रविवार म्हणजे सुट्टीचा, आरामाचा… एकूणच सहकुटुंब ‘एन्जॉय’ करण्याचा दिवस. आपल्या सगळ्यांना अतिशय प्रिय रविवारच्या सुट्टीचा दिवस आज म्हणजेच १० जून रोजी १२९ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. भारतीयांना त्यांना रविवारची पहिली सुट्टी मिळाली होती ती १० जून १८९० रोजी. रावसाहेब नारायण मेघाजी लोखंडे या मराठी माणसाने तब्बल सहा वर्षे केलेल्या संघर्षामुळे.
कामगारांना मिळाला हक्क
१८८१ मध्ये भारतात फॅक्टरी अँक्ट लागू झाला. या कायद्याने बालकामगारांचे किमान वय सात आणि कामाचे तास नऊ ठरविले. आठवड्याच्या सुटीची तरतूद केली. मात्र महिला व प्रौढ कामगारांसाठी अशी तरतूद नव्हती. याविरोधात पहिला आवाज उठवला तो रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी. १८८४ मध्ये नेमलेल्या फॅक्टरी कमिशनला लोखंडे यांनी ५३०० कामगारांच्या सह्यांचे निवेदन दिले. त्यात आठवड्यात एक दिवस सुटी, सूर्योदय ते सूर्यास्त ही कामाची वेळ, दुपारी अर्धा तास विश्रांती अशा मागण्यांचा समावेश होता. पण, सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. लोखंडे यांनी आंदोलन सुरूच ठेवले. २४ एप्रिल १८९० रोजी त्यांनी दहा हजार कामगारांची सभा घेतली. त्यांच्या आंदोलनाला यश आले आणि १० जून १८९० रोजी ‘रविवार’ हा साप्ताहिक सुटीचा दिवस म्हणून जाहीर झाला. तेव्हापासून आजतायगत रविवार हा दिवस साप्ताहिक सुट्टीचा दिवस आहे. तेव्हाची ही रविवारची सुट्टी आजही सर्व कामगार, कर्मचा-यांना मिळते. आज या रविवारच्या सुट्टीला फार महत्व आलं आहे.आज भारतात सर्व सरकारी कार्यालये तसेच बहुतांश खासगी कंपन्यांमध्ये रविवारी साप्ताहिक सुटी असते. अनेक कंपनी-संस्थांमध्ये ‘ऑफ’अन्य दिवसही असतो, पण हक्क म्हणून मिळतो.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply