राजपुतान्यामधील रजपूत राजांना, व उत्तर-हिंदुस्थानातील राजेरजवाडे, नबाब वगैरेंना पत्रें लिहीत होते, त्यांची मनें वळवण्यांचा प्रयत्न करत होते. त्या पत्रांमधील मुख्य बाब काय होती, तर ती ही की, ‘आपण सारे, हिंदुस्थानी-लोक आहोत, मुघल पातशहा हाही हिंदुस्थानी आहे. अब्दाली हा अफगाण , परदेशीय आहे. परकीयांपासून हिंदुस्थानचें संरक्षण आपण सर्वांनी एकत्र येऊन केलें पाहिजे ’ .

दुर्दैवानें, उत्तरेतील कुणालाच भाऊसाहेबांचें ( व पर्यायानें, नानासाहेब पेशव्यांचे )  विचार समजलेच नाहींत.

हा काळ कोणता आहे, तर तो, ‘अमेरिकन वॉर ऑफ् इंडिपेंडेन्स्’ आणि ‘फ्रेंच रिव्होल्यूशन’ यांच्या आधीचा काळ आहे. भाऊसाहेबांच्या पत्रांचा काळ आहे १७६० चा , अमेरिकन वॉरची सुरुवात आहे १७७५ मधली, तर फ्रेंच क्रांती सुरूं झाली १७८९ मध्ये.

त्या काळात युरोपात ( व युरोपीय सत्तांच्या कॉलनीज् मध्ये ) नवविचारांचे  वारे वहात होते. ‘नॅशनॅलिझम’ म्हणजेच राष्ट्रवादाचा already विचार सुरूं झालेला होता. मात्र, भारत  feudal काळातच वावरत होता, ‘राष्ट्रवाद’ वगैरे नवविचार तर तत्कालीन भारतीयांना माहीतच नव्हते. अशा वेळी, भाऊसाहेब,  ‘ हिंदुस्थानी (म्हणजे एतद्देशीय)  व परदेशीय (परकीय आक्रमक) ’ असा जो विचार मांडत होते, तो तत्कालीन भारतीयांसाठी ‘काळाच्या फार पुढला ’ विचार होता ; आणि म्हणून त्यांना तो समजलाच नाहीं ! याउलट, अब्दाली तर मुलुख व लूट यांच्यासाठीच भारतातआलेला होता. नजीबखान रोहिल्यानें पुढे-केलेला धार्मिक विचार त्याला व त्याची बाजू घेणार्‍या भारतीय सत्ताधीशांना समजला, पटला.

मात्र, हें स्पष्ट आहे की, भाऊंचा विचार नोबल् , उदात्त होता . त्यामुळेच, मराठे जरी युद्ध हरले तरी, त्यांचा हेतू  बरोबर होता , योग्य होता, त्यांची बाजू न्याय्य होती, असें म्हणणें क्रमप्राप्त ठरतें. युद्ध जिंकणें अथवा न जिंकणें हा सुयोग्य निकष नव्हेच.

  • युद्धात जो जिंकतो, तो कां जिंकतो, हें लक्षात घेणें गरजेचें आहे. त्याची, खालील एक किंवा अनेक कारणें असूं शकतात.
  • त्याच्याकडील शस्त्रें अधिक प्रगत, अधिक आधुनिक, असतात .
  • त्याची युद्धनीती ( war-stategy and tactics ) अधिक परिणामकारक, ( यशस्वी होण्यासाठी अधिक योग्य ), असते .
  • त्याची ‘वॉर मॅनेंजमेंट’ सुपीरियर असते ( जसें की लॉजिस्टिक्स्, सप्लाय-चेन मॅनेजमेंट, स्टोअर्सस, Administration, इत्यादि ) .
  • सैन्याची quality (क्वालिटी, गुणवत्ता ) , उदा. सैनिकांना मिळालेलं युद्ध-प्रशिक्षण व त्याची त्यांनी युद्धाआधी केलेली प्रॅक्टिस, सैनिकांमधील शिस्त, सैनिकांचें मनोधैर्य , इत्यादि .
  • भूगोल आणि त्याचा केलेला योग्य उपयोग .
  • आणि, कधीकधी , नशीब .

ही त्या जेत्याच्या जिंकण्यांमागची खरी कारणें असतात .

  • तो जो कोणी जिंकला, म्हणजे ‘त्याचा हेतू योग्य होता, त्याची बाजू न्याय्य होती’, असा अर्थ काढणें  बरोबर नव्हेच, हा मुद्दा पुन्हां ( व पुन्हांपुन्हां ) अधोरेखित होतो.
  • अखेरीस : आपण वर पाहिलेली बरीच उदाहरणें युरोपीय सत्तांशी संबंधित आहेत. म्हणून, त्यासंदर्भातील, Samuel P. Huntington याच्या  ‘Clash of Civilizations’ या महत्वाच्या पुस्तकातला,  Western म्हणजे युरोपीत सत्तांच्या संदर्भातील, एक उतारा पाहूं या. ( त्याच्या मराठी भाषांतराऐवजी मूळ इंग्रजी उतारा वाचणें अधिक उपयुक्त होईल).

           “ … ‘the rise of the West’ depended upon exercise of force … the key to the Westerners’ success in creating the … truly global empires …. depended precisely upon those improvements in the ability to wage war ’ …. The expansion of the West was also facilitated by superiority in organisation, discipline, and training of its troops, and susequently by superior weapons, transport, logistics, …. The West won the world, not by the superiority of its ideas or values, …. but rather by its superiority in applying organised violence. … “  .   ( ठळक टाइप माझा ) .

या उतार्‍यात मांडलेला मुद्दा इतका सुस्पष्ट, इतका बोलका, आहे की त्यावर अधिक भाष्य करायची आवश्यकताच नाहीं.

  • समारोप : या सगळ्या विवेचनाचा अर्थ हाच की, १८५७-५८ चें भारतीयांचा इंग्रज सत्तेविरुद्धचा लढा, हें स्वातंत्र्ययुद्धच होतें  ;  त्याला केवळ, ‘उठाव’ , ‘बंड’ असें संबोधणें योग्य नव्हे.

आणि, म्हणूनच, आपण सर्वांनी , तें , १८५७ चें, स्वातंत्र्ययुद्ध लढणार्‍या आपल्या known-unknown पूर्वजांचें आदरानें , कृतज्ञतापूर्वक स्मरण करायला हवें. तें आपलें कर्तव्यच आहे.

– – –

— सुभाष स. नाईक    Subhash S. Naik

M – 9869002126.    email : vistainfin@yahoo.co.in

Website  :  www.subhashsnaik.com , www.snehalatanaik.com

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..