नवीन लेखन...

आगर व आगरी : एक धांडोळा

A Historical Review of Agari Community

प्रास्ताविक :

Agari Community in Maharashtraमाझें शैशव गेलें महाराष्ट्रातल्या ‘देशा’वर (घाटावर) , आणि त्यानंतर मी होतो शिक्षणासाठी मध्य प्रदेश व बंगालमधें. (इथें, ‘देशावर’ म्हणजे, कोकणवासी ज्याला घाटावर म्हणतात, तो महाराष्ट्राचा पठारावरील प्रदेश. ‘देश’ म्हणजे भारतदेश ही संकल्पना इथें अभिप्रेत नाहीं). त्या काळात मला ‘आगर’ हा शब्द’ भेटला संस्कृत शिकतांना आणि मराठी भाषेत एक तत्सम शब्द म्हणून. सुप्रसिद्ध समाजसुधारक आगरकर यांच्या नावात व मिठागर यासारख्या शब्दांमधेंही ‘आगर’ आढळलें. कुळागर असाही शब्द दिसला. मुंबईला स्थायिक झाल्यावर, कोकणात अभिप्रेत असलेला ‘आगर’ चा अर्थ माहीत झाला. गुहागर, दिवेआगर, आगरवाडी, आगरीपाडा (आग्रीपाडा) अशी ग्रामनामेंही ऐकण्यात-वाचनात आली. माझ्या पत्नीचे आजोळ आहे रत्नागिरीजवळील भाट्याच्या खाडीला लागून असलेलें एक गाव, तोणदे . तिथें गेल्यावर कोकणातलें ‘आगर‘ मी घराशेजारी प्रत्यक्ष पाहिलें. ‘आगरी‘ या समाजाच्या नावाशीही मी मुंबईला आल्यावर परिचित झालो ; घाटावर लोकांना या समाजाचे नाव विशेष माहीत नाहीं. हल्ली मात्र टीव्हीवरील कॉमेडी शोज् मधे ‘आगरी’ बोली ऐकू येत असल्यामुळे, आख्ख्या महाराष्ट्राला हा शब्द सुपरिचित झालेला आहे.

आगर व आगरी असे किंवा त्यांच्यासमान शब्द इतर भाषांमधेसुद्धा आढळतात. त्या शब्दांचा समावेश असलेली गांवें व आडनावेंही इतरत्र दिसतात. म्हणून, या शब्दांचा मराठीत , इतर भाषांमधे, आणि अन्य मुलुखांमधे धांडोळा घेऊन, त्यातून काय माहिती मिळते हे पहाण्याचा हा प्रयत्न.

आगरी :

महाराष्ट्र शब्दकोश व मराठी व्युत्पत्ति कोश सांगतात की, ‘आगरी’ हा शब्द शके १२८९ (इ.स. १३६७)च्या नांगाव येथील यादवकालीन शिलालेखात प्रथम लिखित स्वरूपात आढळतो. तें वाक्य असें आहे:

“ हें दान वरत सकोश कवळिआ मुख्य करुनि समळि आगरियां मागिउडिळि ”.

गेली ६५० वर्षें आगरी हा शब्द लिखित स्वरूपात मराठीमधे आहे. म्हणजेच, या शिलालेखापूर्वी १००-१५० वर्षें तरी, किंवा त्याहून अधिक काळ, तो शब्द बोलचालीच्या, रोजच्या व्यवहाराच्या, भाषेत प्रचलित असलाच पाहिजे, अन्यथा त्याचा समावेश शिलालेखात झालाच नसता. मराठी भाषेतील शिलालेख व साहित्यात मराठी भाषेचे उल्लेख देवगिरीच्या यादव नृपतींच्या कांही शतकें आधीपासून आढळत असले (उदा. इ.स. ९८१ चा श्रवणबेळगोळा येथील शिलालेख, ज्यात ‘चामुंडरायें करवियले’ असा उल्लेख आहे), तरी शिष्टसंमत मराठी भाषेची सुरुवात मुकुंदराज-ज्ञानेश्वर यांच्या काळापासूनच मानली जाते. (त्या काळापूर्वी ‘महाराष्ट्री’ प्राकृत, ‘अपभ्रंश’ भाषा अशा भाषा प्रचलित होत्या). मुकुंदराजाचा ‘विवेकसिंधु’ साधारणपणे इ.स. ११८८ चा, महिमभट्टाचें ‘लीळाचरित्र’ १२३८ च्या जवळपासचें, व ज्ञानेश्वरांची भावार्थदीपिका अर्थात् ज्ञानेश्वरी १२९० च्या आसपासची. म्हणून, असा निष्कर्ष काढायला हरकत नाहीं की, मराठी भाषेच्या सुरुवातीच्या काळापासून ‘आगरी’ हा शब्द प्रचलित असावा. त्याचा उगम त्याही आधीचा असणार.

‘आगरी’ या शब्दाचा अर्थ मराठी शब्दकोश देतात तो असा : एक कुणबी जात, आगरो-कुणबी, कोळ्यांपैकी एक जात, मिठागारातील कामकरी, शेतकरी, बागवान, बागाईतदार.’ (कुणबी घाटावरही आढळतात, पण आगरी हे कुणबी असले तरी, फक्त कोकणातच आहेत). ‘डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी’ सांगते की, आगरी हा शब्द संस्कृत ‘आगरिक’ (म्हणजेच, शेतकरी) या शब्दापासून उद्भवला आहे. ‘आगरिक’ हा शब्द ‘आगर’ पासून बनलेला आहे, हें स्पष्ट आहे. [ जसें, आकरिक (म्हणजे खाणीवर देखरेख करण्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ति), किंवा नागरिक ]. ‘आगरीगाव’ अथवा ‘आगरगाव’ म्हणजे आगरें असलेलें गाव. ‘आगरी बोली’ ठाणे व रायगड (कुलाबा) या भागात बोलली जाते, असेही हे कोश नमूद करतात.

‘आगर’ या शब्दाला ‘ई’ हा प्रत्यय लागून मराठीमधे आगरी हा शब्द बनला आहे, असे दिसते. जसें कोल्हापुरी, सातारी, नगरी, कोकणी, खानदेशी इत्यादी; तसेंच आगरी. त्यानुसार आगरी म्हणजे ‘आगरातला, आगराचा, आगराशी संबंधित, आगरावर उपजीविका करणारा’, असा अर्थ होतो. अशा अर्थाचा ‘ई’ हा प्रत्यय आपल्याला संस्कृतमधे, इतर संस्कृतोद्भव भाषांमधे व उर्दूतही दिसतो. उदा. महाराष्ट्री, देवनागरी, अर्धमागधी, हिंदी, गुजराती, बंगाली, आसामी, मलयाली (मल्याळी); (शायर) (हफीज) जालंधरी, (शायर) (मजरूह) सुलतानपुरी, आजमगढ़ चे म्हणून (शायर) (कैफी) आजमी, इत्यादी .

म्हणून, आपण ‘आगर’ या शब्दाचा शोध घेणें इष्ट होईल.

आगर :
विविध मराठी शब्दकोशांमधे ‘आगर’ शब्दाचे बरेच अर्थ दिलेले आहेत. कृ. पां. कुलकर्णी यांचा मराठी व्युत्पत्ति कोश सांगतो, (व इतर कोशही सांगतात), की, आगर या शब्दाचा उगम ( वेगवेगळ्या अर्थांच्या दृष्टिकोनातून) संस्कृतमधील ‘आकर’ (खाण, प्रचुरतेचें स्थान, समूह, श्रेष्ठ, इ.), ‘आगार’ (बाग, मळा, साठा इ.), ‘अग्र’ (टोक), ‘अज्र’ या शब्दांपासून झालेला आहे. त्यांपैकी ‘अज्र’ हा शब्द वैदिक-संस्कृतमधील आहे ; तो आधुनिक काळच्या संस्कृत कोशांमधे सापडत नाहीं.

‘आगर’ शब्दाचे विविध अर्थ असे आढळतात : बाग, मळा, फळझाडांचा-मळा, झाडांची राई (वनराई), (कोकणातील) नारळी-पोफळी(सुपारी) ह्यांचा मळा, उद्यान, शेत, आवार, परसूं, आलय, घर, गृह, छप्पर, घराभोवतीच्या आवारात भाजीपाला लावण्याची जागा (आगरभुवन), कुंपण, चंदन (अगरचंदन असाही शब्द आहे), समुद्रकिनार्यावर किंवा खाडीजवळ मिठाचें क्षेत्र (मिठागर, सॉल्ट-पॅन. याला आगरपाव्ह असेंही नांव आहे), आगरात उत्पन्न होणारा पदार्थ, खाण, साठा, ठेवा, संचय, कोष, निधि, संग्रह, खजिना, कोठार, भांडार, स्थान, रहाण्याचें-स्थान, वसतिस्थान, संग्रहस्थान, उत्पत्तिस्थान, कांहीं विशेष गुणांचें किंवा प्रचुरतेचें / वैपुल्याचें स्थान, खूप-अधिक, श्रेष्ठ, उत्तम, चतुर, दक्ष, कुशल.

मराठी व्युत्पत्ति कोशातील टिप्पणी महत्वाची आहे – ‘मिठागर वगैरेतील आगर शब्द संस्कृतोत्पन्न नसावा अशी शंका येते.’ तसेंच, हेंही वाक्य – ‘(आकर व आगर) या दोन अर्थाचे शब्द निराळे असून त्यांची मुळेंही निराळी असावीत’.

आतां थोडें इतर भाषांकडे पाहूं या.

कोकणी : कोकणी (गोमंतकी) भाषेत ‘आँगर’ असा शब्द आहे, असें महाराष्ट्र शब्दकोश सांगतो. त्याचा अर्थ आहे कुंपणाचें बेडें , किंवा दुबेळकें लाकूड. पहिली गोष्ट म्हणजे, कोकणी भाषेत सानुनासिक उच्चार होतात. हें म्हटल्यावर, मराठीतील आगर आणि कोकणी भाषेतील आँगर, यांच्यातील साम्य वेगळें सांगायला नको. आणखी एक गोष्ट. दुबेळकें लाकूड बेड्याला वापरतात, अन् बेडें कुंपणात घातलें जातें, व कुंपण आगराला-बागेला-शेताला घातलें जातें. असा कोकणी भाषेतील अर्थाचा मराठीतील अर्थाशी संबंध जोडता येतो. कोकणी भाषेप्रमाणेंच, महाराष्ट्राच्या कोकण भागातील मराठीच्या बोली देखील कमीअधिक प्रमाणात सानुनासिक आहेत, जसें मालवणी, संगमेश्वरी. तसेंच, कांहीं दशकांपूर्वीपर्यंतच्या काळात कोकणामधील माणसें शिष्टसंमत-मराठीसुद्धा सानुनासिक बोलत असत. आणि, चित्पावनांच्या पुणें शहरातील वास्तव्यामुळे तेथील चित्पावनही अगदी काही दशकांपूर्वीपर्यंत सानुनासिक बोलत. [चित्पावनांच्या ‘चित्पावनी’ बोलीचा, (जी आतां महाराष्ट्रात नामशेष होऊं घातली आहे; परंतु कर्नाटकात पूर्वीच्या काळी स्थायिक झालेले चित्पावन अजूनही घरी ती वापरतात, असा उल्लेख आढळतो), अभ्यास केल्यास, कदाचित् आगर-आँगर याबद्दल कांहीं अधिक माहिती मिळूं शकेल ]. हे सानुनासिक उच्चार ध्यानात घेतल्यावर, आंग्रे (आंगरे-आँगरे) या आडनावाचा ‘आगर’शी संबंध कदाचित जोडता येऊं शकेल. ( आगरकर किंवा आंग्रे या आडनावांची मंडळी आगरी समाजातील नाहीत, हे खरे ; पण, या आडनावांवरून हें नक्कीच स्पष्ट होतें की, ‘आगरा’शी कोकणातील सर्व सामाजिक स्तर संबंधित होते ).

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..