मुले खोटे का बोलतात? कधी बोलायला शिकतात, लागतात? ह्याचा खरेच कोणी विचार केला आहे का?
नीट विचार केला तर जाणवते, खोटे बोलण्याच्या तळाशी, मुळाशी भिती आणि असुरक्षितता आहे. मग त्याला सुरवात कशी, कधी झाली याचा विचार केला तर नीटसे आठवत नाही परंतु खोट्याचे झाड फोफावल्याचे मात्र जाणवते. त्याचे फोफावणे, त्यावर निर्बंध घालणे त्याच व्यक्तीला शक्य असते, जर मनात आणले तर. शाळेमधुनच ह्याची काही सुरवात होते असे म्हणावे लागेल . बाजूचा मुलगा खोटे बोलला त्याला मार मिळत नाही सुटतो, आणि मी मात्र खरे बोललो आणि मला शिक्षा झाली. हा बहुधा सामान्य मुलांच्या मनात येणारच हे साहजिकच आहे. त्याचप्रमाणे खोटे बोलू नको म्हणणारा बाप पदोपदी लोकाशी खोटे बोलतो जर तो राजकारणी किंवा सरकारी अधिकारी, कर्मचारी असेल तर कधी कधी बोलूच नये आणि हे मुलाला जाणवायला सुरवात होते. अर्थात म्हणजे सर्व नाही, सरसकट नाही हेही लक्षात ठेवावे कारण मुलगा लहान असतो पण त्याचा मेंदू अत्यंत सक्षम आणि तीव्र असतो हे कुणीही विसरू नये. घरातील वातावरण आणि शाळेमध्ये येणाऱ्या अडचणी यांची जेव्हा मेंदूमध्ये भेट होते तेव्हा त्याचा मेंदू हळूहळू त्या दिशेने काम करू लागतो. आपण खोटे बोलतो आहोत हे त्या मुलाला कळत असते, ते त्याच्या डोळ्यात दिसत असते पण ते वाचणारा शिक्षक असेल तर ठीक, नाहीतर ते पचून जाते आणि तो मुलगा खऱ्या अर्थाने ‘तयार’ होण्याची प्रक्रिया सुरु ह्याच वेळी होते. मला असा शेकडो मुलांचा अनुभव आहे तरी पण मी कधी कधी फसला जातो. कारण समोरचा मुलगा इतका तरबेज असतो की त्याचे डोळेही आपल्याला फसवतात. माझ्या शेजारी एक दुकान आहे, छोटे आहे. एकदा दुकानदार मला म्हणाला सर तुमच्याकडे एक मुलगी आहे तिच्याकडे लक्ष ठेवा. मी का विचारले तेव्हा तो म्हणाला ती मुलगी जरा लांबची गोष्ट मागते मी तिकडे वळलो की तिच्याकडे माझी पाठ होते आणि ती पटकन एखादी गोष्ट उचलते. मला खूप विचित्र वाटले. मी त्याला ती मुलगी दाखव असे सांगितले. त्याने काही दिवसांनी ती मुलगी दाखवली, माझा विश्वास बसला नाही. शिकवता शिकवता मी सहज तो प्रसंग सांगितला, मी तिच्याकडे पहिलेच नाही पण मला नंतर तिच्या पडलेल्या चेहऱ्यांनी बरेच काही सांगितले. मी काहीही माझ्या चेहऱ्यावर दाखवले नाही. मग त्या दुकानातील ती घटना बंद झाली. ती पण पुढे शिकून गेली, ती कुठे आहे काय करते हे माहीत नाही, आता तर तिचे नावही माहीत नाही. तिची हिम्मत का वाढली असणार ह्याचे साधे कारण म्हणजे तिची पहिली चोरी फुटली नाही म्हणून तिचा धीर चेपला असणार. पण तिच्या घरी वातातावरण कसे असणार किंवा तिची संगत कशी असणार हे दिसून येते. कदाचित घराचे ठीक असतील,संगतीचा हा परिणाम असूही शकतो.
दुसरे कारण भिती. हे कारणही खोटे बोलण्याचे असूही शकते. आज तर खोटे अनेक माध्यमातून आपल्या मेंदूवर सतत आक्रमण करत असते. परंतु आपण इथे विचार मुलाचा करत असल्यामुळे तिथेही भिती हे कारण असू शकते. अभ्यास केला नाही, शाळेला दांडी मारली. अशी अनेक कारणे असू शकतील इथेही मला ‘गुरु’ महाभाग भेटले. एका मुलाने तर आई-बाप सोडून सगळ्यांचे शाळेमध्ये ‘तेरावे’ घातले होते. कार्ट अभ्यासात हुशार होते, कधीही लाल रेघ दिसली नाही म्हणून वाचत होते. मला समजले तेव्हा मी नीट सांगितले तेव्हा ते कार्ट म्हणाले सर मी तुमच्याशी कधी खोटे बोलणार नाही, त्या शाळेतले सगळे सर सारखे मला पकवत असतात. वर्गात अक्षरशः झोप येते. म्हणून दांडी मारतो. ह्याला मी काय उत्तर देणार, शिक्षकांनी पण शिकवताना आपण मुलांना किती ‘पकवतो किंवा फसवतो’ याचा विचार करावा. म्हणून मी फक्त त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले होते. ही अशी मुले काय पण करतात आणि सलामत बाहेर पडतात. सहसा कुठे सापडत नाहीत आणि प्रमाणाबाहेर उपद्व्याप करत नाहीत. त्यांना बरोबर माहेत असते आपण यातून कसे बाहेर पडायचे. पण काही भोट मुले बरोबर शिक्षकाच्या जाळ्यात सापडतात. माझ्या क्लास मधला मुलगा शाळेला दांडी मारून ट्रेनने मित्राबरोबर जवळच्या गावात असलेल्या नदीवर गेला होता. येताना त्याने स्टेशनवर गाडी येताच त्याने गाडीतून उडी मारली ती नेमकी त्याच्या शाळेतल्या सरांच्या पुढ्यातच, अंगावर शाळेचे कपडे होते, सर समजले दुसऱ्या दिवशी सरांनी त्याचा वर्गात ‘सत्कारच’ केला आणि मग मी माझ्या क्लासमध्ये मी, अरे तू तिथे गेलास जर डूबला असतास तर? वर त्याने उत्तर दिले सर डूबलो का? मी त्याच्या पाठीवर जाळ काढलाच. कारण तेव्हा त्याचा सत्कार करणेच जरुरी होते. शाळेतून घरी कळलंच होते, मी पण घरी फोन केला. पुढे गाडी रुळावर आली. लहान असो की मोठा असो ज्याच्याकडे भिती असेल तर तो खोटे बोलायला प्रवृत्त होतो, ही भीती अनेक कारणामुळे होते मोठा माणूस जर काही असे करून बसला की जे उघड झाले तर आपली नाचक्की होईल, आपले नाव खराब होईल. जे आपण कृत्य केले ते कोणाला कळू नये असे जेव्हा वाटते तेव्हाच भीतीचा जन्म होतो आणि एकदा तो खोटे बोलून सुटला की तो निर्ढावतो आणि मग तो त्या भ्रष्ट गर्तेत जातो. मुलांच्या बाबतीत काहीसे असेच असते परंतु त्याच्यावर प्रथम पगडा घरातूनच असतो, त्याच्या घरातील वातावरण कसे आहे त्यावर अवलंबून असते. जर घरातच खोटे बोलणे सुरु असेल तो निर्ढावतो. परंतु कधीकधी हे खोटे बोलणे घातक नसते असेही त्याला जाणवते. घरातील वातावरण जर चांगले रहातं त्यामुळे काहीजण ‘जाऊन दे’ ह्या सबबीखाली खोटे बोलतात. असे अनेक प्रसंग तुमच्या आमच्या आयुष्यात येतात तेव्हा आपली ‘नरो वा, कुजरोवा वा’ ही भूमिका ‘फलदायी’ ठरलेली जाणवते अर्थात हे पण खोटेच ना, असा विचार मनात येतो .
लक्षात ठेवा या सर्वच्या तळाशी ‘भिती’ हा शब्द आहे. आपण, आपली मुले, आपले शिक्षक खरोखर निर्भय आहोत का? हा विचार केला तर उत्तर ‘नाहीच’ असे मिळेल. म्हणजे तात्पर्य ‘खोटेपणाचा’ हा वसा असाच चालू रहाणार का? जे पेराल ते उगवेल तुमच्या पुढल्या पिढ्यांसाठी?
उत्तर प्रत्येकाकडेच आहे, द्यायचे का याचा विचार करा, कारण आजूबाजूला ‘तण’ भरपूर आहेत. २०२१ मध्ये जंगलच जंगल.
सतीश चाफेकर
Leave a Reply