शाळेतल्या मुलांच्या पाण्याच्या बाटल्या घरी जाताना बहुतेकवेळा अर्ध्या भरलेल्या असतात. घरी गेल्यावर हे पाणी बेसीनमध्ये ओतून टाकलं जातं. ते अर्थातच वाया जातं. हजारो मुलांकडून असं हजारो लिटर पाणी वाया जातं… तेही दररोज.
यावर पुण्यातल्या पिंपरीमधल्या एका शाळेने एक नामी शक्कल लढवली. “सिटी प्राईड स्कूल” ही ती शाळा. त्यांनी असा नियम केला की सगळ्या मुलांनी घरी जाताना बाटलीतलं उरलेलं पाणी शाळेतच ठेवलेल्या एका पिंपात जमा करायचं. असं जमा केलेलं पाणी शाळेच्या बागेतल्या झाडांना घातलं जातं.
आतापर्यंत जितकं पाणी जमा केलंय त्यावरुन अंदाज काढलाय की एका वर्षात या एकाच शाळेत किमान १ लाख लिटर्स पाणी जमा होईल.
आता जवळपासच्या इतरही शाळांनी त्यांचा कित्ता गिरवायला सुरुवात केलेय.
अशा शाळांच्या व्यवस्थापनाचे आणि त्यातील मुलांचेही कौतुक केले पाहिजे. पाणी तयार तर करता येत नाही, पण वाचवता तर येते.. वाचवलेला एक-एक थेंब महत्त्वाचा आहे…