लक्ष्य फाउंडेशन’तर्फे अनुराधा प्रभुदेसाई यांचा वीर जवान आणि सामान्य नागरिक यांच्यात एक मैत्रीचा पूल बांधण्याचे काम
तेथे कर माझे जुळती…
१९९९ मध्ये भारताला पाकिस्तान या शेजारी राष्ट्राबरोबर युद्धाला सामोरे जावे लागले. हिमालयाच्या १८००० फूट उंचीच्या शिखरावर- भारत- पाक सीमेवर- कारगिल येथे, हाडं गोठविणार्या थंडीत आमच्या जवानांनी शर्थीने युद्ध केले आणि भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आपले प्राण हसत हसत दिले. अर्थातच भारतीय सेना अजेय ठरली. ‘ऑपरेशन विजय’ या नावाने ओळखले जाणारे हे कारगिलचे युद्ध म्हणजे सैन्यदलाच्या बेजोड बलिदानाचा, उच्च मनोबलाचा आणि देदीप्यमान त्यागाचा इतिहास आहे! त्याचे प्रत्येक पान सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले पाहिजे!!
या कारगिलवीरांची शौर्यगाथा सांगणारा एक तेजस्वी, ओजस्वी दृक्श्राव्य कार्यक्रम पुणे येथील ‘लक्ष्य फाउंडेशन’तर्फे अनुराधा प्रभुदेसाई हा कार्यक्रम सादर करतात. सरहद्दीवर लढणारे आमचे वीर जवान आणि सामान्य नागरिक यांच्यात एक मैत्रीचा, सौहार्द्राचा पूल बांधण्याचे काम लक्ष्य फाउंडेशनने हाती घेतले आहे. भारतमातेच्या मुला-मुलींमध्ये देशभक्तीची भावना विविध कार्यक्रमांद्वारे निर्माण करणे, हा या फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे. दृक्श्राव्य माध्यमातून वीरांची यशोगाथा वर्णन करणे, विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षणासाठी व सैन्यदलात प्रवेशासाठी प्रोत्साहित करणे, सैन्यदलात प्रवेश घेतलेल्यांचा सत्कार करणे, जवानांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून आवश्यकतेनुसार मदत करणे, सणांच्या दिवशी जवानांना शुभेच्छापत्रे, खाऊ पाठवणे, आपल्याला त्यांची आठवण आहे हे दर्शवणे, असे बरेच उपक्रम लक्ष्य फाउंडेशनतर्फे हाती घेतले जातात.
अनुराधा प्रभुदेसाई म्हणजे एक असामान्य स्त्री
भविष्यात ‘वीरभवन’ पुण्यात बांधायचे आहे.एक अशी संस्था, जिथे तरुणांना सैन्यात प्रवेश घेण्यासाठी प्रेरणा, मार्गदर्शन व मदत दिली जाईल. या फाउंडेशनच्या संस्थापिका अनुराधा प्रभुदेसाई म्हणजे एक सर्वसामान्य स्त्री(खरे तर त्या असामान्य स्त्री आहेत). २००१ मध्ये लेह-लडाखला सहलीला गेल्या असताना कारगिल येथील विजय स्मारक पाहिले. त्यावरील नावे व शहीद सैनिकांची वयं वाचताना त्या गलबलून गेल्या. विशी-पंचविशीत ते शहीद झाले, हे पाहून त्यांचे आईचे हृदय कळवळले. हे जवान इथे मरत होते तेव्हा आपण मुंबईत काय करत होतो, या प्रश्नाने त्यांना अंतर्मुख केले. कारगिलमधील भौगोलिक परिस्थिती, विषम हवामान, -६० अंश से. पर्यंत गोठवणारे तापमान या सार्याशी सामना करीत आपले जवान तिथे देशासाठी कसे काम करीत, हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले, अनुभवले आणि भारतातल्या सामान्य लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचवण्याची शपथ त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी घेतली.
आता तिथले सगळे जवान म्हणजे अनुताईंची मुलेच आहेत. त्यांना ते सगळे अनुताई, अनुमावशी म्हणूनच ओळखतात. त्यांच्या कुटुंबीयांशीदेखील त्या संपर्कात असतात. व्हॅलेंटाईन डे देशात साजरा झाला तेव्हा जवानच माझा व्हॅलेंटाईन म्हणून जवानांसाठी शुभेच्छापत्रे, विविध शाळांधल्या मुलांकडून तयार करून घेऊन सीमेवर पाठविली. राखी पौर्णिमेला राख्या, दिवाळीत फराळ जवानांसाठी पाठवला जातो. दरवर्षी त्या ३०-४० जणांचा ग्रुप घेऊन कारगिलला जातात. जवानांनाही अशा भेटीचे अप्रूप असते. अशा अनुताई, कारगिल हीरोज्वरील प्रस्तुत दृक्श्राव्य कार्यक्रम अशा आवेशाने सादर करतात की ऐकणारा, पाहणारा देशप्रेमाने प्रेरित होतो.
जवानांविषयी प्रेम, कृतज्ञता आणि गौरव मनात दाटून येतो. जीवन कसे जगावे, यापेक्षा ते देशासाठी कसे झुगारावे, हे सांगणार्या वीरांच्या या कथा! ‘या तो तिरंगा लहराके आऊँगा या तिरंगे में लपेट के आऊँगा’ असे कोवळ्या कॅप्टन विक्रम बात्रांचे उद्गार ऐकून ऊर अभिमानाने भरून येतो. अशा नऊ वीरांच्या कथा सांगणार्या छोट्या पुस्तिकाही त्यांनी काढल्या आहेत व शाळांमधील मुलांना त्या विनामूल्य वाटतात. या कार्याने अनुताई पुर्या झपाटल्या गेल्या आहेत. वेगवेगळ्या शाळांमध्ये, कॉलेजमध्ये व ऑफिसेसमध्ये तसेच सामाजिक संस्थांमध्ये हा तेजोमय कार्यक्रम त्या सादर करतात. त्यांच्या या कार्याची दखल सैन्यदलाने घेतली असून, २०१० व २०११ मध्ये द्रास येथील ‘विजय दिवस’ समारंभासाठी त्यांचा खास आमंत्रितांमध्ये समावेश होता. त्यांना स्मृतिचिन्हही प्रदान करण्यात आले आहे. कारगिल मेमोरियलला पुष्पचक्र वाहण्याचा मान त्यांना प्राप्त झाला आहे. ज्यांना त्यांना मदत करायची असेल त्यांनी सत्याग्रहीच्या माध्यमातुन संपर्क साधावा.
हे व्यर्थ न हो बलिदान
नायक कुंडलिक माने हे १४ मराठा लाईट इन्फंट्रीचे काश्मीरमध्ये जवान जिवाची बाजी लावून लढताहेत. जम्मू-काश्मीरच्या पूछ विभागातल्या सरला चौकीजवळ जवळ गस्त घालणाऱ्या सहा जवानांवर पाकिस्तानी लष्कराच्या तुकडीने हल्ला केल्यामुळे आपले पाच जवान साल २०१५ मध्ये शहीद झाले.या मध्ये ४ जवान २१ बिहार बटालियनचे होते आणि नायक कुंडलिक माने हे १४ मराठा लाईट इन्फंट्रीचे होते.या हल्यामुळे माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.याच भागात मी माझी बटालियन ७ मराठा लाईट इन्फंट्री बरोबर पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी थाम्बावयाचे काम १९९५-१९९८ सालामध्ये केले होते. बटालियनला केलेल्या कामगिरी बद्दल १७ शुरता पुरस्कार मिळाले.हे करताना आमचे तिन जवान शहिद झाले. काय अर्थ आहे नायक कुंडलिक माने यांच्या बलिदानाचा?
सीमांचे संरक्षण करत असताना भारतीय सैन्य कायमच शीर तळहाती घेऊन वावरत असते आणि आपले कर्तव्य बजावताना कोणत्याही क्षणी प्राणांचे मोल द्यायला तयार असते, हे नायक कुंडलिक माने यांच्या बलिदानाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. कुंडलिक तू खरोखरच वीरमरण पत्करलेस. ती लढाई अत्यांत अटीतटीची आणि तीव्र होती. तुझ्या गौरवास्पद बलिदानाचा विचार मी करू लागलो आणि दुःख, अस्वस्थता, निराशा, अभिमान अशा सर्वच भावनांनी मनात गर्दी केली. काय हे अर्थ आहे. तुझ्या बलिदानाचा? तुझ्या त्यागाचा ? एका लहानशा खेड्यातला तुझा जन्म. तू लष्करात भरती झालास. का निवड केलीस तू लष्कराची ? नोकरी मिळवण्यासाठी, तेवढेच एक उत्तर नक्कीच नाही. कुटुंबातील पार्श्वभूमी, देशप्रेम या अनेक कारणांमुळे तू लष्करात दाखल होण्यास प्रेरित झालास? आज मात्र तू या जगात नाहीस. राष्ट्रसेवेच्या साऱ्या स्वप्नांनी धगधगणारी तुझी छाती आता कायामची थंडावलीय.
एखाद्या राष्ट्रीय स्मारकावर आम्ही तुझे नाव कोरून ठेवणार नाही कारण आम्ही अजून तसे स्मारकच उभारले नाहीये. तुझ्यासारख्याच अनेक वीरपुत्रांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योती इंडया गेटवर जळते आहे, पण त्याच इंडिया गेटवर तुझे नाव मात्र आम्ही कोरणार नाही. कारण त्यावर ब्रिटिशांसाठी लढलेल्या तत्कालिन जवानांची नावे आहेत. यापेक्षा विरोधाभास ते कोणता. पण अगदीच काही निराश होऊ नकोस. तुझे लष्करी सहकारी नक्कीच तुझी कदर करतील. काश्मीर खोऱ्यातून तुला निरोप देताना सर्वात ज्येष्ठ अधिका्र्यानी तुला अन्य अधिकाऱ्यांसह मानवंदना दिली. तुझ्या युनिटचे प्रतिनिधीनी तुला घरी पोहचवले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या तिरंग्यासाठी तू तुझे प्राण वेचलीस त्या छतात लपेटूनच तुझा देह अंतिम संस्कारासाठी नेला गेला.तुझ्या अन्तदर्शनाला ऊसळलेला जनसागर या आधी कधिच बघितला नव्हता. तुझ्या वडील,आई, पत्नी मुलाच्या दुःखभरल्या डोळ्यातून अखंड वाहणारी आसवे आणि तुझ्या अकाली जाण्याने प्रचंड धक्का बसलेले आणि दिग्मूढ झालेले तुझे कुटुम्ब यांना पाहून पाषाणालाही पाझर फुटला. कालांतराने तुझी पत्नीला शौर्य पदक दिले गेले आणि अत्यंत गर्वाने तुझ्या घरांत ते ठेवले आहे.
तुझ्यासारखेच अनेक जवान कारगिलच्या भूमीवर धारातीर्थी पडले. परंतु आज त्या अत्यंत पराक्रमी जवानांचा साधा स्मृतिदिनदेखील साजरा करणे या देशवासीयांना जमत नाही. त्या अत्यंत वीरश्रीपूर्ण लढाईची आठवणही दरवर्षी योग्य त्या पद्धतीने केली जात नाही. “शौर्य गाथा भवन” मध्ये तुझे नाव अमर राहील मात्र तुझे युनिट १४ मराठा लाईट इन्फंट्री आणि तुझ्या रेजिमेंटमध्यो तुझे नाव चिरकालासाठी कोरुन ठेवले जाईल. युनिटच्या क्वार्टर गार्डवर देखील तुझे नाव येऊन दरवर्षी तुला आदरांजली वाहिली जाईल. तुझे फॉर्मेशन हेडक्वार्टर आणि रेजिमेंटल सेंटरमध्ये तुझे नाव अभिमानाने झळकत राहील. बेळगाव येथील मराठा लाईफ इन्फंट्री रेगिमेन्ट्ल सेन्टर प्रशिक्षण केंद्रावरील “शौर्य गाथा भवन” मध्ये तुझे नाव राहील. सेवेत दाखल होण्याआधी प्रत्येक जवान तुला या भवना मध्ये येऊन वंदन करेल. काही वर्तमानपत्रांमध्ये तुझ्या सहकाऱ्यांकडून तुझ्या नावे शोकसंदेशही छापला जातो. अनेकजण त्याकडे दुर्लक्षच करतात. मात्र लष्करी गणवेश ज्यांनी अनुभवला आहे. ते आणी सर्व राष्ट्रप्रेमी नागरिक मात्र हा संदेश अत्यांत तपशीलात वाचतात. त्यांना तुझ्याविषयीच्या अभिमानाने भरुन ्येतो. आयुष्याच्या संध्याकालाकडे झुकताना तुझ्या शौर्याच्या आणि धाडसाच्या आठवणी ही तुझ्या मातापित्यांकडची सर्वात मोठी ठेव असेल. तुझ्या सहवासातील क्षण त्यांच्याकरता सर्वात अनमोल असतील. तुझी प्रिय आई तुझा विचार जेव्हा जेव्हा करेल, तेव्हा तेव्हा तिचे डोळे भरून येतील. मात्र तिच्या त्या अश्रूभरल्या डोळ्यात तुझ्या विषयी तुझे वडील कदाचित धीर गंभीरपणे तुझ्याविषयी बोलत राहतील. मात्र त्या धीरोदात्त संवादातही त्यांची अभिमानाने फुलून आलेली छाती कुणाचाच नजरेतून सुटणार नाही. तुझे नातेवाईक, भावंडे, तुझा गाव आणि परिसर यांच्यासाठी तू कायामच एक रिअल हिरो बनून राहशील. गावातल्या एखाद्या चौकाला किंवा रस्त्याला “शहीद कुंडलिक माने मार्ग” असे नाव दिले जाईल. गावकऱ्यांच्या तोंडी तू एक दंतकथा बनून राहशील अजरामर होशील. तू आमच्यातून निघून गेलास. तू प्राणत्याग केलास कारण तुझे कुटुंबीय, तुझे मित्र, तुझे सहकारी या सर्वांनाच अगदी खात्रीच होती, की वेळ येईल तेव्हा तू मागे हटणार नाहीस. आपले कर्तव्य बजावताना प्राणांचेही मोल देत तू त्या साऱ्यांचा विश्वास खरा ठरवलास, कुंडलिक आपल्या कर्तव्यापेक्षा खूपच अधिक मोलाचे काम तू करुन दाखवलेस. तू असे तसे मरण पत्करले नाहीस. तुझे बलिदान व्यर्थ नक्कीच नाही. ईश्वर आणि सैन्य सर्वांच्याच आदराचा विषय !! मात्र केवळ संकटकाळीच, एकदा का संकट टळावे मग देवाकडे दुर्लक्ष आणि सैन्याचा तर विसरच.
— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
Leave a Reply