टीप – येऊं घातलेल्या निवडणुकांच्या निमित्तानें, हल्ली, सर्वश्री नितीन गडकरी व शरद पवार यांच्या नांवांचा प्रधानमंत्रीपदाच्या संदर्भात उल्लेख होतो आहे.
संदर्भ – वृत्तपत्रांमधील लेख.
– आणखी एक संदर्भ म्हणजे ‘मराठीसृष्टी’ या वेब पोर्टल वरील श्री. चितामणी कारखानीस यांचा लेख.
या व अशा लेखांमध्ये १८व्या शतकातील मराठ्यांचा उल्लेख येतो, व तें अपरिहार्य आहे, कारण १८ व्या शतकातील भारतात मराठ्यांचें स्थान महत्वपूर्ण होतें, खास करून दिल्लीच्या संदर्भात.
पंचवीसएक वर्षांपूर्वी महाराष्ट्र टाइम्स् मध्ये, ( माझ्या आठवणीप्रमाणें, श्री. कुलकर्णी यांचा ), या विषयावर एक लेख प्रसिद्ध झाला होता, त्याचा रोखही अप्रत्यक्षपणें शरद पवारांवरच होता, व त्यातही १८व्या शतकाचा उल्लेख होता.
त्यावेळी मी लिहिलेल्या लेखाची ही पुनर्भेट. यात १८व्या शतकातील मराठ्यांचें विश्लेष केलेलें आहे ; सध्याच्या , शरद पवार प्रभृती महाराष्ट्रीयांचें नाहीं, हें कृपया ध्यानांत ठेवावें. अर्थात्, त्याचा संबंध ‘आज’शीही जोडतां येतोच.
सदर लेखामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख काही ठिकाणी एकेरी आलेला आहे. मात्र म्हणून त्यांचा अपमान झाल्याचे वाटणे गैर आहे. भूतकाळातही एकेरी नामोल्लेखाचे अनेक दाखले आहेत. देवतांमधील शंकर, गणपती, महावीर, बुद्ध यांच्यापासून रामायण महाभारत काळातील राम, कृष्ण वगैरेंचा उल्लेखही एकेरीत सापडतो. महाराजांबद्दल समस्त मराठी माणसांना अत्यंत आदर आणि प्रेम आहे.
भाग- १
अठराव्या शतकात मराठी सत्तेने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या भारताचा बराच भूभाग आपल्या अधिपत्याखाली आणला होता, अटकेपर्यंत मजलही मारली होती. इतिहासातील हे युग प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असे आहे. परंतु असा एक विचार अलिकडे मांडला गेलेला आहे की, मराठ्यांनी दिल्लीला धडक दिली वा दिल्ली काबीजही केली पण ते दिल्लीपती झाले नाहीत. याचे कारण म्हणजे मराठी माणूस त्रिभुवनात गेला तरी त्याचा मराठी भाषा, संस्कृती व मुलुख याबद्दलचा अभिमान ढळत नाही व या आपल्या स्वाभिमानामुळे आणि आपल्या आत्मसंतुष्ट किंवा अल्पसंतुष्ट वृत्तीमुळेच मराठे दिल्लीच्या उंबरठ्यावरच राहिले, दिल्लीपती झाले नाहीत.
मराठी माणसाला मराठी भाषा व संस्कृतीचा अभिमान असतोच. म्हणूनच, दिल्लीच्या अनुषंगाने, हा संतुष्टपणाचा आक्षेप कितपत योग्य आहे, याचे इतिहासानुसार विश्लेषण करणे आवश्यक आहे.
‘मराठे’ किंवा ‘मराठी माणूस’ हा उल्लेख जेव्हा जेव्हा येतो, तेव्हा एक विशिष्ट भाषा (मराठी) , व ‘ती भाषा जिथें बोलली जाते अशा भूभागातील संस्कृती असलेला लोकसमूह’ हाच अर्थ तेथे अभिप्रेत असतो. (म्हणजे, आज ज्यांचा उल्लेख ‘महाराष्ट्रीय’ असा केला जातो, ते लोक). आपणही त्या प्रचलित अर्थानेच हे शब्द येथे वापरीत आहोत.
स्वसंस्कृतीचा अभिमान असणे यात गैर ते काय?
स्वभाषा, स्वसंस्कृती यांचा अभिमान सर्वांनाच असतो. भारतात व भारताबाहेर पसरलेल्या गुजराती, मारवाडी, शीख, तमिळ इत्यादींना स्वभाषा व स्वसंस्कृतीचा अभिमान नसतो, असे कोणी म्हणून शकेल का? स्वभाषा व स्वसंस्कृतीच्या अभिमानातूनच बांगलादेशाची निर्मिती झाली. जगभर विखुरलेल्या ज्यू लोकांना स्वसंस्कृतीचा अभिमान नसता तर दोन हजार वर्षांनंतर इस्राएलची पुनर्निर्मिती झालीच नसती. जगावर सत्ता गाजवणार्या युरोपीय राष्ट्रांतील नागरिकांना आपली भाषा, संस्कृती व मुलुख (देश) यांचा अभिमान नव्हता का? स्वसंस्कृती, स्वभाषा व आपला मुलुख याचा अभिमान बाळगणे यात गैर काहीच नाही.
सुरूवात शिवाजीमहाराजांपासून –
जिला ‘मराठे’ म्हणून संबोधावे अशी राजकीय शक्ती शिवाजीमहाराजांपूर्वी अस्तित्वातच नव्हती. शून्यातून सृष्टि निर्माण करावी तसे त्यांनी परकीय सत्तांच्या अधिपत्याखाली असलेल्या मुलुखातून स्वराज्य निर्माण केले. ३०० वर्षे परकीय सत्तेखाली दडपल्या गेलेल्या मराठ्यांची अस्मिता त्यांनीच जागृत केली. १८व्या शतकात भारतभर गाजलेल्या ‘मराठे’ नामक सत्तेचे निर्माते होते शिवाजीमहाराज.
शिवाजीमहाराजांच्याया बाबतीत एक विद्वान म्हणतात, ‘आपण दक्षिणेतच राहू, मुघलांस इकडे येऊ द्यायचे नाही. हा विचार सतराव्या शतकात प्रबळ दिसतो. आपण दिल्ली ताब्यात घेऊ अशी विचारसरणी नाही’, (पाहा महाराष्ट्र टाइम्स, मैफल, २६.६.१९९४); म्हणून आपण शिवाजीमहाराजांसंबंधी विश्लेषण करून मगच १८व्या शतकात प्रवेश करू.
शिवाजी महाराजांच्या ज्या काळाचा आपण विचार करतो आहोत त्यावेळी इमादशाही व विजयनगर नामशेष होऊन एक शतक लोटलेले होते. निजामशाही व बेरीदशाहीचाही मुघलांनी अंत केलेला होता. ( १६३७ ते १६५६ ). आदिलशाही व कुतुबशाही यांनाही उतरती कळा लागलेली होती ( आणि पुढे १६८६ व १६८७ मध्ये मुघलांनी त्यांचाही अंत केलाच ). त्याकाळी भारतात मुघल ही एकच महासत्ता होती. दक्षिणेत उतरलेल्या महासागरासारख्या मुघल सैन्यापुढे निभाव न लागल्यामुळे १६६५ मध्ये शिवाजी महाराजांना मुघलांशी तह करावा लागला व बादशहाची चाकरी कबूल करून आग्र्याला जावे लागले होते. ( नंतरही अशीच विस्तीर्ण सेना घेऊन औरंगजेब स्वतः मराठ्यांचा काटा काढायला २५ वर्षांहून अधिक काळ दक्षिणेत तळ ठोकून बसला होता ).
ह्या पार्श्वभूमीवर, ‘आपण दिल्ली ताब्यात घेऊ’ असा आत्मघातकी अविचार शिवाजी महाराजांसारखा व्यवहारी व मुत्सद्दी पुरुष करेल का? शिवाजी महाराजांनी जरूर लागेल त्याप्रमाणे चतुरपणे कधी मुघल तर कधी विजापूरकरांशी सख्य केले व आपले स्वराज्याचे राजकारण सफल केले. दिल्ली काबीज करणे त्या काळी दक्षिणी सत्तेला अशक्य होते. मुघलांना दक्षिणेत शह देणे, हाच व्यावहारिक वास्तववाद होता.
शिवाजीमहाराज हे युगपुरुष होते, निर्माते होते, अल्पसंतुष्ट तर ते नव्हतेच नव्हते !!!
(पुढे चालू)
— सुभाष स. नाईक
Leave a Reply