१० मे २०१६ ला भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य-युद्धाला १५९ वर्षें पूर्ण होतील. तें युद्ध १० मे १८५७ ला सुरूं झालें होतें. जरी इंग्रजांनी त्याची ‘गदर’ म्हणून संभावना केली असली तरी, तें स्वातंत्र्ययुद्धच होतें, हें स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९०७ मधील त्यांच्या ग्रंथाद्वारें दाखवून दिलेलें आहे.
हें स्वातंत्र्ययुद्ध असफल झालें असें म्हटलें जातें. बहादुरशहा जफर याला दूर ब्रह्मदेशात कैदेत ठेवलें गेलें, झाशीची राणी लक्ष्मीबाई हिला वीरमृत्यू आला, तात्या टोपे यांना फाशी देण्यात आले, नानासाहेब पेशवे परागंदा झाले, कित्येक लहानमोठ्या वीरांचा मृत्यू झाला, किंवा त्यांना झाडांवर लटकवून फाशी दिलें गेलें. काळ्या पाण्याची शिक्षा १८५७ नंतरच सुरूं झाली. आणि, १८५७ नंतर, ब्रिटिश सत्तेचे पाय भारतात आणखी घट्ट रोवले गेले. या सर्वांचा अर्थ , ‘हें युद्ध असफलच झालें’, असा काढला गेला तर नवल नव्हे.
पण, हें युद्ध असफल झालें नाहीं !! ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार या युद्धानंतर संपुष्टात आला ; ही महत्वाची घटना नाहीं काय ? त्यानंतर या कंपनीचा सर्व व्यापार संपलाच ! , आणि ती एक केवळ एक पोकळ shell बनून अस्तित्वात राहिली.
या युद्धानंतर जरी UK च्या सरकारनें भारताचा कारभार हातात घेतला , तरी, आपण हें ध्यानात घ्यायला हवें की, it was the beginning of the end of the British Rule in India. कारण, १८५७ च्या युद्धापासून स्फूर्ती घेऊन, त्यानंतर ब्रिटिशांशी विविध पातळ्यांवर संघर्ष सुरूं झाला, आणि परिणामस्वरूप, १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळालें. हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या भारतासारख्या पुरातन देशाच्या दृष्टीनें , (१८५७ ते १९४७ ही) ९० वर्षें म्हणजे कांहींच नाहीं !
रामदास स्वामींनी म्हटलें आहे – ‘वन्हि तो चेतवावा रे’. तो वन्हि १८५७ नें नक्कीच चेतवला, आणि त्याचे दूरगामी परिणामही झाले !
मात्र, २१ व्या शतकात जन्म झालेल्या युवा पिढीला १८५७ चें महत्व काय आहे, तें कितपत ठाऊक आहे ? ; कांहीं कल्पना नाहीं. तें महत्व तिला कळायला मात्र नक्कीच हवें.
दर वर्षी, भारत सरकार, राज्य सरकारें व consencious राजकीय पक्षांनी, तसेंच जनजागृती करणार्या सोशल-ऑरगायझेशन्सनी, १० मे हा दिवस, ‘१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा स्मृतिदिवस ’ म्हणून साजरा करायला हवा, असें मला सुचवावेसें वाटतें. (मात्र या दिवशीं, सुट्टी नको. आधीच भारतात खूप सुट्ट्या आहेत ! ). १० मे या दिवशी, या दिवसाची महती वर्णणारे, त्याची long-term implications सांगणारे कार्यक्रम व्हावेत, अशी अपेक्षा करणें चूक आहे काय ?
पाहूं या, कोणी जागें होतें कां, तें.
— सुभाष स. नाईक . सांताक्रूझ मुंबई.
M- 9869002126. eMail : vistainfin@yahoo.co.in
अतिशय छान माहिती. पण सध्याच्या दिवसात अशा गोष्टींकडे बघायला ना सरकारला रस आहे ना लोकांना. काहीतरी करायलाच पाहिजे.