पुण्यातील नाना पेठ परिसरातील ऐतिहासिक सिटी चर्चने आज २२७ वर्षे पूर्ण केली आहेत. पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील क्वार्टरगेट जवळील ऑर्नेलाज हायस्कूल शेजारी हे भव्य कॅथोलिक चर्च उभे आहे. “इमॅक्युलेट कन्सेप्शन ऑफ मदर मेरी” चर्च असेही याला संबोधले जाते. विशेष म्हणजे या सिटी चर्चच्या सभोवताली मोठी मुस्लिम वस्ती असून चर्चच्या कम्पाऊंड व भिंत व बाजूच्या मशिदीची भिंत एकच आहे. धार्मिक सलोख्याचे हे विलोभनीय उदाहरण मानावे लागेल.
पुण्यातील सिटी चर्चचा इतिहास :
पुण्यातील सिटी चर्चसाठी सवाई माधवराव पेशवे यांनी सुमारे चार एकर जागा दिली होती. अटकेपार झेंडे लावणाऱ्या पराक्रमी श्रीमंत पेशव्यांच्या फौजेत डॉम मॅन्यूल डि नोव्हो हा पोर्तुगीज लष्करी अधिकारी सेवेत होता. पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोवा आणि उत्तर कर्नाटक येथून श्रीमंत पेशव्यांच्या फौजांसाठी सैन्यभरती करीत असत. त्यामुळे पेशव्यांच्या फौजांमध्ये अनेक पोर्तुगीज व ख्रिस्ती सैन्य असायचे. पोर्तुगीज अधिकारी डॉम मॅन्यूल डि नोव्हो हा साऱ्या सैन्याच्या गरजांकडे लक्ष देत असे.
सैन्यातील ख्रिश्चनांची गरज त्यांनी श्रीमंत पेशव्यांच्या कानावर घातली आणि श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या मागणीस तत्काळ मान्यता देऊन सध्याच्या नाना पेठेत चार एकर जागा कॅथोलिक चर्च बांधण्यासाठी दिली. तसेच आपले कारभारी नाना फडणवीस यांना सांगून आर्थिक मदत दिली. तेथे ८ डिसेंबर १७९३ मध्ये सध्याच्या चर्चची पायाभरणी होऊन प्राथमिक शेड बांधली गेली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बांधकाम होत प्राथमिक चर्चची वास्तू आकारास आली.
पेशव्यांनी दिलेल्या जागेवर पायाभरणी करून बांधलेल्या शेडमध्ये २५ डिसेंबर १७९२ मध्ये उल्हासात ख्रिसमस साजरा करण्यात आला. चर्चची उभारणी करण्यासाठी उपस्थित ख्रिश्चन बांधवांनी वर्गणी काढून निधी उभारला. तेव्हा सुध्दा त्यात श्रीमंत माधवराव पेशव्यांनी देखील त्यात सढळ हाताने वैयक्तिक आर्थीक मदत केली. सुमारे वर्षभरात सन १७९३ मध्ये चर्चची बांधणी पूर्ण झाली. त्यानंतर दरवर्षी ८ डिसेंबर रोजी स्थापना दिन आणि २५ डिसेंबरला ख्रिसमस येथे साजरा होतो व त्यात श्रीमंत पेशव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. या चर्चचा विस्तार ब्रिटिश सत्तेच्या कालावधीत होऊन १८५२ मध्ये दगडी इमारत झाली म्हणजे तब्बल १०० वर्षांनी आजचे चर्च आकारास आले.
गेल्या २२७ वर्षांत येथे रोज प्रार्थना व विविध धार्मिक सामाजिक उपक्रमाची परंपरा चालू आहे. सर्व जाती धर्मांमध्ये येथे सलोखा निर्माण करण्यातही या सिटी चर्चचा सदैव पुढाकार राहिला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
https://youtu.be/CZTyUzFmkXQ
Leave a Reply