आपण प्रेमात का पडतो ?, याला जस नेमकं उत्तर देता येत नाही ,तसेच एखाद गाणं आपल्याला का आवडते ? ,याचेही उत्तर कधी कधी सापडत नाही . बस ,ऐकायला आवडत !असेच एक गाणं आहे ,जे मला आवडत . आणि हि आवड गेल्या पन्नास वर्षा पासून कायम आहे !
‘ कजरा मोहब्बत वाला , अखियोंमे ऐसा डाला ,
कजरे ने लेली मेरी जान ,हाय रे मै तेरे कुर्बान ‘
हे गाणं आहे ‘किस्मत ‘ सिनेमातलं . तसे पाहायला गेलं तर काय आहे या गाण्यात ?ना हळुवार भावना , ना दर्द भरी दास्तां ,ना इमोशन , ना कसला फिलॉसफीकल संदेश ! आहे ती , निखळ करमणूक ! मस्त लाईट मूड असावा ,त्यात हे गाणं लावावं आणि मनसोक्त धिंगाणा करावा . गंभीर प्रकृतीच्या लोकांसाठी हे थिल्लर किंवा उडाणटप्पू गाणं ,पण आमचं ‘दिल तो पागल है ‘ त्याला आवडत हे ‘मोहब्बतवाल ‘गाणं .
१९६८ साली हे गाणं एस . एच . बिहारी यांनी ‘किस्मत ‘ साठी लिहलं . सिनेमात हे एक स्टेज परफॉर्मन्स गाणं . गुंडाना चकमा देण्यासाठी बबिता आणि बिश्वजित एका थेटर मध्ये घुसतात . दोन कलावंतांची गठडी वळून ,त्यांचा पोशाखात स्टेज वर गाणं म्हणतात अशी काहीशी कॉमिक सिच्युएशन या गाण्यासाठी वापरली आहे . त्यात कहर ,बबिता पुरुषाच्या आणि बिश्वजीत स्त्री वेषात स्टेज वर धडकतात !
बबिता (पुरुष वेशातील ) साठी आशा भोसले आणि बिश्वजीत (स्त्री वेशातील ) साठी शमशाद बेगम गायल्या आहेत . संगीतकार आहेत ओ . पी . नय्यर . ओ . पी . ,आशा आणि शमशाद बेगम अफलातून कॉम्बिनेशन , धमाक्याची गॅरंटी !
ओ . पी . म्हणजे क्रांतिकारी हिंदी सिनेसंगीतकारा पैकी एक , पहिले गुलाम हैदर , दुसरे सी . रामचंद्र , तिसरे ओ . पी . नय्यर ( चौथे आर .डी . बर्मन आणि पाचवा ए . आर . रहमान ! ) ! त्याकाळी दिग्गज लता मंगेशकरां शिवाय आपली कारकीर्द यशस्वी करणारा अवलिया ! मला शास्त्रीय संगीतातलं ओ कि ठो कळत नाही असे उघडपणे सांगणारा संगीतकार ! तरी ‘ फागुन ‘ मधील सर्व गाणी ‘पिलू ‘रंगात पेलणारा किमयागार !, ‘ऱ्हिदम किंग ‘ !, हिंदी सिनेमाचा अनाभिषिक्त ‘ठेके ‘दार ! या बंडखोर माणसासाठी स्वतंत्र लिहावं लागेल . असो . त्याचा संगीतातल हे ठुमकेदार गाणं . मना बरोबर पायालाही नाचवणार !
बिहारींच्या शब्दांना आणि ओ . पी . च्या चालीला आवाजाच्या गोफणीतून रसिकांना घायाळकरणारा ‘मारा ‘ केलाय आशा भोसले आणि शमशाद बेगम यांनी . आशा भोसले आणि ओ . पी . अनोखं मिश्रण . आशा भोसले ओ . पी . साठी भरपूर गायल्या आहेत . भरपूर म्हणजे किती ? तब्बल एकशे पासष्ठ सोलो आणि एकशे चौरेंचाळीस डुएट ! ओ . पी .च्या गाण्याला काय हवं हे त्यांना सांगायची जरूर नसायची ! त्याचा या गाण्यात प्रत्यय येतोच . आशा ओ . पी .साठी शेवटची गायली ,ते १९७३सालच्या ‘टॅक्सी ड्रॉयव्हर ‘ मध्ये .
या गाण्याची दुसरी गायिका आहे शमशाद बेगम . थोडासा ‘रफ ‘ आवाज ,पुरुषी थाटाचा वाटावा असा . ह्या गाण्यात बिश्वजीतला तो फिट बसलाय ! ती अशीच स्त्री वेशातील शम्मीकपूर साठी पण गायलीय ‘ब्लफ मास्टर ‘ मध्ये ! ओ . पी. ना जसे गाण्यातले काही कळत नव्हते ,तसेच शमशाद बेगमला पण गाण्याचे रीतसर शिक्षण नव्हते ! गाण्याची आवड होती . शमशाद बेगमच्या एक गुण म्हणा किंवा वैशिष्ट्य म्हणा होते . संगीतकार कोणीही असो ,सहगायक कितीही दिग्गज असो , हि आपला ‘ बिन्धास ‘ आवाजात ,टेचात गाऊन जायची ! या गाण्याच्या वेळेस तिने वयाची चाळीशी पार केली होती , आणि आशा भोसले त्यामानाने कोवळी होती . या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेस ओ . पी . शमशाद बेगमवर जाम खूष होता . ‘देखो , कैसे आशा से टक्कर दे राही है ! ‘ असे कौतुकाने म्हणाला होता . तिचा आवाज होताच तसा . काही नायिका ‘हॉट ‘सिनेमुळे पडद्याला ‘आग ‘ लावतात असे म्हटले जाते . पण ‘आवरा ‘मधील शमशाद बेगमच्या आवाजातील -एक ,दोन ,तीन ,आज मोसम है रंगीन –या गाण्याने अख्खे थेटर पेटलं असेल ! (मी हे गाणे यु ट्यूब वर पहिले –भन्नाट !)
हे गाणं बबिता आणि विश्वजितवर चित्रित केलाय . स्त्री वेशातील बिश्वजीत काय थुई-थुई नाचलाय ! वा !. पुरुष वेशातील बबिता गोड दिसते ,पण काही शॉट मध्ये बिश्वजीतने तिला ‘खाऊन ‘ टाकलंय !
या गाण्यात आशा भोसले आणि शमशाद बेगम च्या आवाजा बरोबरच हार्मोनियमचा पण सुंदर वापर करून घेतला आहे . हा छोटुकला हार्मोनियमचा पीस ,गाण्याचा ब्युटी स्पॉट होऊन गेलाय !
२०११ सालच्या ‘तन्नू वेड्स मन्नू ‘ मध्ये हे गाणं उचललंय . एका गोष्टीचे समाधान वाटले कि हे ‘जशे त्या तशे ‘उचललंय , त्याच अभद्र रिमिक्स केलेलं नाही . त्रेचाळीस वर्षा नंतरही या गाण्यातील ‘लय आणि गोडवा ‘ कालबाह्या वाटत नाही , पूर्वी इतकाच तो टवटवीत आहे ! या ‘तन्नू वेड्स मन्नू ‘तल्या गाण्याचेहि एक वैशिष्ट्य आहे , कंगनाचा अफलातून परफार्मन्स ! काय एनर्जी लावून वेड्या सारखी नाचलीय ! झकास ! हे गाणे तिच्या (अभिनयाच्या )प्रेमात पडण्यासाठी, एक अजून कारण देऊन गेलाय ,किमान माझ्या साठी तरी !
मग ,पहाणारना हे गाणं ? कि फक्त ऐकणार ? दोन्हीतही करमणूक आहे येव्हड मात्र नक्की .
सिनेमा ——किस्मत (१९६८)
गीत ———एस . एच . बिहारी
संगीत ——ओ . पी . नय्यर
गायकी —–आशा भोसले , शमशाद बेगम
— सु र कुलकर्णी
आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye .