नवीन लेखन...

१९७१ च्या युद्धातील एक ‘मसी’

भारतीय सैनिकांच्या शौर्याची गाथा प्रत्येक भारतीयांच्या हृदयात कोरली जायला हवी, अशी आहे. अभूतपूर्व साहस, जाज्वल्य देशाभिमान, दुर्दम्य इच्छाशक्ती, नि:सीम धैर्य आणि कठोर निर्धार यांच्या बळावर जीवाची तमा न  बाळगता ‘ छोडो मत उनको’ असे म्हणत शरीरातल्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणाऱ्या भारतीय सैन्याचे वीर जवान यांच्या शौर्याविषयी आजच्या तरुणाईला आत्मियता आहे की नाही हा संशोधनाचा विषय आहे. पण या शौर्यवंत शिलेदारांचे बळ वाढविणारे अनेकजन असतात. भले ते सैन्य दलात खानसामा असो वा धोबी. यांच्या कोठे नोंदी आढळत नाहीत. पण सरहद्दीपर्यंत मुसंडी मारणाऱ्या जवानांची विशेष देखभाल करणाराला आपण विसरतोच. पण सरकारही त्यांच्या अथक परिश्रमाची नोंद घेत नाही. अशा शौर्यवंताचे दीप कायम उजळले जावेत,असं मनाला वाटतं.

आम्ही लहान असतना १९७१ च्या भारत पाक युद्धाच्या वेळी रात्रीच्या वेळी पाकिस्तान कडून तोफगोळे यायचे. आम्ही बघायला लागलो की, आई हात धरून घरात नेत असे. तेव्हा काही तरी अफवांचे पिक चर्चेचा विषय होऊन गेले होते. शेजारच्या मावशीने सांगितले की,एकजण गच्चीवरून तोफगोळे बघत असताना त्याचे डोळे गेले. पूर्ण काळोख असे. सायरन वाजला की आहे ते दिवे मालाविले जात होते. अंधारातून ते लालबुंद गोळे भयाण वाटायचे. काही दिवसाचेच युध्द होते.पण त्यात विजय आपण मिळविला असला तरी त्यांच्याप्रमाणे आपलेही मोहरे गमावून बसलो.

आजकाल महाराष्ट्रातील  एकेक सैनिक पाकिस्तानी छुप्या युद्धात बळी पडत आहे. तात्पुरते त्यांच्याबद्दल सहानुभूती प्रकट केली जाते. नंतर आपण त्यांना विसरून जातो. कुरुक्षेत्रावर झालेल्या धर्मयुद्धात लाखो लोक धारातीर्थी पडलेले आपण ऐकलेले आहे शिवाय पानिपतच्या लढाईत दीड लाख मराठे कामी आले पण लक्षात राहिले ते विश्वासराव पेशवा,सदाशिवरावभाऊ, दत्ताजी शिंदे अशा मोजक्या वीरांची नांवे वगळता आपल्याला इतर सारे अनभिज्ञच. हे असेच असते. आपण मोहऱ्यांची नांवे लक्षात ठेवतो, आपला खुर्दा किती गमावला हे केवळ संख्येत मोजतो. तीही माणसेच असतात पण त्यांची इतिहास दखल घेत नाही की आपणही त्यांची नोंद घेत नाही. ही वास्तविकता आहे.

असाच एक *मसी*  होता. धर्माने मुसलमान. हिमाचल प्रदेशातील डलहौशी जवळच्या खेड्यातला. सदा हसतमुख, उंची सहा फुट, लालबुंद चेहरा, पांच मुलांचा बाप. बिडी कायमची तोंडात.पठाणकोट मध्ये एका झोपडीत राहणारा. वायुदलात पक्की नोकरी असलेला स्वयंपाकी. सैनिक प्रेमाने सांगायचे ‘अरे बिडी पिना छोड दो’ पण तो हसत हसत दुर्लक्ष करीत असे. पठाणकोट… नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे थंडीचा मोसम… दिवसाढवळ्या माणसं गारठतात. तेथे या वायुदलाने पाकिस्तानी सैनिकांना धूळ चारण्यासाठी ठिय्या मांडला होता. आकाशात फटाकड्या वाजत असल्याचे आवाज घुमू लागले होते.धूर धूर झाला होता.  दिवाळी नुकतीच होऊन गेली होती. ते फटाकडे म्हणजे पाकिस्तानी सेबरजेट नावाची विमाने घिरट्या घालीत होती.रडारवर कळले होते. काही अवधीत पाकिस्तान कडून हल्ला होणार ….! इशाऱ्याचे भोंगे वाजले. घराकडे निघालेले सैनिक आणि घरी असलेले सैनिक तळाकडे धाव घेऊ लागले. युध्द सुरु झाले. पहिल्याच झटक्यात पाकिस्तानचे कंबरडे मोडले होते. जेमतेम पंधरा दिवस युध्द सुरु होते. सैनिक हल्ला करून तळावर परतत तेव्हा त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था हा मसी पाहत होता.’आओ मेरे शेअरो… गरमागरम रोटी खाओ’ मसी सैनिकांचे आत्मबल वाढवीत होता. जेवता जेवता त्यांच्या शौर्याच्या कथा मेसच्या टेबलावर ऐकत त्यांना दाद देत होता. जवळपास बॉम्ब पडत होते. अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर पाकिस्तान होते. सैनिक पेटून उठले होते. आले मरण तरी ते वीरमरण असणार. म्हणून ते प्राणानिशी हल्ला चढवीत होते.  चोवीस तास त्यांच्या दिमतीला उभा ठाकला होता. सर्वतोपरी सैनिकांची काळजी घेत होता. कुठेही कमी भासू देत नव्हता. पाकिस्तानला योग्य धडा शिकविला गेला. युध्द एक दोन दिवसात संपणार असे दिसू लागले आणि तो दिवस उगविला. ५  डिसेंबर १९७१ …….!

मसी पंधरा दिवस झोपला नव्हता म्हणून त्याला सुट्टी देऊन घरी जायला सांगितले होते. तो घरी गेला. आपल्या कुटुंबासोबत ती काळरात्र अखेरची असेल असं कुणालाही वाटलं नसेल. पण दुसऱ्यादिवशी सकाळी परत येईल असं सर्वांनी गृहीत धरलं होतं. पण तो परतला नाही. सकाळी दुख:द वार्ता येऊन थडकली. रात्री पठाणकोटच्या वस्तीत पाकिस्तानने बॉम्ब टाकला अन मसी आपल्या घरात आपल्या पाच मुलांबरोबर जळून खाक झाला. सर्व वस्तीच जाळून खाक झाली. सर्व योद्धे क्षणभर अवाक झाले. पंधरा दिवस न झोपलेल्या मसी चिरनिद्रेत गेला होता. आता आओ मेरे शेअरो ….. म्हणणारा त्यांचा मसी त्यांना सोडून गेला होता.

आपण युध्द जिंकले. सिमला करार झाला. पण मसी व त्यांचे कुटुंब काळाबरोबर संपले होते. सीमेवर केवळ सैनिक लढतात असे नाही, तर सैनिकांच्या आसपासचेही कितीतरी जण लढत असतात… मसीसारखे. मोहरे गेले की त्यांची नांवे झळकतात. ते योग्यच आहे; पण मसी सारखे कितीतरी चिल्लरमध्ये जमा होणारे असतात, याची इतिहास नोंद घेणार आहे का …?

— अशोक भेके

 

Avatar
About अशोक मारुती भेके 13 Articles
मी लहापणापासून मुंबईतील घोडपदेव या श्रमजीवी भागात राहत असून सध्या मी बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेत सेवेला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..