आज २० ऑक्टोबर. आज संगीत संशयकल्लोळ या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला १०० वर्षे झाली.
संगीत संशयकल्लोळ हे गोविंद बल्लाळ देवलयांनी लिहिलेले एक विनोदी नाटक आहे. २० ऑक्टोबर १९१६ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग गंधर्व नाटक मंडळीने केला.
या नाटकाचा पहिला गद्य प्रयोग १८९४ मध्ये तसबिरीचा घोटाळा ऊर्फ फाल्गुनरावाचा फार्स या नावाने झाला. १९१६ पर्यंत या गद्य नाटकाचे सतत प्रयोग होत होते. गंधर्व नाटक कंपनीने मूळ नाट्यसंहितेत थोडाफार बदल करून नाटकात पदे घातली. ही बहुतेक सर्व गाणी देवलांनी रचली होती. देवल हे अण्णासाहेब किर्लोस्कराचे शिष्य होते आणि एक उत्कृष्ट तालीममास्तर, कवी आणि संगीताचे जाणकार होते.पहिल्यांदा गद्य रूपात आलेले हे नाटक संगीत नाटक म्हणून रंगभूमीवर आले तेव्हा त्यात तब्बल तीसेक गाणी होती. एकटय़ा अश्विनशेठ यांच्या वाटय़ाला दहा गाणी होती. मग रेवती या पात्रासाठी दहा गाणी अशा तीस गाण्यांना घेऊन हे नाटक लोकांसमोर आले.
तेव्हा रात्र रात्रभर नाटक चालत असल्याने तीस गाण्यांचे हे नाटकही त्या वेळी लोकांना खूप आवडले. तेव्हापासून आज शंभर वर्षांत हजारो प्रयोग होऊनही लोकांच्या मनावरची
‘संगीत संशयकल्लोळ’ची जादू ओसरलेली नाही आणि यातलं संगीत आणि तसबिरींच्या घोटाळ्यातून निर्माण झालेलं नाट्य एवढं अस्सल आहे की, त्याचे प्रयोग करण्याचा मोह भल्याभल्यांना आवरलेला नाही. शताब्दीच्या निमित्ताने पुन्हा एकदा या नाटकाचे प्रयोग रंगभूमीवर होत आहेत.संगीत संशयकल्लोळ’ या नाटकाचे २०१६ शतकमहोत्सवी वर्ष असल्याची पर्वणी साधून ‘प्रशांत दामले फॅन फाउंडेशन’ने ते नाटक रंगभूमीवर आणले आहे. नव्या ‘संशयकल्लोळ’मध्ये श्री.राहुल देशपांडे आणि श्री.प्रशांत दामले हे दोघे प्रमुख भूमिकांत आहेत. राहुल देशपांडे हे सध्याचे महाराष्ट्रातील लोकप्रिय रंगभूमी गायक कलाकार. दामले यांनी तर लोकप्रियतेचे अनेक विक्रम केले आहेत. त्यांनी या अगोदर सौभद्र या आणखी एका लोकप्रिय संगीत नाटकाचे प्रयोग केले होते. त्यावेळचे तंत्र वापरूनच संशयकल्लोळ हे नाटक बसवण्यात आले आहे.
संगीत संशयकल्लोळचे कथानक
अश्विनशेठ आणि रेवती हे या नाटकाचे नायक-नायिका आहेत. फाल्गुनराव आणि कृत्तिका या भूमिका थोडीफार खलनायकी स्वरूपाच्या आहेत. नायक-नायिकेत गैरसमज करून देण्यामागे त्यांचा सहभाग आहे. याशिवाय अश्विनशेठचा मित्र वैशाखशेठ, रेवतीची आई मघा नायकीण, तसेच भादव्या, रोहिणी, आषाढ्या, स्वाती, तारका आदी दुय्यम पात्रेही नाटकात कथानकाच्या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात. त्यामुळे नाटकाच्या रंजकतेमध्ये अधिक भर पडली आहे.
फाल्गुनराव हा संशयी स्वभावाचा आहे. तो आपली बायको कृत्तिकावर संशय घेतो. तीही संशयग्रस्त आहे.या संशयाच्या जाळ्यात ते नकळत अश्विनशेठ-रेवती या नायक-नायिकेलाही ओढतात. ही गुंतागुंत शेवटी सर्व संशय फिटेपर्यंत वाढतच जाते, आणि नाटक, बघणार्याची उत्सुकता ताणत ताणत अखेरपर्यंत मनोरंजक राहते.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/विकीपिडीया.
Leave a Reply