दादा कोंडकेंचा नायक म्हणून, पहिला चित्रपट ‘सोंगाड्या’!! या पहिल्याच चित्रपटाने त्यांच्या यशस्वी कारकिर्दीची मुहूर्तमेढ रोवली. या चित्रपटाच्या पहिल्याच फ्रेममध्ये दिसलेली त्यांची आई, रत्नमाला ही रसिक प्रेक्षकांना दादांची खरोखरचीच आई भासली. दादांनी देखील पुढच्या अनेक चित्रपटांतून त्यांना तीच भूमिका देऊन, आपल्या आईला कधीही ‘अंतर’ दिले नाही.
‘एकटा जीव सदाशिव’, ‘पांडू हवालदार’, ‘रामराम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘ह्योच नवरा पाहिजे’, ‘आली अंगावर’ व ‘मुका घ्या मुका’ या चित्रपटांतून दादांची नाव बदलत राहिली, मात्र ‘आये’ ही रत्नमालाच राहिली.
१९८७ साली प्रदर्शित झालेल्या ‘मुका घ्या मुका’ या चित्रपटानंतर, रत्नमाला यांनी चित्रपटात काम करणे थांबवले. दादांच्या ‘पळवा पळवी’ या चित्रपटापासून त्यांच्या आईच्या भूमिका मनोरमा वागळे, आशा पाटील यांनी केल्या. मात्र त्यांना रत्नमालासारखी भोळ्या भाबड्या मुलाची, करारी आई जमली नाही.
रत्नमाला यांचं खरं नाव, कमल भिवंडकर. १९२४ साली त्यांचा जन्म झाला. मेळ्यांतून काम करीत असताना वयाच्या चौदाव्या वर्षी, १९३८ साली ‘भगवा झेंडा’ या चित्रपटात त्यांना पहिली संधी मिळाली. हा चित्रपट करताना त्यांचं नाव, रत्नमाला. हे दादासाहेब तोरणे यांनी ठेवले. त्यानंतर ‘माझी लाडकी’ हा चित्रपट केला. प्रभात फिल्म्सच्या ‘दहा वाजता’ या चित्रपटाने त्यांना प्रसिद्धी मिळाली.
रत्नमाला यांनी अनेक हिंदी चित्रपटांतूनही भूमिका केल्या. हिंदीत काम करताना, त्यांनी मराठीला डावलले नाही. ‘राम राम पाव्हणं’, ‘सांगत्ये ऐका’, ‘मानिनी’, ‘रंगपंचमी’, ‘गरीबाघरची लेक’, ‘धन्य ते संताजी धनाजी’, ‘धर्मकन्या’, ‘मुंबईचा जावई’ इत्यादी चित्रपटांतून त्या रसिकांचं मनोरंजन करीत राहिल्या.
दादांसारख्याच त्या ‘हऱ्या नाऱ्या झिंदाबाद’ व ‘थापाड्या’ या चित्रपटांत निळू फुलेंच्या आई झाल्या. ‘नवरे सगळे गाढव’, ‘प्रीत तुझी माझी’, ‘लक्ष्मी’, ‘ढगाला लागली कळ’ या चित्रपटांतून त्यांनी अविस्मरणीय भूमिका केल्या.
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आईच्या भूमिका अनेक अभिनेत्रींनी साकारलेल्या आहेत. निरुपा राॅय, कामिनी कौशल, सुलोचना, ललिता पवार, दुर्गा खोटे, हंसा वाडकर, इत्यादींमधून लक्षात राहिलेली मुर्तीमंत आई, रत्नमालाच होत्या.
कणखर आवाज, बोलके डोळे, ग्रामीण भाषा, साधी वेशभूषा ही त्यांची वैशिष्ट्ये होती. आई मुलांचे नातेसंबंध साकारताना, त्यांनी दादांना कधी गावरान शिव्या देखील दिल्या तर कधी त्या हळव्या झाल्या. पूर्वीच्या चित्रपटातील, आईची प्रतिमा बदलून टाकणाऱ्या रत्नमाला, खाजगी जीवनातही स्वतःच्या मुलाविषयी संवेदनशील होत्या.
सुप्रसिद्ध नकलाकार व चरित्र अभिनेता असणाऱ्या राजा पंडित यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना जयकुमार नावाचा मुलगा होता. १९८४ साली तरुण जयकुमारचे रेल्वेच्या अपघातात निधन झाले. रत्नमाला यांनी त्याच्या वियोगात, पुढची पाच वर्षे कशीबशी काढली. २४ जानेवारी १९८९ रोजी आपल्या मुलाची ‘आई’ ही हाक ऐकण्यासाठी त्यांनी स्वर्गाचा रस्ता धरला.
त्यांना जाऊनही आज ३३ वर्षे झाली. ही दादांची ‘आये’, पुढच्या पिढीला कळण्याची शक्यता फार कमी आहे, कारण दादांचे चित्रपट अधिकृतरित्या कोणत्याही वाहिनीवर उपलब्ध नाहीत. त्यामुळे दादांची ‘ए आयेऽ.’ ही हाक ऐकणारी माझी पिढी, खरंच भाग्यवान!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२२-६-२२.
Leave a Reply