नवीन लेखन...

‘कट्यार काळजात घुसली’ नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची ५४ वर्षे

मराठी संगीत नाटकांच्या इतिहासात २४ डिसेंबर १९६७ हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा लागेल. कारण या दिवशी इतिहास घडवणारं एक नाटक जन्माला आलं- ‘कट्यार काळजात घुसली!’ पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या लेखणीतून उतरलेलं ‘कट्यार’ हे नाटक म्हणजे साठोत्तरी काळातील सर्वोत्कृष्ट व सर्वाधिक लोकप्रियता लाभलेलं नाटक आहे. आणि त्यातील पदांना पं. अभिषेकीबुवांनी दिलेल्या एक से एक बढकर चाली तर… अक्षरशः लाजवाब! २४ डिसेंबर १९६७ यादिवशी गिरगाव येथील साहित्य संघाच्या नाट्यगृहात पहिला प्रयोग पार पडला. यातील नाट्यगीताला आलेला प्रत्येक वन्समोअर कलाकारांनी स्वीकारला, परिणामी नाटक संपायला पहाटेचे पाच वाजले, “प्रयोग संपल्यावर शेवटची लोकल पकडून घरी जाऊ” असा विचार करुन आलेले प्रेक्षक, दुस-या दिवशीच्या पहिल्या लोकलने घरी गेले, जवळ जवळ आठ तास नाटकाचा प्रयोग चालू होता,या प्रयोगाला आचार्य अत्रे उपस्थित होते. त्यांनी ‘कट्यार’च्या या पहिल्या प्रयोगावर ‘मराठा’त अग्रलेख लिहिला ! त्याच शीर्षक होत – “कट्यार घड्याळात घुसली” “कट्यार……”नाटकाची मोहिनी किती होती, याचा एक किस्सा म्हणजे पंडित रविशंकर यांनी एकदा हे नाटक पाहण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा ‘नाट्यसंपदा’चे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर पणशीकर यांनी एका दिवसांत प्रयोग ठरवून, त्याची जमवाजमव करून पंडित रविशंकरांसाठी प्रयोग सादर केला. तोही हाऊसफुल्ल झाला.

हिंदुस्थानी संगीत, संगीतातील घराणी, घराण्यांचा अभिनिवेश आणि दोन भिन्न घराण्यांच्या गायकांमधील संघर्ष हा ‘कट्यार’चा विषय. या नाटकाला काहीजणांनी आदर्श संगीत नाटक म्हटलं. काहींनी परंपरेला सोडून असलेलं नाटक म्हटलं. याच्यासारखं नाटक पूर्वी झालं नाही असंही काहीजणांनी म्हटलं. पण खुद्द नाटकाचे लेखक असलेल्या पुरुषोत्तम दारव्हेकर यांना मात्र आपलं नाटक हे संगीत नाटकांच्या परंपरेला अभिप्रेत आहे असं वाटत नव्हतं. हे नाटकच मुळात संगीतकारांवर असल्यामुळं त्यातलं संगीत थेट गायन म्हणूनच येतं. पारंपरिक संगीत नाटकांप्रमाणे यात भाव व्यक्त करणारी, व्यथा सांगणारी, वर्णन करणारी नाट्यगीतं जवळजवळ नाहीतच. अपवाद फक्त ‘या भवनातील गीत पुराणे’चा. संगीतकार म्हणून पं. जितेंद्र अभिषेकी यांनी ‘कट्यार’ची गाणी बसवताना आपली संपूर्ण कल्पकता पणाला लावली.

नाटकाचा विषय ‘संगीत’ हाच असल्यामुळे संगीताचे जितके प्रकार येऊ शकतील तितके आणण्याचा प्रयत्न केला. या नाटकात कटाव आहे, कव्वाली आहे, शास्त्रीय गायन आहे, भजन आहे, कजरी ठुमरी आहे. ध्रुपद गायकीचाही अंतर्भाव त्यात करायची अभिषेकींची इच्छा होती, पण नाटकाच्या प्रयोगाचा कालावधी चार तासांहून अधिक होऊ लागला म्हणून त्यावर काट मारण्यात आली. संगीताची बांधणी अभिषेकींनी अशा पद्धतीने केली की कोणत्याही गाण्याला वन्समोअर मिळू नये. वन्समोअरचा हव्यास हा नाट्यवस्तूला बाधक ठरू शकतो. शिवाय हा प्रकार वेळखाऊ ठरतो याची पक्की जाण त्यांना होती. संगीतातील विविधतेच्या दृष्टीने ‘कट्यार’मधील शास्त्रीय, उपशास्त्रीय अनवट चीजा आणि मिश्र राग यांचा वापर त्यांनी केला. ‘कट्यार’चं वैशिष्ट्य असं की या नाटकाची सुरुवातच अभिषेकींनी बंडखोर पद्धतीने केली. पडदा उघडल्याबरोबर जे पहिलंच पद आहे- ‘हरवले मधु मुरलीचे सूर’ ते त्यांनी भैरवीत बांधलं. प्रचलित संकेतानुसार भैरवीचा क्रम अगदी शेवटी येतो. पण बुवांनी नमनालाच भैरवी वापरला. यामागं त्यांची भूमिका अशी होती की ‘कट्यार’ हे शोक पर्यवसायी संगीत नाटक आहे नि म्हणून त्याची सुरुवात मी भैरवीतून केली आहे.

वास्तविक दारव्हेकरांनी ‘कट्यार’चा पहिला ड्राफ्ट लिहिला तेव्हा त्याचा शेवट शोक पर्यवसायी नव्हता; आनंदपर्यवसायी होता. यातले खॉंसाहेब शेवटी सदाशिवला गाणं शिकवायला तयार होतात असा मूळ शेवट होता. पण खॉंसाहेबांची भूमिका करणारे वसंतराव देशपांडे यांनी वेगळाच मुद्दा समोर आणला. ते म्हणाले, ‘मी या क्षेत्रात इतकी वर्षं वावरलो आहे. ही खॉंसाहेब नावाची माणसं एकवेळ आपली मुलगी घराण्याबाहेर जाऊ देतील, पण आपली कला देणार नाहीत.’ या सूचनेनंतर ‘कट्यार’चा शेवट बदलण्यात आला. ‘कट्यार’चा नायक बांके बिहारी आहे. तो नाटक घडवतो. आपल्याला संगीत शिकता येत नाही. दुसर्याय कुणाची तरी संगीत शिकण्याची इच्छा आहे. त्याची इच्छा पूर्ण व्हावी ही बांके बिहारीची तळमळ आहे. यासाठी तो खॉंसाहेबांना सदाशिवला गाणं शिकवण्यासाठी विनवतो. कविराजची एक वेदना आहे की जे गळ्यातून निघत नाही ते डोक्यातून काढावं लागतं. या नाटकातला सदाशिव हा साधक आहे. त्याचं उमावर निसर्गसुलभ प्रेम जरूर आहे, पण उमापेक्षा त्याला आपलं गाणं प्रिय आहे. उमा जेव्हा आपलं प्रेम व्यक्त करते तेव्हादेखील तो सांगतो की तू थांबायला तयार असशील तर माझं गाणं पूर्ण करूनच मी तुझ्याकडं येईन. आणि मग गाणं शिकायला तो खॉंसाहेबांकडे येतो. खॉंसाहेब त्याला गाणं शिकवायला तयार होतात. सदाशिवला ते थोडं गाऊन दाखवायला सांगतात. सदाशिवनं गाण्याला सुरुवात करताच गाण्याचं ते तोंड, तो लगाव ऐकून खॉंसाहेबांना भिंतीवर सदाशिवच्या गुरूंची-पं. भानुशंकरांची- तसबीर दिसायला लागते. खॉंसाहेबांची तमन्ना अशी की दरबारातून पंडितजींचं गाणं साफ पुसून टाकलं पाहिजे. सदाशिवच्या गळ्यावर तर पंडितजींच्या गाण्याची छाप! यात गोची होते ती सदाशिवची. पहिला गुरू शिकवू शकत नाही. दुसरा शिकवू इच्छित नाही. पंडित भानुशंकरांची गायकी काळजापासून येणारी तर खॉंसाहेबांची गायकी बुद्धीपासून उगम पावणारी. एका बाजूला पंडिती गाणं तर दुसर्याक बाजूला उत्साही गाणं असा एकंदर या नाटकाचा थाट.
संगीतकार म्हणून काम करताना पं. जितेंद्र अभिषेकी यांनी सूक्ष्म विचार केला होता पंडित भानुशंकर आणि खॉंसाहेब अल्ताफ हुसेन यांच्या गायनशैलीतला फरक त्यांना तीव्रतेने दाखवायचा होता. दोघांच्याही गायकीतील वेगळेपणा दाखवण्यासाठी त्यांनी ‘घेई छंद मकरंद’ हे एकच गाणे दोन वेगवेगळ्या रागांत बांधले. पंडितजींसाठी ‘घेई छंद’ या पदाला सालगवराळीतील मध्यलयीतील चाल निवडली आणि खॉंसाहेबांसाठी धानी रागाचा वापर करीत हे पद द्रुतलयीत स्वरबद्ध केलं. धानी रागातली ही चाल ‘साडे नालवे पिया’ या पंजाबी बंदिशीच्या अनुषंगाने बसवली. यातून खॉंसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वातील बेधडकपणा आणि आक्रमकपणा अधोरेखित होऊ शकला.

‘या भवनातील गीत पुराणे’ आणि ‘तेजोनिधी लोह गोल’ या दोन पदांत पंडिती आणि उस्तादी गायनाची झलक दिसते. शब्दांश्रयी संगीत असेल तर पदांना शब्दही तसेच पुरवावे लागतात. या नाटकातील पदांसाठी सावरकरी बाज वापरला गेलाय. त्यामुळे संस्कृतप्रचुर शब्दरचना आली. ‘लागी करेजवा कट्यार’ या ठुमरीची बंदिश स्वतः पंडितजींनी रचलेली आहे. ती पारंपरिक ठुमरी नाही. ‘कोयलीया मत कर पुकार’ ही पारंपरिक ठुमरी आहे. ‘या भवनातील गीत पुराणे’ हे पद मुळात ‘या भवनातील कवन पुराणे’ असं लिहिलं होतं. पण चाल बांधताना अभिषेकीबुवांना ‘कवन’ हा शब्द खटकायला लागला. त्यामुळे दारव्हेकरांना सांगून त्यांनी तो ‘गीत’ असा बदलून घेतला. ‘सूरत पिया की ना छिन बिसराए’ ही ‘कट्यार’मधली एक गाजलेली बंदिश. तशी पारंपरिक, पण बुवांनी ती नाटकासाठी सोपी करून घेतली व तिला नाट्यसंगीताचा साज चढवला. अभिषेकींना ही मूळ बंदिश सापडली ती ‘ठुमरी संग्रह’ या पुस्तकात. उस्ताद राहत अली यांच्या नावावर ‘ठुमरी संग्रह’ हे पुस्तक आचार्य विनोबा भावे यांचे वडीलबंधू नरहर भावे यांनी संग्रहित केले होते. ‘कट्यार’मधील सर्वोत्कृष्ट गाणे आहे ‘दिन गेले भजनाविण सारे’ आणि राग आहे ग्वाल्हेरचा बिलावल. अभिषेकींच्या अतिउत्कृष्ट चालींपैकी ही एक चाल आहे. सरळ, साधी, सोपी व हृदयस्पर्शी. खुद्द बुवांच्या आग्रहामुळेच हे गाणं नाटकात घालण्यात आलं. ‘बीत गए दिन भजनाबीना’ या कबीराच्या पदावर पं. अभिषेकी यांचा फार जीव होता. पण नाटकात हिंदी गाण्यांची संख्या अतोनात वाढल्याचे लक्षात आल्याने दारव्हेकर हे पद घ्यायला कसेच तयार होईनात. शेवटी बुवांनी हट्ट धरून ते गाणं मराठी करून घेतलं.‘कट्यार’च्या बाबतीत चीजांची निवड पं. अभिषेकी यांनी केली. त्यांचा विस्तार मात्र वसंतराव देशपांडे यांनी आपल्या शैलीने केला. ‘कट्यार’च्या संगीतासाठी अभिषेकी, देशपांडे व दारव्हेकर तिघेही एकत्र बसून चर्चा करायचे. त्यातून असा विचार आला की सामान्य माणसाला ठाय लयीतलं आणि मध्य लयीतलं गाणं तसंच मध्य तयीतलं आणि द्रुत लयीतलं गाणं यातला फरक समजतो. आक्रमक शैलीतलं गाणं कोणतं आणि आळवून म्हणण्याचं गाणं कोणतं हे सामान्य रसिकाच्या लक्षात येतं. त्या पद्धतीनंच या नाटकातल्या संगीताचा बाज ठेवला गेला पाहिजे. ‘कट्यार’मधील संगीतावर या विचाराची छाप आहे.

‘कट्यार’चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील रागमाला. अनेकांना ही रागमाला म्हणजे एक वेगळा गिमीकच प्रकार वाटतो. उमा आणि झरीना या दोन संगीतकारांच्या दोन कन्या. त्या दोघींनाही कुठे बैठकीत, मैफलीत गायचं नाहीए. मात्र त्यांच्या गळ्यात गाणं आहे. ते त्यांनी आपापल्या पित्याकडून घेतलं आहे. कविराज बांके बिहारी नारदासारखा येथे कारक होतो. उमा व झरीना यांना रागमालिका म्हणायला लावतो. कल्पना अशी की सदाशिवनं या मालिकेतून गाणं शिकायचं आहे. रागमालिकेची रंगत वाढवण्यासाठी सदाशिवही हळूहळू त्यात सहभागी होतो.

‘कट्यार’मधली ही रागदारी मालिका म्हणजे विविधरंगी फुलांचा सुंदर हारच आहे. ती एका मानिनीची गोरज मुहूर्तापासून गोपाळ मुहूर्तापर्यंतची प्रतीक्षेची कहाणी आहे. ‘कट्यार’ नाटकातली ही रागमालिका म्हणजे अपूर्व कल्पनाविलास! अभिषेकींच्या प्रतिभेचा एक अनोखा आविष्कार. मराठी नाट्यसंगीताच्या इतिहासात ‘कट्यार’चं स्थान ध्रुवासारखं अढळ आहे. दारव्हेकरांसारखा नाटककार, अभिषेकींसारखा सव्यसाची संगीतदिग्दर्शक, पणशीकरांसारखा नाट्यमर्मज्ञ निर्माता, वसंतराव देशपांडे यांच्यासारखा मुख्य नटगायक आणि बाकीचे तितकेच श्रेष्ठ कलाकार. त्यात उत्कृष्ट निर्मितीमूल्यांची जोड आणि प्रेक्षकांनी भरभरून दिलेला प्रतिसाद.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..