नवीन लेखन...

२ जानेवारी

३१ डिसेंबर ही तारीख जवळ येऊ लागली की सर्वजण वर्षाची अखेरची रात्र आनंदात कशी घालवता येईल याचे बेत आखू लागतात. मित्रमंडळी, नातेवाईक, कुटुंबीय असे वेगवेगळे ग्रुप्स आपापल्या पसंतीनुसार कुठे जमायचं, काय खायचं आणि काय प्यायचं याचे मनसुबे आखू लागतात. या पाटर्यांसाठी कोणाला बोलवायचं आणि कोणाला फुटवायचं यावरही चर्चा सुरु होते. अमका कसा बोअर आहे आणि नववर्षाच्या सुरुवातीलाच तमकीचं दर्शन नको रे बाबा अशा कॉमेंटस्ची रंगत खुलू लागते. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वजण सिद्ध होतात. ३१ डिसेंबरची प्रतिक्षा सुरु होते.

वर्षभर कामाच्या रगाडयात सापडलेल्या मनाला कधी ना कधी विरंगुळा हवाच असतो. हा विरंगुळा या ३१ डिसेंबरच्या पार्टीच्या निमित्ताने सर्वांना लाभतो. असे आनंदाचे क्षण आपल्या मित्रमंडळींसमवेत अथवा प्रियजनांसमवेत घालविणे हा माणसाचा स्थायीभाव. साहजिकच अशा मौजमजेच्या प्रसंगी आपल्या सोबत कोण असावं याचेही ठोकताळे ठरलेले असतात. समान आवडीनिवडी असलेली मंडळी एकत्र जमतात. हास्यविनोदाला उधाण येतं. मनात साचलेलं मळभ दूर करण्याची संधी चालून येते. ३१ डिसेंबरची रात्र या घडीला वेगळं महत्त्व प्राप्त होतं.

३१ डिसेंबर हा दिवस वर्षभरात घडलेल्या घटनांचीही उजळणी करुन जातो. वर्षभरात आपले कोणकोणते आडाखे चुकले, अपेक्षेप्रमाणे कायकाय घडलं नाही आणि कोणते प्रसंग जीवावर घाव घालून गेले याच्या आठवणी मनात पिंगा घालू लागतात. वर्षभरात घडलेल्या सुखद घटनांच्या स्मृती सोबत असतातच. मात्र काय गवसलं यापेक्षा काय हरवलं याची जंत्री मोठी असते. या निराशेवर मात करण्यासाठी उपाय एकच असतो. ३१ डिसेंबरच्या रात्री एकत्र जमून कटू आठवणींचं ओझं दूर सारायचं. मनाला उभारी देत नव्या वर्षाच्या स्वागताला सिद्ध व्हायचं. मरगळ झटकून पुन्हा ताजं तवानं व्हायचं.

थोडक्यात आप्त जनांबरोबरची पार्टी हे एक निमित्त असतं. या निमित्ताचा आधार घेत स्वतःचं स्वतःला सावरायचं असतं. हे सावरताना समविचारांच्या मंडळींचा, त्यांच्या सोबत रंगणाऱ्या गप्पांचा आधार मोठा असतो. म्हणूनच कदाचित अशा पाटर्यांना साऱ्या जगभर मान्यता लाभली असावी. ३१ डिसेंबरच्या रात्रीला खऱ्या अर्थाने रंगत दिली जाते ती पंचतारांकित अथवा मोठ्या हॉटेलमध्ये. अशा हॉटेल्समध्ये ३१ डिसेंबरसाठी जय्यत तयारी करण्यात येते. सरत्या वर्षांचं प्रतीक म्हणून ओल्ड मॅनचा पुतळा उभा करण्यात येतो. फुलांच्या आणि दीपमाळांच्या सजावटीने सारा परिसर सुशोभित केला जातो. वाद्य संगीताचा शिडकावा मन प्रफुल्लीत करण्यास सिद्ध असतो. सारा माहौल आनंद आणि उत्साहामध्ये आकंठ बुडून जातो.

मोठ्या हॉटेल्सचा भव्य थाटमाट दिमतीला नसला तरी घराघरातील छोटया पाटयांचा माहौल बहुतांशी तसाच असतो. इथेही खाण्यापिण्याची जय्यत तयारी सज्ज असते. डीव्हीडीतील संगीताचे सूर आसमंतात निनादत असतात. मन प्रफुल्लीत करणारं वातावरण इथेही थोडया फार फरकानं सिद्ध होतं. साधारण दहाच्या सुमारास अशा पाटर्यांना आकार येऊ लागतो. अकरा साडे अकरा पर्यंत रंगत वाढत जाते आणि ठीक बाराच्या ठोक्याला आनंदाचा परमोच्च बिंदू साधला जातो. ‘हॅप्पी न्यू इअर’च्या शुभेच्छांनी वातावरण दुमदूमून जाते. मोबाईल्स, फोनच्या रिंगटोन्स निनादू लागतात. बाहेर कुठेतरी फटाक्यांची आतिषबाजी सुरु होते. प्रियजनांचे हात हस्तांदोलनासाठी जुळून येतात. नव्या वर्षाचं प्रफुल्लीत चेहऱ्यानं आणि उत्साहाची परिसिमा गाठलेल्या मनानं स्वागत केलं जातं.

१ जानेवारीची सकाळ उजाडते ती शुभेच्छांच्या सोबतीने. कार्यालयातील सहकाऱ्यांना, नातेवाईकांना फोन जाऊ लागतात. काल रात्री आम्ही काय केलं आणि तुम्ही काय केलं याची देवाणघेवाण सुरु होते. थोडं उजाडल्यानंतर एस.एम.एस. पाठविण्याचे सोपस्कार सुरु होतात. मनापासून नाही तरी उपचार म्हणून नवीन वर्षाच्या शुभेच्छा काहींना पाठविणं अपरिहार्य असतं. अशा मंडळींची एस.एम.एस.वर बोळवण केली जाते. अर्थात आपल्याला आलेले एस.एम.एस.याच स्वरुपाचे असणार याचीही जाणीव मनाला चटका लावून जाते. अमक्याने आपल्याला साधा फोन न करता एस.एम.एस.वर भागवलं याची चुटपूट जीवाला लागूनच जाते. पण आज नव्या वर्षाचा पहिला दिवस असतो. अशा छोटयामोठया कुरबुरींसाठी आज अवसर नसतो. नव्या वर्षाच्या नव्या दिवशी आपण नव्या दमानं घराबाहेर पडतो.

१ जानेवारीच्या रात्रीही क्वचित एखादी पार्टी अथवा आऊटिंग पार पडतं. त्यानंतर उगवतो तो २ जानेवारीचा दिवस. दोन दिवस आनंदात न्हाऊन निघालेलं मन आता रोजच्या वास्तवाला सामोरं जाण्यास सिद्ध होतं. सहजगत्या रोजचे व्यवहार सुरु होतात. दैनंदिन कामकाजात आपण बुडून जातो. कामांचे ताण, पैशांचे हिशेब, आपापसातले हेवेदावे, सर्व कसं पुन्हा सुरळीत सुरु होतं. अगदी दोन दिवसांपूर्वी आपण वेगळं काही अनुभवलं होतं याचा विसर पडतो. धकाधकीच्या आयुष्यात आपण सामावून जातो. काळाच्या ओघात आणखी एका नव्या वर्षांची संथ वाटचाल सुरु होते.

– सुनील रेगे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..