आज ‘महाराष्ट्र टाइम्स’ या मराठी पेपरचे ६१ व्या वर्षात पदार्पण.
‘महाराष्ट्र टाइम्स’ हे टाइम्स समुहाचे मराठी वर्तमान पत्र. महाराष्ट्र राज्याची राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक जडण-घडण करण्यात ज्या व्यक्ती व संस्थांनी मोलाचा वाटा उचलला, त्यात ‘महाराष्ट्र टाइम्स’चे नाव वरच्या क्रमांकाने घ्यावे लागेल. ‘महाराष्ट्र टाइम्स’ची स्थापना महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या सूचनेनुसार झाली.’महाराष्ट्र टाइम्स’ सुरु करण्यामागील प्रेरणा श्री. यशवंतराव चव्हाण यांचीच असल्याचे बेनेट, कोलमन ॲंड कंपनी लिमिटेड कंपनीचे तत्कालिन अध्यक्ष शांतीप्रसाद जैन यांनी जाहीरपणे सांगितले होते.पहिल्या अंकाच्या प्रकाशन समारंभात शांतीप्रसाद जैन यांनी ही माहिती दिली. यावेळी श्री. यशवंतराव चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की,”टाइम्सने मराठी वृत्तपत्र काढावे अशी सूचना मी केली होती, हे खरे आहे. कारण मराठी वृत्तपत्राद्वारे टाइम्सला मराठी मन समजून घ्यावे लागेल.मराठी वृत्तपत्राच्या सततच्या सान्निध्यामुळे महाराष्ट्रातील नव्या पुरोगामी विचारांची त्यांना ओळख होईल आणि टाइम्स व इतर पत्रांच्या द्वारे हा विचार महाराष्ट्राबाहेर असलेल्यांना कळेल, असा यात दोघांचा फायदा होणार आहे.” ही माहिती ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली.
‘महाराष्ट्र टाइम्स’चा पहिला अंक १८ जून १९६२ रोजी प्रसिद्ध झाला. त्यावेळी मोठा समारंभ करण्यात आला. योजनेनुसार जानेवारीपासून वृत्तपत्र सुरु होणार होते. तथापि कागदाचा पुरवठा होण्यात आणि अन्य काही बाबतीत अनेक अडथळे आल्याने ते जूनमध्ये सुरु झाले. जानेवारीत नेमलेल्या अनेक पत्रकारांना सहा महिने बेकार राहावे लागले होते. या पहिल्या अंकाच्या संपादक पदाची सूत्रे ज्येष्ठ पत्रकार द्वा.भ.कर्णिक यांच्याकडे देण्यात आली होती.
पहिले संपादक म्हणून द्वा.भ.कर्णिक यांची, पहिले सहसंपादक म्हणून गोविंद तळवलकर, दुसरे सहसंपादक म्हणून मा. पं. शिखरे यांची नियुक्ती झाली. वृत्तसंपादक पदावर दि. वि. गोखले यांची नियुक्ती झाली. पंढरीनाथ रेगे, रामचंद्र माधव पै, चंद्रकांत ताम्हणे, अनंत मराठे, मनोहर साखळकर, माधव गडकरी, दिनू रणदिवे, शंकर सारडा असे अनुभवी पत्रकार पहिल्या संपादक मंडळात होते.
१९६० मध्ये महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर दोनच वर्षांत ‘महाराष्ट्र टाइम्स’ची सुरुवात झाली मुंबई, ठाणे, पुण्यातील मराठी जनतेची बौद्धिक भूक भागवत असतानाच त्यांच्या आशा-आकांक्षा, सुख-दु:खे, अपेक्षा व आकांक्षांना वेशीवर टांगण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’अग्रेसर राहिला. स्थापनेपासूनच मटाला उत्तमोत्तम पत्रकार संपादक म्हणून लाभले. सुप्रसिद्ध रॉयवादी विचारवंत द्वा. भ. कर्णिक, गोविंदराव तळवलकर, कुमार केतकर,अशोक पानवलकर ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक राहिले आहेत. भरतकुमार राऊत हे ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये २००० ते २००८ काळात संपादक राहिले आहेत. पराग करंदीकर हे विद्यमान संपादक आहेत. प्रत्येक आवृत्तीस संपादक आणि प्रकाशक वेगवेगळे आहेत. मटामध्ये मराठीतील सर्वोत्तम पत्रकारांनी काम केले व लेखही लिहिले. त्यामुळे मटाची महती वाढली. मटाच्या यशात या सर्वांचाही मोठा हातभार आहे.
या ‘पत्र नव्हे स्मार्ट मित्र’ला मन:पूर्वक शुभेच्छा!
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply