पुढील कार्यक्रम आयोजक अशोक शेवडे यांच्यासाठी दिवाळी पाडव्याला डोंबिवली येथे झाला. ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांच्याबरोबर मी गायलो कार्यक्रमाचे निवेदन प्राची देवस्थळी आणि अशोक शेवडे यांनी केले. रोटरी क्लब आयोजित अंध विद्यार्थ्यांसाठीच्या शिबिरात ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांच्या सोबत माझी प्रकट मुलाखत घेण्यात आली. या विद्यार्थ्यांनी गाण्यासंदर्भात विविध प्रश्न विचारले. त्यांचा गाण्याबद्दलचा इतका अभ्यास पाहून मला आश्चर्य वाटले. परमेश्वर जेव्हा एका शक्तीपासून वंचित ठेवतो, तेव्हा दुसऱ्या क्षमता वाढवून देतो. ही मंडळी अतिशय बारकाईने गाणे ऐकतात हे माझ्या ध्यानात आले. त्या दिवसापासून मी डोळे बंद करून गाणे ऐकायला लागलो.
२०१३ या वर्षाची सुरुवात एका सुगम संगीत स्पर्धेने झाली. जोशी-बेडेकर महाविद्यालयाने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धेचे मी परीक्षण आणि गायन केले. या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शकुंतला सिंग या स्वतः उत्तम गायिका असल्याने त्यांनी या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केले. यानंतर पुढील कार्यक्रमांसाठी मी अहमदाबाद, औरंगाबाद, इंदूर आणि बडोदे येथे जाऊन आलो. ठाण्याला परतल्यावर एका मोठ्या कार्यक्रमाची तयारी आम्ही सुरू केली. १३ फेब्रुवारी २०१३ रोजी माघी गणेश चतुर्थीनिमित्त कळवा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
माझी विद्यार्थिनी नेहा नामजोशी या कार्यक्रमात माझ्याबरोबर गायली. विशेष म्हणजे या कार्यक्रमानंतर पाच हजार लोकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. माझ्यासाठीही हा कार्यक्रम फारच विशेष होता. कार्यक्रमानंतर सर्व वादकांनी माझे अभिनंदन केले. आयोजकांतर्फेही माझा सत्कार करण्यात आला. कारण माघी गणेश चतुर्थीच्या रात्री त्या वक्रतुंड महाकाय श्रीगजाननाच्या कृपेमुळे मी ९५०वा जाहीर कार्यक्रम पूर्ण केला होता.
घरी प्रियांका, मुली आणि आई माझी वाटच पहात होत्या. आईने माझी दृष्ट काढली. गाणे माझ्याकडे आईकडूनच आले होते. माझी पहिली गुरुदेखील आईच होती. प्रत्येक कठीण प्रयोगाच्या वेळी आई भक्कमपणे माझ्या पाठीशी उभी राहिली होती. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. प्रियांका आणि मुलींनी माझे अभिनंदन केले. “अरे हो हो! इतके माझे कौतुक का करताय? मी अजूनही माझ्या ध्येयाच्या ५० कार्यक्रम मागे आहे.” मी म्हणालो.
“असा विचार करू नका. इतके कार्यक्रम करणेदेखील खूप कठीण गोष्ट आहे.” प्रियांकाने पत्नीच्या अधिकारात मला समजावले. एक हजार कार्यक्रमाचे माझे ध्येय गाठण्याच्या नादात मी ९५० कार्यक्रम पूर्ण केल्याच्या या क्षणाचा आनंद घेऊ शकत नव्हतो. आत्तापर्यंत कधी असे घडले नव्हते. मग आत्ताच असे काय होत होते? मला एकदम जाणवले की आता मी माझ्या ध्येयाच्या अगदी जवळ पोहोचलो होतो. एक हजार कार्यक्रम पूर्ण करण्याची मला घाई झाली होती. मी मोठी चूक करत होतो. मी धीराने घ्यायचे ठरवले. असेही ठरवले की, आता समोरून येणारे सगळेच कार्यक्रम करायचे नाही, तर काही निवडक कार्यक्रमच हाती घ्यायचे. आता मी दुसरी मोठी चूक करत होतो. माझ्या या निर्णयामुळे माझ्याच कार्यक्रमांचा वेग मंदावणार होता. पण त्यावेळी मला हे समजत नव्हते. पन्नास कार्यक्रम करणे हे देखील किती कठीण काम असू शकते याचा प्रत्यय मला पुढील काळात आला.
-अनिरुद्ध जोशी
Leave a Reply