अंधेरी हे मुंबईचे एक उपनगर. आता प्रचंड लोकवस्तीचे. मी जुन्या अंधेरीत लहानाचा मोठा झालो. तेव्हां अंधेरी अशी होती.
१९५०च्या आधीची अंधेरी ही तडीपार लोकांचे गांव, म्हणजेच मुंबईत यायला बंदी केलेल्यांच गांव.छोटे रस्ते, मिणमिणते दिवे किंवा दिव्यांचा अभाव यामुळे आपलं अंधेरी नाव सार्थ करणारी.आमच्या मालकाच्या दोन मजली बंगल्याच नांव होतं “नीळकंठ कॉटेज”.खरं तर मागचं आउटहाऊस, जिथे आम्ही रहात होतो, तेच फक्त कॉटेज म्हणण्यासारखं होतं.पण मालकाचा हा बंगला सोडला तर अंधेरीत दुसरी दोन मजली इमारत म्हणजे आमचं हायस्कूल.याशिवाय अंधेरीमधे दोन मजली इमारतच नव्हती.एक मजली किंवा बैठ्या चाळी बऱ्याच ठिकाणी होत्या.तसेच बैठे किंवा एक मजली बंगलेही होते.पूर्वी सांगितल्याप्रमाणे अंधेरी आईस फॕक्टरी किंवा नंतर झालेल्या नवरंग थिएटरपर्यंतच होबती.तीही वेगवेगळ्या वस्त्यांत विभागलेली.स्टेशनवरून निघालांत तर उजव्या हाताला पहिलं इराणी रेस्टॉरंट होतं.मग गझदर हॉल नावाची इमारत होती.मला वाटते तिथे फार छोटा हॉल असावा.क्वचितच तिथे गेलो असेन.डाव्या हाताच्या रस्त्याला वर्सोव्याला जाणाऱ्या बसचा थांबा होता.१९५२पूर्वी तिथून खाजगी कंपनीच्या बसेस वर्सोव्याला जात.तो रस्ता त्यानंतर घोडबंदर रोडला (आताचा स्वामी विवेकानंद रोड) येऊन मिळायचा.शनच्या समोरच एक गल्ली जरा वर चढत जायची.तिला कामा लेन म्हणत असत.तिथे थोडीफार वस्ती होती.त्यानंतर एक पेट्रोल पंप आणि एक अंधेरीला जन्म घेणाऱ्यांसाठी छोटं हॉस्पिटल.डॉ. भट यांच्या प्रसूतिगृहामध्ये अंधेरीच्या मध्यमवर्गीयांच्या एका संपूर्ण पिढीने जन्म घेतला असावा.माझ्यासारखे कोल्हापूरला जन्म घेऊन अंधेरीत आलेले थोडेच होते.दुसऱ्या बाजूला एक डॉक्टर, एक कोळशाच दूकान गेलं की पोस्ट अॉफीसची टुमदार एक मजली बंगली यायची.ती इमारत तेव्हां फारच सुंदर दिसायची.आजही ती इमारत तशीच तिथे आहे.पण आताच्या दुकानांच्या झगमगाटी गर्दीत केविलवाणी दिसते.पुढे परत एक दोन डॉक्टर, एक हार्डवेअर सामानाचं दुकान आणि समोरचे दोन तीन छोटे छोटे एक मजली बंगले संपले की डाव्या बाजूला वर्सोवा रोड (आता जयप्रकाश रोड) सुरू होई.
▪
अंधेरीची प्रमुख वस्ती या रोडवर अर्धा पाऊण कि.मी. अंतरापर्यंत वेगवेगळ्या छोट्या वस्त्यात विभागली होती.रस्त्याच्या डाव्या बाजूला गांवठाण होतं.गांवठाणांत जाणाऱ्या तीन बारक्या गल्ल्या घोडबंदरवरून आत जात तर दोन वर्सोवा रोडवरून.गांवठाणात मिश्र वस्ती होती.हिंदु, मुस्लिम आणि ख्रिश्चन.त्यातल्या त्यात ख्रिश्चनांची वस्ती बरीच असल्यामुळे डुकरं, कोंबड्या, इ. पाळणारे बरेच होते.एखाद्या गल्लीला डुक्कर गल्ली असंही म्हणत.पुढे सर्व गल्ल्यांना गांवठाण लेन नं.१, २ … असे नंबर देण्यात आले.मुंबई महापालिकेत समाविष्ट झाल्यावर कांही व्यक्तींची नांवे त्या गल्ल्यांना देण्यात आली.गांवठाणाच्या मध्यावर बरीच मोठी मोकळी गोल खडकाळ जागा होती.सर्व गल्ल्या तिथे येऊन मिळत.घरं त्याच्या भोवताली होती.त्या गल्ल्यांशिवाय छोटे आडवळणी रस्तेही होते.त्या भुलभुलैय्याचा वापर “शॉर्टकट” म्हणून करू शकायचा तो अस्सल अंधेरीकर.गिरगांवची खोताची वाडी किंवा कुठल्याही जुन्या गांवातले दाट वस्तीतले गल्लीबोळ फक्त तिथल्या स्थायी रहिवाशालाच ठाऊक असतात.गांवठाणांतली जमीन बरीचशी पाटील आडनांवाच्या मालकांची होती.खरं तर पूर्ण अंधेरीच पाटीलांची होती.हे सर्व पाटील एकमेकांच्या चुलत चुलत नात्यातले होते.पण बऱ्याच पाटीलांच्या मधून विस्तव जात नव्हता.वाटण्यांवरून झालेली भांडणं ह्याला कारणीभूत असावीत.
▪
वर्सोवा रोडला प्रवेश केल्यावर उजव्या हाताचं कोपऱ्यावरचं इराणी हॉटेल हे अनेकांच्या मुक्कामाचं ठिकाण होतं.सर्व इराणी हॉटेलांचा मुंबईत अलिखित नियम होता की हॉटेलांत बसलेलं गिऱ्हाईक कितीही तास बसू शकतं.त्याला बिलं आणून द्यायचं नाही कीं कधी जातोय म्हणून वाट पहायची नाही.फक्त ते गिऱ्हाईक स्वतःहून उठून काउंटरपर्यत पोहोचलं की आवाज द्यायचा, “दो ईसम चार आना” किंवा सुप्रसिध्द ओळ “एक इसम, खाया पिया कुछ नही, खाली गिलास तोडा, दो आना” असा पुकारा व्हायचा.त्या हॉटेलच्या पुढे पहिल्या मजल्यावर “तरूण फोटो स्टुडीओ” होता.त्यावेळी अंधेरीकरांना अंधेरीतच फोटो काढायचा असल्यास त्याच्याकडेच जावे लागे.बहुतेकांचे लहानपणीचे फोटो किंवा कुटुंबाचा एखादा एकत्र फोटो तिथेच काढला जात असे.शाळेंत आयडेंटीटी कार्डस नव्हती, पण कॉलेजमधे गेल्यावर आयडेंटीटी कार्डसाठी फोटो लागे.खाली कापडाचे दुकान होते आणि पुढे एक सुरूवातीची अंधेरीची एकमेव लाँड्री होती.वडील आपले कपडे त्या लाँड्रीत देत असत.पण आमचे कपडे गादीखाली ठेवून इस्त्री केले जात.त्याच्यापुढे एक पाववाला आणि एक दूधवाला ह्यांची दुकानं होती.पाववाल्याकडे कुपनावर पाव घेतल्याची नोंद करून पैसे नंतर देण्याची सोय होती.तर दूधवाला घरी येऊन दूध देई आणि महिन्याच्या शेवटी पैसे घेई.पाववाला एक पन्नाशीच्या पुढचा गोरा, जाडसर, लेंगा शर्ट घालणारा इराणी होता तर दूधवाला आंखूड धोतर आणि टोपी घालणारा होता.१९५० नंतर पाववाला इराणला परत गेला.दूधवाला अधूनमधून भाव वाढवत असे.एखाद्याने अगदी काकुळतीने विनंती केली तर तो दयाळूपणे भाव वाढवत नसे.पण धंदा चालावा म्हणून त्या घरी द्यायच्या दूधातलं पाणी त्या प्रमाणांत वाढवत असे.त्या दोन्ही दुकानांच्या वरच्या घरांत आमच्या वाणी कुटुंबासह रहात असे.त्याच्यापुढे थोडा झाडीआड लपलेला अंधेरीच्या विख्यात वकीलांचा एकमजली बंगला होता.माझ्या आठवणीप्रमाणे त्यांना बारा मुली आणि एक मुलगा होता.त्या वकीलांच्या बंधुंचं कुटुंबही तिथेच रहात असे.त्यानाही दोन मुली होत्या.इतर पाटीलांप्रमाणेच हे भाऊसुध्दा अधूनमधून भांडत असत.एऱ्हवी सारं शांत असे.पण पडद्याआडून रस्त्यावर कोणा ना कोणाची नजर असावी असं आपलं आम्हाला वाटत असे.पाटील वकीलांचा बंगला आणि दूधवाला, पाववाला, लाँड्री ही दुकानं ह्यांच्या बरोबर समोर आमचं नीळकंठ कॉटेज होतं.त्याची ओळख बाबल्याच्या गोष्टीत झालीच आहे.
▪
पाटील वकील यांच्या बंगल्यानंतर देऊळ होतं.त्यांत मारूती, शंकर आणि राम अशी तीन देवळं होती.आजही आहेत.पण ते मारूतीचं देऊळ म्हणून ओळखलं जाई.कधीही रांगेत उभं न राहता तिन्ही देवाना हवं तेव्हा हवं तेवढा वेळ भेटता यायचं.कुठल्याच देवळांत कुणालाही मज्जाव नव्हता.राम सोडला तर मारूती आणि शिवलिंग यांना आत जाऊन स्पर्श करतां यायचा.रांग लागायला लागली ती बरीच नंतर.बहुदा १९६५च्याही नंतर.देऊळापुढे पटांगण होतं.सणासुदीला तिथे मांडव घातला जाई आणि किर्तन ठेवले जाई.मला किर्तन ऐकायला आवडत असे.त्यांत गोष्ट असे आख्यान असे.मी ते ऐकण्याचा कधी कंटाळा केला नाही.वेगवेगळ्या किर्तनकारांची किर्तन तिथे ऐकली आहेत.पार्ल्याचे पेठे नांवाचे किर्तनकार बहुदा येत असत.एसएससी अकरावी झाल्यावर किर्तन ऐकलं नाही.कधीतरी टीव्हीवर ऐकलं असेल तेवढच.”किर्तनासी नर हो तुम्ही जागा” या एका ओळीचे चार अर्थ मात्र मला कळले.अगा नरहो, तुम्ही किर्तनाला जा, हा पहिला अर्थ.तिथे जाऊन जागे रहा, झोपू नका, हा दुसरा अर्थ.किर्तनाला जा आणि गा हा तिसरा अर्थ तर तिथे जे ऐकाल त्याला जागा म्हणजे जे ऐकाल त्याच्याप्रमाणे वागा, हा चौथा अर्थ.जागा हा शब्द जसा उच्चारला जाईल तसा अर्थ बदलतो.थोडासा विषय बदल होतो पण ह्याच अलंकाराच दूसरं उदाहरण म्हणजे “शंकरासी पुजले सुमनाने”.ह्याचेही चार अर्थ होतात.थोडा विचार केलांत की तुम्हालाही कळतील ते चारी अर्थ.
▪
देवळापुढे एक छोटी एकमजली चाळ मार्केटच्या दिशेने वळवलेली.तिथेच अंधेरी मार्केटला जाणारी गल्ली.त्या गल्लीत आणखी एक छोटी एकमजली चाळ खूप जुनी.मधे एका पाटीलांचा बंगला.पाटीलाच्या बंगल्यासमोर एक छोटी वखार होती.चाळीच्या मागे मोठी विहिर.अंधेरीतल्या विहिरी सदैव पाण्याने भरलेल्या असत.अनेक मुलं ह्या विहिरींमधेच पोहायला शिकत.ती चाळ किती जुनी होती कुणास ठाऊक पण एका भाडेकरूची पत्नी एकदा वरच्या मजल्यावरून जमीन दुभंग होऊन खालच्या घरांत जात होती पण मध्येच अडकून पडली.तिची त्या स्थितीतून सुटका करताना इतरांच्या नाकी नऊ आले.गल्लीच्या सुरूवातीला चणेवाल्या भय्याचं दुकान होतं आणि मागे दुसऱ्याच पाटीलाची मोकळी जागा होती.मी शाळेत असतानाच तिथे उभट दोन मजली इमारत उभी राहिली.खाली पाटीलानेच औषधांचं दुकान काढलं.त्याच्यापुढे होतं रामभरोसे हॉटेल.तिथली गरम गरम कांदाभजी प्रसिध्द होती.हॉटेल यथातथाच होतं पण भजी पार्सल न्यायला बरेच येत.त्यापुढे पुन्हा एका पाटलाचा बंगला आणि त्याच्यापुढचा आत जाणारा रस्ता तुम्हाला एका लांबलचक भरपूर जनसंख्या असणाऱ्या बाळाभट चाळींत घेऊन जायचा.
