नवीन लेखन...

८ वी ड – भाग १७

मागच्या लेखात सेल्फी बद्दल लिहिले तेव्हा अनेक लोकांनी प्रतिक्रिया भेटल्यावर दिल्या , तर कोणी फोन केला. विशेषतः तरुण मुलांना बरे वाटले निदान सेल्फिची थोडी तरी बाजू कोणी मांडणारा आहे. काही सत्य असतात ती कधीच लपवता येत नाही प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार त्याचे विश्लेषण करतो किवा समर्थन-विरोध काहीही असू शकतो. शाळा-कॉलेजमधील मुलांमध्ये चित्रापटाविषयी असणारी क्रेझ काही लपून रहात नाही , आणि हे पिढ्या न पिढ्या चालूच असते आणि रहाणार आहे. त्याला सतत दोष देणे म्हणजे आपण खूप अनुभवी आहोत हे दाखवण्यासारखे आहे.

मला आठवत आहे माझ्या क्लास मधला मुलगा क्लासला दांडी मारून एका चित्रपटाला गेला आहे कळले. मी तावातावाने त्या चित्रपटगृहाच्या बाहेर उभा राहिलो. पण तो कधी सटकला ते कळले नाही. दुसऱ्यादिवशी मी त्याची वाटच बघत होतो , त्याला मुलांनी सांगितले होते , त्याला माहित होते आज आपल्यलाला पडणार. आल्यावर म्हणालो त्याला कसा होता सिनेमा, चांगला होता तो म्हणाला . मी अभ्यास सुरु केला , तो वाट बघत होता अजून कशी आपल्याला पडली नाही. त्या दिवशी खरेच त्याला पडली नाही. का कुणास ठाऊक माझ्या हातून घडले नाही. पण एकदा मात्र एका चुकीत सापडला आणि मग सगळा हिशेब बरोबर झाला. मी अनेक दिवस असा विचार करत होतो खरेच मुलांचे चुकते का. तत्त्वानुसार चालणारा मी शिक्षक नव्हतो. परंतु चूक केली तर माफी नाही हे मात्र होते पण प्रत्येक वेळा शिक्षा करावीच लागतेच असे नाही, न बोलताही शिक्षा करता येते कारण चूक झाल्यावर मुलगा फार सावध होतो, कारण त्याला असते सरांना माहित आहे कधी न कधीआपल्यालाला पडणारच , पण केव्हा ह्याचा त्याला अंदाज येत नाही म्हणून तो होणाऱ्या चुकाबद्दल तो जास्त सावध असतो , रहातो , कमी चुका करतो हा माझा अनुभव आहे पण काहीना मात्र रत्न दाखवावेच लागते , ती मुले वेगळीच असतात.

आमचे लहानपण मग मला आठवते त्यावेळी दोन आणि तीन रुपये तिकीट असायचे. खूप वेळा एक एक चित्रपट बघायचो कधी चोरून तर कधी घरून पैसे घेऊन. दिवाळी-गणपतीमध्ये खूप चित्रपट व्हायचे कारण त्यावेळी पैसे मिळायचे , थोडे थोडे वाचवून चित्रपट बघायचो. पण प्रमाण कमी. आम्हालाही क्रेझ होती आणि आजच्या मुलांना देखील आहे. मग चूक कुठे आहे ?. आत्ता तर इंटरनेटमुळे घरीच बघता येतात तरी पण चित्रपटगृहे भरतात कारण चित्रपट मजा करण्यासाठी सर्व बघतात , समीक्षेसाठी नाही. पूर्वी लोक वृत्तपत्रामधील परीक्षण वाचून चित्रपट बघितले जात , आज असे नाही . कारण वृत्तपत्रामध्ये सुमार चित्रपट म्हणून जो गणला जातो तो भरपूर चालतो कारण त्या पिढीला तो आवडतो आणि ते स्विकारतात, बस. त्याप्रमाणे चित्रपट चालतात. आज शाळेत मुलांना केस कापणे शाळेत अनिवार्य आहे म्हणून नाहीतर त्यांनी धमालच केली असती. आमच्या पिढीने अभिताभ , राजेश खन्ना सारखे केस वाढवले होतेच ना ? खरेच आरसा ते मोबाईल हा प्रवास निश्चित विलक्षण आहे. इंटरनेटचे तेच आहे. एक शोध काय लागला आणि हाहा म्हणता त्याने क्रांती केली. मध्यंतरात इंटरनेटचा शोध लावणाऱ्या विन सेट यांना भेटण्याचा योग आला, ऐकण्याचा योग आला. त्यांना इंटरनेटच्याबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले मी इंटरनेटचा शोध लावला आणि सोडून दिला लोकांसाठी आणि त्याची वेगवेळी स्वरूपे दिसू लागली, नवीन त्यांसबधी सुधरणा , शोध वेगाने लागले. माझ्या हातून शोध लागला ,पुढले काय ते माझ्या आत्ता हातात नाही. सागायचा मुद्द्दा हाच की नवनवीन गोष्टी निर्माण होतात, त्याचे चांगले-वाईट परिणाम होतच असतात. जसजशी पिढी पुढे सरकते तसतसे बदल होतात पण ठराविक वळणावर परत सर्व काही शांत होते. मुलाच्या बाबतीत तसेच असते , योग्य वेळ येताच ती शांत होतात अर्थात जी बिघडायची ती बिघडतात त्याला दुर्दैवाने पर्याय नाही. एक शिक्षक म्हणून पालक म्हणून असे मनात अनेकांच्या येताच असतील. परंतु त्याच्याकडे कोणत्या दृष्टीकोनातून बघितले पाहीजे हे मात्र ज्याच्या त्याच्या बुद्धिमतेवर अवलंबून असते. कारण त्याच्याकडे बघण्याचा दुष्टीकोन वेगवेगळा असू शकतो, व्यक्तीसापेक्ष असतो. मुलांचे व्यवहार वेगवेगळे असू शकतात, कदाचित ते वेगळे असू शकतात म्हणून त्याला आपली फुटपट्टी लावू नये. जितका विरोध कराल तितकेच परिणाम तीव्र होत जातात.

आजची मुले कुणाचा मान राखत नाहीत , बेछुट असतात , कोणाची पर्वा नसते. अशा अनेक गोष्टी ऐकायला मिळतात. नीट पाहिले तर ती त्याच्या पद्धतीने वागत असतात. ह्या सिनेमामुळे मुले बिघडतात, हे चित्रपट सुरु झाल्यापासून पिढ्यान पिढ्या आपल्या कानावर पडत आहे आणि ते तसेच पडत रहाणार. पूर्वी मोठा पडदा आता तो पडदा हातात आला , इतकेच. माझ्या मते आजची मुले ही पूर्वीपेक्षा ‘ बोल्ड ‘ आहेत आणि हा बोल्डपणा मागच्यांना खपत नाही कदाचित असूयाही असू शकते ती ‘ कोल्ह्याला द्राक्षे आंबट ‘ ह्या म्हणीप्रमाणे असेल कदाचित. आमची ८ वी ड पुढे सरकाने आहे परंतु एक पिढी परत सामाजिक नियम लावून ८ वी ड कडे सरकत आहे , तिच्या जवळ जात आहे असे वाटते.

त्या दिवशी मी स्टेशनवर जात होतो , रिक्षा उभ्या राहतात तिथे दोन मुली उभ्या होत्या, असतील कॉलेजमधल्या , एका मळकट चादरीवर एक म्हातारी पडली होती , भिकारीण असणार परंतु त्या मुली तिला पुडीतून काही खायला देत होत्या. दोन मिनिटे तिच्याशी बोलल्या आणि निघून गेल्या. काही दिवसांनी परत त्या मुली दिसल्या, पुन्हा तेच. त्या गेल्यानंतर मी हळूच त्या म्हातारी जवळ गेलो तेव्हा बघितले त्या मुलीनी कागदातून दोन पोळ्या आणि थोडी भाजी दिली होती ती ते म्हातारी खात होती. हजारो माणसे सतत जात-येत होती त्यात मीपण होतो पण एकानेही असे केलेले मी पाहिले नाही. एक गोष्ट लक्षात आली मुले-मुली कितीही पुढे गेलेल्या वाटल्या तरी एक माणुसकीचा कोपरा प्रत्येकाच्या मनात असतो काहीच तो कोपरा त्यांना सापडतो तर काहीना तो सापडत नाही. माझ्या ओळखीचे एक कुटुंब आहे, प्रचंड श्रीमंत आहेत, त्याचा मोठा व्यवसाय आहे परंतु त्यांची मुलगी ही दरवर्षी काही पोती धान्य अनाथ आश्रमात देते , ती पण शिकलेली आहे , अगदी परदेशात शिकलेली आहे , नवीन विचारांची आहे परंतु तिला तसे करावेसे वाटते हे महत्वाचे. कोणी म्हणेल त्याच्याकडे सुबत्ता आहे म्हणून ती करते , जर असे असते तर अनेकजण असे सापडले असते पण तसे नसते , ती वृत्ती असणे आवश्यक असते आणि दुसऱ्याचे दुखः बघण्याची , समजून घेण्याची क्षमता असायला हवी .

एक महत्वाचे कुठलाही चित्रपट किंवा एखादी गोष्ट जास्त मुलांना बिघडवू शकत नाही. जी मुले मनाने कमजोर असतात ती कशामुळेही बिघडतात ज्याप्रमाणे मोठी माणसेही बिघडतात. उलट आज मुलांना आपण वेगळे काही करावेसे वाटते आहे पण ते ‘ वेगळे ‘ काय ह्याचा शोध घेतात. आधीच्या पिढीने त्यांना ‘ वेगळे ‘ काय आहे हे शोधण्यास मदत केली तर निश्चित ते बरेच काही करू शकतात. फक्त आधीच्या पिढीकडे ते वेगळे काही देण्याची क्षमता असणे गरजेचे आहे मग त्यात शिक्षक असू दे , पालक असू दे आणि कोणीही! मला वाटते तिथेच थोडा ‘ घोळ ‘ आहे.

सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..