नवव्या शतकापर्यंत श्री गणेशाची जपानला माहिती नव्हती. परंतू भारतीय तत्त्वज्ञानाबाबत त्यांना उत्सुकता होती. चीनी विचारवंतांकडून दिशा घेऊन भारतीय पध्दतीचा त्यांनी अभ्यास केला. कोबा डाइती याने प्रथम श्री गणेशाची स्थापना जपानमध्ये केली. चारही दिशांचा रक्षक म्हणून प्रसिद्ध असलेला श्री गणेश पुढे चीन प्रमाणेच गुढ विद्येचा स्वामी ठरला व त्यानंतर कोंगी तेन हा प्रकार जपानमध्ये सुरु झाला.
बावीस इंचापेक्षा जास्त मोठी मूर्ती जपानमध्ये आढळत नाही. काळ्या दगडावर सोनेरी रंगात काढलेल्या टाकोआ मंडलातील ही कलाकृती आजही डीनजे जी टाकोसन येथे आहे. यानंतर मात्र जपानमध्ये सर्वत्र श्री गणेशाची पूजा होऊ लागली.
या कलाकृतीत श्री गणेश हा चीन प्रमाणे विद्वान पंडितांच्या स्वरूपाप्रमाणे असला तरी जपानी तत्ववेत्यांनी स्वत: महा वै राजन या सूत्राचा अभ्यास करून त्याचे स्वरूप प्रकटलेले आहे. नेपाळ, चीन आणि तिबेट किंवा भारत येथे न आढळणारे हसमुख गणेश मूर्तीचे दर्शन जपान मध्ये घडते.
काबोडाई हा चतुर्भुज असून न आढळणारी आयुधे हातात आहेत. उजव्या बाजूस वरच्या हातात कुर्हाड तर दुसर्या हातात कुंभ, डाव्या हातात धनुष्य-बाण व एका हातात पुष्पमाला आहे. निळे डोळे, हसरा चेहरा व विद्वान पंडिता प्रमाणे शेंडी असलेली ही मूर्ती पुस्तकावर बसलेली आढळते. येथेच विद्येच्या स्वामीचे खरे दर्शन घडते.
।। ॐ गं गणपतये नम: ।।
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply