नवीन लेखन...

श्री साईनाथांच्या एकशेंचौथ्या स्मृतिदिना निमित्ताने

“यावचंद्रदिवाकरौग्निहोत्रंजुहुयात” – श्री साईनाथांच्या एकशेंचौथ्या स्मृति दिनानिमित्ताने….

लेखक : कॅ. विवेकानंद र. नूलकर

आजीवन अग्निहोत्र चालविणाऱ्या श्री साईनाथांच्या शिरडीखेरिज अन्य अग्निहोत्र ऐकिवात वा वाचनांत नाहीत. श्री साईनाथ देहधारी असतांना व आतां सूर्य-चंद्र असेपर्यत चालणारे असे हे अग्निहोत्र आहे. ( पारसी अग्यारी अपवाद धरावा, तर ज्वालाजी हि. प्र. भूगर्भ अग्नि आहे.) मशीदीत तर अग्नी नाहीच. अग्निहोत्र चालविणारे अत्यंत पुण्यवान असतात अशीच किर्ति आहे. येथे मुद्दामच ‘नाथ’ असा शब्द वापरत आहे कारण श्री साई सच्चरित्र वाचनांत या नाथ संप्रदायाचे पालन श्री बाबांनी कसें केले हेंच दिसते. (प्रत्यक्ष परब्रह्माला हे निकष कांटेकोरपणें लावू नयेत). नुकतेच एक धर्ममार्तंड ब्रह्मीभूत जाहले. जगद्गुरु शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या पांच पीठांपैकी एकाचे ते अधिपती होते, तेंव्हा त्यांच्या विद्वत्तेबद्दल कोणालाही शंका असू नये. कांही वर्षांपूर्वी त्यांनी श्री साईनाथांबद्दल एक विधान केले होते. दुर्दैवाने त्याची आठवणीनें री ओढण्यांत एका वाहीनीला मनस्वी समाधान मिळाले असावे. या दोनही बाबी आतां दखल घेण्यासारख्या आहेत असे नाही. काळ सोकावण्याचा प्रश्र्नच नाही. परंतु या निमित्ताने कांही खुलासा करावासा वाटतो.

सामान्य जनांस अवतार ह्या कल्पनेचे आकलनच होत नाही कारण आपल्याला अमक्याचा मुलगा, तमक्याची मुलगी, यांची मावशी, त्यांचा काका, अशीच नाती माहीत असतात. अवतार म्हणजे ज्याला आई-वडील नाहीत पण जीवन आहे म्हणजेच ‘अयोनिज.’ असं कसं शक्य आहे ? असं शक्य आहे आणि असतं. येशू ख्रिस्ताबद्दल आपल्याला माहित नसल्यामुळे ख्रिस्तांनी सांगितलेल्यावर आपण विश्र्वास ठेवतो. पण आपल्याजवळपास असा कांही प्रकार होऊ शकतो हे मानायला मन धजत नाही. ज्यांना कशावरच विश्र्वास ठेवायचा नसतो आणि बुद्धिप्रामाण्याच्या बुजगावण्याखाली सामान्य जनांचा बुद्धिभेद करण्यापर्यंत मजल जाते त्यांची कीव करावीशी वाटते. सामान्यांना माहीत असलेले, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट, श्री समर्थ गजानन महाराज शेगांव, श्री समर्थ शंकर महाराज, हे सर्वच ‘अयोनिज’ होते. श्री साईनाथही ‘अयोनिज’ होते.

चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस (1320) श्रीदत्त गुरुंनी घेतलेल्या अवतारांत त्यांच्याच आज्ञेने शंकरभट्ट या शिष्याने त्यांचे संस्कृतमधें चरित्र लिहिले. ते पुढे, श्री दत्त गुरुंच्या आज्ञेप्रमाणे, शंकरभट्टाच्या 33 व्या पीढीतील सारंगदेवांनी तेलगुमधे भाषांतर केले. याचे मराठी भाषांतर 2008 मधे सत्पुरुष श्री भाऊमहाराज निटुरकर यांनी केले. श्रीशंकरांच्या भविष्य पुराणाप्रमाणें श्री दत्तगुरुंनीही भाकीते केली आहेत. त्यांत त्यांनी स्वच्छ शब्दांत म्हटले आहे की, ‘ मी कारंजा येथे नरसिंह सरस्वती (पहिले),’ नंतर तीनशें वर्षांच्या समाधीनंतर ‘प्रज्ञापूर’ (अक्कलकोट) येथे ‘स्चामीसमर्थ’ या नांवाने प्रकट होईन. धिशीला नगरींत (शीलधी/शिरडी) ‘ साई बाबा ’ या नांवाने ‘ यवन वेषांत ’ माझा ‘समर्थ सद्गुरु’ रूपांत अवतार होईल, (यवन होऊन नव्हे). हे विधान श्री श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजेच श्री दत्तगुरुंचे आहेत. याच विधानाबरोबर श्री श्रीपाद श्रीवल्लभांच्या इतर भाकीतांमधे, श्री रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज, श्रीधरस्वामी, श्री माणिकप्रभू, श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे महाराज) यांचेही अवतारांचे उल्लेख आहेत. (श्री साईबाबा व श्री वासुदेवानंद सरस्वती यांचे अवतार हे एकाच वेळी झाले होते. श्री वासुदेवानंद सरस्वतींनी राजमहेंद्रीला गोदातीरी असताना नांदेडचे वकील पुंडलीकांजवळ एक नारळ दिला होता आणि सांगितले की “ते अमुचे बंधू निष्काम, आम्हांसी निस्सीम प्रेम त्यांचे;” “वंदूनि बंधू पदकमळ, अर्पा हें शिरडीस जाल तेंव्हा. ”) श्री वासुदेवानंद सरस्वतींबद्दल आणि ज्यांना बंधू म्हटलें त्यांच्याबाबत अधिक सांगण्याची आवश्यकता नाही. प्रत्यक्ष भगवंतापेक्षां (हे दोनही दत्तावतार समकालीन होते) कोणी पदाधिकारी मोठा असावा हे सद्सद्विवेक बुद्धिला अग्राह्य आहे. यासोबत एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे श्री भाऊमहाराज निटुरकर म्हणजे भाषांतरकार, यांचे समाजकार्य, प्रबोधन याची वाखाणणी खुद्द कांचीकोटी शंकराचार्य तसेच पूर्व राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा यांनी केली आहे. अधिक बोलणे नलगे.

आतां बोलूं श्री साईनाथांसंबंधी. नाथ संप्रदाय हा आपल्याच धर्मांत आहे. श्री बाबा किती काटेकोर याचे पालन करीत होते याचे वर्णन चपखल वर्णन चरित्रकार कै. दाभोळकारांनी केलेच आहे. त्यानुसार श्रीबाबा भीक्षा मागत, फक्त ती पांच घरी असेलच असें नव्हते आणि वेळही ठरलेली नसे कारण मशीदीपाशी आलेले उपाशी कुत्रे, डुक्करही त्यांच्या मनाचा ठाव घ्यायचे. केस राखत असत. चिमट्याऐवजी जवळ सटका असे. इतरही कांही मासले उद्बबोधक ठरतील. सुरुवातीस तरुणपणी रानावनांत एकटेच भटकत. मोडकळीस आलेल्या मशीदीत वास्तव्य केले तीला नांव दिले द्वारकामाई. तिथे धुनी लावली. समोर तुळशी वृंदावन. तेलाऐवजी पाणी भरुन दिवे लावले. स्वत:च्या जुन्या कफनीच्या चिंध्या बांधून आठ फूट उंचीवर बांधलेल्या दहा इंच रूंदीच्या फळीवर कधी आणि कसें चढून जात, उतरत आणि निजत हे पाहण्याचे अनेकांचे प्रयत्न फसले. स्वत:ची आंतडी बाहेर काढून धुण्याची क्रिया श्री बाबा करीत. ज्याला धोती-पोती योग म्हणतात, हे कुठल्या इतर धर्मियांना जमलेले ऐकिवात नाही, इतकेच नाही तर स्वत:चे अवयव (हात-पाय-डोके) वेगळे करून परत जुळवणे ज्याला खंडयोग म्हणतात, जो इतर धर्मात, कोणी केलेला ऐकिवात नाही. हे योगाचे प्रकार अवगत असलेले इतर धर्मीय माहीतही नाहीत आणि ऐकलेही नाहीत. असे योगी एकांतात किंवा हिमालयांतच साधना करीत असावेत.

श्री बाबांकडे आलेल्या तीन मुस्लीमांपैकी एकावरच श्री बाबांनी कृपा केली तर एकाला शिरडीकरांनी आणि गंगागीर महाराजांनी नामोहरम केले. तीसरा घाबरून पळून गेला. गांवातील मुस्लीमांना ताज्जे मिरविणें व इतर जवळीक असे पण स्वत:हून येणारे मोजकेही नव्हते. तसे हंडी-प्रसादाला येत असत. हंडीच्या निमित्ताने श्री बाबा अन्नदानाचा पाठ देत असत. हंडीची सर्व तयारी स्वत: करत. उकळत्या हंडीत हात घालूनतपासणी करत.रोजच्या आरती-पूजेच्या वेळी आवर्जून येणारे कोणी मुस्लीम भक्त नव्हते. क्वचित प्रसंगी कांही गांवातील वा बाहेरचे सल्ल्यासाठी येत असत. याच सुमारास मुंबईत सूफी संत बाबा अब्दुल रहिमान तसेच ताजुद्दीन बाबाही होते. त्यांच्यापेक्षां कितीतरी पटीने किर्तीमान असलेले श्री साईबाबा यांच्याकडे कधी कोणी तेथून गेले नाहीत. गेले ते फक्त कित्येक हिंदू, दासगणूंच्या मुंबईतील किर्तनांच्या प्रभावाने. आतां शिरडीला येणारे असंख्य दाक्षिणात्य, हे श्री श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राचा तामीळ, तेलगु, मल्याळी अनुवाद वाचून प्रभावित आहेत, तसेंच अत्यंत भावुक आहेत. श्री साई सच्चरिताचेही अनुवाद अनेकांचे मुखोद्गत आहेत. त्यांची श्रद्धा अपार आहे.

श्री बाबांनी सांगितलेल्या रुपकात्मक गोष्टींचे सार – 1) उपाशीपोटी देवाची आठवण येत नाही. 2) गुरुने दिलेले, सांगितलेले काम शुद्ध मनाने आणि निखालसपणें करा. 3) वैर, ऋण आणि हत्या हे जन्मोजन्मी फिटत नाहीत, यासाठी त्याचेपासून दूर रहा. 4) गुरुने उलटे टांगून ठेवले तरी त्यांतच तुमचे हित आहे. वास्तविक या कथेंत श्री बाबांना सांगायचे की गुरुकृपा झाल्यावार कुंडलिनी जागृत होऊन आत्मज्ञानानंदाला किती वेळ ? 5) तुम्ही कुणाला बोल लावाल, तर मला दु:ख येते.

श्री बाबांकडे येणारे – शिरडीतील म्हाळसापती, बाळा शिंपी. अप्पा कुलकर्णी, कोते पाटील, गोंदकर, बायजाबाई, लक्ष्मीबाई, खुशालचंद, भागचंद, मारवाडी, व इतर कांही पण श्री बाबांशी जोडत गेलेले म्हणजे, चांदोरकर, सहस्त्रबुद्धे, नूलकर, दीक्षित, बुटी, नरके, सरदार मिरीकर, महाजनी, देशपांडे, साठे, निमोणकर, सोहोनी, केळकर, जोग, देव, वझे, खापर्डे, तर्खड, पुरंदरे, उपासनीबाबा, राधाकृष्णआई (क्षीरसागर), दाभोळकर, तेंडूलकर,भीष्म, हृषिकेशचे स्वामी सोमदेव, रानडे आणखी कित्येक ब्राह्मण भक्त जोडले गेले. त्यांतच रामलाल पंजाबी, गुजराती मेघा, साई शरणानंद, इ., डॉ. पिल्ले, एक अब्दुलबाबा, अण्णा कासार (रासने), पितळे, खेरिज पारशीही होते. अनेकांना माहित असलेले पूज्य मेहेरबाबा हे श्री बाबांचेच अनुयायी होते. ठाण्यातील ब्र.भू. राममारुती हे ही श्री बाबांचे शिष्य होते. लॉर्ड रे, (गव्हर्नर) सपत्निक शिरडीला येऊन श्री बाबांचे शिष्य बनले पण कनींगहॅम दंपतीला जवळसुद्धां फिरकू दिले नाही. लोकमान्य टिळकही खापर्डे यांना भेटण्याच्या निमित्ताने शिरडीला जाऊन आले होते. यादी बरीच मोठी आहे पण यादीतील व्यक्ती बहुतेक शिक्षित, उच्च-शिक्षित, संस्कृत पारंगत, विद्वान, सरकारी हुद्देदार होते. कांही, जे आत्मज्ञानाच्या उंबरठ्यावर होते त्यांनाही पार केले. इतरांना मार्गावर आणून सोडले, तर काहींना ओढून आणून मार्गावर सोडले. छोट्या छोट्या कामासाठी येणाऱ्यांना, श्री बाबा, ‘हिंग–जिऱ्याची’ गिऱ्हाईके म्हणत असत. श्री साईबाबांसंबंधांत लिहिलेले वाङ्मय हे इतर संतांच्या तुलनेत खूपच आहे. अन्य संतांशी तुलना म्हणून नव्हे पण श्री बाबांकडे येणारे, शिक्षित आणि उच्चपदस्थ असल्याने कितीतरी अनुभव लिहिले गेले आहेत, त्यामुळें श्री बाबांचे अनेक पैलू श्री साईलीलेतून (1932) उधृत झाले आहेत. त्यामुळे चरित्रापुरतेच ते वाङ्मय मर्यादित राहीले नाही.

एकदां श्री बाबा धगधलेल्या धुनीत हात घालून बसले. तिथे असलेला एक सेवेकरी माधव आणि माधवराव देशपांडे यांनी श्री बाबांना खाकेत हात घालून मागे खेचले. माधवराव देशपांड्यांनी चांदोरकरांना कळविल्यावर ते डॉ. परमानंदाना घेऊन आले पण श्री बाबांनी, न हात दाखविला न औषध घेतले. त्यांचा महारोगी सेवेकरी भागोजी शिंदेकडून पुढे कांही वर्षें तूप लावून पट्ट्या बांधून सेवा करून घेतली. कदाचित त्याच्या कर्मांचा विलय श्री बाबांच्या सान्निध्यांत व्हायचा होता. श्रींचे उत्तर – ‘एका लोहाराच्या बायकोच्या कडेवरचे पोर भट्टींत पडत होते ते म्या वाचविले’. एकदां प्रचंड वादळ व पाऊस झाला, गांवकरी, गुर-ढोरे द्वारकामाईच्या आश्रयाला आली, श्री बाबांनी दरडावणीच्या सुरांत त्या वादळ-पावसाचे तांडव बंद केले, तीच अवस्था केली भडकलेल्या धुनीची.

श्री बाबा स्वत: जरी ‘अल्ला मालीकचा’ जप करायचे तरी उपदेश मात्र, कोणाला राम-नाम, कोणाला विष्णु-सहस्त्रनाम, भागवत वाचन, रामचरितमानस, ज्ञानेश्र्वरी, रामायण, भगवद्गीता, राजाराम जप, अशा अनेकांना अनेक उपासना; ‘अल्ला मालीक नाही. ’किती एकांचे सर्पदंश, असाध्य रोग, माानसिक, शारीरिक रोगांचे निर्दालन केले, किती एकांना अपत्यप्राप्ती, ही कृत्ये महानुभाव किंवा महात्म्यांची नव्हेत कारण सृष्टी-नियम बदलणे हे फक्त परब्रह्म परमात्म्याच्याच हाती आहेत. श्री बाबांनी, भगव्द्गीतेतील चौथ्या अध्यायातील चौतिसाव्या श्र्लोकाच्या तीसऱ्या चरणाचा अर्थ जो चांदोरकरांना समजाविला तो शंकरभाष्य, आनंदगिरी, व्याख्याकार शंकरानंद, श्रीधर, मधुसूदन नीलकंठ यांच्यापेक्षां वेगळाच होता. चांदोरकरांना श्री बाबांच्या गीता आणि संस्कृत ज्ञानाबद्दल सुखद धक्के बसले. इतकेच नाही तर दासगणूंना ज्यावेळी श्री बाबांनी ईशावास्य उपनिषदाच्या न समजलेल्या भागाचा अर्थबोध दीक्षितांच्या मोलकरणीकडून करवून दिला. इतकेच नव्हे तर एका प्रसंगी श्री बाबांनी उपनिषदातील कांही भाग म्हणूनही दाखविला होता.

शंकेच्या गर्तेंत असलेल्यांसाठी ही गोष्ट नमूद करणे आवश्यक आहे. (दि.11डिसें 1886,मार्गशीर्ष शु, पौर्णिमा) या दिवशी श्री बाबांना दमा उद्भवला. (कदाचित कोणा भक्ताचे दुखणे असेल). सर्व भक्तांना सांगून त्यांनी समाधी घेतली. तीन दिवस. दुसऱ्या दिवशी चुळबुळ सुरु झाली. गांवातील लोक जमा झाले, तसे मौलानाही आले. कांही हालचाल नाही, उचला त्यांना. म्हाळसापतींनी कोणालाहि हात लावूं दिला नाही. तिसऱ्या दिवशी पहाटे श्री बाबा उठून बसले.

6 ऑक्टो. 1916, शुक्र. दसरा, यादिवशी तिन्हीसांजेवेळी, श्री बाबांनी रूद्रावतार धारण केला. द्वारकामाईच्या कांठावर उभें राहून शिव्याशापांचा भडीमार सुरु केला, द्वारकामाईसमोर गांवकरी जमा झाले. तोपर्यंत श्री बाबांनी कफनी, धोतर. डोईचे फडकें, लंगोट, धुनीचें भक्ष्य केले. दिगंबरावस्थेत श्री बाबांनी आवाहन केले, ‘बघा रे, आज बघून घ्या, मी मुसलमान आहे की हिंदू !’ भागोजी शिंदे भीत भीत पुढे आला. श्री बाबांना प्रेमाचे दोन शब्द बोलून अलगद लंगोट नेसविला, कफनी आणि धोतर, डोक्याला फडके बांधले. त्यांचा राग शांत झाला. अण्णासाहेब दाभोळकर (चरित्रकार) म्हणतात, श्री बाबांचे कान विंधित होते तर सुंता झालेली नव्हती. एवढेंच नव्हे तर एका प्रसंगी नानासाहेब चांदोरकरांना, श्री बाबांनी निक्षून सांगितले होते, “नाना, मी शुभ्र ब्राह्मण आहे.”

कॅ. विवेकानंद र. नूलकर
201, संकल्प, वीरभद्रनगर,
बाणेर, पुणे, 411045.
मोबाईल नं. 9422308634.
vrnoolkar@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..