▪
वरची परिस्थिती वर्सोवा रोडच्या डाव्या बाजूची झाली.आमच्या नीळकंठ कॉटेजच्यापुढे गावठाण लेनपैकी एक यायची.त्यापुढे पीठाची गिरणी.गावठाण लेनच्या सुरूवातीलाच नीळकंठ कॉटेजच्या चाळीला लागूनच नंतर बांधलेलं जैन मंदिर.ह्या वास्तुरचना पाहिल्या की जाणवतं “हवं तशी परवानगी मिळवणं” हा प्रकार स्वातंत्र्याच्याही बराच आधीचा आहे.पीठाच्या गिरणीनंतर एक दुकान होतं तिथे पाटीलांपैकी एकाने लाँड्री काढल्याच आठवतं.पण आधी काय होतं आठवत नाही.त्या दुकानाच्या पुढे आणखी एका पाटीलाचं घर आणि एक हलवाई.एका सुंदर मराठी मुलीने त्या यु.पी.च्या हलवायाबरोबर प्रेमविवाहही केला. ‘कांहे दिया परदेस’ मालिकातेव्हांच घडली.मग गावठाणात जाणारी दुसरी गल्ली यायची.ही बरोबर मार्केटकडे जाणाऱ्या गल्लीच्या समोर यायची.आत गेल्यावर ह्या दुकानांच्या मागेही एक आणखी वेगळे पाटील रहात असत.त्यांचं एक मजली घर होतं.त्या गल्लीत एक एकमजली नवी कोरी इमारत बांधली होती. गल्लीच्या पुढे कंपाउंडच्या आत दोन तीन गाळे होते.त्यांत मधोमध शारंगधर वैद्याचा दवाखाना सर्वपरिचीत होता.आयुर्वेदाच्याही विशिष्ट पध्दतीच्या औषधांसाठी ते प्रसिध्द होते.बारा आणे किंवा रूपया ही डॉक्टरांची फी न परवडणारे किंवा आयुर्वेदावर विश्वास असणारे अनेकजण वैद्यराजांची दोन चार आणे फी पसंत करत.पुढे त्यांच्या मुलाने तोच व्यवसाय स्वीकारून वाढवला असे ऐकीवात आहे.पण माहिती नाही.त्या पुढे मुन्शी भवन ही तीन चार एकमजली चाळींची वाडी यायची.तिथेही जनसंख्या बरीच होती.ती साधारण बाळाभटाच्या चाळीकडे जाणाऱ्या गल्लीच्या समोर यायची.त्याच्यापुढे पुन्हा पाटीलांपैकी एकाचा एक मजली छानसा बंगला यायचा.त्याच्यासमोर लोकल बोर्डाची ऊर्दू शाळा होती.तर पुढे एक गल्ली आत जात असे, तिथे चार पाच चाळी होत्या.त्या वाडीला शांतावाडी म्हणत असत.शांतावाडी जरा उच्चभ्रू लोकांची वस्ती समजली जाई.पुण्यात सदाशिव पेठ तशी अंधेरीत शांतावाडी.शांतावाडीमधें संपूर्ण जुन्या अंधेरीच्या लोकांचा पांच दिवसांचा गणेशोत्सव दर वर्षी होई.जास्त कार्यक्रम स्थानिकांचेच व्हायचे.पण अधूनमधून एखादा प्रसिद्ध वक्ता, गायक किंवा नकलाकार हजेरी लावून जायचा.स्थानिक लोक एखादं नाटकही बसवायचे.शांतावाडीतल्या लोकांचा ह्या व्यवस्थापनात पुढाकार असे.कार्यक्रमांचा दर्जा खूपच चांगला असे.पण विविध स्पर्धांमधली बक्षिसे शांतावाडीच्याच स्पर्धकाना मिळतात असा प्रवाद मात्र होता.परिक्षक तिथलेच असत त्यामुळे गैरसमज होत असावा असं आपण म्हणूया.
