प्रस्तावना –
महर्षी वाल्मिकींचे आदिकाव्य रामायण सर्वपरिचित आहे. या आदिकाव्यापासून प्रेरणा घेऊन विविध कवींनी आपापल्या प्रतिभेला अनुसरून विविध रामायणांची निर्मिती केली असल्याचे दिसून येते.संस्कृत भाषेतील आनंद रामायण,अगस्त्य रामायण, तमिळ भाषेतील कंब रामायण, तुलसीदासांचे हिंदी भाषेतील तुलसी रामायण,बंगाली भाषेतील कृत्तिवास रामायण ही त्याची काही उदाहरणे.
परमेश्वराच्या ठिकाणी भक्तीभाव कसा ठेवावा याचे मार्गदर्शन करणारा ग्रंथ म्हणून अध्यात्म रामायणाचे विशेष महत्व आहे. यामध्ये रामायणाच्या कथानकातच प्रसंगानुरूप रामाच्या तत्वज्ञानात्मक रूपाचे वर्णन केलेले दिसून येते.ब्रह्मांड पुराणाचा एक भाग असलेल्या अध्यात्म रामायणात ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय झालेला दिसून येतो.यालाच अध्यात्मरामचरित किंवा आध्यात्मिक रामसंहिता असेही म्हणतात.या ग्रंथाची ७ कांडे आणि १५ सर्ग आहेत.
अध्यात्म रामायण ब्रह्मांड पुराणाचा भाग असले तरी त्याचा कर्ता कोण याविषयी अभ्यासकात मतभेद आहेत. १४ व्या शतकातील रामानंद हे त्याचे कवी असावेत असा काहींचा कयास आहे.( संदर्भ -Dhody Chandan Lal, 1995, The Adhytma Ramayan,M.D. Publications PVT.LTD.)
अध्यात्म म्हणजे आत्म्याविषयीचे ज्ञान.सर्व विश्वाला व्यापणारे अव्यक्त अविनाशी तत्व कोणते त्याचा विचार करणे म्हणजे अध्यात्मशास्त्र.ईश्वरस्वरूपाची ओळख करून घेणे म्हणजे अध्यात्म. या ग्रंथात श्रीराम हे सर्व जगाचे आदिकारण आहेत आणि भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी रामावतार घेतला आहे अशी या रामकथेचा मुख्य आशय असल्याने तिला अध्यात्म रामायण असे नाव दिले आहे.
या ग्रंथात रामायण कथेच्या ओघातच यथाक्रमाने श्रीरामाच्या आध्यात्मिक स्वरूपाचे वर्णन आलेले दिसते.ते असे-
पृथ्वीचा भार हरण करण्याची विनंती देवांनी महाविष्णूना केली आणि त्यानुसार मायेने मनुष्यावतारात रामांनी जन्म घेतला.भगवान शंकर पार्वतीला म्हणाले-“ रामाठायी भक्ती हेच संसार तरण्याचे साधन होय.राम श्रेष्ठ असूनही मायेने वेढलेल्या स्वत:च्या स्वरूपाची त्याला जाणीव नव्हती. वसिष्ठांनी त्याला ती जाणीव करून दिली.”
अध्यात्म रामायणाच्या कथानकात वाल्मिकी रामायणापेक्षा काही वेगळेपण आहे.-
१. वाल्मिकी रामायणाचे गायन राम-सीतेचे पुत्र लव-कुश यांनी केले आहे, तर अध्यात्म रामायण हे भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितले आहे.
२.रामजन्माचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे की रावण वा त्याचा भाऊ कुंभकर्ण यांनी देवांना त्रास दिला. मनुष्याच्या हातूनच रावणाचा वध होईल अशी ब्रह्मदेवाची योजना होती वा त्यासाठीच विष्णूने रामावतार घेतला.
३. विश्वामित्रांनी राम व लक्ष्मण यांना मिथिलेला नेले.जनक राजाने आपली कन्या सीता हिच्या स्वयंवराची सोज्ना केली होती. भगवान शिवाचे धनुष्य जो कोणी उचलेले आणि त्याला प्रत्यंचा लावेल त्याला सीता माळ घालेल असा स्वयंवराचा पण होता. सीता स्वयंवराचे असे आख्यान अध्यात्म रामायणात नाही. रामाने जनकाच्या नगरीत जाऊन तेथे असलेले शिवधनुष्य सहज पेलले आणि जनकाने या पराक्रमी युवराजाला आपली कन्या सीता विवाहपूर्वक दिली. धनुष्य तुटलेले समजल्यावर भगवान परशुराम, मिथीलेहून अयोध्येच्या वाटेवर परत जाणा-या दशरथ आदि सर्वांना रागाने सामोरे गेले. प्रथम रामाविषयी त्यांनी आपला क्रोध व्यक्त केला परंतु नंतर मात्र श्रीरामाचे स्व-रूप लक्षात येताच त्यांना शरण जावून त्यांची स्तुती केली.परशुराम म्हणाले-“ तुझ्या भक्तांची संगती वा तुझ्या चरणी दृढ भक्ती मला सदा लाभो. जो हे तुझे स्तोत्र म्हणेल त्याला भक्ती, विज्ञान वा अंतकाळी तुझे स्मरण लाभो.”
४. वाल्मिकी रामायणात राजा दशरथाला युद्धात कैकेयीने वाचविले. त्यानंतर प्रसन्न होवून दशरथाने कैकेयीला वरदान दिले होते. त्या वरदानाचा उप्तोग करून रामला वनवासाला पाठविणे आणि भरताला राज्याभिषेक करणे यासाठी कैकेयीने राजा दशरथाकडे वर मागितला. या घटनेला एक नाट्यमय वळण अध्यात्म रामायण देते- तो प्रसंग असा- देवांनी सरस्वतीला आज्ञा केली की तू प्रयत्नपूर्वक भूलोकी अयोध्येला जा आणि राम राज्याभिषेकात विघ्न आण. त्यासाठी मंथरा आणि कैकेयी यांच्या शरीरात तू प्रवेश कर. सारांश, कैकेयीला वरदान आणि तिचे रामाविषयी निष्ठुर वर्तन हे सर्व देवांनीच घडवून आणले.
५. रावणाचे आत्मगत चिंतन हे या रामायणाचे एक वैशिष्ट्य ! राम हा मनुष्य नसून परमेश्वरच असावा. त्यामुळे त्याच्याकडून मी मारला गेलो तर वैकुंठाच्या साम्राज्याचा मालक होईन. भगवान माझ्यावर भक्तीने प्रसन्न होणार नसेल तर विरोध बुद्धीने त्याच्याकडे जावे असा विचार रावणाने येथे केलेला दिसतो ! हा विचार रामाला समजल्यावर राम सीतेला सांगतात की रावण संन्याशाचे रूप घेवून आश्रमात येईल.
म्हणून तू तुझ्या आकाराची छाया आश्रमात ठेव आणि माझ्या आज्ञेने एक वर्षपर्यंत अग्नीत गुप्तरूपाने रहा. रामाचे वाचन ऐकून सीतेने तसेच केले. राम प्रत्यक्ष परब्रह्म आणि सीता प्रत्यक्ष योगमाया असल्याने याप्रकारची नाट्यमयता त्यांनीच कथानकाला दिली आहे.
६. ज्याप्रमाणे सीता स्वयंवर आख्यान या रामायणात नाही त्याप्रमाणे प्रसिद्ध अशा लक्ष्मणरेषेचा उल्लेखही यामध्ये नाही. मारीचाने कांचनमृगाचे रूप घेवून सीतेला मोहित केल्यावर श्रीराम त्याच्यामागे जातात , त्यावेळी श्रीरामांचा आवाज ऐकून सीता लक्ष्मणाला रामाच्या रक्षणासाठी जायला सांगते. त्यावेळी तिच्याच रक्षणाचा विचार करून लक्ष्मण जायला तयार होत नाही. सीतेच्या आग्रहाखातर लक्ष्मण एक रेषा काढतो वा कोणीही आले तरी ही रेषा ओलांडू नकोस असेही बजावले होते.अध्यात्म रामायणातील सीता लक्ष्मणाचा अपमान करून त्याचा धिक्कार करते आणि त्यामुळे काहीसा चिडलेला लक्ष्मण तिला तसेच सोडून रामाच्या मदतीला निघून जातो असा कथाभाग आहे.
या वा अशा अन्य घटनांच्या माध्यमातून रामाचे आध्यात्मिक वा अलौकिक रूप मांडले गेले आहे. ज्यामध्ये रामकथेतील विविध व्यक्तीनी रामाचे गुणवर्णन केले आहे.
या वा अशा अन्य घटनांच्या माध्यमातून रामाचे आध्यात्मिक वा अलौकिक रूप मांडले गेले आहे. ज्यामध्ये रामकथेतील विविध व्यक्तीनी रामाचे गुणवर्णन केले आहे.
जटायूच्या मृत्यूनंतर रामकृपेने त्याला दिव्यरूप प्राप्त झाले. त्यानंतर रामाची स्तुती करताना जटायू म्हणतो-“ हे रामा, तू जगाचे आदिकारण आहेस. तू असंख्य गुणांनी युक्त आहेस. तू भक्तांना वर देण्यात तत्पर आहेस. तू शेकडो सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेस.”
या रामायणामध्ये श्रीरामांनी शबरीला भक्तीची आणि लक्ष्मणाला ज्ञानाची साधने सांगितली वनवासाहून परत आल्यानंतर हनुमानाला प्रत्यक्ष सीतेने रामाचे स्वरूप सांगितले, त्याला ‘रामहृदय’ असे म्हटले जाते. त्याचे पठन जो करतो त्याची पापातून मुक्ती होते असे त्याचे फलही सांगितले आहे. योगमाया सीता सांगते-“राम हा सच्चिदानंदरूप आहे. ते गुणरहित,सर्वप्रेरक ,स्वयंप्रकाशी,पापरहित आहे. राम हा शोकरहित आहे.त्याच्या रूपात बदल होत नाहे.ते सृष्टीरूप भासतो ते मायेमुळेच.उत्पत्ती-स्थिती आणि लय करणारी आदिमाया मीच आहे आणि या रामायाणातील सर्व घटना मायारूपी सीतेनेच घडविल्या आहेत.”
शबरीला श्रीराम म्हणतात-“सज्जनसंगती, रामकथांचे श्रवण,त्याचे गुणगान करणे,आपल्या गुरूला रामस्वरूप मानून त्याची मनोभावे पूजा करणे,सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी रामालाच पाहणे, रामभक्तांची पूजा करणे , यम-नियम इ. चे पालन करणे ही भक्तीची साधने जो मनापासून आचरण करेल त्याला रामाच्या कृपेची प्राप्ती होईल.
लक्ष्मणाने केलेल्या विनंतीवरून रामाने त्याला ज्ञानाची साधने सांगितली ती याप्रमाणे-
रामभक्ताने दंभ, हिंसा यांचा त्याग करावा. निंदा सहन करावी.मनामध्ये चांगले विचार आणावेत.अहंकाराचा त्याग प्रयत्नपूर्वक करावा. रामाठायी अनन्यभक्ती ठेवावी.शरीर-मन- बुध्दीची शुद्धी असावी. असे आचरण केल्याने रामाच्या स्व-रूपाची प्राप्ती होईल वा भक्ताचे कल्याण होईल.
याच रामकथेमध्ये श्रीरामाने आपली पूजा कशी करावी हे ही सांगितले आहे. याला दशावरण पूजा असे म्हणतात.
या रामायणात गंधर्वाने केलेली रामस्तुती वैशिष्टपूर्ण आहे.- रामाचा देह म्हणजे ब्रह्मांड,पाताळ हे त्याचे तळवे,आकाश ही त्याची नाभी,अग्नी हे त्याचे मुख,सूर्य हे डोळे,चंद्र हा मन,यम ह्या त्याच्या दाढा,नक्षत्रे त्याचे दात,दिवस वा रात्र म्हणजे त्याच्या डोळ्यांची उघडझाप असे म्हणून श्रीराम हे सर्वव्यापी तत्व आहे असे म्हटले आहे.
या रामायणाच्या शेवटी भगवान शंकर म्हणतात-
अहं भवन्नाम गृणान्कृतार्थो वसामि काश्यामनिशं भवान्या |
मुमूर्षमाणस्य विमुक्तये S हं दिशामि मंत्रं तव रामनाम ||
मी (महादेव) तुझाच जप करीत काशीतच निवास करतो. मरणासन्न प्राण्याला मुक्तीसाठी तुझ्याच नावाचा उपदेश करतो.
वाल्मिकी रामायणाचा संदर्भ घेत परंतु रामाचे अलौकिक स्वरूप सांगण्याच्या प्रयत्नात अध्यात्म रामायणाने केलेले कथानाकातील बदल मुळातून वाचण्यासारखे आहेत. त्यानिमित्ताने एका वेगळ्या रामायणाचा परीच्या होईल आणि श्रीरामाच्या आध्यात्मिक रूपाची ओळख ही होईल.
— आर्या आशुतोष जोशी
संदर्भ ग्रंथ-
- (भाषांतर) देवस्थळी भालचंद्र शंकर,(प्रस्तावना) जोशी नरहर गणेश, १९२८, सार्थ श्रीमद् अध्यात्मरामायण,केशव भिकाजी ढवळे प्रकाशन.
- संपादक-जोशी महादेवशास्त्री , होडारकर पद्मजा,२०१० (पुनर्मुद्रण), भारतीय संस्कृती कोश, खंड २,( अं ते औक्षण), भारतीय संस्कृतीकोश मंडळ प्रकाशन.
- (Translation) Dhody chandan Lal,1995, The Adhyatma Ramayan,M.D. Publications Pvt, Ltd.
- Swami Tapasyanand, 1985,Adhyatm Ramayan( The spiritual version of Rama Saga) Sri Ramkrishna Math, Madras.