भाग ४ – मराठ्यांचे अर्थकारण
मराठ्यांच्या अर्थकारणाचा विचार केल्याशिवाय तत्कालीन परिस्थितीचे पूर्ण आकलन होत नाही.
मराठ्यांचा चौथाईचा अधिकार मिळाला होता खरा, पण राजपूत व इतर राजे सुखासुखी चौथाई देत नसत. त्यासाठी लुटालूट, लढाई व जबरदस्ती करावी लागे. वेळ आलीच तर ते राजे थोडीफार खंडणी देत व पुढला वायदा करीत. त्याच्या पूर्तीसाठी पुन्हा लढाई. असा प्रकार चालू होता. सैन्याचा खर्च करावा लागे आणि वसुली न झाल्यास कर्ज होई. १७४० मध्ये बाजीरावाचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्यावर १४ लाखांचे कर्ज होते. नानासाहेबाला कायम युद्धांमध्ये अडकून राहावे लागले व कर्जे तशीच राहिली. ( १७५७-५८ च्या अटकेपर्यंतच्या मोहिमेतही राघोबा ८० लाखांचे कर्जच करून आला होता. ) त्यामुळे नानासाहेबाचा हाच कल झाला की बादशहाकडून सनदा व फर्माने घेऊन नवनव्या मुलुखांतून चौथाई वसूल करावी व कर्ज मिटवावे. ( म्हणुनच, ‘पानिपत’ मिहिमेसाठी राघोबानें एक कोटीचा खजिना मागितला, तौ बाब नानासाहेब व सदाशिवराव भाऊ यांना मान्य नव्हती ). पहिली १७४० ते १७४९ अशी ९ वर्षे नानासाहेब शाहूच्या दबावाखाली होताच. नंतरही, अर्थप्राप्तीच्या दृष्टीने त्याला आधीचेच धोरण पुढे चालवणे फायदेशीर वाटले. १७५० नंतरही अगदी १७६० पर्यंत नानासाहेब व अन्य मराठे सरदार नजराणे, चौथाई आणि चौथाईसाठी-नवनवा-मुलूख मागतांना दिसतात. १७५३ साली मराठे जाटांकडून एक कोटीची खंडणी मागतात, १७५७ मध्ये राघोबा पंजाबातील वसुलीचा अर्धा हिस्सा मिळण्याचा दिल्लीशी करार करतो, १७५८ साली दत्ताजी पूर्वेकडील स्वारीत मराठ्यांसाठी रुपयात दहा आणे हिस्सा वजिरास मागतो, स्वतः नानासाहेब १७६० साली नागपूरकर भोसल्यांकडून पंचवीस लाख रुपये नजराणा मागतो; १७५७च्या अब्दालीच्या दिल्ली स्वारीच्या वेळी जे सावकार वगैरे दिल्लीहून पळून सुरक्षिततेसाठी मराठ्यांच्या बरोबर आले होत्या त्यांना नारो शंकर व समशेरबहाद्दर स्वतःच लुटतात, असे हे चित्र आहे.
( मराठी माणूस पैशाच्या मागे लागत नाही, अर्थकारण करत नाही, असा एक समज हल्ली झालेला आहे. परंतु १८व्या शतकातील परिस्थिती वेगळी होती, हे सत्य आपण लक्षात घ्यायला हवे ) .
असे असूनही परिस्थिती अशी होती की, मराठ्यांना नेहमीच पैशाची कमतरता भासत असे. राघोबा १७५७ साली जयपूरच्या राजाला लिहितो, ‘‘झुंजल्याखेरीज दाणा नाही, रुपया नाही, कर्जही न मिळे, निदानी येक येक दोन दोन रोज फाके लष्करास झाले’’. १७६० साली सुभेदार मल्हारराव होळकराचा दिवाण गंगोबा तात्या पेशव्यास लिहितो, ‘‘कर्जपटीचा मजकूर वायदेविसी स्वामी आज्ञा समक्ष केली, येथे आप्रिया कोणे गोस्टीने युक्तीस न पडे. खर्च बहुत आये थोडा. राजश्री सुबेदाराचेही . . . येंदा खर्चामुळे डोहात आहेत.’’ २६ जून १७६० रोज खुद्द भाऊ चंबळेजवळ गंभीर नदीच्या काठून लिहितो, ‘‘खर्च फार, जमा थोडकी . . . इकडील सावकार परागंदा झाले. कर्जवाम कोठे पैसा मिळत नाही.’’ या अडचणीचे अंशतः निवारण करण्यासाठीच भाऊला दिल्लीत ‘दिवाणे आम’च्या छताचा पत्रा काढून फौजेस रोजमुरा द्यावा लागला. त्यानंतर पानपतपूर्वी पैशांअभावी मराठी फौजेचे झालेले हाल सर्वांना माहीत आहेतच.
मराठ्यांना अर्थव्यवहार जमला नाही, पैशाची त्यांना सदैव उणीवच भासत राहिली आणि अर्थकारणासाठीच दिल्लीच्या नामधारी बादशहाला तसेच शिल्लक ठेवणे त्यांना सोयीस्कर वाटले; हे आपण विसरून चालणार नाही.
अब्दाली
१७६०चा विचार करतांना एक महत्त्वाचा घटक ध्यानात ठेवायला हवा आणि तो म्हणजे अहमद शाह अब्दाली. तो ‘दुर्रानी’ या अफगाण टोळीतील होता. १७४७ मध्ये नादिरशहाचा मृत्यू झाल्यावर अब्दाली अफगाणिस्तानचा स्वतंत्र राजा बनला. आधी त्याने नादिरशहाच्या हिंदुस्थानस्वारीत भाग घेतलेला होता. राजा बनल्यावर १७५२ पर्यंत त्याने भारतावर तीन स्वार्या केलेल्या होत्या. १७५७च्या चौथ्या स्वारीत त्याने दिल्ली लुटली होती. १७५८ मध्ये त्याने भारतावर पाचवी स्वारी केली. जानेवारी १७६० मधील अब्दालीच्या सैन्याशी झालेल्या चकमकीत, बयाजी व दत्ताजी शिंदे पडले. मार्च १७६० मध्ये अब्दालीच्या सरदारांनी मल्हाररावाच्या सैन्याला मात दिली. ऑगस्ट १७६० मध्ये भाऊ दिल्लीस पोचला तेव्हा अब्दाली जवळच यमुनेपलिकडे तळ टाकून होता. भाऊ व अब्दाली यांच्यात आपण तह घडवून आणतो असे शुजाने भाऊला कळवले होते. या घटनाही आपल्याला ध्यानात घ्यायला हव्या.
( पुढे चालू )
— सुभाष स नाईक
Leave a Reply