डिसेंबर महिना सुरु झालेला आहे, सूर्यास्त लवकर होऊ लागला आहे, चार्टर बस मधून घरी परतताना, अस्तांचल जाताना सूर्य दमलेला, ओजहीन दिसत होता. सूर्य अस्त होताच, थंड गार वारे अंगाला झोंबू लागले. बसची खिडकी बंद केली. काळजात धस्स झाले. चित्र-विचित्र निराशेने भरलेले विचार मनात येऊ लागले. खरं म्हणाल तर मला हिवाळ्याची भीतीच वाटते. जिथे साक्षात सूर्यदेव शक्तीहीन झाले तिथे सामान्य माणसांचे काय. हिवाळा म्हणजे छोटे दिवस आणि मोठ्या रात्री. सूर्याची भीती नाहीशी झाल्याने मानवाला त्रास देणाऱ्या अंधाराच्या राक्षसांचे बळ वाढते. दुसऱ्या शब्दांत हिवाळा म्हणजे अंधाराच्या राक्षसांचे राज्य. काही दया-माया न बागळता हे राक्षस आपल्या शरीरातील सर्व उर्जा, तेज, शक्ती शोषून घेतात. किती ही गरम कपडे घातले तरी ही बचाव होत नाही. रात्री बिछान्यावर पडल्यावर वाटू लागले शरीरातील जुन्या जखमा अंग वर काढू लागल्या आहे, नवीन जखमा ही भरभरून वाहू लागल्या आहे. असह्य वेदनांमुळे डोळा लागत नाही. हे अंधाराचे राक्षस व्याधीग्रस्त मानवांवर हिंस्त्र प्राण्याप्रमाणे तुटून पडतात. व्याधीग्रस्त माणसांना तडपवून मारण्यात राक्षसाना आसुरी आनंद मिळतो. किती ही डोक्यावर पांघरूण घेऊन त्यात दडले तरीही राक्षसांच्या भेसूर हास्य आणि डरकाळ्या सतत रात्रभर ऐकू येतात. बिछान्यावर कड बदलता -बदलता सारी रात्र निघून जाते. तेंव्हा कुठे जाऊन ब्राह्म मुहूर्तावर डोळा लागतो. सकाळी घड्याळाच्या गजरा बरोबर जाग येतेच (सवयच आहे ती). आधी शरीरला चिमटा घेऊन जिवंत असल्याची खात्री करतो, भिंतीवर लटकलेल्या घड्याळा कडे पाहतो, सकाळचे साडेपाच वाजलेले असतात. उठण्याची इच्छा नसते तरी ही देवाचे नाव घेऊन कसा-बसा उठतो. आता पुढचे दीड महिना तरी असेच हाल होणार. जनवरी महिन्यात संक्राती येईलच. सूर्याचे तेज पुन्हा वाढू लागेल. सूर्याच्या उर्जेने शरीरात नवचैतन्य येईल. तो पर्यंत तरी रोज जगण्यासाठी संघर्ष करावाच लागणार. …शरीरात साठविलेल्या शक्तीने अंधाराच्या राक्षसांशी झुंज देत देत….आयुष्याची गाडी पुढे रेटावी लागणार.
— विवेक पटाईत
Leave a Reply