ए,बी फॉर्म हा शब्द प्रसारमाध्यमातून गेले दोन दिवस सारखा ऐकायला मिळतोय.हा ए-बी फॉर्म म्हणजे काय ? निवडणुकीत त्याचं महत्त्व काय हे प्रश्न तुम्हाला पडले असतीलच.
आपल्या देशात अनेक राजकीय पक्ष आहेत. निवडणुकांमध्ये हे पक्ष त्यांचे अधिकृत म्हणून काही उमेदवार रिंगणात उतरवितात. त्यांना संबंधित राजकीय पक्षाकडून ‘ए’ फॉर्म दिला जातो. त्यात उमेदवाराचं नाव, पक्षातील पद आणि कोणत्या मतदारसंघातून पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे, याची माहिती द्यावी लागते. उमेदवारी अर्ज भरताना अनेक कागदपत्रं, प्रतिज्ञापत्र काळजीपूर्वक द्यावी लागतात. काहीवेळा अधिकृत उमेदवाराने अर्ज भरल्यानंतरही छाननीच्या वेळी त्यात काही त्रुटी निघाल्या, तर अर्ज बाद ठरू शकतो. त्यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणातून बाहेर पडतो. अशा वेळी पक्षाचा कुणीतरी पर्यायी उमेदवार असावा यासाठी राजकीय पक्षांकडून ‘बी’ फॉर्म दिला जातो. त्यात प्रथम पसंतीच्या उमेदवारासह पर्यायी उमेदवाराचं नाव दिलेलं असतं. जर पडताळणी दरम्यान अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद ठरल्यास किंवा त्याने उमेदवारी मागे घेतल्यास पर्यायी उमेदवार संबंधित पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवतो. राज्यसभा किंवा विधान परिषद निवडणुकीसाठी हे फॉर्म ‘एए’ आणि ‘बीबी’ म्हणून ओळखले जातात.
राष्ट्रीय, राज्य पातळीवरील किंवा केवळ निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेला कुठलाही पक्ष हे फॉर्म उमेदवाराला देऊ शकतो. उशिरात उशिरा म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत हे अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. तसंच पक्षाच्या शिक्क्यासह पक्षाचे प्रमुख, सचिव किंवा पक्षाने जबाबदारी सोपविलेल्या व्यक्तीची सही त्यावर असणं गरजेचं असतं. संबंधित व्यक्तीच्या सहीचा शिक्का, झेरॉक्स चालत नाही. फॅक्सने पाठविलेले अर्जही ग्राह्य धरले जात नाही. त्यामुळे अधिकृत उमेदवार जाहीर केल्यावर पक्ष संबंधित उमेदवाराला केवळ सही करून उमेदवाराचं नाव न टाकलेले अर्ज देऊन टाकतात.
एकाच मतदार संघातून एकाच पक्षाच्या अनेक उमेदवारांनी अर्ज करू नयेत म्हणून राजकीय पक्ष हे फार्म अधिकृत उमेदवारांना देतात.
— संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.श्री.साळगांवकर
Leave a Reply