नवीन लेखन...

४०, के. दुभाष मार्ग – रॅम्पार्ट रो, फोर्ट, मुंबई

40, Rampart Row, Fort, Mumbai

“४०, के. दुभाष मार्ग (रॅम्पार्ट रो), फोर्ट, मुंबई ४०० ००१..”

वरचा पत्ता रोज या ठिकाणाहून जा-ये करणाऱालाही लक्षात येणार नाही. पण ‘ र्‍हिदम  हाऊस’ म्हटलं की चटकन, ‘च्यायला हा ऱ्हिदम हाऊसचा पत्ताय होय’ असे उद्गार ऐकू येतील..!

फोर्टचा काळा घोडा परिसर मुंबईचा ‘कला आणि सांस्कृतिक परिसर’ म्हणून देश-विदेशातल्या कलावंतांच्या जगतात मशहूर आहे..जहॉंगीर आर्ट गॅलरी, मॅक्समुल्लर भवन, छत्रपती शिवाजी महाराज (पूर्वीचं प्रिन्स ऑफ वेल्स) म्युझीयम, त्याच्या समोरच असलेलं राष्ट्रीय कला दालन, १८९६ साली देशातला पहीला सिनेमा ल्युमीए बंधूंनी जिथे दाखवला ते मुंबईतलं पहिलं स्टार हॉटेल वॉटसन हॉटेल आदी कला-संस्कृतीला वाहीलेल्या उत्तमोत्तम ऐतिहासिक वास्तूंनी सजलेला हा कला परिसर. याच परिसरात पूर्वेकडील नौदलाच्या गोदीच्या ‘लायन गेट’ कडून जहॉंगीर आर्ट गॅलरीच्या दिशेने जो के. दुभाष मार्ग (पूर्वीचा रॅम्पार्ट रो) येतो, त्याच्या अगदी टोकाशी, जहॉंगीरच्या समोर फाऊंटनच्या दिशेला ‘ऱ्हिदम हाऊस’ उभं आहे, म्हणजे आता होत असं म्हणावं लागेल; सध्या ‘हाऊस’ आहे मात्र त्यातला ‘ऱ्हीदम’ अगदी आता आता म्हणजे तीन-चार महीन्यांपूर्वी अस्तंगत झालाय..

मित्रांनो, ही कथा ऱ्हिदम हाऊसची नाही. ऱ्हिदम हाऊसचा महिमा सर्व संगीत प्रेमी जाणतातच. ही कथा आहे ऱ्हिदम हाऊस ज्या इमारतीत आहे( होत) त्या इमारतीची..

मुंबई शहराच्या नगर व्यवस्थेचे काम सुरुवातील इस्ट इंडिया कंपनीचे अध्यक्ष त्यांच्या अधिकाऱ्यांमार्फत करून घेत. सन १७९२ मध्ये हे अधिकार मुंबईच्या गव्हर्नर जनरलकडे देण्यात आले. सन १८४५ मध्ये स्वतंत्र म्युनिसिपल फंड स्थापन होऊन मुंबई शहराच्या नागरी सोयी आणि व्यवस्थेसाठी सात सदस्यांची कार्यकारी समिति नेमेपर्यंत इस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल मुंबईतील आरोग्य, साफसफाई आदीची व्यवस्था त्याच्या कार्यकारी मंडळामार्फत बघत असे. इस्ट इंडिया कंपनीकडून मुंबई शहराचे (देशाचेही) प्रशासन इंग्लंडच्या राणीने आपल्या हाती घेतल्यानंतर १८५८ मध्ये मुंबई शहराच्या व्यवस्थेसाठी तीन स्वतंत्र कमिशनर्स नेमले गेले.

पुढे सन १८६५ मध्ये इंग्लंडच्या पार्लमेंटने ‘म्युनिसिपल अॅक्ट’ पास करून नगर प्रशासनाचे संपूर्ण अधिकार असलेली एक शासन संस्था निर्माण करून तिच्या प्रमुखपदी एका म्युनिसिपल कामिशनरची नेमणूक केली व त्याच्या दिमतीला २०० जे.पी.च एक कार्यकारी मंडळ दिलं गेलं. ही आपल्या म्युनिसिपालीटीची स्थापना म्हणायला हरकत नाही.

सन १८६५च्या सुरुवातील महानगर पालिकेचे –म्युनिसिपालीटीचे – कार्यालय काही दिवस गिरगावात एका भाड्याच्या इमारतीत होतं ते पुढे४०, के. दुभाष मार्ग (रॅम्पार्ट को), फोर्ट, मुंबई ४०० ००१..ह्या इमारतीत आणलं गेलं. जवळपास चार-पांच वर्ष, म्हणजे सन १८७१-७२ पर्यंत ऱ्हिदम हाऊसच्या उपरोक्त पत्त्यावरून मुंबई महानगर पालिकेचा-तेंव्हाच्या म्युनिसिपालीटीचा कारभार हाकला जात होता. मुंबई शहर म्हणजे क्रॉफर्ड मार्केट पर्यंतचा आजचा आखीव-रेखीव परिसर जो आपल्याला आज दिसतो, भुरळ घालतो त्या परिसराची सुरुवातीची आखणी ह्याच इमारतीत केली गेली आहे..

ऱ्हिदम हाऊसचं म्युझिकच्या क्षेत्रातलं महात्म्य आपल्याला माहित आहे परंतु त्याचबरोबर ही इमारत मुंबई महानगर पालिकेचं सुरूवातीचं कार्यालय देखील आहे हे देखील माहित असावं म्हणून हा लेखनप्रपंच..

जाता जाता –

१८६५च्या म्युनिसिपल कायद्यान्वये स्थापन झालेल्या मुंबई म्युनिसिपालीटीचा पहिला कमिशनर आर्थर क्रॉफर्ड होता. अतिशय कर्तबगार असलेल्या या कामिशनरवर तेंव्हाच्या मुंबईकर नागरिकांचे त्याच्यावर निरतिशय प्रेम होते. आज मुंबई शहरात(मुळच्या) जे प्रशस्त रस्ते, रुंद फुटपाथ, रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडे दिसतात त्याचे श्रेय या मिस्टर आर्थर क्रॉफर्डला जाते. शहरात मध्यवर्ती मार्केट असावे आणि त्यात शाकाहारी व मांसाहारी यांच्यासाठी वेगळी व्यवस्था असावी ही कल्पना या क्रॉफर्ड यांचीच. यांच्याच कारकिर्दीत मुंबईतील रस्त्यावर गॅस चे दिवे लावले गेले..गटारे, सांडपाणी, रस्ते दुरुस्ती, वाहतूक व्यवस्था आदींच्या व्यवस्थेचा पाया या क्रॉफर्ड महाशयानीच घातला..

अश्या ह्या कर्तबगार कमिशनर आर्थर क्रॉफर्ड यांच्यावर लाचखोरीचे व मनमानी पद्धतीने कंत्राटे दिल्याचा आरोप झाल्यावरून आपल्या पदाचा त्याग करावा लागला होता. क्रॉफर्डवर जरी मनमानी पद्धतीने कारभार केल्याचा आरोप झाला तरी त्याने केलेला मनमानी कारभार, इंग्लंडच्या मंजुरीची वाट न पाहता केलेला खर्च हा लोकोपयोगी कामासाठी होता याची लोकांना निव्वळ खात्रीच नव्हती तर ती कामे दृष्टीसही पडत होती. सर फेरोजशा मेहता यांनी त्यावेळेस चौकशी आयोगासमोर आर्थर क्रॉफर्ड यांची बाजू लावून धरली होती परंतु त्याचा काही उपयोग न होता त्यांना आपल्या पदाचा त्याग करावा लागला होता. लोककल्याणासाठी कोणाच्याही मंजुरीची वाट न पाहता धडाक्याने काम करून घेण्याच्या सवयीमुळे बेजबाबदारपणा व मनमानी कारभाराचा आरोप अंगावर घेणाऱ्या आणि अतिशय देखणं शहर निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या आद्य म्युनिसिपल आयुक्तांच नाव मध्यवर्ती मार्केटला – क्रॉफर्ड मार्केट- देऊन त्यावेळच्या मुंबैकरांनी त्याची स्मृती अजूनही जतन करून ठेवली आहे..

म्युनिसिपालीटीच्या भ्रष्टाचाराला व बेधुंद कारभाराला असा इतिहास आहे. फरक एवढाच की क्रॉफर्डचा भ्रष्टाचार व मनमानी कारभार ‘लोककल्याणा’साठी होता आणि आताचा मात्र ‘स्व-कल्याणा’साठी आहे.

-गणेश साळुंखे
९३२१८११०९१

मुंबईतील इतिहासाच्या पाऊलखुणा लेखमाला – लेखांक १४

संदर्भ –
1. ‘मुंबईचा वृत्तांत’, ले. मोरो शिंगणे, सन १८८९;
2. ‘महानगर पालिका मुख्यालय शताब्दी’ विशेषांक सन १९९३.

 

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..