सध्या मराठीचे सर्व लिखाण, म्हणजे दैनिके, मासिके, पुस्तके आणि अतर सर्व प्रसार माध्यमातील मराठी मजकूर संगणकावरच टाईप केला जातो. संगणकीय संस्कारांना पर्याय नाही. म्हणून संगणकावर लिखाण करण्याचे ज्ञान, अनुभव आणि सवय यांची आवश्यकता भासू लागली आहे.
संगणकावर लिखाण करायचे तर त्याचा कीबोर्ड आणि आज्ञावली वापरण्याशिवाय गत्यंतर नाही. कीबोर्ड हा, संगणकाच्या सर्वच कारखानदारांनी अेकसूत्रता राखून प्रमाणित केला आहे आणि तो टाईपरायटरच्या कीबोर्डाशी बराचसा मिळताजुळता आहे.
मूलभूत कार्यवाही आज्ञावली म्हणजे ऑपरेटिग सिस्टिम ही संगणकाच्या अुत्पादकानेच संगणकात भरून ठेवली असते आणि त्यानुसार संगणक काम करीत असतो. आपल्या क्षेत्रातली विशिष्ट कामे संगणकाकडून करून घ्यावयाची असल्यास त्या त्या प्रकारच्या सॉफ्टवेअरच्या सीडी मिळतात, त्यातील सॉफ्टवेअर आपल्या संगणकावर बसवून घ्यावयाचे असते.
मराठी अक्षरप्रकार (फॉन्ट) आणि त्यांची आज्ञावली या बाबतीत मात्र सुसूत्रता नाही. मराठी माणसाच्या स्वभावाप्रमाणेच या आज्ञावल्या, अक्षरप्रकार आणि त्यांचे कळबोर्ड यांचे अेकमेकांशी अजिबात पटत नाही. त्यामुळे मराठी मजकूर, संगणकाद्वारे कुणाला पाठविला तर तो त्याला अजिबात वाचता येत नाही. याबाबतीत सुसूत्रता आणणे फारच निकडीचे झाले आहे.
कमीतकमी की (ठसे) आणि सोपी आज्ञावली वापरून जास्तीत जास्त मराठी शब्द लिहायची तडजोड केली तर पुढील पिढ्यांना त्याची सवय होआील.
इ, ई, उ, ऊ, ए, आणि ऐ साठी साधी आणि कॅपिटल कळा म्हणजे ‘की‘ ख्ऽब्छ असतात. या ६ स्वरांसाठी स्वतंत्र कळाही आहेत.
आ, ओ, आणि औ साठी, तसेच श्र, त्र, या जोडाक्षरांसाठी देखील स्वतंत्र कळा असतात. वास्तविक ही पाचही अक्षरे प्रत्येकी दोन कळा आणि कॅपिटल कळ वापरून देखील टाईप करता येतात, अॅ, आ, ऑ, ओ आणि औ या अक्षरांसाठी मात्र, अतर अक्षरांच्या बाराखडीसारख्याच दोन कळा वापरतात.
‘क‘ ला र्हस्व किवा दीर्घ वेलांटी लावली म्हणजे ‘कि‘ किंवा ‘की‘ होते तर त्याच प्रकाराने अ किवा आी का रूढ होअू नये? अु, अू, अे आणि अै ही अक्षरे देखील आपण स्वीकारू शकतो. इ, ई, उ, ऊ, ए आणि ऐ साठी स्वतंत्र कळा वापरल्या तर टाअपिगचा वेग वाढतो, पण हे स्वर, अतर अक्षरांसाठी असलेल्या कळा वापरूनदेखील टाअप करता येतात. अॅ, आ, ऑ, ओ, औ, अं आणि आं तर आपण स्वीकारले आहेतच. या स्वरांसाठी निराळी अक्षरचिन्हे नाहीत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ही ‘अ‘ ची बाराखडी फार पूर्वीच सुचविली आहे. त्याकाळी संगणक नव्हते. पण त्यांनी सुचविलेली ही बाराखडी आजच्या संगणकयुगात फार अुपयोगी आहे असे वाटते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या विपुल आणि चतुरस्त्र मराठी लिखाणात अ ची बाराखडीच वापरली आणि त्यावेळच्या मराठी मासिकांनी ती स्वीकारलीही.
इ. स. १९३० ते १९३७ या काळात श्री. सावरकरांचे ‘विज्ञाननिष्ठ निबंध‘ किर्लोस्कर मासिकात प्रसिध्द झालेत, त्यातही किर्लोस्कर मासिकाने अ ची बाराखडीच वापरली आहे. सह्याद्री मासिकात, फेब्रुवारी १९४८ च्या अंकात प्रसिध्द झालेल्या ‘विज्ञान आणि गुन्हेगार‘ या अहमदाबादच्या श्री. बाळ वासुदेव समुद्र यांनी लिहीलेल्या लेखातही अ च्या बारखडीचा वापर केला आहे. त्या काळच्या अतर अनेक लेखातही, विशेषतः पुण्याच्या मासिकातून, ही बाराखडी वापरली आहे. नंतर केव्हातरी ही बाराखडी मागे का पडली हे समजायला मार्ग नाही. मी, माझ्या सर्व मराठी लिखाणात अ च्या बाराखडीचाच वापर करतो. २००१ साली प्रसिध्द झालेल्या ‘बाळ गोजिरे नाव साजिरे‘, २००४ साली प्रसिध्द झालेल्या ‘अंडिया, भारत आणि हिदुस्थान‘ व ‘वाचणारा लिहीतो‘ या माझ्या पुस्तकातही अ च्या बारखडीचाच वापर केला आहे.
अ, आी, अु, अू, अे, अै, अशी अक्षरे वापरल्यास कमी संगणकीय ठसे लागतील. म्हणजे उ, ऊ, इ, ई, ए, ऐ या कळा दुसर्या चिन्हांसाठी किवा जोडाक्षरांसाठी वापरता येतील. अंग्रजी कीबोर्डवरील ! @ # $ % ^ & * () _ + | वगैरे खुणा, मराठी फॉन्ट वापरूनच टाअप करता आल्या तर बराच वेळ अणि श्रम वाचतील. वाचणारे हे श्रम आणि वेळ, स्वतंत्र कळा वापरून वाचणार्या वेळेपेक्षा बराच जास्त आहे.
अॅक्शन, ऑगस्ट अशासारखे शब्द आता मराठीत वापरले जाताहेत. आणि ते आपण स्वीकारलेही आहेत. अंग्रजीच्या आक्रमणानंतर, मराठी स्वरमालेत अॅ आणि ऑ या स्वरांची भर घालण्याची आवश्यकता भासली. कारण ब्रिटिश राजवटीत ऑगस्ट, ऑक्टोबर, कँप, कॅप, बँक, कॅप्टन, ऑनरेबल वगैरे शब्दांच्या अुच्चाराची सोय करणे अपरिहार्य होते. चंद्रचिन्ह वापरून हा अुच्चार लिहीण्याची कल्पना ज्या कोण्या व्यक्तीने रूढ केली तिच्या प्रतिभेचे खरोखर कौतुकच केले पाहिजे. नाहीतर हे शब्द, आगस्ट, आक्टोबर, क्यांप, क्याप, ब्यांक, क्याप्टन, आनरेबल असे लिहावे लागले असते आणि पूर्वी ते लिहीलेही गेले आहेत. हिन्दीत कैम्प, कैप, बैंक, आगस्ट, अक्टूबर असे शब्द लिहीतात. पॉ चा अुच्चार प्वा असा करतात म्हणजे पॉअंट हा शब्द प्वाअंट असा लिहीतात. गुजराथी बांधव हॉल या शब्दाचा अुच्चार होल असा करतात तर स्नॅक या शब्दाचा अुच्चार स्नेक असा करतात.
ऋषी, पत्र, वृक्ष, प्रती, श्री, आर्य, हृदय, विद्या, विद्वान वगैरे शब्दातील जोडाक्षरांना पर्यायी संकेत निर्माण करावे लागतील. काही जुने अवघड संकेत मोडून नवे सुलभ संकेत घडविण्यास काय हरकत आहे? ‘ऋषि‘ अैवजी ‘रुशी‘ असे लिहीले तर अुच्चारात फारसा फरक पडत नाही. ऋ अैवजी रु वापरला आणि ष अैवजी श वापरला तर काही बिघडत नाही. काही वर्षांनी सवय होअून जाआील. अुषा आणि अुशा, कोष आणि कोश यातील फरक, संदर्भावरून सहज लक्षात येआील. प्रश्न, विश्व, बुद्धी, प्रसिद्धी अशा शब्दांशी आता जुळवून घ्यावे लागणार आहे. विश्वनाथ अैवजी विश्वनाथ, आणि श्रीधर अैवजी श्रीधर असे खपवून घ्यावे लागणार आहे.
बुध्दी आणि विद्वान हे शब्द काळजीपूर्वक अुच्चारा. तुमच्या चटकन लक्षात येआील की अुच्चारात, ‘द‘ अर्धा, तर ‘ध‘ आणि ‘व‘ हे पूर्ण आहेत पण लिहीतांना मात्र, द पूर्ण, तर ध आणि व अध र्े लिहीले गेले आहेत. बुद्धी आणि विद्वान असे लिहीणे जास्त बरोबर आहे. उत्पत्ती हा शब्द आता उत्पत्ती असा लिहावा लागणार आहे. अंग्रजी कळबोर्डावरील चिन्हांच्या कळा तशाच ठेवल्या तर सोयीचे होआील कारण त्या कळांवरच त्या कोरलेल्या असतात.
जोडाक्षरांबाबत, मराठी अक्षरचिन्हतज्ज्ञांनी जे बौध्दिक कौशल्य आणि प्रतिभा दाखविली आहे त्याला जवाब नाही, अक्षरशः माझे सलाम. प्र, क्र, कृ, र्क, ट्र, त्र, श्र, ध्द, द्व, ऋ वगैरे, तसेच ङ, ञ, ही अनुनासिके आणि अनुस्वार ही अक्षरचिन्हे शोधली आणि रूढ केली हे देवनागरी लिपीला फार मोठे योगदान आहे. संगणकाची आज्ञावली आणि अक्षरप्रकार याबाबतीत मराठी संगणकतज्ज्ञ आणि अक्षर शिल्पकार यांनी पुढाकार घेतला पाहिजे.
सध्या संगणकयुग सुरू झाले आहे. काही वर्षापूर्वीच्या अंग्रजी शब्दकोशातदेखील नव्हते असे शब्द आणि संज्ञा अस्तित्वात येत आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या अंग्रजी शब्दांचे अर्थ आणि संगणकशास्त्रात, त्या शब्दांना असलेला आशय हे पूर्णपणे भिन्न आहेत. अुदा. माअुस ही संज्ञा. त्या सर्वांना मराठीत योग्य प्रतिशब्द काढणे केवळ अशक्य आहे. ‘क्लिक’ ह्या शब्दासाठी योग्य मराठी शब्द शोधण्याचा बराच प्रयत्न केला. धबधबा, फटफटी, टकटक, टिकटिक, aqua हे जसे आवाजानुसार निर्माण झालेले शब्द आहेत, तसाच क्लिक हा शब्ददेखील आवाजानुसारच निर्माण झाला आहे. म्हणून तो तसाच वापरणे योग्य आहे.
गजानन वामनाचार्य,
१८०/४९३१, पंतनगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई ४०० ०७५.
०२२-२५०१२८९७, ९८ १९३४ १८४१
मंगळवार ८ फेब्रुवारी २०११.
Leave a Reply