नवीन लेखन...

१४१ वर्षे संगीत शाकुंतलच्या पहिल्या प्रयोगाची

ज्याला अस्सल मराठी संगीत नाटक म्हणून संबोधिता येईल अशा नाटकाचे आद्य प्रवर्तक अण्णासाहेब किर्लोस्कर हे होत. १८८० साली पुणे मुक्कामी अण्णासाहेब किर्लोस्करांनी ‘इंद्रसभा’ नावाचे पारसी नाटक – उर्दू भाषेतील – पाहिले आणि तशा प्रकारचे नाटक मराठी रंगभूमीवर का होऊ शकत नाही, या ईर्ष्येने एकटाकी ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाचा पहिला अंक लिहून काढला. किर्लोस्करांनी कवी कुलगुरू कालिदासाच्या अजरामर शाकुंतलाचे मराठी रूपांतर १८८० साली केले. आणि त्या मराठी `शाकुंतला’चा पहिला प्रयोग म्हणजे संगीत नाटकाची गंगोत्री होय. या प्रयोगात जवळपास शंभर पदे होती. आणि या पदांची रचना ओवी, लावणी, साकी, दिंडी इ. रूढ छंदांना अनुसरणारी होती.

१३ ऑक्टोबर १८८० रोजी पुण्याच्या तंबाखू आळीत दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘शाकुंतल’च्या पहिल्या तीन अंकांची रंगीत तालीम झाली. आणि रविवार ३१ ऑक्टोबर १८८० रोजी बुधवार पेठेतील भांग्या मारुतीसमोरच्या तांबेकरांच्या वाड्यात असलेल्या आनंदोद्भव नाटकगृहाच्या गच्च भरलेल्या तिन्ही मजल्यांसमोर शाकुंतलाचा पहिला प्रयोग झाला. पुढे पाच वर्षांनी म्हणजे १८८० मध्ये आणखी एका अंकाची भर घालून अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी याच ठिकाणी पाच अंकी ‘संगीत शाकुंतल’ सादर केले होते. याने व्यावसायिक मराठी संगीत नाटकाची मुहूर्तमेढ इथे रोवली गेली.

भारतीय नाटशास्त्राचा पाया भरतमुनींनी लिहिलेल्या नाट्यशास्त्राच्या ग्रंथात सापडतो. रंगमंचावरील नेपथ्य, संगीत, नृत्य, वेषभूषा, रंगभूषा, अभिनय, दिग्दर्शन इथपासून रंगमंच जिथे असतो त्या रंगमंदिराचे बांधकाम कसे करावे, त्यासाठी भूमीची निवड, बांधकाम साहित्य, आकारमान इथपर्यंत नाटकाचे संपूर्ण नियम, पथ्ये भरताच्या नाट्यशास्त्रात सापडतात. त्यामुळेच नाट्यशास्त्राला पाचवा वेद मानलं जातं. भरताच्या नाट्यशास्त्राप्रमाणे जेव्हा इतिहासकाळात नाटके होत असत, तेव्हा वातावरणनिर्मितीसाठी सुरुवातीला धृवागीतं वाजवली जात असत – ती वाद्यांवर वाजवली जात. त्यांत दोन प्रकार होते – निःशब्द धृवागीत आणि सशब्द धृवागीत. प्रथम निःशब्द धृवागीत वाजवले जात असे, जेणेकरून लोकांना कळावे, की आज इथे काहीतरी नाटक आहे. निःशब्द धृवागीताने एकप्रकारे सुरांचे गूढ असे वातावरण निर्माण होत असे. पण नाटक म्हणजे शेवटी शब्दसृष्टी. त्यामुळे निःशब्द धृवागीतानंतर सशब्द धृवागीत होत असे. त्यालाच आपण आज नांदी म्हणून ओळखतो.

नाट्यशास्त्राप्रमाणे नांदी हा एक पडद्यामागे होणारा विधी असे. त्यानुसार ‘संगीत शाकुंतल’ नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला स्वतः अण्णासाहेब सूत्रधार, बाळकोबा नाटेकर, मोरोबा वाघोलीकर आणि शेवडे या पारिपार्श्वकांसह पडद्यामागे नांदी म्हणण्याकरता सज्ज झाले. ‘पंचतुंड नररुंडमालधर’ ही नांदी म्हणण्यास सुरुवात करणार, तोवर जणू पडदा ओढणार्या स तेवढाही विलंब सहन न होऊन त्याने एकदम पडदा वर उचलला. आणि पडद्यामागे नांदी म्हणून नटेश्वराला फुले अर्पण करून नाट्यप्रयोगाला सुरुवात करण्याचा संकेत असा अचानकपणे बदलून गेला.

‘संगीत शाकुंतला’ची नांदी.

(राग : खमाज, ताल : धुमाळी, चाल : जय श्री रमणा भयहरणा)

पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधी नमितो ॥
विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपति मग तो ॥ ध्रु.
कालिदास कविराज विरचित हें, गाती शाकुंतल रचितों
जाणुनिया अवसान नसोनि महकृत्यभर शिरिं घेतो
ईशवराचा लेश मिळे तरि मूढ यत्न शेवटि जातो
या न्याये बलवत्कवि निजवाक्यपुष्पिं रसिकार्चन करितो ॥

नांदीनंतर सूचकपद असे. शाकुंतलाच्या नांदीच्या सूचकपदाची झलक ही अशी.

अष्टमुर्ती परमेश सदाशिव तुम्हां शिव देवो
यदृपाविण विश्वचि हा भास हृदयी ठसवो

सूचकपदातून नाटकाचं साधारण कथानक हे नटेश्वराच्या आयुष्यावर बेतून सांगितले जायचे. जणू काही नटेश्वराच्या जीवनामध्ये या घटना घडल्या आहेत, असे समजून त्याला उद्देशून हे सूचकपद म्हणायचे कारण ती असायची त्या नाटकाच्या एकूण कथासूत्राची सुरुवात. नाटकाचा मूळ उद्देश हा मनोरंजनाचा असल्याने नाटकाचे कथानक सूचकपदातून सांगितल्याने काही रसभंग होत नसे. उलट जमलेल्या लोकांना आज आपण कुठल्या कथानकावरचे नाटक पाहण्यासाठी जमलो आहोत, हे कळल्याने नाटकाचा आणि पदांचा आनंद लुटायला मदतच होत असे. जसे एखाद्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत गायक माहितीतलाच राग सादर करणार असेल, तरी त्या-त्या दिवशीचा रसाविष्कार वेगळा असतो, तसेच कथानक आधी माहीत असले, तरी त्या दिवशी नाटक आणि मुख्य म्हणजे पदे कशी होतील याची उत्सुकता प्रेक्षकांत असेच.

या नाटकातील पात्रे : राजा दुष्यंत, ,शकुंतला ,अनसूया,प्रियंवदा,गौतमी,शारंग्रव,शारद्वत,कण्व मुनी, नटी, सूत्रधार, विदूषक, मातली, सेवक, चोर, शिपाई

संगीत शाकुंतलच्या नांदी.

https://www.youtube.com/watch?v=P_3YAYwVzhI

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..