निसर्गाच्या विविध चमत्काराबरोबरच कॅनडातील मानव निर्मित कलाकौशल्ये पाहून आम्ही भाराऊन गेलो. विज्ञानाची कास धरत मानवाने केलेले अदभुत चमत्कार थक्क करून सोडणारेच होते. कॅपिलानो ब्रीज हे त्यापैकीच एक ! कॅपिलानो ब्रीज पहायला जायचय म्हणून कन्येने सांगितलं, तेंव्हा त्याबद्दल विशेष वाटले नाही. भारतात नदीवरील अनेक लहान-मोठे पूल पाहिले आहेत, असाच एखादा पूल असेल अशीच आमची कल्पना ! परंतु एखाद्या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय त्याच्याविषयी अनुमान काढणे म्हणजे निव्वळ मुर्खपणाच ! कॅपिलानो ब्रीजच्या बाबतीत माझे नेमके असेच झाले.
कॅपिलानो ब्रीज म्हणजे मानवी कौशल्याचा अद्भुत चमत्कार असल्याची अनुभूती आम्ही त्याला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर झाली. मती गुंग करणारीच ही स्थापत्य कला आहे. तिथले दृश्य पाहून निसर्गाच्या किमयेचे नि त्यात भर घातलेल्या कृत्रिम कल्पकतेचे कौतुक वाटले. कॅपिलानो सस्पेंशन ब्रिज, ट्रीटॉप्स अँडव्हेंचर आणि रोमांचक नवीन क्लिफवॉक अशा तीन चित्तथरारक सौंदर्याने मन भारावून गेले. इतिहास,संस्कृती आणि निसर्ग अद्वितीय आणि थरारक पद्धतीने ईथे प्रस्तुत केला आहे.
गोकाकच्या घटप्रभा नदीवर बांधलेला ब्रिटिश कालीन झुलता पूल मी पाहिला होता. शालेय जीवनात त्याचे तितकेच नवलही वाटले होते. तसाच हा कांहीसा प्रकार. परंतु त्याचं वेगळेपण आणि वैशिष्ट्य तो प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय लक्षात येत नाही. ब्रिटिश कोलंबिया राज्यातील उत्तर व्हॅंकुव्हर जिल्ह्यात कॅपिलानो नदीवरील हा पूल जगातलं आनखी एक आश्चर्य मानायला कुणाची हरकत असण्याचं कारण नाही. अरुंद अशा या पूलावरून केवळ पदयात्रीनाच जाण्याची मुभा आहे. 140 मीटर (460 फूट) लांब व नदीपासून 70 मीटर (230 फूट) उंचीवरील हा झुलता पूल पर्यटकांच आज आकर्षण बनला आहे. प्रतिवर्षी जगातील सुमारे आठ लाख पर्यटक या ठिकाणाला भेट देऊन एक वेगळा अनुभव पाठिशी घेऊन जातात.
कॅपिलानो ब्रीज शेजारच्या पार्किंगवर आमची गाडी येऊन थांबली.शेजारीच असलेल्या कौंटरवरून तिकीटे खरेदी केली नि रस्त्यापलिकडे असलेल्या कॅपिलानो नदीकडे आम्ही गेलो. पर्यटकांची लागलेली रांग पाहून कुतूहलात भर पडली. समोरच्या स्वागत कमानीने आमचे स्वागत केले, कमानीवरील सुंदर नक्षीकामातून कॅनडाच्या संसकृतीचे दर्शन घडले नि मनही मोहीत झाले. कांहीसे पुढे गेलो नि तो अद्भूत चमत्कार दृष्टीस पडला. बाळाला झोक्यात घालून झुलवावे, त्या प्रमाणे हा झुलता झुला पर्यटकांना हिंदोळ्या घालीत होता, साऱ्यांना एक अनोखा आनंद देत होता. पूलाच्या झोक्याबरोबर कांहीजण लटपटत होते, तर कांहीजण पूलावरील लोखंडी दोरखंडाचा आधार घेत पुढे-पुढे जात होते.
नदीच्या काठावरूनच ही गंमत पहाण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची ओढ लागली. धडधडत्या छातीनेच आम्ही पूलावर पाऊल टाकले. लोकांच्या पावलांच्या हालचालीबरोबर पूल झुलू लागला. एक वेगळा अनुभव घेत पूलाच्या हिंदोळ्याबरोबर लटपटणारी पावले सावरीत आम्ही पुढे, पुढे जाऊ लागलो.
पूलाच्या मध्यभागी आलो नि सहज खाली नजर गेली, त्याबरोबर छातीत धस्सsss झालं. नदी तुडूंब भरलेली नव्हती; परंतु पात्रातील पाण्याच्या पातळीचा अंदाज येत नव्हता. पाणी संथगतीने वाहत होते. दुतर्फा असलेल्या गर्द वृक्षांनी नदीची गहनता अधिक जाणवत होती. हिरव्यागार शेतातून सळसळत नागीन जावी, तशी वेडी-वाकडी वळणे घेत नदी वृक्षांच्या दाट गर्दीतून वाट काढीत पुढे, पुढे जात होती.
पूलाच्या दुतर्फा मजबूत जाळी असल्याने कुणी खाली पडण्याची शक्यता नाही. परंतु…..
‘पूलच खाली कोसळला तर…..?’
एक निरर्थक भिती मनात येऊन गेली. मजबूतीमुळेच कित्तेक वर्षापासून हा पूल पर्यटकांचे ओझे लिलया सहन करीत त्यांचे मनोरंजन करीत आहे, एक अनोखा आनंद देत आहे.
पूल पर्यटकांना झुलवत होता, सभोवारचा निसर्ग खिदळत होता. नजरेच्या टप्यापर्यंत सर्वत्र हिरवेगार, पर्नभारित उंच वृक्ष मन वेधून घेत होते ! फडफडत मुक्तपणे संचार करणारे पक्षी, निर्भयपणे फिरणारी हरणाची पाडसं….. सगळच कस नयनरम्य, मनाला खुलवणारं दृश्य ! त्याची छायाचित्रे कॅमेऱ्यात टिपत, झुलत्या पूलावरून झुलत 460 फूट लांबीचा पूलाचा टप्पा पार करून आम्ही नदीच्या दुसऱ्या काठावर येऊन पोहोचलो.पुढे जे कांही पहायला नि अनुभवायला मिळालं ते त्याहून वेगळ, मन तृत्प करणारं होतं.
ट्रीटॉप अॅडव्हेंचर
ट्रीटॉप अॅडव्हेंचरचा एक वेगळा अविस्मरणीय अनुभव आम्हाला इथे घेता आलाकॅपिलानो सस्पेन्शन ब्रीज पार्कमधील ट्री टॉप अॅडव्हेंचर हा एक नवखा प्रकार पर्यटकांना आनोखा आनंद देऊन जतो. टोलेजंग इमारतीत जीना चढून जाण्याचा अनुभव नवीन नाही. पण इथे आम्ही चढणार होतो झाडावर…. एका झाडापासून दुसऱ्या झाडाला जोडलेल्या जीन्यावरून….उंच, उंच ….. झाडाच्या शेंड्यापर्यंत ! एक आगळा आनंद देणारा अॅडव्हेंचरचा हा प्रकार!
पार्कमध्ये आकाशाला गवसणी घालणारे भव्य वृक्ष साऱ्यांचे लक्ष वेधून घेतातडॉग्लास-फर जातीचे हे वृक्ष 300 पेक्षाही अधिक वर्षे वयाचे असावेत असा अंदाज आहे. एका सरळ रेषेत उंच-उंच गेलेल्या या वृक्षांचा शेंडा जमिनीवरून नजरेस पडत नाहीमग या झाडांच्या शेंड्यापर्यंत चढून जाण्याची कल्पना हा एक कल्पना विलासच ठरावा.
परंतु इथे ही कल्पना वेगळ्या पध्दतीने साकार केलेली आहे. एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंत चढतापूल बांधून त्यावरून वरपर्यंत जाण्याचा हा प्रयोग उत्तर अमेरिका खंडात एकमेव असावा. 2004 मध्ये तो निर्माण करण्यात आला. एका वृक्षापासून दुसऱ्या वृक्षापर्यंत उंच-उंच नेणाऱ्या झुलत्या पूलांची ही मालिकाच आहे. सात झुलते पूल जुन्या उंच वृक्षांना वैशिष्ट्यपूर्णरित्या जोडले आहेत. पर्यटकांना 110 फूट (33.5 मीटर) उंचीपर्यंत या पूलावरून जाता येते. पूलाने जोडलेल्या वृक्षांसभोती प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले आहेत. त्यावरून सभोतालच्या निसर्गसौंदर्याचे निरिक्षण करता येते.
ट्रीटॉप अॅडव्हेंचर वॉक हा माझ्या जीवनातील एक अविस्मरणीय अनुभव होता. कॅपिलानो नदीवरील झुलतापूल पार करून आम्ही दुसऱ्या काठावर आलो. समोरच झाडाना जोडणाऱ्या पूलावरून गमतीजमती करीत, कॅमेऱ्यात निसर्गाची छायाचित्रे टिपीत जाणारे प्रवासी दिसले. त्याबरोबर हा आगळा अनुभव घेण्याची आम्हालाही उत्कंठा लागली. जोड पूलावरून एक वेगळा अनुभव घेत आम्ही जाऊ लागलो. पुढील वृक्षाच्या अधिक उंचीवर जाण्यासाठी पूलावरच बनविलेल्या पायऱ्यावरून वृक्षाभोवती बनविलेल्या निरिक्षण प्लॅटफॉर्मवर आम्ही जात होतो. एका ठिकाणी आम्ही 110 फूट उंचीपर्यंत जाऊन पोहोचलो. निरिक्षण प्लॅटफॉर्मवरून वर नजर टाकली, वृक्ष अजूनही बराच उंच होता. निसर्गाच्या किमयेला कृत्रिम कौशल्याची जोड मिळाल्याने त्याच्या सौंदर्यात अधिक भर पडली होती. सभोवार सहज नजर टाकली, निसर्गाने सर्वत्र सौंदर्याची लयलूट केली होती. वृक्ष पर्णभराने अलंकृत झाले होते, पानानी गजबजले होते. पानातून लपतछपत खाली येणारे सूर्यकिरण जमीनीवरील तलावातील जलतरंगाशी क्रीडा करीत होते. भर ऊन्हातही चांदण्यासारखी वाटणारी शीतलता मनाला उबारी देत होती. वृक्षांवर नाना रंगांच्या पक्षांचा चिवचिवाट सुरू होता. त्यात पूलावरून ये-जा करणाऱ्या पर्यटकांचा गलबलाट मिसळला होता. माझ्यासारख्या अननुभवी व्यक्तीला एवढ्या उंचीपर्यंत थेट झाडावरून चढणे अशक्य कोटीतली गोष्ट! कल्पकतेने तयार केलेल्या मानव निर्मित अनोख्या पूलामुळे झाडावर चढण्याचा आनंद तर लुटता आलाच; शिवाय निसर्गाची किमया वेगळ्या अंगाने निरखून पहाता आली. आता पुढचा प्रवास परतीचा होता. पुढे ट्री बॉटम वॉकिंग सुरू झाले. एक आगळा नि अविस्मरणीय अनुभव पाठिशी घेऊन आम्ही परत नदीच्या काठावर आलो.
क्लीफ वॉकिंग
नदीवरील झुलत्या पूलावरून आम्ही परत नदीच्या पहिल्या काठावर आलो. नदीचे पात्र एका खोल दरीसारखे आहे. नदीचा पहिला काठ उंच कड्यासारखा, अखंड खडकाचा बनला आहे. कड्यावरून चालत जाण्याचा रोमांचकारी अनुभव पर्यटकांना मिळवून देण्यासाठी क्लीफ वॉकिंगचा 2011 पासून एक नवखा प्रकार सुरू करण्यात आला आहे. कड्यवरून चालण्याची कल्पनाच अशक्य कोटीतील व स्वप्नवत वाटावी ! पण ती इथे वेगळ्या पध्दतीने साकार करून पर्यटकांना एक नवा एनुभव मिळवून दिला आहे. नदीच्या पहिल्या काठावर उंचचउंच कडा, कड्याला लागूनच जाणारा झुलता पूल, पूलाच्या खाली, खोल दरीसारख्या पात्रातून वाहत जाणारी नदी …… सगळच कस अशक्यप्राय वाटाव ! नदीकाठावरील उंच ग्रानाईटच्या नैसर्गिक कड्याला जोडून गेलेला झुलता पूल अभियांत्रिकी कलेचा एक आधुनिक नमुनाच आहे. क्लिफ वाकिंग पूलावरून आम्ही धडधडत्या छातीने चालत जाऊ लागलो. उजव्या बाजुला उंचचउंच कडा, पूलाखाली उजव्या बाजुला घोंघावत जाणारी नदी, त्यात झुलणारा पूल ……. मनात धडकी भरली. एक आगळा-वेगळा अनुभव घेत, निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटीत आम्ही पुढे-पुढे जात होतो. एका जागी पूलाला जोडून नदीच्या मध्यापर्यंत गेलेला निरिक्षण पॉईंट होता. एका विशिष्ट प्रकारच्या काचेच्या पारदर्शक फरशीवरून आम्ही त्या पॉइंटवर गेलो. पारदर्शक काचेमुळे खालून पहाणाऱ्याला आम्ही हवेतूनच चालत जात असल्यासारखे वाटावे. त्या पारदर्शक काचेवरून जाताना आमच्या छातीचे ठोके वाढले. “ओझ्याने काच फुटलीच तर थेट नदीच्या प्रवाहात जाऊन पडायचे !’
मनात निरर्थक विचार आला. अशाच प्रकारची काच टोरेंटो येथील सीएन टॉवरमध्ये आम्ही पाहिली होती. त्याच्यावर उड्या मारून तिच्या मजबूतीचा अनुभव घेतला होता. त्यामुळे भिती कांहीशी कमी झाली.
निरिक्षण पॉईंटवरून खाली नदीतील पाण्याकडे डोकाऊन पहिले. इथे नदीचे पात्र उथळ होते. त्यामुळे पाणी घोंघावत वेगाने खाली धाव घेत होते. समुद्रातील वादळाचा रुद्रावतार तिथे नव्हता; परंतु मानवी मनाला भेडसावणारी गती त्यात निश्चितच होती. नदीपलिकडचं दृश्य विलोभनीय होतं. हिरवेगार जुनाट वृक्ष स्पर्धा करीत आकाशाला गवसणी घालीत होते. मनातल्या संमिश्र भावनासह आम्ही पुढे जाऊ लागलो. 486 मीटर लांबीचा क्लिफ वॉकिंगचा टप्पा आम्ही पूर्ण केला. कड्याच्या माथ्यावर जाण्यासाठी बनविलेल्या पायऱ्यावरून वाटेतील गमती-जमती पहात आम्ही पहिल्या प्रवेशद्वारावर आलो. एव्हाना अचानक सुर्य ढगाआड लपला. पावसाला सुरवात झाली. लगबिगीने पार्किंगवर असलेली कार गाठली नि पुढच्या प्रवासाला लागलो.
इतिहास
कॅपिलानो ब्रीज, ट्री टॉप अॅडव्हेंचर आणि ल्किफ वॉकिंग या साऱ्याच गोष्टीनी मन प्रभावित झालं होतं. निसर्गाचा समतोल राखून वैज्ञानिक क्लृप्ती लढविलेली पाहून कौतुक वाटलं. त्यातून पर्यटकांच मनोरंजन करून कॅनडाने आपल्या कलाकौशल्याचं येथे प्रदर्शन घडविलं आहे. कॅपिलानो झुलत्या पूलाचा इतिहास मी जाणून घेतला. तो तितकाच मनोरंजक आहे. व्हॅंकुव्हरचे पार्क आयुक्त जॉर्ज ग्रॅंट मॅके नावाच्या स्कॉटिश अभियंत्याने 1889 मध्ये पूलाची निर्मिती केली. सुरवातीच्या काळात मजबूत तागाची दोरी व सीडर वृक्षाच्या फळीचा त्यासाठी वापर करण्यात आला होता. 1903 मध्ये एका मजबूत वायरने त्याची जागा घेतली. एडवर्ड महोन नावाच्या व्यक्तीने 1910 मध्ये कॅपिलानोचा झुलता पूल विकत घेतला. पुढे 1935 मध्ये मॅक इचर्नने महोन यांच्याकडून या पूलाची खेरीदी केली. त्यानी कुल चिन्ह कोरलेले विशिष्ट प्रकारचे लाकडी स्तंभ तिथल्या पार्कमध्ये उभा केले. आजही हे स्तंभ पार्कमध्ये दिसून येतात. 1945 मध्ये हेनरी ऑबेन्यु यांना त्याने पूल विकला. आता या पूलाची मालकी नॅन्सी स्टीबर्ड यांच्याकडे आहे. त्यांनी या पूलात मोठे परिवर्तन केले असून दिवसे दिवस पर्यटकांची गर्दी वाढत आहे. 2004 ला ट्री टॉप अॅडव्हेंचरची त्यात भर पडली. 2011 पासून “क्लिफ वॉकिंग’ चे अनोखे आकर्षण वाढले आहे, उत्तर अमेरिका खंडातील अशाप्रकारचं हे पहिलंच पर्यटन स्थळ आहे. पार्कने मानाचा पर्यावरण पुरस्कारही प्राप्त केला आहे.
चित्रपट व दुरदर्शन वाहिन्यांचेही कॅपिलानो झुलता पूल,कॅपिलानो ब्रिज पार्क,क्लिफ वॉक ब्रीज आकर्षण बनले आहे. मॅक गिव्हर, स्लायडर्स, दी क्रो, स्टेअर वे टू हेवन, साईक यासारख्या गाजलेल्या दूरदर्शन वाहिन्यांचे चित्रिकरण इथेच झाले आहे.
व्हॅंकुव्हरच्या उत्तर किनारपट्टीवरील पहाडी प्रदेशातून कॅपिलानो नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत जाते. व्हॅंकुव्हर प्रदेशातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे ही नदीच मुख्य साधन आहे. कॅपिलानो पानलोट क्षेत्रातून नदी वाहत जाते. 1954 मध्ये नदीवर क्लिव्हलॅंड धरण बांधण्यात आले आहे. उन्हाळ्यात बर्फ वितळून तर पावसाळ्यात पवसाच्या पाण्यामुळे नदीला बाराही महिने पाणी मिळते.
… मनोहर (बी. बी. देसाई)
Leave a Reply