आयोजक आणि निवेदक अशोक शेवडे यांच्याबरोबर काही कार्यक्रम मी केले. ठाण्याच्या शिवसमर्थ मंदिर ट्रस्टसाठी गाण्याचा कार्यक्रम केला. यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे ‘भजन-संध्या’ सादर केली. आमचे चार्टर्ड अकाऊंटंट लक्ष्मीकांत काब्राजी यांच्या वाढदिवसानिमित्त गझलचा मोठा कार्यक्रम ब्ल्यू रूफ क्लब येथे गायलो. दरवर्षीप्रमाणे संत एकनाथ मंदिर, भिवंडी येथेही संत एकनाथ षष्ठी निमित्त गाण्याचा कार्यक्रम सादर केला. माजी महापौर सतीश प्रधान यांच्यासाठीही एक कार्यक्रम केला. ऑक्टोबर महिन्यात ‘पुणे मराठी बांधकाम असोसिएशन’साठी गुरुकल लॉन्स, पुणे येथील कार्यक्रमात गाणी सादर केली. या कार्यक्रमात माझ्याबरोबर मधुरा कुंभार आणि आनंदी जोशी या गायिका होत्या आणि झी मराठीच्या ‘फू बाई फू’ या कार्यक्रमातील काही कलाकार होते. कार्यक्रमाचे आयोजन ‘इंडियन मॅजिक आय’ने केले होते.
वर्ष संपत आले होते. मुंबई दूरदर्शनच्या ‘सुहाना सह्याद्री अंताक्षरी’ च्या नवीन वर्ष सेलिब्रिटी स्पेशल कार्यक्रमात गाण्यासाठी निमंत्रण आले. संगीत संयोजन प्रशांत ठाकरे करणार होते. गौरी कवी, निनाद आजगावकर, अविनाश हांडे आणि प्रमिला दातार हे कलाकार माझ्याबरोबर गाणार होते. प्रमिला दातार यांना पाहून मला विशेष आनंद झाला. त्यांचा ‘सुनहरी यादें’ हा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय होता. संगीतकार सी. रामचंद्र यांच्याबरोबरचा त्यांचा कार्यक्रम मी पाहिला होता. मला भेटताच त्या म्हणाल्या, “अनिरुद्ध, – तुला टेलिव्हिजनवर अनेकदा गाताना पाहिले आहे. नॅशनल नेटवर्कच्या शाम-ए-गज़ल कार्यक्रमातील तुझी गज़ल मला विशेष आवडली.’
‘मनापासून धन्यवाद! पण माझ्या या संगीत कारकिर्दीचे श्रेय तुम्हालाही आहे.” मी म्हणालो. “ते कसे रे? तू कधी आमच्या कार्यक्रमात गायलेले मला आठवत नाही.”
“नाही हो ! कॉलेजात असताना एका सुगम संगीताच्या मोठ्या स्पर्धे त मी भाग घेतला होता. तुम्ही या स्पर्धेच्या परीक्षक होतात. मला पहिले बक्षीस जाहीर करताना तुम्ही म्हणाला होतात की, हा आवाज मला भविष्यातील एक प्रॉमिसिंग आवाज वाटतो. आज तुमचे शब्द खरे ठरले आहेत. कारण काही वर्षांपूर्वी तुमच्यासमोर एक स्पर्धक म्हणून गाणारा मी आज तुमच्याबरोबर सेलिब्रिटी स्पेशल अंताक्षरी गाणार आहे.” मी म्हणालो. प्रमिलाताई चकितच झाल्या. कार्यक्रमाचे निर्माते विद्युत शहा यांनाही आश्चर्य वाटले. त्यांच्याच परवानगीने ही घटना मी या कार्यक्रमात सांगितली. अंताक्षरी फारच रंगतदार ठरली. एकूणच हा एक आनंददायक अनुभव होता. माझ्यासाठी तर फारच विशेष होता. कारण हा माझा ९००वा कार्यक्रम होता. वर्ष २०११च्या अखेरीस मी ९०० कार्यक्रम पूर्ण केले होते.
‘धुंद मैफिलीत माझ्या’ या आयोजक संजय जोशी यांच्या कार्यक्रमाने २०१२ या वर्षाची सुरुवात झाली. कॉरपोरा टेरेस या ठिकाणी गझलचा एक कार्यक्रम करून आमदार अमित देशमुख यांच्या आमंत्रणाने मी या वर्षीही लातूर फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालो. सुगम संगीताच्या अंतिम स्पर्धेचे परीक्षण तर मी केलेच, पण ‘गझल संध्या’ या कार्यक्रमाचे उद्घाटनही माझ्या हस्ते झाले. आता लातूर शहरातील अनेक मान्यवर मंडळी चांगल्या परिचयाची झाली होती. लातूरहून परतल्यावर आयोजक डॉ. किशोर भिसे यांच्यासाठी नेहरू सेंटर, वरळी, मुंबई येथे एक कार्यक्रम केला.
-अनिरुद्ध जोशी
Leave a Reply