▪
शांतावाडीनंतर सिमेंटच्या चाळी म्हणून समजली जाणारी वस्ती होती.खरं तर ह्या वस्तीत माझ्या ओळखीचं विशेष कोणी नसल्यामुळे त्या वस्तीबद्दल फारशी माहिती मलाच नव्हती.पण मराठी कष्टकरी आणि कांही गुजराती यांची वस्ती होती. त्याच्या समोर उजव्या बाजूला रस्ता जायचा त्याचं नाव होत दाऊदबाग.दाऊदबागेतही एका पाटीलांचा बंगला व बऱ्याच पाटीलांच्या छोट्या मोठ्या चाळी होत्या.मुख्य म्हणजे दाऊदबागेत त्यावेळची अंधेरीची लोकल बोर्डाची आणि एकमेव शाळा त्या गल्लीत टोकाला होती.प्रत्येकाला चौथीपर्यतच शिक्षण तिथेच घ्यावं लागे.तिथे शिकलेले लोक इंजिनीयर, डॉक्टर, आयपीएस, एलआयसीचे एम. डी., इ. मोठे अधिकारी झाले असतील, पण पहिला “श्री” इथेच गिरवावा लागला.लांबून लांबून म्हणजे अंधेरी पूर्व मधील मरोळ गाव म्हणा की जोगेश्वरीजवळचा आंबोलीचा भाग म्हणा, तिथून मुलं ह्या शाळेंत येत असत.आमची शाळा एक मजली इमारतीत होती.पण उंच चौथऱ्यावर होती.त्यामुळे तळमजल्यावर जायला सुध्दा पाच पायऱ्या चढाव्या लागत.मागच्या बाजूच्या त्याच उंचीवरील गॕलरीतून वेगवेगळ्या प्रकारे उड्या मारण्याची मुलांच्यात स्पर्धा चाले. मी शाळेत जाऊ लागलो, तेव्हाच शाळा दोन वेळांत म्हणजे सकाळची आणि दुपारची अशी घेण्यात येऊ लागली.सातवीपर्यंत म्हणजे व्हरनॕक्युलर फायनलपर्यंत तिथे शिकता येत असे.बहुतेक मुलं चौथीनंतर हायस्कूलसाठी दुसरीकडे जात.परंतु खाजगी हायस्कूलची फी न परवडणारे तिथेच व्ह.फा. पर्यंत शिकत.मुलींची शाळा थोडी अलीकडे वेगळ्या इमारतीत होती.तीही एकमजली इमारत होती.शाळेंत असतांना दाऊदबागेंतल्या कांही जणांशी माझी चांगली मैत्री होती.पण पुढे ती टिकली नाही.फक्त ओळख राहिली.अंधेरीतली थोडीफार मुस्लिम वस्तीही दाऊदबागेतच होती.पण अंधेरीत मारामारी तर सोडाच पण धार्मिक तणावही कधी निर्माण झाला नाही.अगदी मुंबईत दंगे झाले त्याचे पडसाद म्हणूनही नाही.दाऊदबागेतच रामबागही होती.त्याच्या एका अंगाला वाहणारा ओढा शाळेजवळ येऊन पुढे अंबोलीच्या दिशेला जात असे.शाळेपासून ओढा जवळच होता.मुंबईच्या इतर नदीनाल्यांसारखाच पावसांत पूर आणणारा आणि इतर दिवसांत गटारागत होणारा.पावसाळ्यांत एक दोनदां तरी गुढघाभर (मुलांच्या) पाणी आल्याने आम्हाला शाळेला सुट्टी मिळे.त्या ओढ्याकडे पाहून कधी “ओढा नेई सोने वाटे वाहूनिया दूर” हा अनुभव मात्र आला नाही.दाऊदबागेमधे योगायोगाने मतिमंद किंवा वेडे झालेल्यांची संख्याही लक्षणीय होती.अर्थात् ह्या बाबतीतले अज्ञानच त्याला कारणीभूत होतं.
