माझे पहिले-वहिले पुस्तक ” माणूस नांवाचे निगेटिव्ह वर्तुळ ” (एकांकिका-संग्रह) आमच्या महाविद्यालयाच्या नवनिर्मित सेमिनार हॉल मध्ये प्रकाशित झाले. महाविद्यालयातील एका शिक्षकाच्या मराठी पुस्तकाचे “अभियांत्रिकी” महाविद्यालयात प्रकाशन व्हावे,हे दुर्मिळ ! बहुधा त्या सेमिनार हॉलमध्ये मी साखराळे सोडल्यावर असा युनिक साहित्यिक कार्यक्रम पुन्हा झाला नसावा.
हे पुस्तक महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृतीच्या मंडळाच्या अनुदानातून पुण्याच्या नीहारा प्रकाशनाच्या वतीने काढले होते. आपल्या कर्मभूमीत पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन व्हावे या माझ्या आग्रहाखातर प्रकाशिका डॉ स्नेहसुधा कुळकर्णी इस्लामपूरला आल्या. समवेत साहित्यिका स्वाती सामकही होत्या. त्या समारंभात माझा जिवलग मित्र -जयंत असनारे खास प्रवरेहून आला होता आणि त्याच्यावर संवादकाची भूमिका मी सोपविली होती. पुस्तक प्रकाशन औदुंबरच्या कवीवर्य सुधांशू यांच्या हस्ते झाले. हा एकांकिका संग्रह माझ्या वालचंद महाविद्यालयाच्या “टिळक हॉल ” ला मी अर्पण केलाय,कारण तिथेच नाट्यशास्त्राचे गमभन मी रंगवलेय आणि त्याच्या साक्षीने एकांकिका लेखन सुरु केले. बारा एकांकिकांना सरकारकडून हिरवा कंदील मिळाला,पण प्रत्यक्षात अनुदानाच्या रकमेत फक्त तीन एकांकिका त्या संग्रहात समाविष्ट होऊ शकल्या. माझ्या साखराळेच्या विद्यार्थ्यांनी त्यातील “फ्रेम्स ” या एका एकांकिकेचा प्रयोगही त्या दिवशी सेमिनार हॉल मध्ये पुस्तक प्रकाशनानंतर सादर केला.
माझ्या निमंत्रणाला मान देऊन वालचंदचे माझे गुरुजन आवर्जून या समारंभाला उपस्थित होते. प्राचार्य पी ए कुळकर्णी सर येऊ शकले नाहीत पण त्यांनी एक हृद्य पत्र पाठवून माझी क्षमा (?) मागितली होती. विद्यार्थीदशेतच माझ्या या भावी पुस्तकासाठी प्रा.विजय दिवाण सरांनी मला अभिप्रायात्मक आशीर्वाद दिलेला होता,तोच मी पुस्तकात त्यांच्या परवानगीने छापला.
मी तयार केलेल्या सेमिनार हॉलमध्ये माझ्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्याची परवानगी प्राचार्य जोगळेकर सरांनी दिली आणि सर्व यंत्रणा माझ्या दिमतीला दिली होती.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply