असे म्हणतात की बाळाचे पाय हे पाळण्यात दिसतात कारण एखाद्या व्यक्तीला एखाद्या क्षेत्रात कारकीर्द घडवायची असेल तर त्याची सुरुवात आणि मुळातच आवड ही बालपणापासून असावी लागते. तरच आपली पॅशन हे आपलं करीयर बनू शकतं. काहींच्या बाबतीत हे तंतोतंत लागू पडतं. याच युक्तीप्रमाणे ५५ आवाजांची किमया लाभलेल्या अमोल तेली या तरुणाने हे खरे करुन दाखवले आहे. चित्रपटाल्या अनेक नायकांचे आवाज तो अगदी सहजगतीने काढतो. यामध्ये अभिनेता शाहरुख खान, नाना पाटेकर, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, आमिर खान, अक्षय कुमार यांसारख्या सुपरस्टार्सचा समावेश आहे. यासोबतच अनेक पक्षी आणि प्राण्यांचेही आवाज तो काढू शकतो. याबाबत अधिक बोलताना अमोल सांगतो, ”लहानपणापासूनच मला कलाकारांची नक्कल करण्याची हौस होती. त्यांच्यासारखेच कपडे घालणे, त्यांच्यासारखेच बोलणे. यामुळे मिमिक्री करण्याचा छंदच लागला. आणि मुळातच विनोदी स्वभावामुळे ही कला आणखीन फुलत गेली. मग मला जाणवलं की मी अनेक व्यक्तींसारखेच त्यांच्या ढंगात वेगवेगळ्या शैलीत बोलू शकतो. त्यांचे आवाज काढू शकतो. यासाठी मला शाळा-महाविद्यालयात असताना स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी माझ्या मित्रांनी आणि घरच्यांनीसुद्धा प्रोत्साहीत केले.
अनेक कलाकारांबरोबरच तो खेळाडू तसेच समाजातील मान्यवरांची हुबेहुब नक्कल करुन दाखवतो, तेव्हा ते पाहण्यात समोरच्याला रंजकता मिळते आणि यातच त्याच्या कलेला पोचपावती मिळते. याचे कुठेही रीतसर शिक्षण न घेता ही आवाजाची कला मी स्वत: विकसित केल्याचे अमोल नमूद करतो. अभ्यासक्रम निवडतानाही त्याने तो कलेशी निगडीत निवडला जेणेकरुन प्रसारमाध्यमांमध्ये काम करण्याची संधी मिळून लिकांचे मनोरंजन त्याला करता येईल. यासाठी अमोलनी आत्तापर्यंत अनेक स्टेज शोज आणि इव्हेंट केले आहेत. भविष्यात डबींग आर्टीस्ट तसेच रेडिओ जॉकी, समालोचन सारख्या निवेदन प्रकारात आवाज द्यायचा आहे असा मानस अमोलने व्यक्त केला.
अभिनय आणि आवाजाच्या बळावर आयुष्यात बर्याच गोष्टींची सांगड घालता येते ती त्यातील अनोख्या पद्धतीमुळेच. कारण ही कला अगदी अमोल आहे, एकापेक्षा एक सरस आवाज अवगत असलेल्या अमोल तेली प्रमाणे.
Leave a Reply