ऑल इंडिया रेडिओसाठी माझी रेकॉर्डिंग सुरू होतीच. २२ डिसेंबर २००२ रोजी रेडिओसाठी माझे २००वे गाणे रेकॉर्ड झाले. माझ्या गाण्याच्या करिअरच्या सुरवातीपासून रेडिओ माझ्या पाठिशी उभा राहिला. या २०० गाण्यांनी मला प्रचंड आत्मविश्वास दिला. माननीय प्रभाकर पंडित, यशवंत देव, भूमानंद बोगन या रेडिओच्या संगीतकारांचे ऋण मी कधीही विसरू शकणार नाही.
ठाण्याच्या सरस्वती मराठी हायस्कूलच्या सुवर्णजयंतीननिमित्त आयोजित गाण्याच्या कार्यक्रमामध्ये मी सुरेश बापट आणि मुकुंद मराठे यांच्याबरोबर गायलो.
२००३ च्या कार्यक्रमांची सुरुवात ११ जानेवारी रोजी झाली. ‘गोल्डन स्वान कन्ट्री क्लब’साठी मी गझलचा कार्यक्रम सादर केला. २००३ सालचा हा पहिला कार्यक्रम होता पण माझा हा ६००वा जाहीर कार्यक्रम होता. एक पुढचा मोठा मैलाचा दगड मी पार केला होता. पण अजून बरीच वाटचाल करायची होती. ही वाटचाल आधीपेक्षा सोपी वाटत होती. कारण गायनाच्या क्षेत्रात थोडे नाव झाल्यामुळे कार्यक्रम समोरून येत होते. कार्यक्रम मिळवण्यासाठीचे कष्ट आता कमी झाले होते.
आर.सी.एफ. आयोजित नाट्यसंगीत आणि गझल यांची मैफल मी प्रल्हाद अडफळकर यांच्याबरोबर गायलो. युनायटेड जैन या संस्थेसाठी संदीप कर्नावट यांनी माझा कार्यक्रम क्रूझवर आयोजित केला. पाण्यावर तरंगत गाण्याची माझी पहिलीच वेळ होती. माझी मुलगी शर्वरी माझ्याकडे गाणे शिकत होतीच. या कार्यक्रमात तीही माझ्याबरोबर गायली. माझ्यापेक्षा शर्वरीने हा कार्यक्रम एन्जॉय केला. आता कार्यक्रमांची भौगोलिक कक्षा रुंदावली होती. दिल्ली, कलकत्ता, इंदौर अशा अनेक ठिकाणी प्रवास होत होता. सुप्रसिद्ध विको लॅबोरेटरीजच्या सुवर्ण जयंतीनिमित्त गोव्याच्या सिदादे दे गोवा या पंचतारांकित हॉटेलमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री श्री. मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत मी गाणे सादर केले. ख्यातनाम गझलकार सुरेश भट यांना आदरांजली वाहणारा गझलचा कार्यक्रम संगीतकार अनिल मोहिले यांच्या समवेत ठाणे येथे आणि गोरेगाव पत्रकार संघासाठी मी गायलो. मुंबईच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख उपस्थित होते. ते सुरेश भटांचे जवळचे मित्र आणि गझलचे चाहते असल्याने सुरेश भटांच्या अनेक गझल त्यांनी तोंडपाठ पेश केल्या. मित्रावर आणि गझलवर प्रेम करणारी एक व्यक्ती म्हणून विलासरावांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळा पैलू पहायला मिळाला.
‘शेजारी-शेजारी’ चित्रपटाचे माझे आवडते संगीतकार विश्वासजी पाटणकर यांनी ‘रामगाथा’ हा रामायणावरील संपूर्ण नवीन गीतांचा कार्यक्रम बसवला. ही गीते अरविंद आगाशे यांची होती. या कार्यक्रमात माझ्याबरोबर दाढे-जोशी, श्रुतकिर्ती मराठे-बने, राजेश पंड्या हे गायक कलाकार होते. या मृदुला कार्यक्रमाचे प्रयोग आम्ही मुंबई, पुणे, नागपूर अशा अनेक ठिकाणी केले.
-अनिरुद्ध जोशी
Leave a Reply