४ फेब्रुवारी १९७२ रोजी पाकिजा चित्रपट प्रदर्शित झाला कैफी आझमी यांची गीते आणि गुलाम अहमद आणि नौशाद यांच्या संगीतातील गाण्यांचा गोडवा आजही कायम आहे. चलते चलते, मुझे कोई मिल गया था, चलो दिलदार चलो चांद के पार चलो, इन्ही लोगों ने, मौसम है आशिकाना, ठरहे रहिओ…, आज हम अपनी…. एकाच चित्रपटातील सर्वच्या सर्व गाणी सुपर हिट असे खूप कमी चित्रपटात बघायला मिळते ते या चित्रपटाचे वैशिष्ट्य झाले. सुरुवातीच्या काही दिवसांत हा चित्रपट फार चालला नव्हता, नंतर चित्रपट हिट झाला.
या चित्रपटात राजकुमार,मीनाकुमारी यांच्या बरोबर अशोककुमार,वीणा,नादिरा यांनी कसदार अभिनय केला होता. कमाल अमरोही यांनी आपल्या अख्ख्या फिल्मी करिअरमध्ये केवळ पाच चित्रपटांचे दिग्दर्शन केले. यापैकी एक होता, ‘पाकिजा’.
मीना कुमारीच्या अभिनयाने सजलेल्या ‘पाकिजा’कडे एक चित्रपट म्हणून नव्हे तर एक अमर कलाकृती म्हणून बघितले जाते. पण हीच अमर कलाकृती साकारण्यासाठी तब्बल १४ वर्षे लागलीत. होय, १९५८ साली या चित्रपटाचे शूटींग सुरु झाले आणि १९७२ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. याचे मुख्य कारण होते कमाल अमरोही आणि त्यांची पत्नी असलेली ‘पाकिजा’ची नायिका मीनाकुमारी यांच्यातील तणाव आणि नंतरचा तलाक. असेही म्हणतात की, सुनील दत्त आणि नर्गिस यांनी मध्यस्थी केली नसती ‘पाकिजा’ कधीच बनला नसता. सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या मध्यस्थीनंतर कमाल अमरोही व मीना कुमारी दोघेही पुन्हा एकत्र काम करण्यास तयार झाले आणि चित्रपट पूर्ण झाला. प्रदीर्घ खंडानंतर चित्रपटाला पुन्हा सुरुवात झाली, तोपर्यंत मीनाकुमारी यांना व्याधींनी घेरले होते. पण त्याची पर्वा न करता त्यांनी चित्रीकरण पूर्ण केले. मात्र त्यांच्या आजारपणाची आणि वाढलेल्या वयाची छाया चित्रपटातील काही मोजक्या दृश्यांत आणि ‘तीर ए नजर’सारख्या गाण्यात दिसते.
बॉलिवूडमध्ये मीना कुमारीने खूप मोठे नाव कमावले. दिलीप कुमारपासून राजकुमार असे सगळे स्टार तिच्यापुढे आपले डायलॉग विसरत, असे म्हटले जाते. असे म्हणतात ‘पाकिजा’मध्ये मीनाकुमारीसोबत ट्रेनमधील सीन शूट करताना राजकुमारने मीरा कुमारीचे पाय जवळून बघितले आणि मग तो तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडला. १९७२ साली ‘पाकिजा’चित्रपट प्रदर्शित झाला आणि दुदैवाने काही दिवसांतच मीनाकुमारीचे निधन झाले.
‘पाकिजा’ चित्रपटाच्या बाबतीत एक किस्सा.
कुलदीप नायर यांनी ‘On Leaders and Icons: From Jinnah to Modi’ या आपल्या पुस्तकात या घटनेचा उल्लेख केला आहे.
मुंबईच्या स्टुडिओत भारताचे दुसरे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादुर शास्त्रीजींना ‘पाकिजा’चे शूटींग पाहण्याचे निमंत्रण दिले गेले होते. महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी खुद्द हे निमंत्रण दिले होते. त्यामुळे शास्त्रीजी नाही म्हणू शकले नाहीत आणि ते शूटींग पाहायला स्टुडिओमध्ये पोहोचले.
त्यांनी लिहिले आहे की, ‘ लाल बहादूर शास्त्री स्टुडिओत पोहोचले. त्यावेळी स्टुडिओत अनेक दिग्गज उपस्थित होते. मीना कुमारी लाल बहादूर शास्त्री यांच्या स्वागतासाठी पुढे आली आणि अचानक शास्त्रीजींनी अतिशय विनम्रपणे ही महिला कोण? असे मला (कुलदीप नायक)विचारले. मला आश्चर्याचा धक्का बसला. ही मीना कुमारी, असे मी शास्त्रीजींना हळूच सांगितले. पण शास्त्रीजींना तरीही तिला ओळखले नाही. यानंतर शास्त्रीजी भाषणासाठी उभे राहिले. मीना कुमारीजी, मला माफ कराल. पण मी तुमचे नाव पहिल्यांदा ऐकले, असे शास्त्रीजी म्हणाले. हिंदी सिनेमाची एक दिग्गज अभिनेत्री मीना कुमारी त्यावेळी उपस्थितांच्या पहिल्या रांगेत बसली होती. शास्त्रीजींचे ते शब्द ऐकून ती खजिल झाली होती.’
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply