नवीन लेखन...

एका कलाकाराची छबी

मिशी ठेवणार्‍या एका कलाकाराने हॉलीवूडमधे प्रवेश केला.  तीन वर्षात ऑस्कर नामांकन व तीन गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळवले. पहिल्या  हॉलीवुडपटात  उत्कृष्ट  दिग्दर्शकाबरोबर व प्रसिद्द  नटासोबत  काम  करून त्याने  आपली  भूमिका  अजरामर  केली.  या चित्रपटात ना कोणी स्त्री कलाकार ना ठासून मारामारी.  बस!  फक्त चांगला दिग्दर्शक आणि त्याचे ऐकणारे एवढेच होते ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ या 1962 च्या चित्रपटात. प्रिय पत्नी, पहिले महायुद्ध व रशियन क्रांती या तिढ़यात सापडलेला कविमनाचा ‘डॉक्टर झिवागो’ त्याने साकारला 1965 मधे. ‘फन्नी गर्ल’ या 1968 च्या चित्रपटात त्याने बार्बरा स्त्रिसॅन्ड बरोबर काम केले. ‘चेंगीझ खान’ व ‘मेकेन्नास गोल्ड’ मधूनही तो रूपेरी पडद्यावर झळकला.  हाताने पत्र लिहीण्याच्या व पोस्टमने पत्र पोचवण्याच्या काळात, त्याला आलेल्या प्रेमपत्रांची व मागण्यांची संख्या होती एक महिन्यात ३०००! सुरुवातीची कारकीर्द इजिप्त मधे अरेबिक चित्रपटात घडवलेला व पुढे इंग्रजी येत असल्याच्या गुणावर हॉलिवुड्चा झालेला हा थोर कलाकार म्हणजे ‘ओमर शरीफ’. तरुणींच्या दिलाची धडकन ‘ओमर शरीफ’.

मी ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हा चित्रपट आय्. आय्. टी. त असताना पहिला. प्रचंड उन्हाच्या काहीलीने अस्पष्ट बनलेल्या हवेच्या पडद्याआडून उंटावर स्वार झालेला ‘अली’ हळुहळु दिसायला लागतो. कसलेला नट पीटर ओ टूट हा नायक. पण भाव खाऊन जातो नवखा ओमर शरीफ. अँथनी क्विन, ग्रेगरी पेक पासून आताच्या आँटोनिओ बांदेरास यांच्या सोबत कारकीर्द घडवलेला ओमर शरीफ खूप प्रसिद्ध झाला. लहानपणी आईच्या हातचा फटका न खाल्लेले दिवस आठवावेच लागतील असे म्हणणारा ओमर आईविषयी कृतज्ञ होता. त्याच्या कारकिर्दीतील २५ वर्षे एकाही हिट चित्रपटाशिवाय गेली. प्रसिद्धीची घसरण त्याने आपल्या दुसर्‍या गुणाने सावरली, नव्हे प्रसिद्धी वाढवलीही. रसिकांवर मोहिनी घालणार अक्रुत्रिम, उमदं व्यक्तिमत्व त्याला लाभलं होतं. हॉलिवूडमधे काम करीत असताना तो ‘फ्रेंच’ बनला होता. उतारवयात तो पुन्हा मायदेशी इजिप्तला परतला. वयाच्या सत्तरीत रागाच्या भरात केलेल्या कृत्यांमुळे साधी कैद, दंड, प्रोबेशन यासारख्या शिक्षाना तो सामोरा गेला. ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ या चित्रपटावर तुर्कस्तानमधे काही काळ बंदी होती. आरिकन या तुर्की पत्रकाराने म्हटले होते, “It wasn’t that just girls wanted to be with him and all the boys wanted to be him, Omar was icon and idol of young people in the Middle East.”. जुलै २०१५ मधे ओमर शरीफच्या निधनानंतर याच पत्रकाराची प्रतिक्रिया होती, “My mother will be devastated on hearing the news”. कारण, आज ७५ च्या पुढे वय असणार्‍या महिलांचा तो त्या काळी हीरो होता. प्रसिद्धि वाढवणारा त्याचा दुसरा गुण होता ‘ब्रिजपटुत्व’.

ओमर शरीफ उत्तम ब्रिज खेळणारा होता. या खेळात त्याने इजिप्तचे प्रतिनिधित्व केले. जगातील गुणवान व अग्रगण्य खेळाडूना घेऊन त्याने ‘ओमर शरीफ ब्रिज सर्कस’ सुरू केली. ‘शिकागो ट्रिब्युन’ या वृत्तपत्रात त्याने ब्रिजविषयी स्तंभलेखन केले, पुस्तके लिहिली. माझी ब्रिज खेळण्याची आवड मला या कलाकारापर्यंत घेऊन गेली. जेथे असेन तेथे मी ब्रिज खेळत होतो. चांगल्या खेळाडूंचा खेळ पाहणेसुद्धा आनंददायक असते. अशी संधी मी कधीच सोडली नाही. १९९६ च्या जानेवारीत लंडन येथे मला ओमर शरीफचा खेळ पाहण्याची संधी मिळाली. खेळाडू व कलाकार असे दुहेरी वलय लाभलेला होता तो. केव्हा एकदा ऑफीसमधुन निघतोय व पोर्टलॅंड स्ट्रीट जवळील ‘व्हाईट हाउस’ हॉटेलमधे पोचतोय असे मला होत असे. Times-Macallan ने प्रायोजित केलेल्या या स्पर्धेत जगातील सर्वोत्तम १६ जोड्या भाग घेत.  हॉटेलच्या भव्य दालनात ८ टेबलवर खेळ सुरू होता. पण माझे लक्ष एकाच टेबलकडे गेले. ‘Lights, Camera, Action’ हे शब्द फक्त चित्रीकरणाच्या ठिकाणी असतात. अन्यत्र नाही. पण त्या टेबलवर दिग्दर्शकाच्या सूचनेशिवाय लाइट व कॅमेरा सुरू होता. एक्शनचा भाग साकारत होता ओमर शरीफ. समोर दिग्दर्शक नव्हता तर त्याचा पार्ट्नर होता, झिया महमूद. मूळ पाकिस्तानचा पण नंतर अमेरिकन झालेला. ब्रिज वर्तुळात प्रचंड लोकप्रिय, अत्यंत संयमी व तल्लख बुद्धीचा, सी.ए. असलेला झिया. माझी पावलं त्याच टेबलकडे वळली. अनेक पत्रकार, कॅमेरामन व प्रेक्षक यांच्या घोळक्यात मीही शिरलो. प्रखर प्रकाशझोतात ते दोघे खेळावरील लक्ष जरासुद्धा विचलित होऊ देत नव्हते. दीड तासानंतर सत्र संपले. निकाल जाहीर होऊन पुढील खेळ सुरू होण्यास वेळ होता. टेबलाभोवतीची गर्दी ओसरली. पाय मोकळे करण्यासाठी हिंडत असताना मी ओमर-झिया या दोघांना फोटोसाठी विनंती केली. त्यांनी ती मानली. चार सेकंदात फोटो घेतला. ‘अजि मी ब्रह्म पहिले’ ची भावना काय असते ते मी अनुभवले. या स्पर्धेच्या तीन दिवसात मी सकाळी आठ वाजता घरातून निघून रात्री अकरा वाजता परतत होतो. मधल्या काळात ऑफिस आणि White House Hotel. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व जोड्यांचे फोटो घेतले. शिवदासानी-घोष ही भारतीय जोडी खेळत होती.

स्पर्धा संपल्यावर ऑफीसमधील मित्राना मी फोटो दाखवले व कोणी ओळखीचे दिसते का विचारले. माझ्या भारतीय व ब्रिटीश सहकार्यांनी ‘ओमर शरीफ’ ला ओळखले. “तुला कसे समजले?” या प्रश्नाचे उत्तर मी “ब्रिज खेळामुळे” असे दिले. पुढील वर्षापासून जानेवारी महिना माझ्यासाठी पर्वणी ठरली. वीस वर्षानंतरही मला या घटना स्पष्ट आठवतात. ख्रिश्चन (कॅथोलिक) धर्मातून इस्लाम धर्मात प्रवेश करताना नावात काहीतरी ‘नोबल’ असावे म्हणून त्याने ‘शरीफ’ चा स्वीकार केला. ‘Acting is my profession and Bridge is my passion’ अस तो म्हणत असे. ओमर शरीफ च्या कलाकार व खेळाडू या गुणांना ‘Charismatic Personality’ हे वर्णन यथार्थ लागू पडते.

मला प्रश्न असा पडतो की, नंतरच्या काळात दोहा येथील एका समारंभात एका व्यावसायिक महिला छायाचित्रकारावर चिडलेला अभिनेता ‘ओमर’ माझ्यासारख्या हौशी चाहत्याला फोटोसाठी पोज देताना ब्रिजपटू ‘शरीफ’ कसा झाला होता?

 

ओमर शरीफ व झिया महमूद (पाठमोरा)

झिया महमूद (उजवीकडे) व एरिक रॉडवेल (मधे)

Avatar
About रविंद्रनाथ गांगल 36 Articles
गणित विषयात M.Sc. पदवी. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (TCS) काम. निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्य. वैचारिक लेख, अनुभवावर आधारित व्यक्तीचित्रे, माहितीपूर्ण लेख लिहिण्याची आवड आहे.Cosmology व Neurology चा अभ्यास. ब्रिज स्पर्धांमधे सहभाग.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..