मराठी दौलतशाहीची शान असलेल्या आणि अटकेपार झेंडा फडकविणाऱ्या कर्तबगार पुरुषांची मालिका पाहण्याचे भाग्य लाभलेल्या शनिवारवाडय़ाच्या वास्तुशांतीला २२ जानेवारी रोजी २८५ वर्षे पूर्ण झाली.
त्या निमित्ताने शनिवारवाडय़ाची माहिती.
पराक्रमी थोरले बाजीराव पेशवे यांनी माघ शुद्ध तृतीया या तिथीला (शके १६५१) म्हणजेच १० जानेवारी १७३० रोजी भूमिपूजन करून शनिवारवाडय़ाच्या बांधकामाचा प्रारंभ केला. त्या दिवशी शनिवार होता. पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण होऊन २२ जानेवारी १७३२ रोजी वाडय़ाची वास्तुशांत झाली, त्या दिवशीही शनिवार होता. वास्तुशांतीला २३३ रुपये आठ आणे खर्च आला होता. तीनशे वैदिकांनी वास्तुशांतीचे धार्मिक विधी केले. हा वाडा शनिवार पेठेमध्ये असल्याने त्याचे नाव शनिवारवाडा असे ठेवले गेले. १७३२ नंतरही या वाड्यात वारंवार नवीन बांधकामे, बदल होत राहिले. बुरुजाचे दरवाजाचे काम होण्यास १७६० हे वर्ष उजाडले. शिवराम कृष्ण लिमये ऊर्फ खासगीवाले यांच्या देखरेखीखाली हे बांधकाम झाले. बाजीरावांचा महाल, सदर, दफ्तरखाना, फडणीस-चिटणीसांचा फड, जवाहिरखाना आणि भुयाराची विहीर असे शनिवारवाडय़ातील पहिल्या टप्प्याचे बांधकाम झाले होते. पूर्वी पेशव्यांचे कुटुंब लहान होते. मात्र, कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढल्यामुळे वाडय़ाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत वाडय़ाला तटबंदी करण्याचे ठरविले. मात्र, पुण्यामध्ये पेशव्यांनी कोट बांधला तर सिंहगडाला शह बसेल अशी भूमिका घेत सचिवांनी छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे तटबंदीचे बांधकाम थांबविण्याचे आदेश आले. मात्र, नानासाहेबांनी छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन वाडय़ावर शत्रूकडून घातपाती कृत्ये तसेच हल्ला होऊ शकतो हे ध्यानात घेऊन तटबंदी उभारण्यात येत आहे, असे स्पष्ट केले. त्यानंतर परवानगी मिळाली आणि पायाच्या दगडकामावर विटांचे बांधकाम करून तटबंदी उभारण्यात आली, शनिवारवाड्याची इमारत २१ फूट उंच होती आणि तिच्या चारही बाजूने ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत होती. ही भिंत आणि बुरूज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत. येथून जवळच मुठा नदी वाहते. तटाला ९ बुरूज असून सर्वांवर तोफा बसवण्याची सोय केलेली आहे. यांपैकी ‘पागेचा बुरूज’ आतून पोकळ असून त्याच्या पायथ्याशी मध्यभागी बांधून काढलेला एक गोल खड्डा आहे. त्यात तोफांचे गोळे ठेवत असत. तटबंदीला पाच दरवाजे असून, त्यांना अनुक्रमे दिल्ली, अलीबहाद्दार किंवा मस्तानी, खिडकी, गणेश, नाटकशाळा ऊर्फ जांभूळ दरवाजा ही नावे आहेत. सर्व दरवाजे टोकदार कमानींमधे असून मोठे अणुकुचीदार लोखंडी खिळे व जाडजूड पट्ट्या ठोकून ते भक्कम केलेले आहेत. यांत दिल्ली दरवाज्याची उंची २१ फूट असून रुंदी १४ फूट आहे. हाच सर्वांत मोठा दरवाजा आहे. हा दरवाजा अजून सुस्थितीत आहे. वाड्याच्या सर्व तटांवर मिळून २७५ शिपाई, रात्रंदिवस ५०० स्वार व वाड्यातील अंतर्गत बंदोबस्तासाठी १००० हून अधिक नोकर होते.
१८०८, १८१२, १८१३ या वर्षी छोट्या-मोठ्या आगी लागल्याच्या नोंदी सापडतात, तर १७ नोव्हेंबर १८१७ ला वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले. त्यानंतर येथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्ट र हेन्रीत डंडास रॉबर्टसन राहत होता. त्यानंतर वाड्यात तुरुंग, पंगुगृह, पोलिसांची निवासस्थाने होती. १८२८ मध्ये वाड्यास मोठी आग लागली व आगीत बहुतेक सर्व इमारती जळाल्या. पुढे तब्बल ९० वर्षांनी वाड्याची दुरवस्था संपण्याचा योग आला. १९१९ मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला व वाड्याचे उत्खनन करण्यास सुरुवात झाली. त्या काळी वाड्यात कोर्टासाठी वापरण्यात येणारी इमारत १९२३ पूर्वी उत्खननासाठी पाडण्यात आली. शनिवारवाड्यासंबंधी अनेक घटना, दुर्घटना आहेत. वाड्यातील पेशव्यांच्या कार्यालयात अनेक वीर आणि मुत्सद्दी येत. राजकारणाचे येथे फड रंगत; पेशव्यांचा दरबार येथेच होता. पेशव्यांच्या घरांतील मुलामुलींची लग्ने याच वाड्यात होत. शनिवारवाड्यासमोरील पटांगणात मोहिमेला जाणारे सैन्य जमे. पुढे जाहीर सभा होऊ लागल्या. आचार्य अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याच पटांगणातून लढवली. वाड्याच्या पटांगणातील मारुतीस सभामंडप होता. हे मंदिर लॉइड्ज पूल (हल्लीचा नवा पूल किंवा शिवाजी पूल) बांधणार्या केंजळ्यांनी बांधले. मंदिरात १९ मार्च १९२४ रोजी मारुतीची मूर्ती बसविण्यात आली. हा मारुती बटाट्या मारुती म्हणून प्रसिद्ध आहे.
शनिवारवाड्याची इमारत २१ फूट उंच होती आणि चारही बाजूने एकूण ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत होती. ही भिंत आणि बुरूज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत. येथून जवळच मुठा नदी वाहते. तटाला ९ बुरूज असून सर्वांवर तोफा बसवण्याची सोय केलेली आहे. यांपैकी ‘पागेचा बुरूज’ आतून पोकळ असून त्याच्या पायथ्याशी मध्यभागी बांधून काढलेला एक गोल खड्डा आहे. त्यात तोफांचे गोळे ठेवत असत. दिल्ली-दरवाज्यावर नगारखाना आहे. आगीच्या प्रलयातून वाचलेला अस्सल पेशवेकालीन शाबूत असलेला भाग हा एवढाच. देवडीच्या भिंतीवर शेषशायी विष्णू, गणपती या दैवतांची चित्रे काढली आहेत. ती आता बरीच खराब झाली आहेत. वाड्याच्या आतल्या भागांमध्ये काय चालले आहे, हे बाहेरच्या माणसांना दिसू नये म्हणून दिल्ली दरवाजा, देवडी आणि आतला चौक नागमोडी रचनेत आहे. शनिवारवाड्यातील गणेश रंगमहाल हा नानासाहेब पेशव्यांनी १७५५मध्ये बनवून घेतला. गणेशोत्सव भव्य दिव्य प्रमाणात साजरा करता यावा हा त्यामागचा उद्देश होता. येथे एका वेळीशंभर नर्तकी नृत्य करू शकत असत. महालाच्या एका टोकाला सोन्याचा पत्रा असलेली संगमरवरी गणेशमूर्ती होती, तर दुसर्यास टोकाला कारंजी व सुंदर फुलबाग होती. फुलांचा सुगंध व कारंज्यांचा नाद यामुळे महालात बसणे हा सुखद अनुभव असे. पुण्यातील पेशवे दफ्तरात पेशव्यांच्या खजिन्याची मोजदाद दिलेली आहे. या कागदपत्रांनुसार पेशव्यांच्या शनिवारवाड्यातील रत्नशाळेत ५१४०२ हिरे, ११३५२ माणके, २७६४३ पाचू, १७६०११ मोती, ४३५ नीलम, ४३२ वैडुर्य, ४१७ पुष्कराज, ७५ गोमेद, ४४४ पोवळी, ३७८ करड्या, १५६२ पिरोजा, १९१२ करिपोला (कोरल), ४९७ लसण्या असे मौल्यवान खडे होते. यातील बहुतांशी खजिना इंग्रजांनी चोरून नेला. उरलेला खजिना बाजीरावानंतर त्याचा दत्तक पुत्र नानासाहेब याला मिळाला. कानपूर आणि विठूर-ब्रह्मावर्तमध्ये पराभव झाल्यानंतर नानासाहेबांना हा खजिना सोबत नेणे शक्य नव्हते. अतिमौल्यवान जडजवाहीर सोडून राहिलेला खजिना त्यांनी तेथील एका विहिरीत लपवला. इंग्रजांना हेरांकडून त्याची माहिती मिळाली. त्यांनी तो खजिना बाहेर काढला. कर्नल गॉर्डन अलेक्झांडर याने लिहून ठेवलेल्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. त्यात ३० लाख रुपयांची सोन्या-चांदीची नाणी, ताटे, वाट्या, इतर भांडी, कित्येकशे शेर वजनाची चांदीची अंबारी आणि ७० लाख रुपयांचे दागिने, जडजवाहिरे असा एकूण एक कोटी रुपयांचा खजिना त्या वेळी ब्रिटिशांना मिळाला होता.
— संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply