इतर भारतीय भाषांचा व मुलुखांचा शोध :
हिंदी : हिंदीचे कोश आगरचे असे अर्थ देतात – अधीक, खान (खाण), गृह, ढेर, भंडार, आकर, समूह, कोष, निधि, खज़ाना, नमक जमाने का गड्ढा, अगार, आगार, छाजन (छप्पर), कुहर (छेद), घर, श्रेष्ठ, उत्तम, बढ़कर, चतुर, होशियार, दक्ष, कुशल.
हिंदीत आगरचे बरेच अर्थ मराठीसारखेच आहेत. आणि, तें साहजिकच आहे, कारण हिंदीसुद्धा मराठीप्रमाणेच संस्कृतोद्भव भाषा आहे. अर्थात् , ‘कोकणातील नारळी-पोफळीचा मळा’ हा अर्थ हिंदीत नाही, कारण तो महाराष्ट्रातील भूगोलाशी निगडित आहे. ‘आगरी’ हें हिंदीत आगर चें स्त्रीलिंग होतें. हिंदीत आगरीचा आणखीही एक अर्थ होतो, तो म्हणजे, ‘खानमजदूर’ (खाणमजूर). म्हणजेच, ‘आगर’(खाण)शी संबंधित. हिंदीत आगरी या शब्दाचा कोकणातील आगरी समाजाशी संबंधित अर्थसुद्धा मिळत नाहीं. तेंही साहजिक आहे, कारण आगरी समाज फक्त उत्तर कोकणातच आढळतो.
हिंदीत, आगर शब्दाशी साधर्म्य असलेले अन्य शब्दही आहेत. त्यांच्यावर जरा नजर टाकून पुढे जाऊं. ‘अगर’ म्हणजे ‘सुगंधिऔत लाकूड असलेलें एक प्रकारचें झाड, उदा. ‘ऊद’. (अगरबत्ती अथवा उदबत्ती हा शब्द आपल्याला सुपरिचित आहे.). मराठीतील चंदन या अर्थाशी हिंदीतील या अर्थाचें साधर्म्य आहे. आगर अथवा अगर या शब्दांशी साधर्म्य असलेले अन्य हिंदी शब्द असे – अगरना (क्रियापद), अगरा, अगरो, अगरु, अगार, अगारी. हे शब्द ‘अग्र’ या संस्कृत शब्दाशी निगडित आहेत. त्याशिवाय, अगराना (क्रियापद) म्हणजे ‘प्यार या दुलार से छूना’ (प्रेमानें/ वात्सल्यानें अंजारणें-गोंजारणें); अगरु म्हणजे अगर या झाडाचें किंवा ऊदाचें लाकूड ; अगरी म्हणजे अर्गला (कडी) तसेंच अनुचित अथवा वाईट बोलणें. ग्रामनामाचा विचार केल्यास, आगरा या शहराच्या नांवाचा संबंध ‘अग्र’शी आहे ; आगरा म्हणजे ‘आगे बढ़ा हुआ’. आडनांवाचा विचार केल्यास, उत्तरेत अगरवाल / आगरवाल हा बनिया समाज दिसून येतो ; त्यात वाल/वाला हा प्रत्यय आहे. त्या समाजनामाचा मूळ संबंध आगर म्हणजे कोठार / भांडार याच्याशी असावा, वनराईशी नव्हे.
उर्दू : उर्दूत जो ‘अगर’ शब्द आहे, (जो हिंदीतही वापरला जातो), त्याचा अर्थ आहे ‘जर’, ‘यदि’. आणि, हा अगर’ फारसीतील आहे. उच्चारसाम्य असलें तरी, त्याचा संस्कृतोद्भव ‘अगर’ किंवा ‘आगर’शी कांहीं संबंध नाहीं. उर्दूत अरबीमधून आलेला ‘अज्र’ असा एक शब्द आहे. त्याचा अर्थ आहे, ‘प्रत्युपकार’, किंवा
‘पुण्याचें फळ’. उर्दूत ‘अग़ाल’ असाही फारसीमधील शब्द आहे, ज्याचा अर्थ दिला जातो, ‘जंगल में भेड़-बकरियों के सोने का सुरक्षित स्थान’. पण या सर्व उर्दू-फारसी-अरबी शब्दांचा आपल्याला सध्या उपयोग नाहीं.
गुजराती : गुजरातीमधे आगर चा अर्थ खाण, समूह, उत्पत्तिस्थान इ. , म्हणजेच इतर संस्कृतोद्भव भाषांप्रमाणेच आहे. जरा तशाच उच्चाराचा आणखी एक गुजराती शब्द आहे ‘अगार’, म्हणजे ‘पहाणें’.
तो आपल्याला उपयोगी नाहीं.
त्रिपुरा : अतिपूर्वेला त्रिपुरामधे आगर शब्दाचा समावेश असलेले शहर आहे, ‘आगरतला’. इथें आठवण होते ‘अमृतानुभव’ची, ज्यात ज्ञानेश्वर म्हणतात – ‘बोल्हावतु कां मानसें । आगरातळीं’. त्यामुळे असें दिसतें की, दूर उत्तरपूर्वेतही आगरचा अर्थ संस्कृतोद्भव भाषांप्रमाणेच असावा.
Leave a Reply