२८ जानेवारी हा त्रिनिदादमधील पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स पार्क ओवलवर खेळल्या गेलेल्या वेस्ट इंडीज विरुद्ध इंग्लंड या कसोटीचा अखेरचा दिवस होता. इंग्लिश कर्नधार बॉब वायटने नाणेकौल जिंकून यजमानांना फलंदाजी दिली होती आणि पहिल्या डावात यजमानांनी ३०२ धावा काढल्या होत्या. डेरेक सिली (९२ धावा) आणि लिअरी कॉन्सन्टाईन (९० धावा) हे टॉप-स्कोअरर होते तर जिम स्मिथने बरोबर १०० धावा देऊन चार गडी बाद केले होते.इंग्लंडचा डाव २५८ धावांवर आटोपला.
पॅट्सी हेन्ड्रेन, जॅक इडन आणि एरोल होम्स या अनुक्रमे सहाव्या, सातव्या आणि आठव्या क्रमांकाच्या फलंदाजांनी ४१, ७३ आणि ८५ धावा काढल्या. या तिघांनंतर डावात सर्वाधिक धावा होत्या : १६ आणि त्या काढल्या होत्या दहाव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या यष्टीरक्षक बिल फॅरिमन्डने. या यादीत चौथ्या क्रमांकावर होता कर्णधार, सलामीवीर बॉब वायट १५ धावा. ६ बाद २८० धावांवर वेस्ट इंडीज कर्णधार जॅकी ग्रॅन्टने घोषित केला. जॉर्ज हेडलीने या डावात ९३ धावा काढल्या.
इंग्लंडपुढे विजयासाठी आता ३२५ धावांचे लक्ष्य होते आणि हा सामना जिंकायचाच असा जबरी निर्धार वायटने केला होता.पहिल्या डावात इंग्लंडची सलामीची जोडी होती दस्तुरखुद्द नायक वायट आणि डेविड टाऊनसेन्ड ही. आता वायटने स्वतःला थांबवून ठेवले आणि टाऊनसेन्डच्या जोडीला फॅरिमन्डला (पहिल्या डावातील क्र. १०) सलामीला पाठविले ! अवघ्या दोन धावा काढून फॅरिमन्ड बाद झाला. इंग्लंड १ बाद १४.
पहिल्या डावातील शेवटचा फलंदाज जॉर्ज पेन आता क्रमांक तीनवर उतरला आणि त्याने टाऊनसेन्डला चांगली साथ दिली. वैयक्तिक १४ धावा काढून पेन स्वयंचित झाला. इंग्लंड ३ बाद ५४. त्याआधी टाऊनसेन्ड वैयक्तिक ३६ धावा काढून बाद झाला होता.पहिल्या डावातील क्र. ९ जिम स्मिथ आता क्र. ४ : ३ धावांवर धावबाद. इंग्लंड ४ बाद ६२.
अखेर नेहमी वन-डाऊन पझिशनला खेळणारा वॉली हॅमंड फलंदाजीसाठी आला पण ते नऊच धावा काढू शकले. पाच बाद ७१. वायटची चाल पचलेली नव्हती….
पॅट्सी हेन्ड्रेन हा एकमेव फलंदाज असा ठरला जो दोन्ही डावांमध्ये एकाच क्रमांकावर खेळला. दुसर्या डावात त्याचीही मात्रा चालली नाही आणि सातव्या क्रमांकावर आलेला कर्णधार वायटही निष्प्रभ ठरला. अखेर अवघ्या १०७ धावांवर इंग्लंडचा डाव आटोपला. लिअरी कॉन्स्टन्टाईनने १४.५ षटकांमधील नऊ निर्धाव टाकली आणि ११ धावांचे मोल देत तीन इंग्रज टिपले.
वेस्ट इंडीजने मालिकेतील हा दुसरा सामना जिंकून १-१ अशी बरोबरी साधली. तिसरा सामना अनिर्णित राहिला आणि चौथा सामना जिंकून वेस्ट इंडीजने अधिकृत कसोट्यांमध्ये प्रथमच इंग्लंडविरुद्ध रबर जिंकले. डेविड टाऊनसेन्डसाठी ही पदार्पणाची कसोटी होती.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply