१४ ऑक्टोबर १९६८ रोजी रशिद लतिफ या पाकिस्तानी कर्णधाराचा आणि यष्टीरक्षकाचा जन्म झाला. क्रिकेटविश्वाला ढवळून काढणार्या निकालनिश्चिती प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर असे प्रकार मान्य करणार्या थोडक्या खेळाडूंमध्ये रशीद लतीफ होता. ओवलवर १९९१२ मध्ये त्याने कसोटीपदार्पण साजरे केले. ज्येफ बॉयकॉटने रशिद ३५ धावाही काढू शकणार नाही असे भाकित केले होते आणि विश्वासाने पाच पौंडांची पैजही लावली होती. (त्याचे कोणत्याही सटोडीयांशी संबंध नव्हते.) रशिद लतीफने पस्तिशीच काय एकोणपन्नाशीही पार केली. पदार्पणातच त्याने अर्धशतक झळकाविले. निकालनिश्चितीच्या वादळात १९९४-९५ च्या हंगामात त्याने निवृत्ती पत्करली. नंतर त्याने कर्णधार म्हणून पुनरागमनही केले पण त्याचा खरे बोलण्याचा स्वभाव आड आला आणि सहकारी खेळाडूंच्या नाराजीला त्याला तोंड द्यावे लागले. मोईन खानच्या रुपाने नवा यष्टीरक्षक-फलंदाज पाकला लाभला होता याची भर पडली आणि रशीदचा दुसरा डाव लवकरच संपुष्टात आला.
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये सामनावीर ठरण्याचा मान भारतात जन्मलेल्या केवळ दोन खेळाडूंनाच लाभलेला आहे. आज वयाची २९ वर्षे पूर्ण करून गौतम गंभीर तिशीत पदार्पण करतो आहे- ५१ च्या कसोटी सरासरीसह. भारताने पाकिस्तानला थरारक सामन्यात पराजित करवून विसविशीत विश्वचषकाचे विजेतेपद पटकाविले होते तेव्हा गौतम गंभीर सामनावीर होता. तिन्ही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता तो सलामीला येतो आणि तिन्ही ठिकाणी त्याने आपली गुणवत्ता आणि उपयुक्तता सिद्ध केलेली आहे.
कारकिर्दीच्या प्रारंभकाळात कसोटी सामन्यांमध्ये तो कितपत प्रभावी ठरेल अशा शंका घेतल्या जात होत्या पण त्याने त्या आपल्या कामगिरीच्या जोरावर फोल ठरविल्या आहेत. २००८ च्या श्रीलंका दौर्यात मेंडिस जोरावर असतानादेखील फलंदाजीत गंभीरने लक्षणीय कामगिरी केली. गेल्या १३ कसोट्यांमधून त्याने भिन्न-भिन्न संघांना तोंड देताना ८ शतके काढलेली आहेत. २००९ या वर्षाचा कसोटी खेळाडू म्हणून आंक्रिपने त्याचा गौरव केलेला आहे. सुनील गावसकरांनंतरचा सर्वोत्तम भारतीय सलामीवीर म्हणून वीरेंद्र सेहवागने गंभीरचा गौरव केलेला आहे पण तो करताना बहुधा सेहवागसमोर आरसा नसावा ! सेहवाग हाच अशा गौरवात गंभीरचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी आहे.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply