नवीन लेखन...

अ. भा. मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखेचा प्रवाह

ठाणे रंगयात्रा २०१६ मधील आशा जोशी यांचा लेख.


ठाण्याला नाट्यप्रेरणा दिली ती नाट्यप्रेमी, मो. ह. विद्यालयातील शिक्षक असलेल्या वि. रा. परांजपेसरांनी. शाळेतील मुलांची नाटके ते बसवत असत. परंतु तेवढ्यावर त्यांनी कधीच समाधान मानले नाही. मुंबईतील वेगवेगळी नाटके ठाण्यातील रसिकांना दाखविण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. मो. ह. विद्यालयात खुल्या रंगमंचावर नाटके लावली. आपले ठाणेकरही रसिकच! शाल, मफलर असा थंडीचा पूर्ण बंदोबस्त करून नाटके बघायला येत असत. त्यावेळी गडकरी रंगायतन नव्हते. त्यावेळचे नगराध्यक्ष असलेल्या मा. सतीश प्रधान यांना सरांनी प्रेरणा दिली व गडकरी रंगायतन बांधले गेले. ही ठाणेकरांना अभिमान वाटावा अशी वास्तू १५ डिसेंबर १९७८ रोजी उभारली गेली.

तेवढ्यावरही ह्या नाट्यप्रेमी मंडळीचे समाधान झाले नाही. कारण ठाण्यातील समाजातून वेगवेगळे कलाकार निर्माण झाले पाहिजेत हीच जिगिषा, तळमळ मनांत ठेवून वि. रा. परांजपे व सन्मित्रकार स. पां. जोशी या द्वयींनी पुढाकार घेऊन अ.भा.म.ना. परिषद, ठाणे शाखेची स्थापना १ ऑक्टोबर १९७९ रोजी केली. तो विजया दशमीचा शुभ दिवस होता.

रंगभूमीची परंपरा जतन करणे, जुनी नाटके लावणे, जुन्या जाणत्या कलावंतांचे कार्य तरुण कलाकारांसमोर आणून त्या कलावंतांना प्रोत्साहन देणे, मार्गदर्शन करणे, रंगभूमी संदर्भात कार्य करणाऱ्या सर्व घटकांमध्ये समन्वय साधणे, त्यांच्या समस्या दूर करणे हे संस्थेचे उद्दिष्ट ठरले.

बीज रोवलेल्या वृक्षाला प्रेरणेचे पाणी देऊन वाढविला. संस्थेने प्रेरित केलेल्या समाजातून दिग्दर्शक, कलाकार, नेपथ्यकार बाहेर येऊ लागले. प्रथम संस्थेच्या माध्यमातून नाटकातील छोटे भाग सादर करण्यात त्यांनी धन्यता मानली. त्यांत उदा. पुण्यप्रभाव, वहिनी, भाऊबंदकी वगैरेंचा समावेश आहे.

रंगभूमी दिनानिमित्त 1989 साली मराठी ‘रंगभूमीवरील विनोद’ ही संकल्पना घेऊन ‘सौभद्र’ ते ‘बिघडले स्वर्गाचे दार’ यातील नाट्यप्रवेश घेऊन नाट्यप्रवास सादर करण्यात आला. ठाण्यातील सर्व हौशी नाट्यसंस्थांमधील ३० ते ३५ कलाकार यात सहभागी होते.

१९८८ साली बालगंधर्व जन्मशताब्दी निमित्ताने मुंबईला संगीत नाट्यस्पर्धा झाली. त्यावेळी वि. रा. परांजपे दिग्दर्शित ‘सं. मृच्छकटिक’ हे नाटक बसविण्यात आले. या स्पर्धेत नाटकाला दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस तर मिळालेच, शिवाय त्यातील सात कलाकारांना वैयक्तिक अभिनयाचे बक्षीसही मिळाले.

रंगभूमी दिनाच्या दिवशी म्हणजे रविवार, ५ नोव्हेंबर १९८९ साली ज्येष्ठ रंगकर्मी केशवराव मोरे दिग्दर्शित ‘बेबंदशाही’ हे नाटक रंगभूमीवर आले.

वि. रा. परांजपेसरांच्या प्रेरणेने माधुरी भागवत दिग्दर्शित मालती जोशी लिखित १२ स्त्रियांच्या ताफ्यासह रंगभूमी दिनाला शताब्दी वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शुक्रवार, ५ नोव्हेंबर १९९३ रोजी ‘संगीत महिला मंडळ’ हे नाटक रंगायतनमध्ये सादर झाले.

नाट्याभिमानी शशी जोशी यांना नाटकातील छोट्या छोट्या प्रवेशात कधीच समाधान वाटले नाही. राम गणेश गडकरी स्मृतिदिनानिमित्त त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘संगीत एकच प्याला’ हे नाटक रविवार, २३ जानेवारी १९९४ रोजी रंगमंचावर आणले. सगळ्यांचा आनंद, उत्साह ओसंडून वाहत होता. एव्हढ्यावर थांबणारे शशी नव्हतेच. लगेच पुढील वर्षी म्हणजेच सोमवार दिनांक २३ जानेवारी १९९५ रोजी ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ हे नाटक त्यांनी रंगभूमीवर आणले.

आचार्य अत्रे जन्मशताब्दीनिमित्ताने शासनाने नाट्यदर्पणच्या सहकार्याने शनिवार दिनांक २७ डिसेंबर १९९७ रोजी नाट्यस्पर्धा आयोजित केली होती. त्यावेळी वि. रा. परांजपे दिग्दर्शित ‘लग्नाची बेडी’ हे नाटक स्पर्धेला उतरले होते. त्याही नाटकाला दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. त्यानंतर पुन्हा वेगळ्या संचात ‘संगीत एकच प्याला’ हे वि. रा. परांजपे दिग्दर्शित नाटक रंगमंचावर सादर झाले.

राम मराठे स्मृतिसमारोहात १५ नोव्हेंबर २००८ रोजी यतीन ठाकूर दिग्दर्शित ‘मत्स्यगंधा’ हे नाटक रंगभूमीवर आले. अतिशय उत्कृष्ट झालेले हे नाटक रसिकांच्या कौतुकाचा विषय ठरला.

या नाट्यप्रवासात ‘एकच प्याला’ चे सात/आठ प्रयोग झाले. तर ‘लग्नाची बेडी’, ‘सं. मत्स्यगंधा’ या नाटकांचे दहा-बारा प्रयोग झाले व इतर नाटकांचे चार-पाच प्रयोग झाले.

वरील नाटकांमधून मुरब्बी कलाकारांनी व हौशी कलाकारांनी कामे केली यांत शशी जोशी, माधुरी भागवत, अरुण वैद्य, लीलाधर कांबळी, राजू पटवर्धन, माधव जोशी, यतीन ठाकूर, मधुवंती दांडेकर, मोहन दांडेकर, विलास भणगे, सुमित्रा जोगळेकर, मेघना साने, सतीश आगाशे, विद्या साठे, मोहन पवार, धनंजय जोशी, किशोर कानडे, प्रकाश चितळे, वंदना परांजपे, रवी पटवर्धन, उर्मिला वैद्य, आशा जोशी, वृषाली राजे, पद्मा हुशिंग, मृदुला मराठे, वासंती सोमण, प्रतिभा कुलकर्णी, शोभना शेंबेकर, कलिका खटावकर, प्रिया मराठे, गोविंद केळकर, जगन्नाथ केळकर, माधव धामणकर, वामन गोडबोले, अनघा परांजपे, मिलिंद सफई, मुकुंद मराठे, अपर्णा अपराजिता, मृणाली मयुरेश, प्रशांत काळुंद्रेकर, गिरीष घाग, सुहास जोशी, अरविंद पिळगावकर, प्रबोध कुलकर्णी, श्रीकांत सौंदतीकर, सीमा रसाळ.

हौशी कलाकार हळूहळू मोठे झाले. नावारूपास आले व आपापली कला सादर करू लागले. त्यात प्रामुख्याने यतीन ठाकूर, मेघना साने, प्रिया मराठे या कलाकारांचा उल्लेख करावा लागेल.

याबरोबर ही संस्था राम गणेश गडकरी स्मृतिदिन, मामा पेंडसे स्मृतिदिन, दिवाळी पहाट, नाट्य संमेलनाध्यक्षांच्या प्रकट मुलाखती, नाट्य प्रशिक्षण शिबीर यांसारखे छोटे-छोटे कार्यक्रम करीत असते.

संगीतभूषण पं. राम मराठे यांची ठाणे ही कर्मभूमी. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेली २२ वर्ष ५ दिवस ७ सत्रांमध्ये चालणारा शास्त्रीय संगीताचा महोत्सव संस्था करीत आहे. या महोत्सवात आजवर देशातील सर्व दिग्गज शास्त्रीय, गायक, वादक, नृत्यकलाकार यामध्ये हजेरी लावत आहेत.

ज्येष्ठश्रेष्ठ कलाकार जसराज परवीन सुलताना, शोभा गुर्टु, सुरेश तळवलकर, किशोरी आमोणकर, शैलेश भागवत, राजन-साजन मिश्रा, गुंदेचा बंधु, अर्चना जोगळेकर, विजय घाटे, डॉ. मंजिरी देव, डॉ. विद्याधर ओक, देवकी पंडित, विश्वमोहन भट्ट, प्रभाकर जोग, दिनकर पणशीकर, उपेंद्र भट, पं. भीमसेन जोशी, हरिप्रसाद चौरसिया, पं. कलापिनी कोमकली, पं. मुकुंदराज देव या दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केली आहे. तसेच अनेक नवोदित कलाकारांना आपण संधी देऊन त्यांना प्रेरणा देत आहोत.

संस्थेची उभारणी करण्यात पुढाकार घेणारे वि. रा. परांजपे यांचे निधन झाले ७ ऑगस्ट २००५ रोजी व दुसऱ्याच दिवशी ८ ऑगस्ट २००५ या दिवशी सन्मित्रकार स. पां. जोशी यांचे निधन झाले. त्यानंतर श्रेष्ठ रंगकर्मी केशवराव मोरे हे अध्यक्षस्थानी आले. संस्थेने त्यानंतर जवळजवळ १० वर्षे वि. रा. परांजपे स्मृतिदिन साजरा केला. त्यात वेगवेगळ्या कलाकारांची भावगीते नाट्यसंगीत, सुगम संगीत असे कार्यक्रम सादर केले. ६-८-२००९ रोजी कथ्थक, कुचिपुडी, भरतनाट्यम् या शैलीचे सादरीकरण करणारा भक्ती-भावसंगम हा कार्यक्रम सादर केला, तर आता द्विपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करीत आहोत.

२००७ साली प्रथमच अ.भा.मराठी नाट्य परिषद मुंबई यांनी एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले. राजेश राणे दिग्दर्शित ‘सायली पेंडसे-ब्रिस्टो’ ही एकांकिका ठाणे शाखेने सादर केली. यात अभिनयासाठी पल्लवी वाघ हिला प्रथम व सतीश आगाशे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. अ.भा.म. नाट्य परिषद मुंबईतर्फे एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

१८ नोव्हेंबर २०१४ रोजी हौशी राज्य नाट्यस्पर्धेत आपण भाग घेतला. क्षितिज झारापकर लिखित दुर्गेश आकेरकर दिग्दर्शित ‘मस्तानी’ हे नाटक सादर करण्यात आले. प्राथमिक फेरीत ठाणे केंद्रातर्फे प्रथम क्रमांक तर मिळालाच, शिवाय इतर ५ बक्षिसेही मिळाली. या नाटकात एकूण २७ कलाकार होते.

याबरोबरच परिषदेतर्फे दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर द्विपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यालाही भरभरून प्रतिसाद मिळतो.

जनकवी पी. सावळाराम यांचे २०१३-१४ हे जन्मशताब्दी वर्ष होते. त्यावेळी पी. सावळाराम यांच्या गाण्याच्या स्पर्धांचे आयोजन केले होते. प्राथमिक फेरी नाशिक, सांगली, पुणे, ठाणे येथे घेऊन अंतिम फेरी ठाण्यात घेतली गेली. उदंड प्रतिसादात ३५० स्पर्धकांनी यात भाग घेतला.

एक विचाराची माणसे एकदिलाने काम करू लागली की एकात्मता निर्माण होऊन भरीव कार्य होऊ शकते. हे नाट्य परिषद ठाणे शाखेच्या प्रवाहात डोकावताना समजू लागते.

९६वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने भूतकाळात रमता-रमता वर्तमानकाळ कसा येत गेला ते कळलेच नाही.

परिषदेचा हा प्रवास असाच अखंड चालू राहणार असून नवनवीन छोटा-छोटी पावले मोठ्यांचे बोट धरून त्यांच्या पावलावर पावले टाकत असेच चालत राहणार, चालतच राहणार आणि या न संपणाऱ्या आनंदी प्रवाहाच्या डोहात तरगंत राहणार, स्वत मनमुराद डुंबत दुसऱ्यालाही आनंद देत राहणार!

— आशा जोशी – 9869 00 9917

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..