▪
दाऊदबागेच्या गल्लीत न जाता पुढे गेल्यास एक छोटा एकमजली बंगला होता.तिथे पब्लिक प्रॉसिक्युटर राहत असत.कागदपत्रांवर राजपत्रित अधिका-याची सही लागली की अंधरीतील सर्व त्यांच्याकडेच धाव घेत.त्यांच्या पत्नीही डॉक्टर होत्या व एक छोटं प्रसुतिगृह चालवीत.त्यानंतरचे दोन बंगले पुन्हा पाटीलांचेच होते.त्या दोन बंगल्यांच्या मधल्या मैदानाला धोबीघाट म्हणत.ह्याच मैदानांत मी राजकीय भाषणं ऐकली.आचार्य अत्र्यांच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अत्यंत जोरांत असतानाचं भाषण मी तिथेच ऐकलं.त्यांच्याच भाषेंत सांगायचं तर गेल्या दहा हजार वर्षात त्यांच्या भाषणाला झाली तशी गर्दी त्या मैदानावर झाली नव्हती.गाडगे बाबांचे भाषण/किर्तनही तिथेचं ऐकलं आणि त्यांचे पाय धरू पहाणाऱ्या पाटलाला त्यानी दम भरतांनाही पाहिलं.त्या मेदानाच्या समोरच आईस फॕक्टरी होती.आणि पश्चिम अंधेरीची त्यापुढची वस्ती म्हणजे फक्त चार पांच बंगले.वर्सोवा रोड घोडबंदर रोड जिथे मिळत त्या नाक्यापासूनची ही पश्चिम अंधेरी. नाक्यावरून घोडबंदर रोड पुढे जायचा.नाक्यावर एक विहिर होती.तिथें पखालींमधे पाणी भरून नेत.घोडबंदर रोड पुढे मार्केटकडे जाई तर वर्सोवा रोड रेल्वे फाटकाला जाऊन भिडे आणि संपत असे.त्या रस्त्यावरून उजवीकडे एक छोटी गल्ली स्टेशनकडे जाई.गल्लीला लागूनच मशीद होती आणि आजही आहे.समोरच एक छोटी एकमजली चाळ होती.तिथेही एक डॉक्टर होते.मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला छोटी छोटी दूकाने होती.फरसाण, मिठाई, कपडे, वाणसामान, खादी ग्रामोद्योग, इ.जिथे एकमजली इमारत असे, तिथे वरच्या मजल्यावर लोक रहात असत.आमचे राशनचे दुकानही त्याच रांगेत होतं.तिथे अनेकदां नंबर लावायला उभं राहिल्याचं आठवतं.डावीकडे प्रथम भाजीचं मोठं मार्केट आणि मग मासे मटण ह्यांच वेगळं मार्केट होतं.अंधेरीला वर्सोव्याहून रोज ताजी मासळी मिळत असे.सोमवार ते शनिवार मासे आणि रविवारी मटण अशी मांसाहारी लोकांची चंगळ होती.अर्थात कांही गुरूवारी तर कांही सोमवारी मांसाहार करत नसत.ह्या मार्केटच्या टोकाला बाबल्याचं श्रीराम लंच होम आजही आहे.त्याच्यापुढे लाकडाच्या वखारी होत्या आणि अंबोलीत जाणारा रस्ता होता.तिथे अंधेरी उत्तर संपत असे.
▪
स्टेशनकडून बाहेर येऊन उत्तरेला न वळतां घोडबंदरवर दक्षिणेकडे वळल्यास फार विरळ वस्ती होती.आमराई म्हणून एक भाग होता.तिथे थोडी झोपडीपध्दतीची पण अधिकृत मालकीची घरं होती.तो रस्ता पुढे अंधेरीच्या गांवदेवीच्या देवळाकडे जायचा.अंधेरीच्या गांवदेवीचा डोंगर म्हणजे माणसाने हावरटपणापायी पर्यावरणाचा नाश केल्याचा पुरावाच आहे.आज देवीचं देऊळ आहे तेवढाच डोंगराचा छोटा भाग आणि तिथपर्यंत जायला आमराईकडून जाणारा एकमेव रस्ता शिल्लक आहे.बाकी सर्व बाजूनी तो डोंगर दगडांसाठी पूर्ण उभा तासला आहे.लहानपणी आम्ही कितीदा तरी देवळात जात असू.आणि कांही शूर वीर रॉक क्लायंबिंग करून दुसऱ्या बाजूने पण चढत.आमराई नंतर फिदाई मुलांचे बोर्डींग आणि शाळा होती.ते उत्तम बँड वाजवीत.समोर एक बँक आणि तिच्यापुढे मुलींचे हायस्कूल आणि नंतर आमचे माधवदास अमरसी हायस्कूल.अंधेरी खरं तर इथेच संपत असे.पुढच्या भागाला ईर्ला म्हणत.त्याच्या अलिकडे लल्लूभाई पार्क हा अंधेरीचा एकमेव छोटा बगिचा होता.त्याच्या डाव्या हाताला शांता आपटे, वैकुंठलाल मेहता आदींचे बंगले होते.उजव्या हातालाही शांता आपटे यांच्याच मालकीची मोठी वाडी होती.ती नंतर डॉ. जोशी ह्या गुजराती डॉक्टरनी विकत घेतली.अगदी अलिकडेपर्यंत डॉक्टरनी तसाच जतन केलेला बंगला पाडून तिथेही आता टॉवर आला.१९४७ नंतर त्या वाडीच्या बाजूलाच आशावाडी ही सिंधी लोकांची घरे असलेली मोठी वाडी झाली.
▪
अंधेरी पूर्वेला सुरूवातीला उषा टॉकीज, त्याच्याजवळ एक दोन बंगले, कर्णिक चाळ नांवाची अंधेरी कुर्ला रोडवरची चाळ, पोलिस स्टेशन, पोलिसांच्या चाळी आणि त्यामागे असणाऱ्या झोपड्या इतकीच वस्ती होती.कर्णिक चाळीकडून एक रस्ता पारशी कॉलनी जोगेश्वरीला जाई.अंधेरी कुर्ला रोडवर गणपतीचे देऊळ आहे त्यानंतर मथुरादास वसनजींचा महालवजा बंगला होता.तो दहा फूट उंच गेटच्या बाहेरूनच बघतां येई.पुढे सिनेमा स्टुडीओ होता.नाही म्हणायला तेली गल्लीच्या आसपास थोडी वस्ती होती.पण ती सर्व वाढ बहुतेक १९५०नंतरची.बावन्न बंगले, परांजपेंच विजयनगर हे सर्व १९५५ किंवा १९६०नंतरचं.पूर्वेला असलेला मथुरादास यांचा बंगला पहातां येत नसे.पण पश्चिमेच्या एका विशेष बंगल्याबद्दल सांगायचं राहिलं.ज्ञानदेवांच्या भिंताडाकडे जातांना भवन्सवरून वर्सोव्याच्या दिशेला वळल्यावर उजव्या हाताला दिसणारा तो एकमेव बंगला होता.शेरू व्हीला हे त्याचं नांव.तो संपूर्ण महाल बाहेरून सुंदर रंगीत कांचा भिंतीत बसवून बांधण्यात आला होता.आताही तो स्टेडीयमच्या बाहेरच्या बाजूला आहे.तो हेरिटेजमध्ये समाविष्ट करण्यांत आलाय.पण त्याची काळजी कोण घेणार ?आमचा एक बॅंकेतले सहकारी मित्र ह्या शेरू व्हीलात भाड्याने अनेक वर्षे राहिले.त्यांना त्यासाठी न्यायालयीन लढाईही अनेक वर्षे लढावी लागली.शेवटी छोटेसे कॉम्पेन्सेशन घेऊन त्याना जागा सोडावी लागली.पण अंधेरी-वर्सोवा रोडवरचा तो सर्वात प्रेक्षणीय बंगला होता.अशा ह्या अंधेरीत माझं बालपण गेलं.बालपणीच्या इतर कितीतरी आठवणी स्मृतीपटलावर येण्यासाठी धडपडतायत.पण आज इथेच थांबतो.
— अरविंद खानोलकर.
Leave a Reply