दोन पात्रांना दोन तास एक नाटक पेलायला द्यायचे, हे काही वर्षांपूर्वी “देव बाभळी ” ने समर्थपणे सिद्ध केले होते. पात्रसंख्या हा नाटक यशस्वितेचा अथवा नाट्यानुभवाचा निकष होऊ शकत नाही हे अजूनही सहजी पचनी पडत नाहीए याला एकमेव कारण म्हणजे मी पाहिलेल्या/अनुभवलेल्या नाटकांना पात्र संख्या वर्ज्य नव्हती. पण एकुणातच आजकाल मानवी जीवनाप्रमाणे नाट्यकलाही आकुंचित होत चाललीय. कधीच “दोन अंकी “व्हर्शनवर आम्ही स्थिरावलोय. पूर्वी चार अंकी अधून-मधून आणि तीन अंकी सर्रास असा नॉर्म होता. अंक जसे घटले तसतशी पात्रेही संख्येने मावळत चालली. गेल्या कित्येक वर्षात मी फार तर चार पात्रे रंगमंचावर पाहातोय.
बालगंधर्वच्या बाहेर डॉ गिरीश ओकांचे हे ५० वे नाटक आहे असा सार्थ आणि गौरवास्पद बोर्ड होता आणि सगळ्या ५० नाटकांची यादीही ! माझ्यासारख्याने त्यातील बहुतांशी पाहिलेली आहेत.
मराठी रंगभूमीला देखण्या, भारदस्त पुरुष नटांची परंपरा तशी क्षीण ! माझी यादी सुरु होते- सतीश पुळेकर, त्यानंतर जयराम हर्डीकर (दुर्दैववश अपघाती निधन झाल्यामुळे खऱ्या अर्थाने आपण एका बलदंड अभिनेत्याला मुकलो) आणि आता डॉ गिरीश ओक !
पण पडदा उघडल्यावर त्यांची जी मूर्ती दिसली ती बुलंद इमारत हळूहळू उतरणीला लागलीय याची प्रचिती होती. (मनोज वाजपेयी हा उत्तुंग अभिनेता आजकाल असाच खटकतो). काहीवेळा मान थरथरणे, आवाजात कंप, मंद चाल हे डॉ लागू टाईप त्यांचं प्रोजेक्शन माझ्या समजुतीला आधार देत होतं. नाटकाच्या शेवटी त्यांच्या वयाचा आणि दुर्धर आजाराचा उल्लेख आला आणि जाणवलं- हे भूमिकेचे बेअरींग आहे. पण एकुणात ” ढासळणे ” जाणवतंय.
सोबतीला नाटकाच्या लेखिका -डॉ श्वेता पेंडसे यांनी तोडीस तोड भूमिका केलीय. सोप्पं नसतं नवोदितांना अशा बुजुर्गांसमोर ठामपणे उभे ठाकणे आणि चक्क काही प्रसंगांमध्ये त्यांना “खाऊन टाकणे “. डॉ श्वेता हा विक्रम करताना दिसल्या.
विशेषतः संपूर्ण नाटकभर दोनच पात्रे सातत्याने बोलताहेत, तेही “वाङ्मय चौर्य ” या रंगभूमीवर अपवादाने आढळलेल्या साहित्यिक विषयात ! मानलं लेखिकेला ! त्यांनी चक्क दोन मानसशास्त्रीय आजारांना तोंड देणाऱ्या आणि त्यांतून निर्माण झालेल्या मुखवट्यांना सुघडपणे मांडलंय. तिसरं पात्र अध्याहृत आहे आणि ते या दोघांना गुंतागुंतीला आणि नंतर ती सोडवायला भागही पाडतंय. विजय केंकरे, शीतल तळपदे, अजित परब यांच्या सारखी स्थिरावलेली मंडळी हा मांडलेला खेळ छानपणे पेलून नेतात.
यापुढे रंगमंदिराने (खरं तर मंदिर शब्द इथे खोडायला हवा, कारण ते आता नाटकं होतात म्हणून “नाट्यगृह ” या पदवीला पात्र झालंय) नेमलेली कंत्राटी माणसे, मध्यंतरात राष्ट्रीय खाद्य “वडापाव “विकताना खेकसणारा कौंटराधिपती, अस्वच्छ वॉशरूम्स (जे महाराष्ट्रातील यच्चयावत नाट्यगृहाचे आता व्यवच्छेदक लक्षण झालंय आणि सगळे कलावंत याविरुद्ध सातत्याने आवाज उठवित असले तरी त्याकडे कानाडोळा करणारे व्यवस्थापन), बाहेरचा मळकट,धुरकट कॅफे टेरिया आणि जवळपास येऊ घातलेल्या मेट्रोच्या खुणांमुळे खणलेला परिसर हे “विरोधी “दृश्य विसरायला झाले.
बालगंधर्व वर कुऱ्हाड पडणार आहे अशी वदंता आहे. त्यापूर्वी त्याला शक्य तितकं विद्रुप करणे सुरु आहे. अशा “वारसा (हेरिटेज) स्थळांना ” सन्मानाने तिलांजली (द्यायचीच असेल तर) कां देता येऊ नये?
काल मुंबईत “गोदरेज आरके एस ” अशी चेंबूरला पाटी दिसली. बाहेरच्या राज-नर्गिस अजरामर म्युरलमुळे, ” अरे, हाच तो आर के स्टुडियो ” अशी स्वतःची समजूत काढली. मागच्या आठवड्यात सोलापूरला मित्राच्या हॉटेलमध्ये बसलो असताना समोरची भग्न “आशा टॉकीज ” पाडायला सुरुवात झालेली दिसली. मित्र म्हणाला – “एका कॉर्पोरेट हाऊस ने ती जागा खरेदी केलीय.” मग तेथील “गीत गाता चल ” चे स्वर मी कायमचे हृदयात कोंडून घातले. चेंबूरला “आर के ” च्या म्युरलला नेहेमीचा नमस्कार भविष्यात कदाचित करता येणार नाही. डॉ लागू या नटसम्राटाचे पार्थिव आमच्या दर्शनासाठी बालगंधर्वच्या आवारात जेथे ठेवले होते ती जागा आता तात्पुरत्या वाहनतळाने गजबजलीय. ” विकास ” ही संकल्पना “जतन ” या मानवी भावनेच्या “इतकी ” विरुद्ध असते कां ? असो.
आतमधील भिंतींमध्ये ओक आणि पेंडसे या जोडगोळीने समर्थ नाट्यानुभव देत या साऱ्या बाह्य गोष्टींचा (तात्पुरता) पराभव केला.
हेही नाटक “चुकवू नये ” अशा गटातील आहे.
एक साहित्यिक वाक्य त्याने दिले, जी “रायटर्स ब्लॉक ” नामक संज्ञेखाली झाकलेली करूण आणि अपरिहार्य भावना असते- ” काहीच न सुचणं आणि काहीच न लिहिणं या दोहोंमध्ये खूप फरक असतो.”
लेखक जमातीची ही मनोवस्था डॉ पेंडसे यांनी अचूक टिपलीय. त्यांच्याकडून भविष्यात रंगभूमीला अशीच समर्थ साथ अपेक्षित आहे.
ता. क. – आता “बकेट लिस्ट “मधील “पुनश्च हनिमून ” तेवढं बघायचं राहिलंय.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply